Site icon InMarathi

या ११ गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवलात, तर संसार नक्कीच सुखाचा होईल…

sweetu final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“लग्न” ही खूप मोठी कमिटमेंट आहे. जेव्हा एखादी व्यक्ती लग्न करण्याचा निर्णय घेते तेव्हा तो आयुष्यातला मोठा निर्णय असतो. दोन भिन्न घरांतल्या ,भिन्न स्वभावांच्या, भिन्न वातावरणात वाढलेल्या, भिन्न सवयी व आवडीनिवडी असलेल्या दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात तेव्हा तो आयुष्यात होणारा खूप मोठा बदल असतो.

आता आपले आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, आपल्याला बऱ्याच तडजोडी कराव्या लागणार आहेत. हा विचार करूनच लग्न करण्याचा निर्णय घ्यावा. कारण चित्रपट, कथा, कादंबऱ्या, सिरीयल ह्यात जे लग्नानंतरचे गुडी गुडी आयुष्य दाखवले असते, तसे प्रत्यक्षात घडत नाही.

लग्नाळू मुलामुलींनी आणि जोडप्यांनी सुद्धा पुढील काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर त्यांचे आयुष्य सुखी आणि सुंदर होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. पती व पत्नी हे समान असतात.

आपल्या संस्कृतीत जिथे नवऱ्याला परमेश्वर मानावे असे सांगितले जाते तिथे पत्नीला सुद्धा अर्धांगिनी म्हटले जाते. पत्नीला लक्ष्मीस्वरूप मानले जाते. म्हणजेच आपल्या संस्कृतीत पती व पत्नी हे समान असतात हे सांगितले आहे.

तरीही, अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा मोठा पगडा समाजाच्या मनावर असल्याने घराघरांत अजूनही मुलांना वरचढ ठरवून मुलींना कमी लेखले जाते. मुलांना हीच सवय लागते आणि पुढे ते घरातील स्त्रियांना कमी लेखून पत्नीवर वर्चस्व गाजवू लागतात. इथेच पती पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ लागतो.

पत्नी ही केवळ स्वयंपाक करणारी, तुमचे घर, नातेवाईक सांभाळणारी, तुमचे सगळे नखरे ,मूड स्विंग्स सहन करत परत सगळं हसतमुखाने करणारी , तुमच्या वंशाचे दिवटे जन्माला घालणारी मशीन नव्हे..!

 

 

ती सुद्धा एक मनुष्य आहे. तिलाही तिची मते, आवडीनिवडी, तिचे करियर आहे. ती तुमची फुकटातली खाजगी असिस्टंट नसून तुमच्या आयुष्याची जोडीदार आहे.

त्यामुळे घरातली कामे, मुलांचे संगोपन ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही फक्त तिची एकटीची जबाबदारी नसून तुमची देखील आहे. राबताना घर तिचे आणि महत्वाचे निर्णय घेताना घर तुमचे असा विरोधाभास चालणार नाही. त्याने संसार सुखाचा होत नाही केवळ बायकोची घुसमट होते.

 

 

काम सुद्धा अर्धे अर्धे आणि निर्णय सुद्धा दोघांनी मिळून घ्यायचे असतात. तसेच आर्थिक जबाबदारी सुद्धा दोघांची असते. बायकांनी सुद्धा नवऱ्यांकडून अवास्तव अपेक्षा करू नये.

प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे सुवर्णमध्य साधत दोघांनाही सोयीचे होईल आणि कमीत कमी त्रास होईल ह्या हिशोबाने कामे आणि जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तसेच एकमेकांना कमी न लेखता, दुय्यम वागणूक न देता एकमेकांचा आदर ठेवून वागले तर संसार शंभर टक्के सुखी होईल.

 

२. हुंडा ही पद्धत पुरातन आणि कालबाह्य आहे

बायको किंवा सुनेचे कुटुंब हे तुमचे कर्जदार नाहीत. त्यांनी तुमच्या घरात मुलगी दिली, तुम्ही त्यांच्या मुलीशी लग्न केले म्हणजे तुम्ही त्या मुलीवर आणि तिच्या आईवडिलांवर कुठलेही उपकार केले नाहीत. त्यामुळे “त्यांच्या” मुलीची काळजी घेण्यासाठी किंवा तिची जबाबदारी घेण्यासाठी ते तुम्हाला पैसे, सोनेनाणे, महागड्या वस्तू देणे लागत नाहीत.

 

 

त्यांची मुलगी ही तुमची बायको आणि सून असते. ती तुमच्या कुटुंबावर भार नसते. आणि आईवडिलांना सुद्धा त्यांची मुलगी जड होतेय म्हणून त्यांनी तिला तुमच्याकडे पाठवलेली नसते. त्यामुळे ते तुमचे काहीही देणं लागत नाहीत. लग्न हा फक्त कोरडा आर्थिक व्यवहार नाही.

