आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
(हा लेख लिहिताना मी सुझान ब्राऊन मिल्लर हिच्या “Against our will- Men Women and Rape” ह्या पुस्तकाचा तसेच You tube वरील BBC च्या “Documentary on Women’s liberation movement.” चा प्रामुख्याने आधार घेतला आहे. शिवाय इतर अनेक Documentaries, articles ,मराठी लेख,फेस बुक वरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया- थोडक्यात इंटरनेट वर उपलब्ध माहितीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे ह्या विवेचनाला काही मर्यादा पडल्यात ह्याची मला जाणीव आहे. वाचकांनी वाचताना ह्याचे भान ठेवावे ही विनंती)
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
नुकतंच नववर्ष सुरु झालं. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी बेंगलोर मध्ये भर रस्त्यात महिलांचा विनयभंग केल्याचा तो किळसवाणा प्रकार घडला आणि अपेक्षेप्रमाणे मिडीयावर/ सोशल मिडीयावर माशांचे मोहोळ उठावे तसे प्रतिक्रियांचे मोहोळ उठले. आता ही काही पहिलीच किंवा अगदीच क्वचित घडणारी घटना नव्हे. खरेतर अशा गंभीर घटना वारंवार घडताना आपण पाहतो/ ऐकतो. भारतामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण पाहिल्यावर एखाद्या महामारी / साथीच्या रोगाची आठवण होते. (आणि कदाचित त्यामुळेच) ह्या विषयाबाबत समाजात एक प्रकारचा कोडगेपणा हल्ली हल्ली येऊ लागला आहे असं मला वाटू लागलंय. मागे झालेल्या निर्भया प्रकरणावेळी किंवा अगदी ह्या आजच्या बेंगलोर प्रकरणावेळी अबू आझमी सारख्या अनेक महान दार्शनिक विचारवंतानी केलेली विचारधनाची उधळण (पक्षी मुक्ताफळे) पाहिली/ऐकली की हा कोडगेपणा वाढत चालला आहे हे जाणवू लागते. ह्या अबू आझमी आणि त्याच्या मुलाच्या निरनिराळ्या विधानांमुळेच मी ह्या प्रकरणाचा जास्त विचार करू लागलो. का? कारण ही माणसं मूर्ख नसतात. ती अनावधानाने, चुकून असे फारसे काही कधी बोलत नसतात. ती जे बोलतात ते त्यांचा जो मतदार वर्ग असतो त्यांच्या मानसिकतेला धरून असेच असते. त्यांच्या मतदात्यांच्या भावनांना फारसा धक्का न लावण्याचे, उलटपक्षी बऱ्याचदा त्यांना गोंजारायचे काम ह्या प्रतिक्रिया करतात. म्हणजे त्यांनी कुठेही विनयभंग किंवा बलात्कार योग्य आहे असे म्हटलेले नाही पण त्याची बरीचशी जबाबदारी त्या त्या मुलींवर टाकून ते मोकळे झाले. खरेच असे असते का?
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बलात्कार का होतो ?
(हे सुद्धा वाचा: निर्भया-कोपर्डी-माळवाडी…बलात्कार का होतात? कसे थांबवावे?)
ह्या प्रश्नाची जी उत्तरं, अगदी सर्वसामान्य माणूस ते विचारवंत (बरेचसे, सगळे नाही आणि ह्यात स्त्रियाही येतात) देतात त्यांच्या मध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे खाली दिलेले विचार आढळतात.
- बलात्कार करणारे पुरुष अडाणी, अशिक्षित, विकृत, खेडवळ, असंस्कृत, बुरसटलेल्या विचारांचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात.
- बलात्काराच्या शिकार झालेल्या स्त्रिया ह्या गरीब ते मध्यम वर्गीय गटातल्या, नोकरी-कामधंदा करणाऱ्या, तोकडे किंवा पाश्चात्य(modern?) पद्धतीचे कपडे घालणाऱ्या, रात्री उशिरा घराबाहेर राहणाऱ्या ( नोकरी, काम शिक्षण किंवा अगदी मौज मजेसाठीही), fashion(!) करणाऱ्या असतात.
