आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या बॉलीवूड मध्ये ऐतिहासिक घटनांवर चित्रपट केले जात आहेत. या आधी भन्साळींचा बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि त्यानंतर आता पानिपत.
ऐतिहासिक घटनांवर चित्रपट करायचा म्हणजे शिवधनुष्यच, कारण त्या समाजाच्या किंवा त्या व्यक्तीच्या समर्थकांच्या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावीच लागते.
या आधी जेव्हा पद्मावत हा चित्रपट येणार होता तेव्हा त्याला तीव्र विरोध झाला. कलाकारांवर किंवा चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांवर हल्ले केले गेले. या विरोधाचे कारण म्हणजे त्यातील पद्मावती हिचं ड्रेसिंग चुकीचे दाखवले असे मारवाडी समाजाचे म्हणणे होते.
त्या वरून कलाकारांचे पुतळे जाळणे किंवा बस जाळणे हे प्रकार घडून आले. हा सर्व प्रकार होऊनही चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला, आणि बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई देखील केली. यातील रणवीर सिंग याची खिल्जीची भूमिका सर्वांना खूप आवडली.
आता येत आहे पानिपत. याचे निर्माते आशुतोष गोवारीकर आहेत. त्यांची खासियत हीच मानली जाते की त्यांच्या चित्रपटांचे सेट हे खूप मोठे असतात. या आधी त्यांनी जोधा अकबर हा ऐतिहासिक चित्रपट केला होता.
पानिपत या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे, जो सर्वांच्या पसंतीस पडला आहे. सध्या सर्वत्र फक्त पानिपत याच चित्रपटाची चर्चा चालू आहे.
यामध्ये अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रीती सॅनॉन ही स्टारकास्ट आहे. क्रीती सॅनॉन हिने पार्वतीबाई यांची भूमिका केली आहे जी सर्वांनाच आवडत आहे.
त्यानंतर संजय दत्त यांनी अहमदशाह अब्दालीची भूमिका केलेली दिसते आहे, जी कदाचित या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट भूमिका ठरेल आणि सदाशिवराव भाऊ यांची भूमिका केली आहे अर्जुन कपूरने.
यातील संगीत हे अजय अतुल यांनी केले आहे. या आधी अजय अतुल यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांना संगीत दिलं आहे, आणि त्यांची गाणी देखील हिट आहेत. यातील बॅकग्राऊंड स्कोर हा चांगला वाटतोय म्हणून या चित्रपटाकडून देखील चांगल्या संगीताची अपेक्षा आहे.
सध्या ट्रेलर बद्दल सर्वत्र चर्चा चालू असताना एक गोष्ट खूप बोलली जात आहे आणि ती म्हणजे अर्जुन कपूरचा आवाज त्या भूमिकेला शोभत नाही, किवा एकंदरीतच त्याचा अभिनय हा त्या पात्राला ज्ञाय देईल कि नाही अशी आपसूक शंका येऊन जाते.
चित्रपटाचा ट्रेलर पाहताना असं वाटतं की सगळं चांगलं चाललं होतं आणि तेव्हा अर्जुन कपूर बोलला आणि सगळा मूडच गेला. काही जणांचं म्हणणं आहे की कास्टिंग करताना हे लोक हेडफोन घालून बसले होते का?
पूर्ण ट्रेलर मध्ये बाजीराव मस्तानी किंवा बाहुबली या चित्रपटांची आठवण येत होती. थोडक्यात हेच की वेगळं असं काही जाणवलं नाही. हा मग वेगळं काही जाणवलंच असेल तर ते फक्त आणि फक्त म्हणजे मुख्य भूमिकेची चुकीची कास्टिंग.
शिता वरून भाताची परीक्षा होतेच पण काही सांगता येत नाही चित्रपट पाहताना काही वेगळं देखील भासू शकतं. बघुयात हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतोय की नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.