आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
प्रत्येक सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना काही ठराविक गोष्टी करणे आपण टाळतो किंवा काही गोष्टी आवर्जून करतो. जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये या नववर्षाच्या स्वागताला धरून काही श्रद्धा आहेत तशाच अंधश्रद्धा देखील आहेत.
नववर्षाच्या स्वागताशी संबधित असलेल्या या अंधश्रद्धा ऐकल्या तर तुम्हाला नक्कीच हसू येईल. यातल्या काही अंधश्रद्धा थक्क करणाऱ्या तर काही अगदीच हास्यास्पदही आहेत.
अगदी नवीन वर्षाच्या संध्याकाळी काय करावे, काय करू नये इथपासून ते काय खावे आणि काय खाऊ नये इथपर्यंतच्या या अंधश्रद्धा आहेत.
नवीन वर्ष भरभराटीचे आणि समृद्धीचे असावे अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते आणि काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर ही समृद्धी आपल्यापासून दूर राहणार असेल, तर ते कुणाला आवडेल बरं? यासाठी आजही अनेक भागांमध्ये या अंधश्रद्धा जपल्या जातात. या लेखाद्वारे जाणून घेऊया अशाच काही थक्क करणाऱ्या अंधश्रद्धा..
१) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कपडे धुतले तर, त्यासोबत आपले गुडलक पण निघून जाते अशी एक अंधश्रद्धा आहे.
म्हणजे, जानेवारीच्या दोन तारखेला भलेही दोन बदल्या कपडे धुतले तर चालतील पण, एक तारखेला कपडे अज्जिबात धुवायचे नाहीत. आहे की नाही गंमत?
२) कोलंबियामध्ये वर्षाच्या पहिल्या दिवशी हातात रिकामी सुटकेस घेऊन फेरफटका मारण्याची पद्धत आहे.
पहिल्याच दिवशी अशा प्रकारे सुटकेस घेऊन फिरल्याने, वर्षभर पर्यटनाची संधी किंवा लाभ मिळतो असा तिथला समज आहे.
३) नववर्षाच्या मुहूर्तावर तुम्ही जर बारा द्राक्षे खाल्ली तर, येणारे बाराही महिने तुमच्यासाठी भाग्यशाली ठरतील. हो स्पेनमध्ये अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा) बाळगली जाते.
त्यानुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी द्राक्षे खाणे शुभ मानले जाते. तीही वर्षातील बारा महिन्यासाठी बारा द्राक्षे..!
४) येणारे नववर्ष सुखद आणि गोड बातम्या घेऊन येणारे असावे, जसे की नोकरीत प्रमोशन मिळणे किंवा लॉटरी लागणे. असे वाटत असेल तर, वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही तुमच्या घरात केकवर सजवण्यासाठी वापरतात ते क्रीम सांडावे.
हो, अशीही एक अंधश्रद्धा आहे. गोड बातम्या हव्या तर घरात गोड पदार्थ सांडावा.
५) नववर्षाचे आगमन होत असताना, जेव्हा घडाळ्यात बाराचे ठोके पडतील तेव्हा, तुमच्या हातात काही नोटा असतील तर, त्यामुळे येत्या वर्षभर तुमच्या बँकेतील बॅलन्स वाढत राहील. असाही एक समज आहे.
आपली आर्थिक समृद्धी आणि भरभराट होण्यासाठी आजही ही श्रद्धा जपली जाते. इतकेच नाही तर नव्यावर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचे कर्ज डोक्यावर ठेऊ नये. नाहीतर, येणारे वर्षदेखील कर्जाची परतफेड करण्यातच जाते अशीही अंधश्रद्धा आहे.
६) आयर्लंडमध्ये अशीही प्रथा आहे की, तुमच्या मागील दुष्ट शक्तींचा पिच्छा सुटावा असे वाटत असेल तर, एक ब्रेड ते भिंतीवरती चिकटवतात किंवा भिंतीला फेकून मारतात. यामुळे घरातील सगळ्या दुष्टशक्ती पळून जातात असे मानले जाते.
७) फर्निचर बाहेर फेकणे. अर्थात, ही फारच खर्चिक किंवा महागात पडणारी अंधश्रद्धा आहे असे आपल्याला वाटू शकते. पण, दक्षिण आफ्रिकेत ही अंधश्रद्धा पाळली जाते.
घरात अडगळ ठेवल्याने येणारी लक्ष्मी परत माघारी जाते असे तिथले लोक मानतात. यासाठी ते जुना फ्रीज उचलून बाहेर फेकायालाही मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे घरात आणखी नवनव्या वस्तू येतात अशी त्यांची समजूत आहे.
या फर्निचर मागोमाग सगळी दु:खे देखील निघून जातात, अशीही समजूत या अंधश्रद्धेशी चिकटलेली आहे.