- पुरुषांना बऱ्याचदा त्यांच्या कामोत्तेजना शमवता न आल्यामुळे बलात्कार होतात (कामाकरता बाहेर राहिल्याने कुटुंब आणि बायकोशी संपर्क न राहिल्यामुळे?)
- सध्याच्या काळात सगळीकडे सिनेमा,मालिका, जाहिरातीमध्ये स्त्रियांना उत्तेजक / उत्तान अश्लील हावभाव/ वर्तन करताना दाखवतात किंवा पोर्नफिल्म्सचा सूळसुळाट झाल्यामुळे!
ही यादी अजून कितीही लांबवता येईल पण ढोबळ मानाने अशा प्रतिक्रियाच येतात. ह्या प्रतिक्रिया ३ विभागात वर्गीकृत करता येतात.
- भूमिका भंग
- मर्यादा भंग
- औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचे उल्लंघन
१ भूमिका भंग
पुरुषांनी स्त्रियांचे रक्षण करायचे असते आणि तसे करायच्या ऐवजी तेच त्यांचे शोषण करू लागतात किंवा पुरुष स्त्रियांचे/ त्यांच्या अधिकारांचे, लज्जेचे, अब्रूचे रक्षण करण्यात कमी पडतात. म्हणजे उदा. पोलीस हे कायद्याचे रक्षक पण जेव्हा तेच कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा ते रक्षक न राहता भक्षक बनतात किंवा ते कमी पडतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. अशी काहीशी ही भूमिका/ प्रतिक्रिया आहे.
२ मर्यादा भंग
स्त्रियांच्या चालण्या, बोलण्या, वागण्याच्या काही विशिष्ट मर्यादा असतात. त्यांचे त्या उल्लंघन करतात. त्यामुळे त्या स्वत:ला अशा धोकादायक परिस्थितीत टाकतात. त्यामुळे अशावेळी घडणाऱ्या घटनांना त्याच काही किंवा बऱ्याच अंशी जबाबदार असतात.
३. औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचे उल्लंघन
भारतासारख्या अध्यात्मिकदृष्ट्या/सांस्कृतिकदृष्ट्या उन्नत देशात पाश्चात्य विचाराचे/ संस्कृतीचे अतिक्रमण झाल्याने आपली मूळ संस्कृती / विचारधारा दुषित होऊन पाश्चात्यांच्या भोगवादी संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे सध्या बलात्कारांचे/ विनयभंगाचे प्रमाण वाढले आहे.
इथे एक मुद्दा मला स्पष्ट केला पाहिजे की ह्या प्रतिक्रिया पूर्णपणे बरोबर, पूर्णपणे चूक किंवा अंशत: चूक आहेत किंवा मला त्या मान्य आहेत असे म्हणायचा माझा उद्देश नाहीये. सर्व सामान्य माणूस जो विनयभंग/ बलत्कार हे गंभीर अपराध मानतो, अशा दोषींना कडक, अगदी कायद्याने शक्य नसलेल्या शिक्षा द्यायला हव्यात असेही म्हणतो ( उदा. भर चौकात फासावर लटकावणे, हात, पाय ते अगदी त्याचे लिंग तोडणे अशा) त्यांच्या दृष्टीने ह्या गंभीर गुन्ह्यामागची ही सर्वसाधारण कारणमीमांसा आहे.
सर्व सामान्य माणसं ते अगदी धर्मगुरु मग ते हिंदू असो मुसलमान असो व अन्य कोणत्याही धर्माचे, ‘आपापला किंवा सगळेच धर्म स्त्रियांचा आदर करतात आणि स्त्रियांचे अबृहनन करण्याला महापाप मानतात.’ असेच हिरीरने सांगतात. स्त्रीशी कसे वागावे / तिला सन्मान कसा द्यावा ह्याचे वर्णन आपापल्या धर्मात कसे व्यवस्थित सांगितले आहे ह्याचे दाखलेही देतात. म्हणून ह्या गुन्ह्याबद्दलची धार्मिक भूमिका ही सुद्धा मी भूमिका ह्याच सदरात घेतली आहे.
