सहजीवन व्याख्यानमाला : पुणेकरांसाठी वैचारिक पर्वणी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
विविध क्षेत्रांतील तब्बल ८९ नामवंत वक्त्यांनी आतापर्यंत गाजवलेल्या सहजीवन व्याख्यानमालेत यंदाही अनेकविध विषयांवरील तज्ज्ञांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे. हैदराबाद बलात्कारप्रकरणी विधिज्ञ उज्ज्वल निकम, महाआघाडीच्या सरकारविषयी विश्लेषक विनय हर्डीकर, मंदिरांच्या सौंदर्याविषयी डॉ. गो. बं. देगलूरकर आदी सात पुष्पे यांत गुंफली जातील.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी आणि सचिव उदय कुलकर्णी यांनी या व्याख्यानमालेची माहिती दिली. पुण्यातील सहकारनगरच्या मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे पाच ते अकरा जानेवारी दरम्यान सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात ही व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पाच जानेवारीला राजकारण, समाजकारणाचे ज्येष्ठ आणि परखड विश्लेषक विनय हर्डीकर गुंफणार आहेत. भाजप-शिवसेना युती सत्तेत यावी, असा कल मतदारांनी बहुमतानं नोंदवला होता. मग शिवसेनेने विरोधकांशी आघाडी करणे तसेच गेली पाच वर्षे ज्यांच्या सत्तेविरोधात आपण उभे राहिलो त्यांच्याबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेवर बसणे, हा जनादेशाचा अनादर ठरतो का…? म्हणजेच “महाआघाडी हा जनादेशाचा अनादर आहे का ?’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल.
सहा जानेवारीचे दुसरे पुष्प ग्रंथ अभ्यासक संजय भास्कर जोशी “नेमकं काय वाचाल ?’ या विषयावर गुंफतील. “वाचाल तर वाचाल’ असा इशारा दिला जातो, पण “नेमकं काय वाचावं, अभिजात साहित्यातील कोणते मैलाचे दगड ओलांडावेत, टिपणं कशी घ्यावीत, साहित्य क्षेत्रातील प्रवाह काय आहेत’, या प्रश्नांची उत्तरं जोशी देतील.
तिसरे पुष्प – “मंदिरांसारखी मंदिरं… त्यात बघायचयं काय ?”, असं विचारलं जातं, पण मंदिर उभारणी हे शास्त्र आहे. मंदिरांच्या सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा, हे महाराष्ट्रातील मंदिरांच्या उदाहरणांसह अन त्यांच्या छायाचित्रांसह समजावून देतील ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर सात जानेवारीला ‘महाराष्ट्रातील मंदिरांचे सौंदर्य’ या विषयावरील व्याख्यानात. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातली नवी पर्यटन स्थळं कळतील.
बाई आणि दारू यांच्यात गुरफटलेला पाटील अन ‘मेरे देश की धरती’ म्हणत पडणारी धान्याची रास एवढीच ग्रामीण भागाची जुजबी माहिती शहरातील मंडळींना असते. प्रत्यक्षात भारत कसा आहे?, ग्रामीण भारताचे खरे प्रश्न कोणते आहेत?, याची अचूक माहिती शहरवासियांना नसते.
देशातील सहा लाख गावांपैकी तब्बल ८५ हजार गावांची माहिती असलेले अन त्यापैकी हजारो गावे प्रत्यक्ष फिरलेले प्रदीप लोखंडे आठ जानेवारीला “इंडिया’तील खरा, अस्सल भारत उभा करतील “भारत आणि इंडिया’ या व्याख्यानात… देशाकडं पाहण्याची आपली दृष्टीचं बदलून जाईल.
हैदराबादेतील तरूणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांचं पोलिसांनी ‘एन्काउंटर’ केलं आणि “नराधमांना शिक्षा मिळाली, बरं झालं” असं म्हणून या कृत्याचं समर्थन बहुसंख्य देशवासीय करीत असतानाच “न्यायदानाला विलंब नको, पण एन्काउंटर कितपत बरोबर आहे’, असे प्रश्नही क्षीण आवाजात का होईना, पण विचारले जात आहेत.
कसाबला फाशीच्या दोरापर्यंत नेणारे अन रोखठोक मतं असणारे देशाचे भूषण असलेले वकील उज्ज्वल निकम आपलं मत सांगतील नऊ जानेवारीला ‘हैदराबाद बलात्कार आणि न्याययंत्रणेचे प्रश्न’ या विषयावरील व्याख्यानात.
‘पानिपत’ चित्रपट सध्या गाजतो आहे…, “पानिपतात लाख बांगडी फुटली, मराठ्यांचा दारूण पराभव झाला”, असं आपण ऐकतो, पण हा पराजय हा खरंच पराजय होता का ? त्यानंतर परकी शक्तीला आपल्याकडं तोंड वर करायची ताकद राहिली नाही, हे खरंय का ? संशोधनानं सिद्ध झालेलं मत ऐकवतील ‘पानिपत’ चित्रपटाला भरपूर योगदान दिलेले इतिहासाचे तळमळीचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे दहा जानेवारीला “पानिपतमध्ये मराठे जिंकले का हरले ?’ या व्याख्यानात. हे व्याख्यान ऐकून आपण पानिपत चित्रपट पाहिला तर आपली दृष्टी बदललेली असेल.
हृदयापासून ते एकंदरीत आरोग्यरक्षणापर्यंतच्या उपचारांमध्ये औषधांबरोबरच आध्यात्मिक साधनाही पूरक असते. धार्मिक साधकाचे हे मत नाही तर रोज चार-पाच एन्जिओप्लास्टी, महिन्यातून बऱ्याच बायपास सर्जरी करणाऱ्या अन ज्यांना भेटण्यासाठी किमान चार तास रांग लावावी लागणाऱ्या तज्ज्ञाचं हे मत-प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्याला केवळ उपचारांसाठी नव्हे तर रोजच्या जगण्यासाठीचाही सल्ला डॉ. सुनील साठे अकरा जानेवारीच्या ‘उपचारात अध्यात्माची उपयुक्तता’ या विषयावरील व्याख्यानात देतील.
ही व्याख्यानमाला मोफत असून दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी भरपूर पार्किंग मुक्तांगण बालरंजन केंद्राच्या आवारात उपलब्ध असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.