एकमेकांना महागड्या भेटवस्तू देण्यावरून नवरा बायकोच्या कुटुंबात कटुता येऊ शकते. त्यामुळे हुंडा देण्या घेण्यावर तर बंदी घालावीच, शिवाय वेळोवेळी भेटवस्तू देण्या घेण्यालाही फारसे महत्व देऊ नये.

 

३. बायकोला करियरकडे लक्ष देण्याचा पूर्ण हक्क आहे

बहुतांश मुलांना शिकलेली आणि कमावती बायको हवी असते. पण लग्नानंतर तिने घराकडेही संपूर्ण लक्ष द्यावे, सासू सासरे, नातेवाईक सणवार, अपत्यसंगोपन हे सुद्धा अगदी व्यवस्थित करावे आणि वेळ पडली तर नोकरी/व्यवसाय सोडून देऊन पूर्णवेळ घराची जबाबदारी सांभाळावी ही अपेक्षा चुकीची आहे.

जसे तुम्ही अभ्यास करून, मेहनत करून चांगली नोकरी -प्रमोशन मिळवले आहे, तेच तिनेही केलेलं आहे. जशी तुम्हाला तुमची नोकरी/व्यवसाय महत्वाचा आहे तसेच तिलाही आहे.

त्यामुळे तिने नोकरी करायची की नाही हा निर्णय तिचा असायला हवा. तिच्यावर इतर कुणी सक्ती करता कामा नये. तिने शिक्षण घेतले आहे ते फक्त चांगले स्थळ मिळावे ह्यासाठी नव्हे.

 

 

आपल्याला असेही बघायला मिळेल, जेव्हा स्त्रीयांनी स्वतःहून फॅमिली साठी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. १०-१५ वर्षे करिअर केल्यानंतर जर त्याचे करिअर खूप पुढे जाणार असे दिसत असेल, तर घरातल्या लोकांकरिता – सासू-सासरे, मुले – यांच्यासाठी, तिने स्वतःच्या करिअरकडे पाठ फिरवून घरासाठी पूर्ण वेळ दिल्याची उदाहरणे पाहायला मिळतात.

अंजली तेंडुलकरने सचिनच्या क्रिकेट करिअरसाठी आपल्या मेडिकल प्रॅक्टिसवर पाणी सोडले, आयटी मधील बऱ्याच जणी असा मार्ग पत्करतांना दिसतात, त्यात काही वावगं आहे असं नाही, पण हा निर्णय तिने स्वतःहून, अथवा दोघांनी मिळून घेतलेला असावा; लादलेला नसावा.

 

 

४. दोघांचेही आईवडील आणि कुटुंबीय सारखेच महत्त्वाचे आहेत

आपल्याकडे एकदा लग्न झाले की बायकोने तिच्या आईवडील आणि नातेवाईकांना विसरून जावे आणि केवळ सासरच्या लोकांनाच आपले मानावे अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा असते. पण हा विचारच चुकीचा आहे. सणवारी, काही खास प्रसंगी मुलींनाही आईवडील आणि नातेवाईक ह्यांच्याबरोबर आनंद साजरा करावा अशी इच्छा असते.

 

हे ही वाचा – या १० पैकी एकही गुण असलेल्या व्यक्तीशी चुकूनही लग्न करु नका. पश्चाताप होईल!

जोडप्यांनी हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की दोघांनाही आपापल्या आईवडिलांविषयी सारखेच प्रेम वाटते. दोघांसाठीही आपापले आईवडील महत्वाचे असतात. त्यामुळे ह्यात सुद्धा समतोल साधायला शिकणे आवश्यक आहे. दोन्हीकडच्या आईवडिलांना सारखेच महत्व दिले पाहिजे.

 

५. एकमेकांचा आदर करणे

कुठल्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप आवश्यक आहे. तसेच नवरा बायकोच्या नात्यात तर एकमेकांचा आदर केलाच गेला पाहिजे. बायको नवऱ्याचा आदर करते पण नवरा बायकोला तुच्छतेची वागणूक देत असेल, तिला घालूनपाडून बोलत असेल तर त्या जोडप्याचे आयुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही.

दोघांनीही एकमेकांच्या विचारांचा, आवडीनिवडीचा आणि मतांचा आदर राखला पाहिजे तरच ते नाते आणि त्याबरोबर आयुष्य सुद्धा सुखी होते.

 

 

६. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते

काळाच्या ओघात सौंदर्य कमी होत जाते. पण एकमेकांविषयीचे प्रेम हे केवळ सौंदर्यावरच अवलंबून असले तर ते प्रेम नसून केवळ आकर्षण असते. खरे प्रेम हे माणसाच्या दिसण्याबरोबरच त्याचा स्वभाव, त्याचे वागणे, त्याच्यातली एखादी कला ह्यावर जडते.

 

 

त्यामुळे बाळंतपणानंतर किंवा चाळिशीनंतर बायकोचे वजन वाढले, तिच्या चेहेऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या किंवा नवऱ्याचे पूर्वीचे सिक्स पॅक्स जाऊन त्या जागी अख्खा फॅमिली पॅक आला आणि त्याला टक्कल पडले तरीही आपापल्या जोडीदारवरचे प्रेम कमी होता कामा नये.