भूमिका
समाजाचा (फक्त भारतीय नाही) स्त्री विषयक दृष्टीकोन हा सगळ्यात गोंधळाचा आणि वाट चुकलेला दृष्टीकोन आहे. सर्वसामान्य माणूस मग तो स्त्री असो व पुरुष, गरीब असो व श्रीमंत, अशिक्षित असो व अगदी सुशिक्षीत विचारवंत, त्यांच्या मनात स्त्रीचे सामाजिक स्थान काय आहे ह्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकंदरीत ह्या प्रश्नाच्या उत्तराची फलश्रुती अवलंबून आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे असे आपण अगदी लहानपणापासून शिकतो आणि तसे त्यात चुकीचे काही नाही. समाज म्हटले की त्यातल्या प्रत्येक घटकाचे समाजातले स्थान, कर्तव्य, जबाबदारी आणि तदनुषंगिक मिळणारे लाभही आले.
मग ह्यात स्त्रीचे स्थान नक्की कुठे आहे? जगातल्या जवळपास सर्व संस्कृतींमध्ये स्त्रीचे स्थान हे माणूस म्हणून नाही तर एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी व्यवस्था म्हणूनच आहे. हे इतक्या नागडेपणाने कुणी मांडत नसले तरीही सर्व धर्म आणि संस्कृतींचा स्त्री विषयक दृष्टीकोणाचा गाभा तोच आहे. स्त्री ही माणूस नसून एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी पद्धती आहे म्हणजेच ती कुठल्यातरी पुरुषाची खाजगी मालमत्ता आहे असे मानले गेल्यामुळे स्त्री विषयी जाहीरपणे बोलताना, उल्लेख करताना आणि प्रत्यक्ष वागताना अशा विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी घडतात. तुम्ही जेव्हा स्त्रीला देवी-देवता मानता किंवा तिला सर्व पापाचे मूळ कारण/ आगर मानता तेव्हा त्यातून तिचा माणूसपणा हिरावून घेता, हे कदाचित कोणाला जाणवत नसावे. पण तसे करताना तिला दुय्यम मनुष्यत्व (sub human status) दिले जाते. एखाद्याची जशी घर, गाडी, पैसा, इतर कमी अधिक मौल्यवान मालमत्ता असते, तशीच त्याची स्त्री ही मालमत्ताच असते. आपली चीज वस्तू आपण निष्काळजी पणे इकडे तिकडे कुठेही ठेवली तर, जसे ती चोरी होण्याचा, इतरांनी तिचा वापर करण्याचा धोका उत्पन्न होतो तसेच स्त्रीचेही होते. आपापली मौल्यवान चीज वस्तू आपण सांभाळली पाहिजे. असाच ह्या सगळ्या विधानांचा अर्थ असतो.
(निर्भया प्रकरणावेळी झेपत नव्हते तर मैत्रिणीला घेऊन असे एकटे दुकटे बाहेर जायचे कशाला असे मत tv वर एका महिलेला व्यक्त करताना मी स्वत: ऐकले आहे. तीच गोष्ट शक्ती मिल काम्पाउंड मध्ये झालेल्या रेपची! ती महिला पत्रकार आणि तिचा पुरुष सहकारी तिथे गेले तर अंगी सामर्थ्य नसताना एकट्या दुकट्याने तिथे महिला सहकाऱ्यासोबत जायचे कशाला अशाच प्रकाराच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या आहेत.)
