' नवरा खूप घरकाम करतोय? मग घटस्फोट होऊ शकतो; वाचा हा विचित्र निष्कर्ष! – InMarathi

नवरा खूप घरकाम करतोय? मग घटस्फोट होऊ शकतो; वाचा हा विचित्र निष्कर्ष!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपल्याकडे नवऱ्याने घरकाम करणे, ही आजही फार विचित्र गोष्ट समजली जाते. आता विभक्त कुटुंबात बरेच पुरुष आपल्या बायकोला मदत करताना दिसतात. पण पारंपरिक जुन्या विचारांच्या लोकांना अजूनही पुरुषाने घरकाम करणे म्हणजे पुरुषाचा अपमान वाटतो.

अजूनही बऱ्याच आया आपल्या मुलांना साधा चहा सुद्धा करता येत नाही, त्याला अगदी पाण्याचा पेला सुद्धा हातात द्यावा लागतो हे अभिमानाने सांगतात. मुलांना सुद्धा स्वयंपाक आणि बेसिक घरकाम करता येणे ही काळाची गरज आहे.

पण अजूनही घरात जर पुरुष घरकाम करताना दिसले तर लोक त्याला “बायकोचा गडी, बायकोचा बैल, बायकोच्या ताटाखालचे मांजर” वगैरे म्हणून मोकळे होतात.

 

Indian man taking care InMarathi

बरेचसे पुरुष घरकाम म्हणजे कमी दर्जाचे काम, बायकी काम, असे समजतात आणि घरात बायको राब राब राबत असते आणि हे महाशय सोफ्यावर तंगड्या पसरून लोळत पडलेले असतात आणि वर बायकोवरच आवाज चढवतात. अश्या लोकांसाठी नॉर्वेतून एक खुशखबर आहे.

नॉर्वेतील एका संशोधनात असे म्हटले गेले आहे की, “जर तुमचा नवरा खूप घरकाम करत असेल, तर तुमचा घटस्फोट होण्याची दाट शक्यता आहे.”

ऑस्लो अँड ऍकेरशस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, “पारंपरिक घरांत जिथे बायकाच सगळे घरकाम करतात अश्या घरांत जोडपी अधिक चांगल्या प्रकारे नांदतात.”

 

divorce-in-india InMarathi

 

“लग्न झालेले किंवा एकत्र राहणारे स्त्री-पुरुष आयुष्याच्या विविध टप्प्यांवर  घरकाम, लहान मुलांचे संगोपन ह्या जबाबदाऱ्या कश्या प्रकारे पार पाडतात आणि ते एकमेकांना किती मदत करतात” ह्याचा अभ्यास नॉर्वेजियन अभ्यासकांना करायचा होता.

त्यांनी ह्यासाठी दोन प्रकारे अभ्यास केला. ह्यात सब्जेक्ट म्हणून १८ ते ७९ वयातील वीस हजार पुरुष आणि बायकांचा समावेश होता.

ह्या अभ्यासाला त्यांनी “द स्टडी ऑफ लाईफ कोर्स, जनरेशन अँड जेंडर” आणि “द स्टडी ऑफ नॉर्वेजॉयन लाईफ कोर्स, एजिंग अँड जनरेशन्स”  अशी नावे दिली.

ह्या अभ्यासादरम्यान स्त्री पुरुषांना अपत्यसंगोपन आणि घरकामाची जबाबदारी कशी वाटून घेतली जाते ह्यावर प्रश्न विचारण्यात आले. तसेच लिंग समानतेबद्दल त्यांचे काय विचार आहेत हे त्यांना विचारण्यात आले. तसेच त्यांच्या आयुष्याच्या टप्प्याबद्दल व त्यांच्या सोशल क्लासबद्दल माहिती घेण्यात आली.

ह्या अभ्यासात असे लक्षात आले की ६५ टक्के जोडपी अपत्यसंगोपनाची जबाबदारी समसमान किंवा त्याच्या जवळपास वाटून घेत होती. ११ टक्के जोडप्यांमध्ये घरकामाची जवळपास सगळी जबाबदारी फक्त स्त्रियांनीच त्यांच्या खांद्यावर उचललेली होती.

 

cooking woman InMarathi

६० टक्के घरांत पुरुष थोडीफार मदत करत होते. २५ टक्के घरांत घरकामाची जवळजवळ समसमान विभागणी झाली होती. ह्यात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. ह्या २५ टक्क्यांमधील लोकांना मुले नव्हती किंवा स्त्रिया पूर्णवेळ नोकरी/व्यवसाय करीत होत्या. त्यामुळे ह्या घरात पुरुष व स्त्रिया दोघेही समसमान घरकाम करतांना आढळून आले.

