Site icon InMarathi

चरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

एकदा काय झाले, पंडित नेहरू आणि माउंटबँटॅन दाम्पती हसत खेळत गप्पा मारत होते. पण नेहरूंचं मन काही रमेना म्हणून ते मूड बदलायला पोहायच्या तलावात गेले. तर बघतात काय – तिथे मुलीच मुली, त्याही खूप सुंदर, पण नेहरू ठरले महान नेते…! म्हणून मग ते तलावातून बाहेर पडले. पोहताना असा मूड ऑफ झाल्याने ते अजून वैतागले. शेवटी खूप वैतागून त्यांनी खिशातील एक सिगरेट काढून मस्त पैकी ओढली…खरेच असे काही झाले का? तर अजिबात नाही. नाहीच नाही. नेहरूंचे काही फोटो माऊंटब्याटन दंपती सोबत, पोहताना आणि सिगरेट ओढताना आहेत.

व्हाट्सअप्प किंवा फेसबुक वर असे किंवा ह्यापेक्षा नीच पोस्ट टाकुन नेहरूंची प्रतिमा खराब करायला ते पुरेसे असतात. लोक नेत्यांच्या प्रतिमा निर्मितीत फोटो, विडिओ किंवा एखादे वाक्य ह्यांचे दुधारी तलवारी सारखे स्थान समजायला वरील उदाहरण पुरेसे आहे. 13 जानेवारी पासून मोदींचा फोटो खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडर/डायरी वरती दिसल्या नंतरच्या धुराळ्यातून विचारवाट शोधताना हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

खरे तर खादी ग्रामउद्योग मंडळ हे जनमानसात अगदी ओळखीचे असेलेले मंडळ नाही आणि खादी विभागाचे कॅलेंडर काही किंगफिशर कॅलेंडर सारखे लोकप्रिय नाही. गेल्या काही वर्षात राजकीय कारणाने खादीला हेडलाईन मिळाली ती पहिले रेल्वेमंत्री लालू यादव यांनी रेल्वेत खादीचे पडदे, चादरी वापराचे धोरण घोषित केले तेव्हा आणि दुसरे मोदी घालतात ते मोदी-जॅकेट फॅशन म्हणून प्रस्थापित झाले तेव्हा.

गांधींचा स्वदेशीचा मंत्र हा खादीच्या रूपाने प्रसिद्ध झाला. ती खादी आणि इतर ग्राम/कुटीर उद्योग हांचे हे महामंडळ. त्या मंडळाचे कुठले कॅलेंडर, डायरी वगैरे प्रसिद्ध होतात हेच मुळी कुणाला माहिती नव्हते. पण यंदाच्या आवृत्तीत त्यात चरखा फिरवताना मोदींचा फोटो असल्याने मात्र ते प्रसिद्धीझोतात आले. मोदींचे त्या कॅलेंडरवर असे असणे चूक की बरोबर ह्याचे वाद झडत असताना हा सगळा प्रकार पंतप्रधान, मोदी आणि पंतप्रधान मोदी अश्या प्रकारे तपासून घ्यायला पाहिजे – म्हणजे उथळ निष्कर्षाचा धोका कमी होतो.

प्रथम मोदी.

मुळात चरखा/खादी/तिरंगा/कबुतर/योगा हे इतके लोकप्रिय प्रतीक आहेत की बऱ्याच सामान्यजनांना तसेच राजकारण्यांचा त्यांच्या सोबत पोझमध्ये फोटो काढणे आणि तो भिंतींवर लावून वापरणे ह्यात काही नवल नाही. नवा रोम्यानटिक हिरो आला की तो शाहरुख खान पोझ मध्ये एक तरी सीन देतो तसला प्रकार आहे हा. मग असे फोटो काढणारे राजकारणी गांधी/नेहरू/बोस/शास्त्री/विवेकानंद ह्यांना रिप्लेस करू इच्छितात, स्वतःला त्यांच्या सारखे समजतात असे म्हणायचे का?

आपण तसे करत नाही. जे दिसले ते हौस म्हणून समजून घेतो आणि असे आरोप करत नाही. त्याहीपेक्षा, सगळ्या राजकारणी लोकांना विगत नेत्यांचा प्रतीक म्हणूनच सोयीस्कर वापर करावा लागतो/करतात. राजकारणाची रीत आहे ती. दिवंगत नेते, स्थानिक वेशभूषा, दोन चार लोकभाषेतील वाक्य किंवा मिशेल ओबामा ह्यांनी मुंबईत केला तसा कोळी डान्स….हा सर्व लोकप्रिय प्रतीकांचा सोयीस्कर वापर आहे. त्यामुळे मोदींनी चरखा घेऊन फोटो काढलाच कसा ? ह्या थाटाचे प्रश्न लंगडे पडतात.