एकंदरीत काय तर भूमिका, असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या भूमिकांचा विसर पडणे किंवा त्यांचे उल्लंघन केले जाणे (अगदी पुरुषांकडून ही) हे ह्या समस्येचे मूळ कारण नसून मुळात भूमिका हीच चुकीची आहे. ती म्हणजे स्त्री ही कुणाची तरी खाजगी मालमत्ता आहे आणि तिचे ज्याचे त्याने तसेच समाजाने रक्षण करावे. तिची चोरी किंवा नासधूस करू नये.
मर्यादाभंग
एकदा समाजाने स्त्रीला दुय्यम मानव मानल्यावर मर्यादाभंगाची संगती सहज लावता येते. पुढे लिहिण्याआधी स्पष्ट करतो, मी दुय्यम मानव म्हणतोय, दुय्यम नागरिक नाही! कुणी जेव्हा दुय्यम नागरिक असतो तेव्हा मानव म्हणून पूर्णच असतो फक्त त्या देशातले नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य ह्यापासून मुक्त असतो. दुय्यम मानव म्हटल्यावर साहजीक माणसांचे सगळे/ बहुतांश अधिकार नाकारले जातात. वस्तू मालमत्ता पशु आणि स्त्री अशी वर्गवारी होते. घराला कुंपण, गाडीला गॅरेज, गुरांना गोठा आणि स्त्रीला मग संरक्षणासाठी घराची, नियमाची/ मर्यादांची बंधनं घातली जाऊ लागतात. शिक्षण घे पण ते घरात राहून मुलांचा अभ्यास घेण्यासाठी, नोकरी कर पण घराला हातभार लावण्यासाठी, ते पण बायको, आई, सून, मुलगी वगैरे म्हणून ज्या अपेक्षित जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडूनच. कामावर / बाहेर जा पण संध्याकाळी ७ च्या आत घरी परत ये. रात्री अपरात्री एकटी दुकटी फिरू नको. कुणी पुरुष माणूस बरोबर असलेला बरा..! अशा मर्यादा तिला घातल्या जातात आणि मर्यादा भंग झाला की, मग शिक्षा केली जाईल, वठणीवर आणले जाईल असा धाक असतोच आणि ह्या शिक्षा करण्याचा अधिकार कुणाचा? अर्थात पुरुषांचाच..!
रात्री-बेरात्री घराबाहेर राहिला म्हणून एखाद्या पुरुषाचा विनयभंग किंवा बलात्कार झाल्याच्या घटना आपण किती वेळा वाचतो? जर बलात्कार करणारे सगळे विकृत मानसिकतेचे असतात तर मग त्यातला एकही समलिंगी नसतो? खरं की काय?(समलैंगिकता ही विकृती नाहीये पण तो वेगळा लेखन विषय आहे) बऱ्याचदा मी सेकंड शिफ्ट वरून रात्री घरी येतो, तेव्हा १.०० वाजलेला असतो. कुणी चोर मला पकडून माझ्याकडचे पैसे, घड्याळ वगैरे चीजवस्तू लुबाडून घेऊन जाईल अशी भीती मला क्वचितचं वाटते. पण माझ्यावर कुणी पुरुष किंवा अगदी एखादी विकृत स्त्री बलात्कार करेल अशी भीती सोडा शंकाही येत नाही. का? कारण बलात्कार हे इतर मार्गांनी लैंगिक भूक शमवता येत नाही म्हणून होत नसतात, तर ते समस्त स्त्री वर्गाला धाकात, जरबेत ठेवण्यासाठी केले जातात. ते पुरेसे होत नाही असे जाणवले, स्त्रीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर, तिला धडा शिकवण्यासाठी त्यात अधिक क्रौर्य, विटंबना ते अगदी नंतर छळ करून केले गेलेले निर्घृण खूनही सामील होतात. चोरी/ दरोडा वाईट, पण चोरी होणाऱ्या वस्तुला चोराचा/ दरोडेखोराचा प्रतिकार करायचा अधिकार असतो काय? आणि ह्याचा भयानक परिणाम समस्त स्त्रीवर्गावर