आपल्या जोडीदाराविषयी असलेले प्रेम हे केवळ वरवरच्या दिसण्यावर, बाह्य रूपावर अवलंबून असू नये. ज्या जोडप्यांना वयाच्या सत्तरीत सुद्धा आपली बायको किंवा आपला नवरा सुंदर व हॅन्डसम वाटतात ती जोडपी खूप सुखी समाधानी आयुष्य जगतात.

 

 

७. संवाद साधणे महत्वाचे

नवरा-बायको ह्यांच्यात मोकळा संवाद असणे खूप आवश्यक आहे. मोकळेपणाने संवाद साधल्याने बहुतांश प्रश्न सुटतात. दोघांपैकी कुणालाही काही समस्या असेल, काही तक्रार असेल तर ती आपल्या जोडीदाराला मोकळेपणाने सांगावी. सामान्य माणूस मनकवडा नसतो. त्याला मनातले कळत नाही.

 

 

तुमच्या अपेक्षा, तक्रार, प्रश्न, समस्या समोरच्याने न सांगता जाणून घ्याव्यात ही अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे जे आहे ते समोरच्याला सांगावे आणि एकमेकांचे बोलणे शांतपणे ऐकून व समजून घ्यावे. ह्याने अनेक प्रश्न निर्माण होण्याच्या आधीच सुटतात.

 

८. एकमेकांवर विश्वास ठेवणे

नाते यशस्वी व्हायला हवे असेल तर एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. एकमेकांवर , एकमेकांच्या निर्णयांवर, एकमेकांच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या दोघांची एक टीम आहे. त्यामुळे एक यशस्वी टीम म्हणून टीमवर्क करायचे असेल तर विश्वास ही खूप महत्वाची गोष्ट आहे.

 

 

९. मैत्रीचे नाते जपणे

जे नवरा बायको एकमेकांचे चांगले मित्र असतात, त्यांचे आयुष्य खूप सुखी असते. कारण मैत्रीच्या नात्यात एक सहजता असते. मोकळेपणा असतो. तसेच एकमेकांविषयी आदर आणि प्रेम तसेच विश्वास ह्या सगळ्याचा समतोल असतो.

तिथे एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची भावना नसते, तर एकमेकांना जपण्याची आणि समजून घेण्याची भूमिका असते. त्यामुळे नवरा बायकोमध्ये मैत्रीचे नाते असणे खूप महत्वाचे आहे.

 

 

१०. एकमेकांची स्पेस जपणे

नवरा बायको हे नाते खूप जवळचे असते. त्यामुळे नकळत आपण एकमेकांना गृहीत धरू लागतो. आपल्या जवळच्या व्यक्तीनेच आपल्याला गृहीत धरल्यामुळे घुसमट होते. म्हणूनच एकमेकांना कायम गृहीत न धरता एकमेकांची स्पेस दिली पाहिजे.

नवरा जर कधीतरी मित्रांबरोबर वेळ घालवू इच्छित असेल तर बायकोने त्याला त्याची स्पेस दिली पाहिजे. तसेच नवऱ्यानेही बायकोला तिच्या आवडीनिवडी, छंद जपायला स्पेस दिली पाहिजे. सतत एकमेकांच्या स्पेसमध्ये अतिक्रमण केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

 

हे ही वाचा – दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रने थांबवलं हेमामालिनी आणि जितेंद्रचं लग्न!!

११. मुलांबद्दलचा निर्णय दोघांनी मिळून घ्या

पूर्वी लग्न झाले म्हणजे मुले होणारच ही गृहीत धरलेली गोष्ट होती. पण आता काळ बदलला आहे. हल्ली अनेक लोकांना मूल नको असते. त्यासाठी त्यांची काही कारणं असतात. त्यामुळे ही गोष्ट तर लग्नाच्या आधीच स्पष्ट करायला हवी की तुम्हाला मूल जन्माला घालायचे आहे की नाही! त्यावरुन जर मतभेद असतील, तर लग्न मोडण्याचीच शक्यता अधिक असते.

 

 

कल्पनेपेक्षा वास्तव वेगळे असते हे ध्यानात ठेवले तर अपेक्षाभंग होत नाही. कुठल्याही नात्यात अगदी मैत्रीच्या नात्यात सुद्धा आपण कुठे ना कुठे तडजोड करतोच. त्यामुळे नवरा -बायकोच्या नात्यात दोघांनाही काही ना काही तडजोड करत सुवर्णमध्य गाठत संसार करावा लागतो.

जिथे हे स्वीकारून, एकमेकांना समजून घेऊन सुवर्णमध्य गाठतात, ते घर आनंदी असते. त्या घरातील जोडपी सुखी असतात. त्यामुळे लग्नाळू मुलामुलींनी आणि जोडप्यांनी वरील गोष्टी आत्मसात केल्या तर त्यांची जोडी “राजा-राणी” ची असेल आणि त्यांचे आयुष्य सुखी आणि सुंदर होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version