Site icon InMarathi

युती, आघाडी फक्त राजकारणात नसतात : वाचा जगातील सर्वात “डेडली अलायन्सेस” बद्दल

organized crime Feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हिंदी चित्रपट, हॉलिवूडचे सिनेमे , तसेच आता आलेल्या वेब सिरीज ह्यांमध्ये बऱ्याचदा एखादा माफिया लीडर, त्याचे अनैतिक व्यवसाय , त्याचे गुन्हेगारी जगतातील मोठे साम्राज्य या गोष्टींचे सुरस कथानक रंगवलेलं बघायला मिळतं.  त्याची गॅंग ,त्याचे प्रशिक्षित कॉन्ट्रॅक्ट किलर्स, त्याचे प्रतिस्पर्धी हे सर्व बघुन आपण थक्क होऊन जातो. जगभरात चालणाऱ्या वेगवेगळ्या डील्स , गुप्तहेर संस्थांची त्यांच्यावर असणारी करडी नजर आणि त्यातून मार्ग काढत चालणारे त्याचे अनैतिक व्यवसाय ह्या सगळ्याचे दर्शन आपल्याला घडते.

द गॉडफादर पासून तर डिपार्टेड, कसिनो, ओशन्स सिरीज ह्या सगळ्यातून ह्या गुन्हेगारी जगात काय चालते ह्याची आपल्याला थोडीफार कल्पना येते. मानवी तस्करी, ड्रग्स, पैसे, शस्त्रात्रे ह्यांची तस्करी ह्यांचे सुद्धा बऱ्याच चित्रपटांत आणि कथा कादंबऱ्यांत वर्णन केले गेले आहे. हे सगळे वाचून, बघून आपल्याला प्रश्न पडतो की खरंच जगात अश्या माफिया लोकांच्या गॅंग असतील का?

चित्रपटांत दाखवतात तसे खरंच घडत असेल का? तर ह्याचे उत्तर आहे की होय!

जगात अश्या अनेक माफियांच्या गॅंग आहेत ज्यांनी जगभरातील गुप्तहेर संस्था आणि सरकार ह्यांच्या नाकात दम आणला आहे. त्यांचे जाळे संपूर्ण जगात पसरले आहे आणि ते अत्यंत पद्धतशीरपणे त्यांचे सगळे अनैतिक व्यवसाय करत असतात. विविध प्रकारचे गुन्हे, तस्करी करणारी, अनैतिक धंदे करणारी माणसे एकतर एकत्र काम करतात किंवा एकत्र येऊन एखाद्या माफियासाठी काम करतात.

 

ह्यालाच मॉब , रिंग, सिंडिकेट किंवा सोप्या भाषेत अंडरवर्ल्ड असे म्हणतात. आणि जगात रशियन माफिया, चायनीज माफिया, हाँगकाँग ट्रायड्स , जॅपनीज याकूझा, इटालियन माफिया, मेक्सिकन मॉब , आयरिश मॉब, अमेरिकन मॉब ह्या मोठ्या माफिया गॅंग प्रसिद्ध आहेत.

ह्या माफिया गॅंग ज्या अनैतिक व्यवसायात आहेत त्याला साध्या भाषेत ऑर्गनाइज्ड क्राईम असे म्हटले जाते. त्यांच्या ह्या अनैतिक व्यवसायांचा सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यावर सुद्धा गंभीर परिणाम होत असतो पण आपल्याला जोवर त्याची थेट झळ बसत नाही तोवर आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. आज आपण जगातल्या काही प्रचंड धोकादायक युती उर्फ डेडली अलायन्सेस बद्दल जाणून घेऊया.

१. सोलंटसेव्हस्काया ब्रात्वा (ब्रदरहुड)
हा एक रशियन माफिया ग्रुप आहे. ह्या माफिया गॅंगचे वार्षिक उत्पन्न ८.५ अब्ज डॉलर्स इतके आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात क्रिमिनॉलॉजीचे प्राध्यापक म्हणून काम करणारे आणि इंटरनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राईम ह्या विषयातील तज्ज्ञ असलेले फ्रेडरिको व्हॅरिस ह्यांचे असे म्हणणे आहे की ह्या माफिया ग्रुपची रचना विकेंद्रित आहे.

ह्या ग्रुपमध्ये १० वेगवेगळे अर्ध स्वायत्त बिगेड्स आहेत. हे ब्रिगेड्स बहुतांश वेळेला स्वतंत्रपणे काम करतात. अर्थात ते आपापली संसाधने एकमेकांच्या कामासाठी वापरतात. आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या पैश्याचे नियोजन एका काउन्सिल (परिषद) द्वारे केले जाते. ह्या काउन्सिलमध्ये १२ लोक असतात. हे लोक त्यांच्या कामासाठी जगात अनेक ठिकाणी एकमेकांना भेटत असतात आणि त्यांच्या मिटिंगला एखाद्या उत्सवाचे बाह्यस्वरूप दिले जाते.

Pinterest

तज्ज्ञांचा अंदाज आहे की ह्या माफिया गॅंगसाठी ९००० लोक काम करतात . ड्रग्स आणि मानवी तस्करी हा ह्यांचा मुख्य व्यवसाय आहे. अफगाणिस्तानमध्ये उत्पादन होणाऱ्या हेरॉईनचा ही गॅंग व्यवसाय करते.