झालेला दिसतो. मी ज्या स्त्रियांशी ह्या विषयावर बोलू शकतो, अशा स्त्रियांशी बोललो आणि मला सगळ्यांनी हेच सांगितले की, त्यांच्या दृष्टीने बलात्कार ही त्यांच्या बाबतीत घडू शकणारी, त्यांचे आयुष्य उध्वस्त करू शकणारी, त्यांचे सर्वस्व हिरावून घेऊ शकणारी अशी एक गोष्ट आहे. असे का? बलात्कार वाईट ह्यात संशय नाही पण बळात्कार झाल्यावर सर्वस्व कसे काय नष्ट होते? आयुष्य धुळीला कसे काय मिळते? ह्याचे तर्कसंगत उत्तर एकीलाही देता आले नाही आणि मग लग्नानंतर नवऱ्याकडून होणाऱ्या बलात्काराचे काय? असा प्रश्न विचारला तर सगळ्याजणीनी ती गोष्ट हि वाईटच असे सांगतले पण त्यानेदेखिल त्यांचे आयुष्य उध्वस्त होते का? सर्वस्व नष्ट होते का? ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिले. असे का? परपुरुषाने केलेला आणि नवऱ्याने केलेला बलात्कार ह्यात असा गुणात्मक फरक कसा? एक तर बऱ्याच जणींना नवरा जर जबरदस्ती करत असेल तर तो देखिल बलात्कारच होतो हेच मान्य नव्हते. (ह्याच न्यायाने वेश्यांवर ही बलात्कार होत नाही असे म्हणणरे महाभाग मला भेटले आहेत.)
ह्याचे उत्तर मला सुझान ब्राऊनमिलर ह्या प्रसिद्ध, स्त्रीमुक्ती चळवळीच्या खंद्या कार्यकर्तीच्या “Against our will” ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात मिळाले. त्यात ती म्हणते “Rape is nothing more or less than a process of intimidation by men to keep all women in a state of fear” भाषांतर – “पुरुषांनी समस्त स्त्री वर्गाला सतत दहशतीत ठेवण्यासाठी अंगीकारलेली एक प्रक्रिया म्हणजे बलात्कार.”
हे वाचून एकदम ट्यूब पेटली. सगळे पुरुष बलात्कारी नसतात, नव्हे फार थोडे बलात्कारी असतात. तसेच सगळ्या स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत, पण जवळपास सगळ्या स्त्रिया बलात्काराला अत्यंत घाबरतात. वेळी-अवेळी , एकटी दुकटी असताना स्त्रीला तिच्या आजूबाजूला असणारा कुणीही अनोळखी पुरुष बलात्कारी, लिंगपिसाट, वासनांध वगैरे वाटू शकतो, नव्हे वाटतोच…! जरी प्रत्यक्षात तो तिच्या परिचयाच्या कुठल्याही पुरुषा इतकाच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त सभ्य असला तरीही!
ही मानसिकता पुरुषांनी स्त्रियांच्या मनात रुजवलेली आहे. फक्त लैंगिक अत्याचार, परपुरुषाने जबरदस्तीने केलेला संभोग म्हणजेच बलात्कार नव्हे. (तो त्याचा एक भाग झाला) बलात्कार ही पुरुष वर्गाने धर्म, पाप-पुण्य, न्याय, नीती, समाज, अश्लील, उचित- अनुचित, स्त्रियांच्या वागण्या बोलाण्याच्या मर्यादा अशा असंख्य गोष्टींच्या आडून चालवलेली, स्त्रियांना जखडून टाकण्याची प्रक्रिया आहे आणि ती पिढ्यानुपिढ्या चालूच आहे. कुणी स्त्री ही बंधन तोडून बाहेर येत असेल तर मग तिला निरनिराळ्या शिक्षा आहेत पण तिच्या मनाला पडलेली दहशत ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे आणि बहुसंख्य स्त्रियाही ह्या मानसिकतेच्याच बळी झालेल्या दिसतात.
