नवीन वर्षात आर्थिक सुरक्षिततेसाठी “या” ७ गोष्टींकडे लक्ष द्या आणि आर्थिक चणचणीतून मुक्त व्हा…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
डिसेंबर महिना म्हणजे नवीन वर्षाची चाहूल. हे वर्ष समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच सगळ्यांची इच्छा असते. पण, ही समृद्धी तेव्हाच मिळते जेव्हा आर्थिक स्थैर्य असतं. नवीन वर्षात यशस्वी होण्यासाठी आपण वेगवेगळे निश्चय करत असतो.
पण, बरेचदा आपले निश्चय हे फक्त कागदावरच मर्यादित राहतात.
फिटनेस, करियर अशा विविध गोष्टींवर आपण रिझोल्युशन करतो. पण, आर्थिक बाबींकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं.
या वर्षी आर्थिक चणचणीतून मुक्त होण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
१) बजेट तयार करा
कित्येकदा महिन्याभराच्या खर्चाचं आणि कमाईचं बजेट आपल्या डोक्यात असतं. पण, ते कागदावर लिहून काढण्याची सवय करा. प्रत्येक वेळेस लिहिणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये खर्च लिहून ठेऊ शकता.
आतापर्यंत तुम्ही कधीच असं केलं नसेल तर नवीन वर्ष हे नवा बजेट प्लॅन तयार करण्याची चांगली संधी आहे.
अनेकदा आपल्याकडून लहानसहान खर्च होतात. पण ते लक्षात राहत नाहीत. यासाठी ते लिहून ठेवणं महत्त्वाचं असतं.
कोणत्या गोष्टींवर खर्च केला पाहिजे, कोणत्या नाही हे व्यवस्थित ठरलं असेल तरच वायफळ खर्च टाळता येतो. आहार, कपडे, घराचं कर्ज, बाकीचे कर्ज, बिल्स, प्रवास खर्च असा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही योग्य बजेट आखू शकता.
२) कर्जाची परतफेड त्वरेने करा
डोक्यावर कर्जाची टांगती तलवार कधीच असू नये असं म्हटलं जातं. कर्ज हे दैनंदिन जीवनातील तणावाचे मुख्य कारण होऊ शकतं. त्यामुळे या वर्षात कर्जाचे ओझे कमी करण्याकडे आणि नवीन कर्ज न घेण्याकडे जास्त लक्ष द्या.
कर्ज नसेल तर तुम्ही कोणत्याही तणावाखाली न येता आयुष्य एन्जॉय करू शकता. त्यामुळे, इतर खर्च करण्याआधी घरासाठी घेतलेलं कर्ज, कारसाठी किंवा नवीन व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज वेळीच फेडण्याचा प्रयत्न करा.
३) वायफळ खर्च कमी करा
आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा सगळ्यात साधा आणि सोप्पा पर्याय म्हणजे खर्च कमी करणे.
महिन्याला तुम्ही जेवढे पैसे कमवता त्यापेक्षा कमी तुमचा खर्च असला पाहिजे. पण, आपण कमाईचा फार विचार न करता अनेकदा अनावश्यक गोष्टींच्या हव्यासापायी पैसे खर्च करतो.
एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची तुम्हाला खरंच गरज आहे कि नाही हे तपासून बघा.
कोणतीही लहान वस्तू खरेदी करताना तुम्ही हा विचार केला तरच निवृत्तीनंतर समाधानाचे आयुष्य जगू शकता.
४) काही पैसे स्वतःसाठी राखून ठेवा
बरेचजणं महिन्याच्या अखेरीस काही पैसे बचत खात्यात जमा करण्याचा विचार करतात पण, इतर खर्चांमुळे महिन्याच्या शेवटी हातात पैसेच उरत नाहीत.
असं होऊ नये यासाठी पगार हातात आल्यानंतरच काही पैसे बचतीसाठी बाजूला काढून ठेवा. ते खर्च करू नका.
संकटकाळात हीच बचत कमी येते. त्यामुळे बँकेत ‘फिक्स डिपॉझिट’ करून काही पैसे ठेऊन द्या. बचतीसाठी तुम्ही ‘म्युच्युअल फंडस्’मध्ये देखील गुंतवणूक करू शकता.
५) कमाई वाढवण्यासाठी प्रयत्न करा
बरेचदा कामाचे स्वरूप आपल्याला आवडत नाही आणि आपण नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. पण, काहीही विचार न करता असा निर्णय घेऊ नका. असे निर्णय घेण्याआधी आर्थिक गणिताचा विचार करा. नोकरी सोडण्यापेक्षा कामाचे स्वरूप बदलून पहा.
मनापासून काम केलंत तर तुम्हाला लगेचच प्रमोशनदेखील मिळू शकतं. एखाद्या वरच्या पोस्टसाठी अर्ज करा किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते बघा.
नोकरीव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी इतर आवडीची कामे करूनही तुम्ही कमाई वाढवू शकता.
६) निरोगी रहा
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आरोग्याचा आणि आर्थिक गणिताचा काय संबंध आहे? पण, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
आरोग्य निरोगी असेल तरच तुम्ही उत्तम काम करू शकता आणि उत्तम काम झालं तरच आर्थिक गणितं सुटतात.
तुम्ही निरोगी असाल तर औषधांवर होणार खर्च तुम्ही बचतीसाठी वापरू शकता. त्यामुळे, हजार रुपयांची औषधं खाऊन रोज डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा योग्य आहार घेऊन पैशांची बचत करा.
७) काही वर्षानंतरचे आर्थिक ध्येय डोळ्यासमोर ठेवा
डोळ्यांसमोर कोणते ध्येयचं नसेल तर आपण काहीच कष्ट घेत नाही. त्यामुळे फक्त काही महिन्यांचा विचार करू नका.
मोठं ध्येय बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. पुढील पाच वर्षांनी तुम्हांला कोणत्या पद्धतीचं आयुष्य जगायला आवडेल याचा विचार करा आणि त्यानुसार आतापासूनच गुंतवणूक सुरु करा.
तुम्हाला हवं असणारं घर, कुटुंबाचे पालनपोषण, भटकंतीचे प्लॅन्स यांचा विचार करून आधीपासूनच थोडी थोडी गुंतवणूक करा म्हणजे नंतर तणाव येणार नाही.
या गोष्टी वाचताना अगदी साध्या आहेत असं वाटलं तरीसुद्धा बऱ्याचदा कामाच्या नादात आणि तणावाखाली आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले की सगळीच आर्थिक गणितं कोलमडतात.
म्हणूनच, नवीन वर्षाची सुरुवात करताना कोणताही नवीन खर्च करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा आणि आर्थिकदृष्ट्या सबल व्हा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.