' …आणि “महिंद्रा अँड महिंद्रा” कंपनीचा “फाऊंडर” चक्क पाकिस्तानचा अर्थमंत्री झाला…! – InMarathi

…आणि “महिंद्रा अँड महिंद्रा” कंपनीचा “फाऊंडर” चक्क पाकिस्तानचा अर्थमंत्री झाला…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतात रिलायन्स,टाटा, बिरला, किर्लोस्कर, विप्रो, गोदरेज अशा मोठ-मोठ्या कंपन्या आहेत. जगात ह्या कंपन्यांची भारतीय कंपन्या म्हणून ओळख आहे. ह्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचे चित्र बदलून टाकले.

ह्या सर्व कंपन्या अतिशय कष्ट घेऊन, दूरदृष्टी ठेवून सुरु झालेल्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या जन्मामागे एक रंजक कथा आहे. अशीच एक भारतीय कंपनी आहे जिच्या जन्माची कथा आपण जाणून घेऊया.

आज “मेड इन इंडिया” किंवा “मेक इन इंडिया” ही मोहीम सुरु झालेली आहे. लोकांना स्वदेशी वस्तूचे महत्त्व हळूहळू पटू लागले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात “मेड इन इंडिया” गाड्यांची सुरवात करणाऱ्या “महिंद्रा अँड महिंद्रा” ह्या कंपनीच्या जन्माची कथा देखील रंजक आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी भारतात अनेक कंपन्या अगदी यशस्वीपणे व्यवसाय करीत होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्याबरोबर फाळणी सुद्धा झाली. त्यामुळे अनेक व्यवसायांवर त्याचा घातक परिणाम झाला.

अनेक कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाची जागा बदलावी लागली. काही व्यावसायिक भारतातून पाकिस्तानात गेले तर काही व्यावसायिकांनी भारतात येणे पसंत केले. फाळणीमुळे लोकांची फक्त नातीच तुटली नाहीत तर, अनेकांचे व्यवसाय देखील बंद पडले.

महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचे आधीचे नाव महिंद्रा अँड मोहम्मद होते. महिंद्रा अँड मोहम्मद ची सुरुवात मुंबई येथे एक स्टील कंपनी म्हणून झाली.

 

Mahindra and mohommad Inmarathi

 

२ ऑक्टोबर १९४५ रोजी जगदीश चंद्र उर्फ जे सी महिंद्रा आणि कैलाश चंद्र महिंद्रा उर्फ के सी महिंद्रा ह्या दोन बंधूंनी मलिक गुलाम मोहम्मद ह्यांच्या बरोबर लुधियाना येथे महिंद्रा अँड मोहम्मद ही कंपनी सुरु केली. जगदीश चंद्र महिंद्रा ह्यांचा जन्म लुधियाना येथे झाला.

नऊ भावंडांत ते सर्वात थोरले होते. त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी त्यांच्या सर्व भावंडांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले.

त्यांच्या धाकट्या भावास म्हणजे कैलाश चंद्र ह्यांना त्यांनी केम्ब्रिज येथे शिक्षण घेण्यास पाठवले. त्यांनी स्वत: मुंबईच्या व्हीजेटीआय महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी टाटा स्टील ह्या कंपनीत काम करणे सुरु केले.

ते तिथे सिनियर सेल्स मॅनेजर म्हणून काम करीत होते.  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा स्टील इंडस्ट्रीची अवस्था बिकट झाली तेव्हा भारत सरकारने पहिले स्टील कन्ट्रोलर म्हणून त्यांची नियुक्ती केली.

आनंद महिंद्रा, सध्याचे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन हे जगदीश चंद्र महिंद्रा ह्यांचे नातू आहेत.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मलिक गुलाम मोहम्मद ह्यांनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महिंद्रा अँड मोहम्मद ही कंपनी सोडली आणि ते पाकिस्तानला निघून गेले. तिकडे ते पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री झाले.

 

Malik Ghulam Muhammad InMarathi

 

त्यानंतर महिंद्रा बंधूंनी ही कंपनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेत मुंबईत विलीच्या जीप बनवण्याचा निर्णय घेतला. ह्यामुळे कंपनीचा विकास होणार होता. कंपनीचे नवे नाव “महिंद्रा अँड महिंद्रा” असे ठेवले गेले.

त्यांनी ही कंपनी भारताची जीप बनवणारी कंपनी म्हणून सुरु केली. त्यानंतर त्यांनी लाईट कमर्शियल व्हेईकल्स आणि कृषीक्षेत्रात वापरले जाणारे ट्रॅक्टर्स बनवायला सुरुवात केली.

त्यानंतर हळूहळू कंपनी वाढत गेली आणि ऑटोमोबाईल व आयटीपासून ते हॉस्पिटॅलिटीपर्यंत अनेक क्षेत्रांत पाय रोवले. कायनेटिक मोटर्स हे कंपनी विकत घेऊन दुचाकी गाड्यांच्या क्षेत्रात त्यांनी पाय ठेवला.