आम्हाला व्यवस्थापनात एक गोष्ट सांगायचे. हत्तीच्या पिल्लाला अगदी लहानपणापासून जाड साखळदंड लावून कायम बांधून ठेवतात. ते लहान असताना अशक्त असल्याने साखळदंड तोडू शकत नाही. पण पुढे तो मोठा हत्ती झाल्यावर आणि साखळदंड सहज तोडू शकेल असे सामर्थ्य आल्यावरही तो ते साखळदंड तोडू शकत नाही कारण त्याने आत्मविश्वास गमावलेला असतो. स्त्रियांची इतक्या हजारो वर्षांच्या गुलामीने अशीच काहीशी अवस्था आज झालेली आहे. मर्यादा फक्त स्त्रियांच्या आचार विचारावर नाही ती त्यांच्या मनात भिनवली गेलेली आहे आणि पुरुषांच्या सुद्धा! ह्यातून मुक्ततेची गरज फक्त स्त्रियांना नाही तर पुरुषांना सुद्धा तितकीच तातडीची आहे.
औचित्यभंग किंवा धार्मिक/ सांस्कृतिक सीमांचे उल्लंघन
खरेतर हा विभाग असा काही वेगळा असायची गरज नाही पण बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया त्या अंगाने आल्यामुळे मला नाईलाजाने त्या प्रतिक्रियांचा हा असा वेगळा विभाग करावासा वाटला.
“भारत हा पौर्वात्य देश आहे आणि आमची संस्कृती सगळ्यात जुनी आणि सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती, पण आधी मुसलमान आणि नंतर आलेल्या ह्या पाश्चिमात्य ( इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे) आक्रमकांमुळे आमच्या संस्कृतीत भेसळ झाली त्यामुळे अनेक वाईट गोष्टींचा प्रादुर्भाव झाला. आजकाल तर ह्या पाश्चात्यांच्या अतिरिक्त अनुकरणामुळे चंगळवाद, भोग वाद फोफावला असून त्यामुळे स्त्रीविषयक दृष्टीकोन असा झालेला आहे त्यामुळे भारतात हल्ली हल्ली स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. आपण एकदा का ही पाश्चात्य संस्कृतचे अनुकरण थांबवले कि सर्व काही आलबेल होईल.” असा काहीसा ह्याप्रकारात येणाऱ्या प्रतिक्रियांचा अर्थ आहे.
अशाच एका महान हिंदुत्ववादी नेत्याला मी “भारतामध्ये बलात्कार होत नाहीत तर ते इंडिया मध्ये होतात” असे एक भरमसाट विधान करताना ऐकले आहे. पाश्चात्यांच्या अनुकरणाने बिघडलेला इंडिया सोडून आपल्यामूळ, शुद्ध, पवित्र भारतात परत या अशी ती हाक होती. पोरबंदर इथे लागलेले एक पोस्टर बघा. खरेतर महिला सशक्ती करणाच्या नावाखाली योग्य अयोग्य कपडे परिधान करण्याचा अनाहूत सल्ला कोणी कसे काय देऊ शकते? पण ते एक वेळ बाजूला ठेवले तरी अयोग्य कपडे कोणते तर जीन्स आणि टी शर्टस? ह्या मापदंडाने काही काही पारंपारिक भारतीय कपडे खरेतर अधिक उत्तन/ मादक भासतात. मग? पण त्या सगळ्याचा स्त्रीविषयक अत्याचाराशी काहीही संबंध नाही.
पण त्यांना ही तसे म्हण्याचे नाही. त्यांना अडून अडून असे सांगायचे आहे कि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होते. ही विचारसरणी इतकी तर्क दुष्ट आहे की, खरेतर ह्याचा प्रतिवाद करायची ही गरज नाही पण बरेच लोक असा विचार करतात. म्हणून आपण ह्या विचारसरणीचा पुढील भागात समाचार घेऊ. आता हा जरा लांबलेला भाग इथेच थांबवतो .
क्रमश:
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.