Site icon InMarathi

मुलींनो- लग्न करण्याआधी या “१२” महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या..!

deepika padukone inmarathi

The print

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लग्न म्हटलं की प्रत्येक मुलीला दडपण येतं. नवीन घर, नवीन माणसं, ऑफिस या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे कशा सांभाळायच्या? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात.

भलेही आता आपण २०१९ मध्ये वावरत असू पण, लग्नाच्या बाबतीत मात्र मुली आजही १९५० च्या काळातच राहतात. लग्न म्हणजे कुटंबाशी जुळवून घेणं, जेवण बनवणं,    साफसफाई करणं हेच चित्र डोळ्यासमोर येतं. परंतु, लग्न म्हणजे फक्त स्वयंपाक किंवा साफसफाई नव्हे.

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मीलन आणि जबाबदारीचे वाटून घेणं असतं. ही फक्त एकट्या “मुलाची” किंवा “मुलीची” गोष्ट नाही. त्यांनी एकत्रितपणे नातं टिकवण्याची गरज असते. लग्नाआधी आलेलं दडपण कमी करण्यासाठी जाणून घ्या, या १२ गोष्टी..

 

१. विवाह विषयक कायदे 

विवाह विषयक कायदे जाणून घेण्याची काय गरज? असे बेजबाबदार प्रश्न विचारू नका. कारण भारतात लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही तर, दोन कुटुंबांचं मीलन असतं. आपण कितीही आधुनिकतेची टिमकी वाजवली तरी, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा आपल्याला परंपरा वगैरे प्रिय असतात.

म्हणून कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हिंदू विवाह कायदा काय आहे आणि त्यातील तरतुदी काय आहेत? तुमचे हक्क अधिकार काय आहेत? हे सर्व जाणून घ्या. प्रत्येक लग्न घटस्फोटात परावर्तीत होतेच असे नाही, पण वेळ आलीच तर तुम्हाला तुमचे कायदेशीर अधिकार काय आहेत हे माहिती असायला हवे.

 

 

२. वैद्यकीय चाचण्या

वेळीच काळजी घेतली नाही तर, लग्नानंतर अनेक समस्या उद्भवू शकतात. लग्न करून पश्चाताप करण्याची वेळ येण्यापेक्षा आधीच सावधगिरी घेणे केंव्हाही उत्तम! एचआयव्ही टेस्ट हळूहळू शहरी भागात स्वीकारली जात असली तरी, अजूनही ग्रामीण भागात याचा विचारही केला जात नाही.

पण, लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे चारित्र्य वगैरे ठरवण्याची सोय नाही तर, तुमच्या भावी पिढीच्या सुरक्षिततेची तरतूद आहे हे लक्षात घ्या आणि लग्नाआधी एचआयव्ही टेस्टची मागणी करा.

 

 

३. नम्रपणे नाही म्हणायला शिका 

नाही, म्हणता येणे देखील महत्वाचे आहे. लग्नानंतर नाही केंव्हा आणि कसे म्हणायचे हे मुलीना माहित हवे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही याचा वापर करावा असे अजिबात नाही पण, गरज पडल्यास तुम्हाला नकार दर्शवता आला पाहिजे.

तुमचा नवरा किंवा सासरचे लोक तुमच्यावर भावनिक दबाव आणून एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे करण्यास भाग पाडत असतील किंवा तुमच्या हिताचा विचार न करता, तुमची संमती जाणून न घेता जबरदस्ती करत असतील तर अशावेळी स्वतःच्या भल्यासाठी तुम्हाला ठाम राहता यायला हवे आणि स्पष्टपणे नकार नोंदवता यायला हवा. आपल्यावर अन्याय होतोय किंवा जबरदस्ती होतेय असे तुम्हाला वाटत असल्यास त्याला नकार द्यायला शिकायला हवे.

 

 

४. स्वयंपाक करणे 

तुमच्या कुटुंबासाठी दोन्ही वेळचे जेवण नाश्ता वगैरे बनवायलाच हवा असे आम्ही म्हणत नाही. पण, किचन मधील बेसिक गोष्टी तरी माहिती असायला हव्यात.

समजा तुम्ही दोघेच राहत असाल, आणि कामवाली पण ऐनवेळी सुट्टीवर गेली तर काय कराल? म्हणून थोडा बहुत स्वयंपाक तरी शिकायला हवा. वरचेवर हॉटेलिंग किंवा मॅगी खाऊन राहणं तर परवडू शकत नाही. म्हणून किमान काही बेसिक गोष्टी करता येणे महत्वाचे आहे.