Man working in kitchen InMarathi

अभ्यासक म्हणतात की,

“जिथे स्त्रियाच सगळे घरकाम करीत होत्या तिथे घटस्फोटाचे प्रमाण कमी असते असे नाही. पण जी जोडपी पारंपारिक नाहीत, तिथे मात्र घटस्फोटाचे प्रमाण जास्त आढळले.

चार वर्षांच्या कालावधीत जे पुरुष भरपूर किंवा जास्त प्रमाणात घरकाम करतात त्यांचा घटस्फोट होण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र जिथे स्त्रियाच जवळजवळ सगळे घरकाम करत होत्या तिथे घटस्फोटाचे प्रमाण कमी होते.”

 

Man working in kitchen

 

“जेंडर इक्वालिटी ऍट होम” ह्या अभ्यासाचे लेखक थॉमस हॅन्सन ह्यांनी असे म्हटले की, “पुरुष घरात जितके जास्त घरकाम करेल, तितकी घटस्फोटाची शक्यता वाढते. “पण अभ्यासकांना मात्र ह्या दोन्हीचा एकमेकांशी काहीही संबंध आढळला नाही. त्यांच्या मते हे निरीक्षण जोडप्यांच्या “आधुनिक मतांमुळे” सुद्धा झालेले असू शकते.

ह्याचे एक कारण असेही असू शकते की पारंपरिक जोडपी त्यांच्या लग्नाच्या नात्याला जास्त महत्व देतात आणि शक्यतोवर घटस्फोट घेऊ इच्छित नाहीत. त्यांच्यासाठी घटस्फोट ही वर्ज्य गोष्ट असते.

divorce inmarathi

 

 

ह्याउलट जे लोक पारंपारिकरित्या बायका घरकाम आणि पुरुष पैसे कमावणे ह्या चौकटीत अडकलेले नसतात त्यांचे विचार आधुनिक असू शकतात.

त्यांना लग्नाचे नाते पवित्र असते, ते मोडू नये, घटस्फोट वाईट वगैरे गोष्टींवर भरवसा नसतो. त्यामुळे पटले नाही तर सरळ वेगळे होण्यात त्यांना काही अडचण वाटत नाही. असे त्या रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे.

“आधुनिक जोडपी लग्न ही एक पार्टनरशीपपप्रमाणे मानतात आणि कामाची समसमान विभागणी करतात. ते लग्न पवित्र वगैरे असे मानत नाहीत”

– असे हॅन्सन म्हणतात.

 

Equality In Husband and Wife InMarathi

 

हॅन्सन ह्यांचा भर मूल्यांवर आहे. ते म्हणतात की,

“आजच्या आधुनिक काळात स्त्रिया सुद्धा भरपूर शिक्षण घेतात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे त्या त्यांच्या नवऱ्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून नसतात. त्यामुळे घटस्फोट झाला तरी त्या आपले आयुष्य अगदी व्यवस्थित जगू शकतात.”

अभ्यासकांनी असे म्हटले आहे की घरात सगळी जबाबदारी समान वाटून घेतली तरच समाधान असते असे अजिबात नाही. हॅन्सन म्हणतात की,

“लोकांना वाटेल की घरात समानता पाळली जात नसल्यामुळे लोक विभक्त होतात तर असे नाही. आमच्या अभ्यासातील आकडे वेगळेच काहीतरी सांगतात.”

जेव्हा जोडपी कामाची विभागणी करतात आणि दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत त्या घरात जोडपी अधिक आनंदात राहतात.

couple-inmarathi

दोघेही एकच जबाबदारी सांभाळत असतील तर त्यांना एकमेकांच्या कामात चुका दिसू शकतात आणि त्यामुळे भांडणे होतात. पण जर जबाबदारी वाटूनच घेतली असेल आणि एकमेकांच्या कामात हस्तक्षेप केला नाही तर भांडणे कमी होतात.

पण ह्याच विषयावर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये देखील एक अभ्यास करण्यात आला होता. त्यातील निष्कर्ष मात्र पूर्णपणे ह्याच्या विरुद्ध आहेत.

त्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या घरांत जोडपी एकमेकांना घरकामात मदत करतात ते घर अधिक आनंदी असते. ह्या अभ्यासासाठी ३४ देशांतील तीस हजार लोकांकडून माहिती घेण्यात आली.

 

Happy couple InMarathi

 

ह्या दोन्ही अभ्यासांच्या निष्कर्षात फरक असला तरीही एकमेकांना मदत केल्याने कामे सोपी होतात आणि त्यामुळे तणाव देखील कमी होतो हे साधे लॉजिक आहे.

आपल्याच घरात एकमेकांना मदत केल्याने नुकसान तर नक्कीच होत नाही इतके जरी ह्यातून लक्षात घेतले तरी खूप झाले. आणि हे समजून घेणे ही बदलत्या काळाची गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?