पाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जाणारा दुबळा संघर्ष : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ६)
यापूर्वीच्या भागाची लिंक: काश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)
मुस्लीम बहुलता आणि त्याची सीमा पाकिस्तानशी लागत असल्यामुळे कश्मीरवर आमचाच दावा असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. फाळणीच्या नियमानुसार(नियम वाचण्यासाठी या आधीचा भाग वाचावा) त्याचा दावा वैध आहे.कश्मीरात भारतास हा सिद्धांत सोयीचा नसल्यामुळे भारताने यास अधिकृतपणे मान्यता दिली नाही व धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला आहे. पण सत्य वेगळेच आहे. भारत द्विराष्ट्रवाद सिद्धांत मानत नाही, भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, असे आपण कितीही जरी सांगितले तरी भारतीय फाळणी ही मुस्लीमांसाठी पाकिस्तान आणि हिंदूसाठी हिंदुस्थान याच व्यावहारिक तत्वावर झाली व अंमलात आणली गेली होती. यासाठी वानगीदाखल एकच उदाहरण पुरेसे आहे. हैद्राबाद व जुनागड यांचे स्वातंत्र्य भारताने भौगोलिक संलग्नतेची कसोटी वापरून रद्द केले होते व याठिकाणी कधीही सार्वमत घेण्याच्या भानगडीत पडलेला नाही. जर भारत खरंच धर्मनिरपेक्षता, लोकाचे अधिकार मानत असता तर आज हैद्राबाद, जुनागड स्वतंत्र किंवा पाकिस्तानचे भाग असते.
पाकिस्तान कश्मीरसाठी चार लढाया लढले पण भारतीय नेतृत्वाने वा सैन्याने त्याला यात यश मिळू दिलेले नाही. सियाचीन हे युद्धक्षेत्र हे याच कश्मीरात येते. सियाचीनवरुन पाकिस्तानी आणि चीनी सैन्य यावर नजर ठेवता येते. तेव्हा कश्मीरच सामरीकदृष्टीनेही भारतासाठी तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे आतातर ते त्याला मिळण्याची सुतरामही शक्यता नाही. पाकिस्तानने कश्मीर मिळविण्यासाठी करता येईल ते सर्व केले. या पायी स्वतःला विनाशाच्या कडेलोटावर आणून ठेवले आहे पण त्याने भारताशी लढणे अजूनही थांबवलेले नाही. आताही जेव्हा संधी मिळेल तेव्हा जिथे-तिथे हा प्रश्न तो देश उपस्थित करतच असतो.
पाकिस्तानला कश्मीर जसे धार्मिक कारणासाठी हवे आहे तसे ते त्याला त्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठीही हवे आहे. पाकिस्तानी पाणी हे भारतीय कश्मीरातूनच वहात जाते. पाकिस्तानात पाण्यासाठी मुख्य स्त्रोत असलेल्या रावी, झेलम व सिंधू या मुख्य नद्या भारतीय कश्मीरात उगम पावून पुढे पाकिस्तानात जातात. उद्या भारताने आपलं पाणी रोखले तर? या चिंतेनेही ते कश्मीर मिळविण्यासाठी उद्युक्त होतात. असे काही होणार नाही याची ग्वाही सिंधू नदीकरार करून भारताने पाकिस्तानला यापूर्वीच दिलेली असली तरी भारत गरज पडलीच तर यावर पुन्हा विचार करू शकतो हे काही दिवसापूर्वीच याबाबतीत पंतप्रधान मोदींनी केलेले वक्तव्य हे सुचक म्हणता येईल.
जोपर्यंत पाकिस्तान कश्मीरवरील आपला दावा सोडून देत नाही तोपर्यंत तरी ही समस्या सुटणार नाही हे नक्की .भारत-पाकिस्तान हे असेच लढत राहतील.आपली कमजोर अर्थव्यवस्था, त्याची राज्य म्हणून टिकून राहण्याची कमजोर क्षमता, अंतर्गत सुरक्षिततेस निर्माण झालेले गंभीर धोके, दहशतवाद याने हा देश कडेलोटाच्या कगारीवर पोहचलाय. भारताशी तो आता दीर्घकाळ लढू शकणार नाही .आपण भारताशी लढत राहीलो तर कश्मीर तर आपल्याला मिळणारच नाही पण पाकिस्तानही हातातून जाईल अशा आशयाची मते तेथील जाणकार लोक व्यक्त करत आहेत. पाकिस्तानने कश्मीर सोडून स्वतःच्या घरावर लक्ष द्यावे असे मानणारे तिथे प्रबळ होत आहेत.
भारताशी लढणे आता पाकिस्तानला परवडणारे नाही, पण भुतकाळ असा लगेचच झटकता येत नसतो. कश्मीरी मुसलमान यांच्यासाठी मनात भावनिक किनार असणारे अजूनही तिथे बहुसंख्य आहेत. याचबरोबर कश्मीर समस्या संपली तर पाकिस्तानी सैन्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागू शकते. तेव्हा पाकिस्तानी सैन्य जोपर्यंत कश्मीरबाबतीत आपला दुराग्रह सोडणार नाही तोपर्यंत तरी ही समस्या अशीच रहाणार आहे. मुशर्रफ यांनी याबाबतीत प्रागतीक पाऊल उचलले होते पण ते निष्फळ करण्यात आले. पाकिस्तानी सैन्य नेतृत्वास ज्या दिवशी सुबुद्धी सुचेल त्यादिवशी कश्मीर प्रश्न सुटेल अन्यथा ही लढाई अशीच सुरु राहील पाकिस्तानच्या नाशापर्यंत, आणि तो क्षण आता जवळच आलाय….!
क्रमशः
—
आम्ही एक unbiased media portal आहोत, त्यामुळे आम्ही सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या सर्व मतांना प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. म्हणजेच, MarathiPizza.com वर विवीध लेखकांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.
Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.