८) नवीन वर्षाचे स्वागत अगदी “राईट” म्हणजे योग्य पद्धतीने व्हावे म्हणून, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात “राईट” म्हणजे उजवा पाय टाकून प्रवेश करावा अशीही एक श्रद्धा आहे.
अर्थात, आपल्याकडेही जेव्हा नवरी नव्या घरात प्रवेश करते तेव्हा किंवा आपण नवीन वास्तुत प्रवेश करतो तेव्हा हीच प्रथा पाळली जाते.
९) पूर्व युरोपमध्ये येणारे वर्ष हे अगदी परिपूर्ण असावे म्हणून, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर गोल आकाराचा गोड ब्रेड खाल्ला जातो. यामुळे येणारे वर्ष देखील सर्व प्रकारे उत्तम असते असे समजले जाते.
१०) यूकॅडोरमधील लोक नवीन वर्षाच्या आगमनावेळी एखाद्या अशा नावडत्या वस्तूचा फोटो जाळतात ज्यामुळे गेल्या वर्षात त्यांना काही उपद्रव झाला असेल.
म्हणजे, अशा वस्तूशी निगडीत असलेली नकारात्मक शक्ती येत्या वर्षात आपला प्रभाव पाडू शकत नाहीत असा त्या लोकांचा समज आहे.
११) इटालियन लोक नववर्षाच्या स्वागतादिवशी हमखास मसूर डाळीचा मेन्यू बनवतात. त्यांचा श्रद्धेनुसार मसूर डाळ ही रोमन कॉइनसारखी दिसत असल्याने या दिवशी मसूर डाळ खाल्ल्याने घरात बरकत आणि समृद्धी येते.
१२) दक्षिण अमेरिकेत नववर्षाच्या आगमनाला चवळीच्या बियांची भाजी खाल्ली जाते. या बियाण्यांमध्ये ‘गुड लक’ आकर्षित करण्याची ताकद असते अशी त्या लोकांची समजूत आहे.
१३) डेन्मार्क मध्ये नव्या वर्षाचं स्वागत करताना, मध्यरात्री एक झेप घेतली जाते. म्हणजे नव्या वर्षात अशाप्रकारे उडी घेतल्याने नकरात्मक गोष्टींपासून पिच्छा सुटतो आणि भरपूर चांगल्या गोष्टी नव्या वर्षात घडू शकतात.
१४) नववर्षाच्या संध्याकाळी मासे खाल्ल्याने देखील समृद्धी आणि भरभराट येते अशीही एक श्रद्धा आहे. ही संध्याकाळ आपण काही तरी, विशेष पदार्थ खाऊनच साजरी करतो, मग आपल्या न्यू इयर पार्टीच्या मेन्युत मासे असायला हरकत नसावी.
१५) “एक दुजे के लिये” चित्रपटात रितू अग्निहोत्री कमल हसनच्या जळलेल्या फोटोची राख चहामध्ये टाकून, तो चहा पिते हे पाहिलं असेलच. तर अशीच काहीशी अंधश्रद्धा रशियातही पाहायला मिळते.
नव्या वर्षाचे स्वागत करताना “खाणं-पिणं” तर होतंच, यावेळी तुम्ही एका कागदावर तुमची इच्छा लिहायची आणि तो कागद जाळून ती राख तुमच्या ड्रिंकमध्ये टाकून प्यायची. यामुळे तुमची ती इच्छा पूर्ण होते.
१६) नववर्षाच्या मध्यरात्री जर आपल्या प्रिय व्यक्तीला किस केलं तर, दोघांमधील प्रेमाचा बहार असाच बाराही महिने टवटवीत राहील असाही एक समज आहे. घडाळ्यातील बाराच्या ठोक्याला तुमच्या मनात ज्या भावना असतील त्याच वर्षभर फिरून तुमच्याकडे येतील असे यामागचे कारण आहे.
अर्थात, एखाद्या वेळी जोडीदार जवळ नसेलच घरातील कोणत्याही प्रिय व्यक्तीला किस करून नववर्षाचा आनंद साजरा केला जातो. समजा एखादी व्यक्ती एकटीच असेल तर, ती घरातील कुत्रा किंवा मांजरीचे लाड करते.
१७) नववर्षाच्या संध्याकाळी तरी किमान घरात धनधान्याची समृद्धी असावी. म्हणून, या दिवशी घरात सर्व किराणा आवर्जून भरला जातो. घरातील धान्याच्या, डाळीच्या, मसाल्याच्या बरण्या रिकाम्या असतील तर, ते गरिबीचे लक्षण समजले जाते.
तर “देश तसा वेश” म्हणतात, त्याप्रमाणे देशोदेशी पसरलेल्या या अंधश्रद्धा पाहून खरोखरच थक्क व्हायला होतं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.