ख्रिसमसच्या सुट्टीत भटकायला जायचंय? ही घ्या १९ परफेक्ट ख्रिसमस डेस्टिनेशन्सची यादी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
वर्षाची अखेर त्यात ख्रिसमसचा आनंद आणि गोठवणारी थंडी! यावर्षीची ख्रिसमस इव्ह घरात राहून साजरी करण्याऐवजी कुटुंबासोबत एखाद्या नव्या ठिकाणी आणि नव्या पद्धतीने साजरी करण्याची तुमची इच्छा आहे का?
हा ख्रिसमस थोडासा हटके पद्धतीने, कायम लक्षात राहण्यासारखा करायचाअसेल तर, या काही ठिकाणांची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
मॉल्स मध्ये सजवून ठेवलेले ख्रिसमस ट्रीज, खरेदीवर दिली जाणारी भरघोस सूट, बॉबल्सची किणकिण आणि बेकरीज मधून येणारा ताज्या चॉकलेट केकचा घमघमाट, हा सगळा माहोल आपल्याला सांगतोय की ख्रिसमस आलाय.
सण-उत्सव साजरा करण्याचा भारतीयाचा उत्साह काही औरच असतो. त्यात ख्रिसमसच्या निमित्ताने थोडी सुट्टी देखील मिळते.
सणासुदीच्या निमित्ताने का असेना पण, रोजच्या धावपळीतून कुटुंबाला वेळ दिला जातो आणि एकमेकांचा आनंद वाटून घेता येतो.
या ख्रिसमसला दरवेळी सारखे फक्त गोडधोड खावून आणि संध्याकाळ घरी घालवण्याऐवजी ख्रिसमसच्या निमित्ताने मिळालेली सुट्टी जर सत्कारणी लावायची असेल तर नक्कीच एखादी ट्रीप प्लन करायला हरकत नाही.
भारतातल्या या काही ठिकाणी ख्रिसमसची संध्याकाळ म्हणजे असीम सुखाची एक पर्वणीच असते. खास ख्रिसमसच्या दरम्यान आवर्जून भेट देण्यासारखी अशी कोणती ठिकाणे आहेत ते जाणून घेऊया.
१. गोवा –
समुद्र किनाऱ्यावर चालणाऱ्या नाईटलॉंग पार्टीज, मित्रांशी गप्पा सोबत कॉकटेल, झगमगाटी रोषणाई केलेली कॅथेड्रल्स, मध्यरात्री पर्यंत चर्चेस मधून चालणारी प्रार्थना, मुलांची सुमधुर गीते, ख्रिसमसच्या उत्साहात या वातावरणाने नक्कीच भर पडेल.
से कॅथेड्रल, सांताक्रुझ चर्च, बॅसिला ऑफ बॉम जीजस अशी ख्रिसमसच्या काळात आवर्जून भेट देण्यासारखी कित्येक चर्चेस या परिसरात आहेत.
२. शिलॉंग –
भारतातील अनेक शहराप्रमाणेच पूर्वेकडील मेघालयातील शिलॉंग मध्ये देखील अमाप उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातो. या काळात अनेक मजेशीर गमतीजमती आणि आकर्षक गोष्टी अनुभवण्यास मिळतील.
शिलॉंगमधील मेरी हेल्प ख्रिसमस कॅथेड्रलला या काळात आवर्जून भेट द्यायला हवी. शतकांचा इतिहास सांगणारे चर्चेस देखील रोषणाईने उजळून गेलेले पाहायला मिळतील.
३. पॉंडीचेरी –
शांत, प्रसन्न समुद्र किनारे आणि आसपास फुलांनी आणि रोषणाईने सजवलेले चर्चेस, ख्रिसमसच्या काळात जर तुम्ही पॉंडीचेरी मध्ये असाल तर, सणासुदीच्या काळातील एक उत्साह, प्रसन्नता आणि रोमांच येथे अनुभवयास मिळेल.