 

 

५. घरातील भांडणात दरवेळी नवऱ्याला ओढू नका

प्रत्येक जोडप्याला या दिव्यातून पार व्हायलाच लागत. एकत्र कुटुंबात कधी न कधी तरी भांड्याला भांड हे लागतच. पण, दरवेळी छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी जर तुम्ही नवऱ्याला मध्ये घ्यायला लागला तर त्याच्या मानसिकतेवर याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या नात्यावरही.

म्हणून घरातील छोट्या-छोट्या भांडणापासून त्याला दूरच ठेवा. घरच्यांशी वादविवाद करण्यापेक्षा शांतपणे त्यांना विषय समजावून सांगण्यावर भर द्या. विषय नक्की काय आहे याची नवऱ्याला जरूर कल्पना द्या पण उगाच आकांडतांडव करू नका. सतत कुरबुरी करायला लागलात तर, घरातील वातावरण नेहमीच तणावपूर्ण राहील.

 

 

६. संवाद ठेवा 

संवाद हा तर प्रत्येक नात्याचा प्राण आहे. तुम्हाला खुश ठेवणे ही तुमच्या नवऱ्याची जबाबदारी आहे आणि त्याला खुश ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत? इच्छा, स्वप्न काय आहेत?

कोणत्या गोष्टी खटकतात कोणत्या आवडतात हे सर्व बसून बोलून घ्या. एकमेकांच्या मनातील भावना कळल्याशिवाय तुम्ही एकमेकांसाठी नेमकं काय करायला हवे हे कळणार नाही. तुमच्या बोलण्यातून, हावभावातून एकमेकाबद्दलची काळजी प्रेम व्यक्त होऊ द्या. घरातील इतर व्यक्तींशी देखील सुसंवाद राखा.

 

७. समाधानी वैवाहिक आयुष्य 

शहरी भागातील स्त्रियांपेक्षा ग्रामीण भागातील स्त्रियांना समागम किंवा लैंगिक संबंध म्हणजे कर्तव्य आहे याच भावनेतून पाहतात. समागम हा कर्तव्य भावना म्हणून नाही तर, आनंद देण्या-घेण्याच्या उद्देशाने करण्याची आनंददायी कृती आहे याची जाणीव करून घ्या.

सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल माहिती घ्या. फक्त गर्भनोरोधक गोळ्या किंवा कंडोम एवढेच गर्भनिरोधाचे पर्याय नाहीत, तर इतरही अनेक मार्ग आहेत याची माहिती करून घ्या. तुम्हाला काय आवडते, कसे आवडते यावर आपल्या जोडीदाराशी खुलेपणाने चर्चा करा.

 

 

८. तुमच्या पालकांना देखील तुमची तितकीच गरज असते

लग्नानंतर तुम्ही जरी तुमच्या सासरी राहणार असला तरी, तुमच्या आई-वडिलांना देखील तुमची गरज लागू शकते याची जाणीव ठेवा आणि ती तुमच्या नवऱ्याला आणि सासरच्या मंडळीनाही करून द्या. सुरुवातीचे काही दिवस तरी, तुम्हाला आणि तुमच्या आई-वडिलांना कठीण वाटू शकतात.

तुमच्या नव्या संसाराची आणि नव्या नात्याची सुरुवात करताना तुमच्या मागच्या कुटुंबाला आणि नात्याला अंतर देऊ नका. दोन्ही कुटुंबासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि जबाबदारी वाटून घ्यायची आहे याची मानसिक तयारी ठेवा. तुमच्या आई-वडिलांना गरज असेल तेंव्हा त्यांच्यासाठी वेळ द्या. आईला किमान दोन दिवसातून एकदा फोन करा.

 

 

९. आर्थिकदृष्ट्या सक्षम बना 

लग्न करण्याआधी प्रत्येक स्त्रीने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे, अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही काही तरी काम केले पाहिजे किंवा ९-५ नोकरी केली पाहिजे, असा याचा अर्थ होत नाही.

पण, लग्नानंतर तुमची आर्थिकस्थिती काय असणार आहे आणि भविष्यातील तरतुदीसाठी तुम्ही काय करू इच्छिता हे नक्कीच जाणून घ्यायला हवं. नवरा नोकरी करत असेल तर, भविष्यातील सुरक्षितता म्हणून त्याच्या पैशाची गुंतवणूक कशी आणि कुठे करता येईल याची तरी माहिती असणं फारफार आवश्यक आहे.

