आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक पराक्रमी कुलदीपक जन्माला आला.
शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही.
चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द पाहणे माउली सईबाईंच्या नशिबी नव्हतेच मुळी!
युवराज संभाजी अवघे २ वर्षांचे असताना त्यांनी कैलासाची वाट धरली.
जन्मदात्या आईचे छत्र जरी हरवले असले तरी शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या छत्रछायेखाली युवराज संभाजी तयार होत होते.
आपल्या पुत्राने स्वराज्याची गौरवपताका यशस्वीपणे पुढे न्यावी, या हेतूने युवराज संभाजी लहान असल्यापासूनच शिवाजी महाराजांनी भावी छत्रपती म्हणून त्यांना घडवण्यास सुरुवात केली होती.
शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाले, की सोबत संभाजी राजांना आवर्जून नेत असत. तसेच स्वत:हून सैन्याची लहानगी तुकडी पाठवून संभाजी राजांना त्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगतं.
शिवाजी महाराज राज्यकारभाराची प्रत्येक बाब त्यांच्या मनावर बिंबवत होते. त्याच दरम्यान संभाजी राजांना त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले.
औरंगजेबासोबतच्या आग्रा भेटीचा तो क्षण!
महाराजांनी विश्वासाने औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकारले. सोबत गेलेले संभाजी महाराज वयाने लहान असूनही न डगमगता धिटाईने औरंगजेबाला सामोरे गेले.
तेव्हा औरंगजेबाला वाटलेही नसेल की हाच शिवपुत्र पुढे जाऊन आपल्याले जगणं असह्य करणार आहे. आग्र्यात बंदी असताना शत्रूच्या गोटात राहून संभाजी राजांना अनेक गोष्टी शिकता आल्या.
पुढे आग्र्यातून निसटणं, वेषांतर करून दीर्घकाळ स्वराज्यापासून दूर राहणं, नानाविध प्रदेशांचा आणि परिस्थितींचा अनुभव घेणे या सर्व घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.
आणि भावी छत्रपती म्हणून स्वराज्यासाठी हे सर्व कष्ट सहन करण्याला ते आपले कर्तव्य मानू लागले.
१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ऍबे कँरे नामक एका फ्रेंच प्रवाश्याने संभाजी महाराजांचे केलेलं वर्णन त्यांच्यातील कुशल राज्यकर्त्याची पावती देण्यास पुरेसे आहे.
“हा युवराज लहान आहे, तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे.
“तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे.”
“सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.
केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आस त्यांची मनात रुजू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी छोट्या. परंतु अनेक यशस्वी मोहिमा हाताळल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्यावर आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीमध्ये रडत न बसता संभाजी राजांनी स्वत:ला सावरले आणि स्वराज्याचा डोलारा हाती घेतला.
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.
आता ते स्वत: छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल रयतेमध्ये पसरलेले गैरसमज दूर करून आपण देखील आपल्या पित्याप्रमाणे स्वराज्य अजून १०० वर्षे पुढे नेऊ शकतो हे त्यांना सिद्ध करायचे होते.
विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले.
संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा ९ वर्षांचा काळ हा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण हाच काळ संभाजी महाराजांना महापराक्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे.
केवळ २३ वर्षांचे संभाजी महाराज औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी घेरेले गेले होते. गनिमांकडे दांडगा अनुभव होता पण संभाजी महाराजंकडे होती महत्त्वकांक्षा! याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना पळो की सळो करून सोडले होते.
गोव्यातील पोर्तुगीजां विरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वत:हून खाडीमध्ये उतरुन त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले.
कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली. बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी रयतेला आपलेसे केले. प्रजा त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती.
लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजाने झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापाला होता.
संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजाने त्याला दक्षिणेत यावे लागले. पण त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कुठले?
‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले.
विचार करा कुठे ती पाच लाखांची फौज आणि कुठे ते ७० हजार सैन्य! पण त्यांना आपल्या छत्रपतीवर विश्वास होता, त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी!
औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण १६८९ साली स्वराज्याचा अमुल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्याच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.
“संभाजी महाराजांनी काय केले?” असा प्रश्न जे विचारतात – खास त्यांच्यासाठी पुढील माहिती –
संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले.
जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले.
स्वराज्यात चार नवीन किल्ल्यांची भर घातली.
जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला.
युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली.
स्वराज्याचा प्रथमच स्वतंत्र दारूगोळा कारखाना सुरु केला.
दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.
व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठा स्थापन केल्या. बाल मजुरी व बेटबिगारी विरूध्द कायदे तयार केले.
संभाजी महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना इतके जपले होते की त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकही बंडखोरी झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही.
संभाजी महाराज जोवर हयात होते तोवर स्वराज्याची शान असणारा एकही किल्ला शत्रूच्या हाती गेला नाही…!
त्यांनी सामारे २७ वर्षे औरंगजेबाला दक्षिणेत अडकवून ठेवले त्यामुळे उत्तरेकडे औरंगजेबाचे दुर्लक्ष झाले आणि तेथे इतर हिंदू सत्ता उदयास आल्या आणि उत्तरेतील हिंदू धर्म तरला.
त्यांनी स्वराज्य केवळ सांभाळले नाही तर कैक पटीने वाढवत अखंड भारतामध्ये त्याची गौरवपताका फडकावली.
संभाजी राजांच्या काळात स्वराज्य अधिक सुरक्षित राहील असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून दाखवला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा तो शब्दन शब्द खरा करून दाखवला.
(छ. संभाजी महाराजांवर इतिहासकारांनी, न कळत अन्याय केला आहे. तो कसा – वाचा – छत्रपती संभाजी राजेंचा “बदलता/सुधारित” इतिहास)
—
- तब्बल ५४ दिवस मुघल सैन्याला थोपवून धरणाऱ्या शिवरायांच्या निष्ठावंत शिलेदाराची गोष्ट!
- छत्रपतींच्या स्वराज्यातील पहिल्या सरसेनापतींबद्दल जाणून घ्या!!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.