पॉंडीचेरीची भेट या कळात तरी तुम्ही न चुकवलेलीच बरी, कारण पर्यटकांसाठी इथे कितीतरी मजेशीर गोष्टी पाहण्यासाठी उपलब्ध असतात.
कुकीज, गिफ्ट्स, ख्रिसमस ट्रीज आणि अनेक अॅक्टिव्हीटिज असतात, ज्यामुळे हा ख्रिसमस अगदी यादगार बनून जाईल. पॉंडीचेरीतील डोमस दे कॅथेड्रल पाहण्यासारखा आहे.
४. मुंबई
मॉल्समधून सजवलेली ख्रिसमस ट्रीज, लाईट्स, प्रॉप्स आणि फ्रुट केकचा घमघमाट अशा वातावरणात मुंबई हे देखील ख्रिसमसच्या काळात अपार उत्साहाने आणि सौंदर्याने सजलेले असते.
झगमगाट, घमघमाट आणि थिरकायला लावणारे संगीत अशा वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी ख्रिसमसच्या काळात मुंबईला भेट द्यायलाच हवी.
मुंबईतील थॉमस कॅथेड्रल, अफगाण चर्च ही काही चर्चेस पाहण्यासारखी आहेत. ख्रिसमसच्या काळातील यांचे सौंदर्य मोहवून टाकणारे असते.
५. कलकत्ता –
हो, कलकत्ता म्हणजे आनंदनागरीच. तेंव्हा या ख्रिसमसला तुमच्या सांताक्लॉजला त्याचे सुंदर सुंदर गिफ्ट्स घेऊन थेट कलकत्ताच गाठायला सांगा.
ख्रिसमसच्या काळात भेट देण्यास अत्यंत उत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे ही आनंदनागरी कलकत्ता.
संगीतमय आणि रोषणाई केलेले एक्झिबिशन्स, रॉक बॅंड गाणी, चमचमती लाईटिंग, खरेदीवर मिळणारी भरघोस सुट या सगळ्या आकर्षक करण्याऱ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी म्हणून तरी किमान ख्रिसमसच्या काळात एकदा कलकत्त्याला भेट दिलीच पाहिजे.
सेंट, पॉल्स कॅथेड्रल, सेंट फिलोमेनाज कॅथेड्रल अशी इथेही काही पवित्र आणि शांततेची अनुभूती देणारे जुने चर्चेस आहेत, जिथे जाऊन तुम्ही तुमची ख्रिसमस प्रेयर करू शकता.
६. केरळा –
ख्रिसमसच्या काळात केरळमधील रस्ते अगदी झगमगत असतात. या रस्त्यांचा झगमगाट पाहूनच तुमचा मूड उजळून निघेल. इथल्या चर्चेस मध्ये मध्यरात्री पर्यंत प्रेअर सुरु असतात, जिथे लॉर्ड ख्रिस्तच्या जन्म सोहळ्याचे नाट्यमय सादरीकरण देखील केले जाते.
सोबतीला कॅरोल संगीत आणि आणखीही काही गमतीजमती असतात. समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे झगमगणारे चर्चेस पाहून तुम्हाला एक नेत्रसुखद क्षणांचे साक्षीदार झाल्याचा अनुभव येईल. उत्सवी वातावरणात देखील निवांत हाउसबोटिंगही करता येईल.
७. हैद्राबाद –
संपूर्ण शहर खास ख्रिसमसच्या वैशिष्ट्यांनी सजलेले असते. अनेक दुकानांत खरेदीसाठी मोठमोठी डिस्काऊंट देत असतात, अगदी हॉटेल्स आणि रेस्टोरंट देखील विविध चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी डिस्काऊंटमध्ये देत असतात.
मध्यरात्री पर्यंत चालणाऱ्या ख्रिसमस प्रेअर आणि ख्रिसमस सॉंग्ज मध्ये सहभागी होऊन हा सण साजरा करू शकता.
