' आताच्या पिढीला “हे” श्रीराम लागू माहितच नाहीत…ते माहीत व्हायला हवेत… – InMarathi

आताच्या पिढीला “हे” श्रीराम लागू माहितच नाहीत…ते माहीत व्हायला हवेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: राकेश कुलकर्णी

===

डॉ. श्रीराम लागू आता आपल्यात नाहीत. त्यांचे काल निधन झाले. मराठी नाटके आणि काही प्रमाणात मराठी चित्रपट यामध्येच त्यांच्य‍ा अभिनयाचा आविष्कार पहायला मिळाला होता. वैद्यकीय शिक्षण घेऊन काही वर्षे व्यवसाय केल्यानंतर बर्‍याच उशीरा म्हणजे चाळीशीमध्ये ते मराठी रंगभूमीवर पूर्णवेळ अभिनेते झाले.

वैद्यकीय शिक्षण घेत असल्यापासून कॅनडा व टांझानिया येथील वास्तव्यातही त्यांनी नाट्यअभिनेत्याचा असलेला आपला मूळ पिंड जमेल तसा पोसला.

 

Shriram-Lagoo inmarathi
news18.com

 

उत्पल दत्त किंवा बलराज साहनी यांच्यासारख्या चरित्रअभिनेत्याच्या सशक्त भूमिका हिंदीमध्ये त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत याचे फार वाईट वाटते. मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका पाहता हिंदीमध्ये चांगल्या भूमिकांमध्ये त्यांचा लॉरेन्स ऑलिव्हिए झाला नसता हे निश्चित.

१९७८मध्ये घरोंदा अाणि किनारा या दोन चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचे फिल्मफेअर नामांकन त्यांना मिळाले व त्यातल्या घरोंदासाठी ते यशस्वी झाले हा एक विरळा योग. सौतनसारख्या रद्दी चित्रपटात त्यांनी दलित दिसण्यासाठी अंगाला काळा रंग लावून घेण्याचे मान्य तरी कसे केले, यामागची कहाणी कधीतरी कळायला हवी.

 

shriram lagoo 4 inmarathi
scroll.in

 

पण, म्हटलं तसं, मराठी नाटके आणि सामना-पिंजरा या दोन अतिशय सुंदर चित्रपटांमधील त्यांचा अभिनय फार वेगळा होता.  सामनामधील त्यांच्या भूमिकेसाठी आवश्यक भाबडेपणा असलेली भूमिका लिहिलीच जाऊ शकत नाही, इतकं आता जग बदललं आहे.

माणसाच्या अंतर्मनाला साद घालण्याचा आगळावेगळा प्रयोग कदाचित तेथेच संपला. तशी कलाकृती पुन्हा बनेल की नाही देवास ठाऊक.. पिंजराचे कथानकदेखील असंच एकमेवाद्वितीय…!

नाटकांमधले नटसम्राट हे त्यांचं अतिशय गाजलेलं नाटक. नाटक म्हणून कधी ते नैसर्गिक वाटलं नाही. त्यापेक्षा त्यांचे “सूर्य पाहिलेला माणूस” हे बरेच अधिक आशयप्रधान होते.

 

shriram lagoo inmarathi
Youtube

 

“मित्र” या अगदी छोटा जीव असलेल्या नाटकातील फैय्याज यांच्याबरोबरचा, स्वभावाला मुरड घालावी लागतानाचा त्यांचा अभिनय आजही आठवतो. झाकोळ या चित्रपटाप्रमाणेच त्यांचं “उध्वस्त धर्मशाळा” हे नाटक काही पाहता आलं नाही.

 

shriram lagoo 5 inmarathi
zeetalkies.com

 

आपल्या खासगी आयुष्यात अनेक कठीण घटनांनी त्यांच्या नास्तिक असण्याची परीक्षाच घेतली. परंतु त्यांचे नास्तिकपण बावनकशी होते व त्यातून पुरते उजळून निघाले असे म्हणता येईल. देवाला रिटायर करण्यावरूनच्या त्यांच्या विधानावरूनचा वाद उगाचच वाढवला गेला.

याबाबतचं त्यांचं म्हणणं अगदी साधं होतं. अंधश्रद्धेला असलेल्या त्यांचा विरोध डोळस होता. सामाजिक आयुष्याबाबतही ते सजग होते. चांगल्या सामाजिक उपक्रमांसाठी आर्थिक मदत व्हावी याकरता त्यांनी अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

 

shriram lagoo 3 inmarathi
Hindustan times

 

लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. कोणाही अभिनेत्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार नसरूद्दिन शहाने काढले होते.

 

shriram_lagoo inmarathi 1
AM news

 

गेली अनेक वर्षे डॉ. लागू म्हणजे थरथरणारी मान असंच समीकरण आताच्या पिढीने पाहिलं आहे. मात्र या मानेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ताठपणाने केलेले पराक्रम समजून घ्यायचे, तर त्यांच्या कलाकृती आवर्जून पहायला हव्यात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?