अमेरिकेच्या एका संस्थेने महिन्द्राला ग्लोबल २०० – द वर्ल्ड्स बेस्ट कॉर्पोरेट रेप्युटेशन्स च्या यादीत सर्वोत्तम १० भारतीय कंपन्यांच्या यादीत स्थान दिले.

महिंद्रा अँड महिंद्राने एक कॉर्पोरेट कंपनी म्हणून भारताच्या मार्केटचा चेहेरामोहरा बदलण्यात मोठे योगदान दिले आहे. तसेच, लाखो भारतीयांसाठी रोजगार निर्माण केला आहे.

 

Mahindra InMarathi

 

अनेक उगवत्या व्यावसायिकांना त्यातून प्रेरणा घेता येईल असे कार्य त्यांनी केले आहे. जे. सी महिंद्रा आणि के. सी महिंद्रा हे भारतीयांसाठी दीपस्तंभांप्रमाणे आहेत आणि ते कायम आपल्यासाठी प्रेरणास्रोत म्हणून राहतील.

पण महिंद्रा कंपनी ज्यांनी सुरु केली त्या मलिक गुलाम मोहम्मद ह्यांचे पुढे काय झाले? त्यांचे पाकिस्तानमध्ये आदराने स्वागत झाले का?

मलिक गुलाम मोहम्मद ह्यांचा १८९५ साली लाहोरमध्ये एका मध्यमवर्गीय  पठाण कुटुंबात जन्म झाला. त्यांचे बालपण लाहोर येथे गेले. त्यांच्यावर लाहोरी संस्कृतीचा पगडा होता. त्यांचे शालेय शिक्षण लाहोर येथेच झाले. नंतर उत्तर प्रदेश येथील अलिगढ विद्यापीठातून त्यांनी त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी अकौंटन्सी मध्ये बी.ए केले.

त्यानंतर त्यांनी १९२० साली अकाउंट सर्व्हिस ऑफ इंडियामध्ये काम करणे सुरु केले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला त्यांनी रेल्वे बोर्डमध्ये काम केले आणि त्यांच्यावर सामान्य पुरवठा व खरेदीची जबाबदारी सोपवण्यात आली.

 

Malik Sahab InMarathi

 

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला  मार्च १९४० मध्ये त्यांच्यावर चीफ कंट्रोलर ऑफ स्टोअर्स ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध ठिकाणी काम करून वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे त्यांच्या गाठीशी विविध प्रकारच्या कामाचा मोठा अनुभव होता.

त्यांनी हैद्राबादच्या निझामाकडे अर्थ सल्लागार म्हणून काम केले तसेच बहावलपूरच्या नवाबाकडे सुद्धा काम केले. १९४५ साली त्यांनी महिंद्रा बंधू ह्यांच्याबरोबर कंपनी सुरु केली. त्यांनी कंपनीचे सनदी लेखापाल म्हणून जबाबदारी सांभाळली.

त्यानंतर १९४७ साली जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा मलिक गुलाम मोहम्मद ह्यांची पाकिस्तानच्या नव्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून निवड झाली. त्यांच्याकडे अर्थ क्षेत्राचा मोठा अनुभव असल्याने त्यांनी पाकिस्तानची आर्थिक घडी बसवण्यात मोठे योगदान दिले.

१९४९ साली त्यांनी कराची येथे इंटरनॅशनल इस्लामिक इकॉनॉमिक कॉन्फरन्स आयोजित करण्याचा सल्ला दिला. ह्या परिषदेत सर्व इस्लामिक देशांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते. त्या परिषदेत भाषण करताना मलिक गुलाम मोहम्मद ह्यांनी मुस्लिम इकॉनॉमिक ब्लॉक तयार करण्याचा प्रस्ताव मांडला.

१९५१ साली पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान ह्यांची हत्या झाल्यानंतर मलिक गुलाम मोहम्मद ह्यांची ख्वाजा नाझीमुद्दीन ह्यांनी तिसरे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती केली. १९५५ साली मलिक गुलाम मोहम्मद ह्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गव्हर्नर जनरलचे पद सोडावे लागले.

 

Malik Ghulam Muhommad InMarathi

 

त्यांना पक्षाघाताचा झटका आला.  १९५६ साली त्यांचे निधन झाले. जर १९४७ साली फाळणी झाली नसती तर महिंद्रा अँड मोहम्मद ही कंपनी सुरु राहिली असती आणि मोहम्मद ह्यांच्या आर्थिक क्षेत्रातील ज्ञानाचा कंपनीला चांगला फायदा झाला असता, कंपनी आणखी मोठी व यशस्वी झाली असती.

 

Mahindra-Logo inmarathi
techbombay.com

 

जगात ह्या कंपनीकडे बघून भारतातील एकतेचे दर्शन घडले असते, पण दुर्दैवाने फाळणी झाली आणि फक्त दोन देशांमध्येच नाही तर नात्यांची आणि व्यवसायांची देखील फाळणी झाली. ह्या फाळणीमुळे  दोन्ही देशांतल्या व्यवसायांचे, लोकांचे अपरिमित नुकसान झाले ह्यात तिळमात्र शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?