८. मदुराई –
तमिळनाडूतील हे एक सुंदर शहर. ख्रिसमसच्या काळात तर अगदी झळाळून उठते. या ठिकाणे अनेक जुने चर्च आहेत, जे ख्रिसमसच्या काळात फारच सुंदररित्या सजवले जातात.
या शहरातही अमाप उत्साहाने आणि जल्लोषात ख्रिसमस साजरा केला जातो. भारतातील आणखी एक सुंदर शहर जिथल्या ख्रिसमसची मजा आवर्जून अनुभवावी.
९. बंगळूरू –
ख्रिसमसच्या काळात चविष्ट आणि स्वादिष्ट विविध प्रकारच्या पाककृतींचा आस्वाद घ्यायचा असेल तर, बेंगळूरूला भेट देऊ शकता.
सणाच्या उत्साहाने आणि जल्लोषाने हे शहर पार न्हाऊन निघालेले असते. इथल्या विविध बेकरीमधून केकचे अनेक चविष्ट आणि स्वादिष्ट फ्लेवर्स तुमचा ख्रिसमस आणखी स्पेशल करतील.
१०. दमन-दिव –
दमन-दिव हे भारतातील अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे तुम्ही तुमची ख्रिसमस सुट्टी अगदी आनंदात व्यतीत करू शकता.
या दिवासात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे भारतातील वेगळ्या भागातील एका वेगळ्या संस्कृतीशी तुमचा परिचय होईल.
या शोज मधून पोर्तुगीज डान्स देखील पाहायला मिळेल. दिवच्या प्रसन्न स्वच्ह समुद्र किनाऱ्याला भेट दिल्याने तुमचा हा ख्रिसमस अगदी स्पेशल बनून जाईल.
११. मनाली –
समुद्र किनाऱ्याला भेट देण्याची भीती वाटते? मग तुम्ही हा ख्रिसमस हिमाचलच्या बर्फाळ डोंगरात देखील तितक्याच उत्साहात साजरा करू शकता.
अगदी फेअरीटेल मधल्या प्रमाणे तुम्हाला बर्फात लोळण्याचा आणि बर्फाचे गोळे फेकून मारण्याचाही आनंद घेता येईल.
स्कीईंग आणि स्नोबोर्डिंग करता येईल, सजवलेले ख्रिसमस ट्रीज तर असतीलच पण, गरम चॉकलेट ड्रिंक सोबत शेकोटीचा देखील आनंद घेत, सँटाची वाट देखील पाहता येईल.
१२. दिल्ली –
इतर अनेक शहरांप्रमाणेच राजधानी दिल्लीत देखील ख्रीसमसचा आनंद ओसंडून वाहत असतो. मॉल्स आणि रस्ते देखील अगदी थाटात सजून धजून उभे असतात.
क्लब्ज मधून थीम पार्टीज सुरु असतात, कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये विशिष्ट स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते, वातावरणात सणासुदीचा जादुई फील खूप चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल.
ख्रिसमसचा आनंद देणारी कितीतरी ठिकाणे दिल्लीत मिळतील. सॅक्रेड हर्ट कॅथेड्रल सारखी चर्चेस देखील आहेत, जिथे तुम्ही ख्रिसमस प्रेयर करू शकता.
१३. शिमला –
बर्फाळ ख्रिसमसचे स्वप्न पाहणार्यांसाठी शिमला हे अगदी योग्य डेस्टिनेशन ठरेल. टॉय ट्रेन मध्ये बसून आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या बर्फाळ डोंगररांगा पाहू शकता.
ब्रिटीश कालीन रेस्टॉरंट मधून वाफाळती चॉकलेट ड्रिंक्स आणि कॉफीची मजा घेऊ शकता, तसेच आणखीही काही स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. सोबत पर्यटकांसाठी अनेक मजेशीर गेम्स देखील असतात. मास प्रेअरसाठी चर्चमध्येही जाऊ शकता.