२. यामागूची गुमी
ह्या गॅंगला जगातील सर्वात मोठी गॅंग म्हटले जाते. हे एक जॅपनीज माफिया गॅंग आहे. अश्या बऱ्याच गॅंग जपानमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना जपानमध्ये याकुझी असे म्हटले जाते. याकुझी म्हणजे माफिया होय. जपानचे माजी राष्ट्रीय पोलीस चीफ हिरोमित्सु सुगानुमा ह्यांच्या मते अमली पदार्थांची तस्करी हा यामागूची गुमी ह्या गॅंगचा मुख्य व्यवसाय आहे. त्यातूनच ते भरपूर पैसा कमावतात. त्याखालोखाल जुगार आणि खंडणी ह्यातून सुद्धा ते महसूल कमावतात. तसेच “वाद निराकरण” (डिस्प्युट रिझोल्युशन) हे काम सुद्धा ह्या माफिया गँगची माणसे करतात.

BusinessInsider

“ऍन इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम” ह्या पुस्तकाचे डेनिस मॅककार्थी ह्यांचे असे मत आहे की याकूझा हे शेकडो वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांचे काम सेंट्रलाइज्ड असून त्यांच्या माफिया ग्रुपमध्ये हायरार्की असतात म्हणजे काम करणाऱ्यांच्या विविध श्रेणी किंवा स्तर पदक्रम असतात. इतर आशियाई माफिया उदाहरणार्थ चायनीज माफिया मात्र डीसेंट्रलाइज्ड आहे. चायनिज ट्रायड्स म्हणजे विविध प्रकारचे अनैतिक काम करणारे गुन्हेगार खाजगी संबंधातून एकमेकांबरोबर काम करतात.

३. कॅमोरा
आधुनिक काळातील कडक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी ह्यामुळे इटालियन -अमेरिकन माफियाला काम करणे अवघड झाले असले तरी इटलीमध्ये इटालियन माफिया अजूनही तेवढ्याच ताकदीने कार्यरत आहे. इटालियन सरकार, पत्रकार आणि सामान्य नागरिक ह्यांनी ह्या माफियाचे काम बंद व्हावे ह्यासाठी प्रयत्न केले. तरीही काही सरकारी अधिकाऱ्यांनी इटालियन माफिया ग्रुप्सना संरक्षण दिल्यामुळे आजही इटलीमध्ये विविध माफिया गॅंग अनैतिक धंदे करीत आहेत. आणि त्यातून सुमारे ३३ अब्ज डॉलर्स इतका पैसा ते कमावत आहेत.

DW

इटलीमध्ये चार मोठ्या माफिया गॅंग आहेत. त्यातील कॅमोरा ही सर्वात मोठी गॅंग आहे. मानवी तस्करी, लैंगिक शोषण, ड्रग्स, मानवी तस्करी, जुगार, बनावट माल , शस्त्रांची तस्करी हे सगळे अनैतिक धंदे ही गॅंग करते. ही माफिया गॅंग खूप जुनी आहे. एकोणिसाव्या शतकात ह्या गँगच्या कृत्यांना सुरुवात झाली. ह्या गॅंगचे सुरुवातीचे सदस्य तुरुंगात एकमेकांना भेटले आणि तुरुंगातून सुटका झाल्यांनतर त्यांनी त्यांची गॅंग बनवली. नेपल्स ह्या प्रदेशात ह्या गँगचा तळ आहे.

४. न्द्रानघेता
इटलीमधील ही दुसऱ्या क्रमांकाची माफिया गॅंग आहे. ह्या गँगचा तळ कॅलॅब्रिया ह्या प्रदेशात आहे. कॅमोरा प्रमाणेच ही गॅंग अनेक अनैतिक धंदे करते. तसेच ह्या न्द्रानघेता गॅंगचे दक्षिण अमेरिकेतील कोकेन डीलर्सशी लागेबांधे आहेत. अटलांटिक समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या युरोपमध्ये जो अमली पदार्थांचा व्यवहार चालतो तो ह्याच माफिया गॅंगमार्फत होतो. ही गॅंग युरोपमधील ड्रग मार्केट हाताळते.

BBC

आता न्द्रानघेता गॅंगने अमेरिकेत सुद्धा आपले हातपाय पसरले आहेत आणि तिथे ड्रग्सचा व्यवसाय आणि त्या निगडित अनेक गुन्ह्यांत ह्यांचा मोठा हात आहे. ह्या माफिया गॅंगचे वार्षिक उत्पन्न ४.५ अब्ज डॉलर्स इतके असल्याचे सांगितले जाते.

५. सिनालोआ कार्टेल
ही मेक्सिकन माफिया गॅंग आहे जी अमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय करते. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही मेक्सिकोमधील सर्वात मोठी गॅंग आहे. दक्षिण अमेरिकेतील बेकायदेशीर अमली पदार्थांचे उत्पादन करणारे आणि अमेरिकन मार्केट ह्यांच्यातील दलाल म्हणून ही गॅंग काम करते. अमेरिकन लोक दर वर्षी १०० अब्ज डॉलर्स बेकायदेशीर अमली पदार्थांवर खर्च करतात. आणि त्यातील ६. ५ अब्ज डॉलर्स हे मेक्सिकन कार्टेलच्या खिशात जातात. त्यांचा मार्केट शेअर जवळजवळ ६० टक्के असल्याचे सांगितले जाते.

Borderland Beat

ह्याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील द नंबर्स गॅंग, भारतातील डी कंपनी ह्या काही जगप्रसिद्ध माफिया गॅंग आहेत ज्यांनी जगातल्या मोठमोठ्या गुप्तहेर यंत्रणा व सरकारे ह्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

गुन्हेगारी जगतातील ही काही मोठी नावे आहेत. हे सर्वसामान्य माणसाला समजण्यापलीकडचेआणि कल्पनेपलीकडचे आहे. हे लोक अशी कामे करतात ज्यांचा आपण विचार देखील करू शकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version