त्याच प्रमाणे “सरकारी विभागाने पंतप्रधानांचा फोटो का वापरला?” हा प्रश्न गैरलागू आहे. मुळात कॅलेंडर हे पब्लिसिटी चे साधन असल्याने त्यांना त्यातल्या त्यात लोकांना ठळकपणे लक्षात राहणाऱ्या फोटोचा वापर करणे प्राप्त आहे. एकवेळ खादीधारी पंतप्रधान नसते तर कुणी देखणा मॉडेल वापरला असता. मग “खादी” ह्या उद्योगाचे ते मंडळ आहे म्हणून सदासर्वदा गांधीजींचा फोटो वापरावा हा विचार भावनिक बाब म्हणून ठीक असला तरी व्यावसायिक बाब म्हणून गरजेचा नाही.

सरतेशेवटी उरतो ते हेतूरोपण.

पंतप्रधान झाल्यापासून मोदी हे स्वतःची उत्तुंग प्रतिमा उभारण्याच्या कमी लागलेले आहेत – पण ते तेवढे लायक नाही ह्या दोन गृहितकातून हा आरोप केला जातो.

प्रस्तुत घटनेत मोदी ह्यांनी मुद्दाम,गांधींच्या ऐवजी, त्यांना पर्याय म्हणून  स्वतःला स्थापित करण्यासाठी हा फोटो छापून आणला असा हेतू इथे चिकटवला जातो. ह्यात मोदी ह्यांनी पंतप्रधान म्हणून हे करायला लावले की कुण्या अधिकाऱ्याने हे केले हे अपल्याला कळणे कठीण आहे. अश्या हेतू रोपणाची दखल का घ्यावी लागते ते ही तितकेच महत्वाचे आहे आणि कदाचित त्यातच ह्या सर्व वादळाचे सर आहे.

प्रथमतः, स्थापित पंतप्रधानांचा फोटो हा प्रत्यक्ष रित्या व्यापारी जाहिरातीत सढळ रूपाने वापर आधी रिलायन्स च्या जियो ने आणि नंतर paytm ने ह्यावर्षी केला. ह्या प्रकाराला भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेच त्याला मोदींनी पाडलेला नवीन-अभिनव पायंडा म्हणून कौतुक करणे आहे.

स्वीमसुट मधील किंवा दारू पितांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असे फोटो आपल्याला दिसत नसतील/नाहीत तर ह्या पंतप्रधानचे फोटो इतक्या किरकोळ पणे छापून येऊ नये, दिसू नये हे PMO चे काम आहे. ते तसे न झाल्यामुळे मोदींवर महिमामंडणाचा आरोप करणे शक्य तसेच ग्राह्य होऊन जाते.

दुसरे म्हणजे चरखा हे स्वतंत्र संग्रामचे अतिशय ठळक असे प्रतिक आहे, तसेच ते गांधीजींचेही प्रतीक आहे. त्यामुळे गांधींच्या जागी मोदी तसाच (त्याच पोझ मध्ये) चरखा चालवताना दखवले/छापु दिले तर महिमामंडनाचा चुकीचा संदेश लोकात जातो – एवढे जर अजूनही पंतप्रधान कार्यालयाला लक्षात येत नसेल तर त्याचा सारांशरूपी दोष मात्र लोकांचा पंतप्रधान असलेल्या मोदी वर येतो.

अर्थात हा झाला तत्व मांडणीचा भाग, प्रसिद्ध झालेला फोटो बघून त्यात नकळत किंवा मुद्दाम गांधी ऐवजी मोदी वाटावे असे दाखवले आहे का? हे विश्लेषण आणि पुढील निष्कर्ष प्रत्येकाने आपापले करायचे आहे.

त्याचवेळी इथे मूळ प्रश्न हा, गांधींचा चरखा अजूनही गांधींचा आहे काय? असा आहे.

त्यामुळे ह्यांनी गांधींना वापरण्या/टाकून देण्या आधीच 5 वेळा त्या कॅलेंडर मध्ये गांधींचा फोटो नव्हता, खादीला नवीन आयकॉन नको का? हे आणि असे सर्व मुद्दे हे फक्त अहंमान्यतेचे मुद्दे असून त्यांचा विषयकळण्यासाठी काहीही उपयोग होत नाही हे जाणणे सुद्धा महत्वाचे आहे.

अन्यथा तो गांधींच्या सत्याच्या प्रयोगांचा पराजय ठरावा.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version