१४. चेन्नई –
ख्रिसमस सेलीब्रेट करण्यासाठी चेन्नई हा एक अत्यंत चंगला पर्याय ठारु शकतो. कॅरोल आणि मास प्रेयर व्यतिरिक्त इथल्या विविध हॉटेलमधून बफे जेवणाची असलेली मेजवानी, क्लब्जनी आयोजित केलेल्या नाईटलॉंग पार्टीज, सोबत आश्चर्यचकित करण्याऱ्या अॅक्टिव्हिटीज यामुळे हा ख्रिसमस म्हणजे आनंदाची मेजवानी ठरेल.
१५. लान्सडोन –
शांत निसर्गरम्य परिसरात आणि जिथे जास्त गडबड गोंधळ असणार नाही अशा एकाकी ठिकाणी तुम्हाला ख्रिसमस सेलीब्रेट करायचा असेल तर, लान्सडोन हे एक अत्यंत सुंदर आणि रम्य ठिकाण आहे.
जिथे शेकोटी, संगीत, सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्रीज सोबतच भेट देण्यासाठी काही सुंदर वस्तू देखील भेटतील.
१६. सिक्कीम –
सुमारे ५,४१० फुट उंचीवर असलेले हे हिलस्टेशन देखील तुमच्या ख्रिसमस खास बनवण्यासाठी सज्ज असेल. इथल्या उत्सवाची मजा काही वेगळीच असते.
सुर्यास्ताचा सुंदर देखावा आणि पहाटेची काही अद्भुत सौंदर्य दृश्ये तुम्हाला मोहवून टाकतील. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तर अगदी सुंदर ठिकाण.
एकदा बर्फ वृष्टी सुरु झाली की हेच सिक्कीम स्वर्गीय सौंदर्याने न्हाऊन निघते. इथे साजरा होणारा ख्रिसमस देखील तुम्हाला अद्भुत आनंद देऊन जाईल.
१७. दादर आणि नगरहवेली –
गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये वसलेले या छोट्याशा केंद्रशासित प्रदेशातील ख्रिसमस देखील तुम्हाला अनोखा आनंद देईल. इथल्या ख्रिसमसमध्ये एक प्रादेशिक सौंदर्याची आणि संस्कृतीची सरमिसळ दिसते, ज्याने हा ख्रिसमस आणखीनच यादगार बनेल.
१८. उटी –
तामिळनाडूतील हे एक सुंदर हिलस्टेशन आहे, जिथल्या चर्चेसची वास्तुकला पहिल्यानंतर डोळे थक्क होतील. पर्यटकांना आकर्षित करणारे हे शहर ख्रिसमसच्या उत्साहात आणि जल्लोषात आणखीनच आकर्षक वाटते.
आल्हाददायक हवामान आणि चित्रमय सौंदर्य यामुळे ख्रिसमस काळात भेट देण्यास हे एक उत्तम ठिकाण आहे.
उटीतील प्रशस्त आणि सुंदर चर्चेस पाहून तुमचे डोळे दिपून जातील. ख्रिसमसच्या सर्व परंपरागत पद्धती इथेही पाहायला मिळतील.
१९. गुलमर्ग –
बर्फाळ ख्रिसमसचा आनंद लुटायचा असेल तर, गुलमर्ग हे हिलस्टेशन अगदी योग्य आहे. या काळात अनेक विंटर स्पोर्ट्सचा आनंदही लुटता येईल.
गुलमर्गच्या सुंदर चर्चेस मधून ख्रिस्ताचा बर्थडे सेलिब्रेट करू शकता. गोठवणाऱ्या थंडीचा आनंद लुटू शकता. हॉट चॉकलेट सोबत बर्फवृष्टीची मजा लुटू शकता. ख्रिसमससाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.