तुम्ही नोकरी करत असाल तर दोघांचेही अकाउंट कसे मॅनेज करता येईल याची माहिती असू द्या. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहण्याची किंवा त्याच्याकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या. बँकेचे व्यवहार कसे हाताळावे, प्रॉव्हीडंट फंड म्हणजे काय, यासारख्या आर्थिक संकल्पना तुम्हाला माहित असायला हव्यात.

 

 

१०. लक्षात घ्या तुम्ही “अर्धांगिनी” आहात

लग्न हा दोन व्यक्तींनी आयुष्यभरासाठी एकत्र येऊन करण्याचा प्रवास असतो. तुमच्या यशस्वी किंवा अपयशी नात्याची जबाबदारी जितकी त्याची आहे तितकीच तुमची देखील आहे.

आयुष्यातील समस्या तुम्ही किती सक्षमपणे हाताळू शकता त्यावरच तुमच्या नात्याची मदार टिकून राहील. संकटे आल्यावर हात वर करण्यापेक्षा त्यांना कसे तोंड देता येईल  यावर जास्त विचार करा.

लक्षात घ्या तुम्ही त्याची अर्धांगिनी आहात, याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येकवेळी नात्यासाठी तुम्हीच तडजोड केली पाहिजे. जितके प्रेम आणि आदर तुम्ही त्याला द्याल तितकेच प्रेम आणि आदर त्याच्याकडून मिळणे हा तुमचा हक्क आहे. तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल किंवा तुमचा अनादर होईल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही सहन करणार नाहीत.

 

 

११. तुमची इच्छा

लग्न का करताय, ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करताय तो खरच तुमच्या विचारंशी मिळताजुळता आहे का, की फक्त घराचे खुश व्हावेत म्हणून तुम्ही हे लग्न करताय, लग्नानंतर येणाऱ्या सगळ्या जबाबदार्या पेलण्याची क्षमता तुमच्यात आलीये का, या सगळ्या बाबींवर पूर्ण विचार करा. अगदी तुम्ही प्रेम विवाह जरी करणार असाल तरी, लग्न केल्यानंतर परिस्थिती आहे तशीच राहणार नाही हे लक्षात घ्या.

कोणत्याही दाबावला, अमिषाला बळी पडून लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका. तुमची मनापासून इच्छा असेल, तर आणि तरच लग्नाचा निर्णय घ्या. मुलाचं दिसणं, आर्थिक क्षमता  या सोबतच त्यांची जीवनशैली, विचारसरणी या गोष्टी देखील लक्षात घ्या.

 

indiamarks.com

 

तुम्हाला समानतेची वागणूक देणारा जोडीदार निवडा. लग्नात हुंड्याची बोलणी झालेत का, हुंडा घेणारा आहे की नाकारणारा याची पूर्ण माहिती घ्या. लग्न करण्यामागे समोरच्याचा हेतू काय आहे, हे स्पष्ट जाणून घ्या. लग्नाआधी आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे आयुष्य घालवणार आहात ती व्यक्ती खरंच तुमच्या योग्यतेची आहे का हे समजून घ्या.

 

१२. अपत्यांची अपेक्षा

जी गोष्ट लाग्नाबाबातीत तीच मुलांच्या बाबतीत. लग्नानंतर लगेच घराची मंडळी नातवंडांचे तोंड पाहण्याची घाई करतील पण, हा निर्णय घेताना तुमची क्षमता, आर्थिक परिस्थिती, वेळ, दोघांचीही इच्छा या सर्व गोष्टींचा विचार करा.

तुम्हाला मुल हवय, नकोय किंवा कधी हवंय, हा फक्त तुम्हा दोघांचा निर्णय असू शकतो. त्यात इतरांचे सल्ले जरुरू घ्या पण कुणाच्या दबावाला, इमोशनल ब्लॅकमेलिंगला किंवा शेजारीपाजारी आणि नातेवाईक यांच्या टोमण्यांना बळी पडून हा निर्णय स्वतःवर लादून घेऊ नका. प्रसंगी इतरांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करायला शिका.

 

 

लक्षात घ्या, लग्न म्हणजे तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. त्यामुळे ही आयुष्य सुरू करताना आधीच दडपण घेऊ नका. शांत आणि आनंदी मनाने नवीन घरात प्रवेश करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version