' प्रत्येक पक्षात एक-दोन संजय राऊत असायला हवेत… – InMarathi

प्रत्येक पक्षात एक-दोन संजय राऊत असायला हवेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: सुधन्वा कुलकर्णी

===

तसे पाहता पक्ष प्रवक्ते तर सगळ्यांचे असतातच. पण संजय राऊत ही स्वतंत्र कॅटेगरी आहे. रुढार्थाने ते नेता नाहीत, आणि राजकारणी सुद्धा नाहीत.

लोकसत्ता- लोकप्रभात क्राईम रिपोर्टिंगने सुरुवात करून सामनाच्या संपादक पदावर पोहोचलेला हा माणूस मूलतः पत्रकारच आहे.

सेनेची गरज म्हणून त्यांना जरी राज्यसभेवर पाठवलं असलं तरी त्यांना राजकीय आकांक्षा नाहीत.

Sanjay Raut Uddhav Thackeray inmarathi

शीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे.

या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.

गेले दहा दिवस महाराष्ट्र हाच खमंगपणा अनुभवत आहे.

SanjayRaut UddhavThackeray DevendraFadnavis

 

अर्थात गेल्या एप्रिल-मे मध्ये, राज ठाकरेंच्या अशाच खमंगपणाचा शेवट काय झाला हे सगळ्यांनी बघितलंय. आपले फेसबुकी पुरोगामी किंवा कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाले, तेव्हा मारे राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचत होते.

इतके, की त्यांच्या थोरपणाच्या आणि गुणवर्णनाच्या पोस्टी सुद्धा इथे वाचायला मिळाल्या.

raj thackarey inmarathi

कारण त्यावेळी राजचं उपद्रवमुल्य सर्वांना हवंसं वाटत होतं. पण आता किमान पाच वर्षांसाठी तरी ते संपलं आहे.

त्यामुळे आज भाजपला पर्यायी सरकार देण्याच्या गप्पा करणाऱ्या एकाही फेसबुक्याला, सरकार स्थापनेत राज ठाकरेंची आठवण येत नाहीये.

सगळे एकजात कृतघ्न…!

राज ठाकरे स्वतः मोठे नेते असूनही त्यांची ही गत, तर संजय राऊतांची स्थिती यापेक्षा वेगळी असणार नाहीये.

पण तूर्तास दोन आठवड्याकरीता का होईना संजय राऊतांनी महाराष्ट्राचा सगळा फोकस स्वतःवर घेतलाय. आणि हेही सामान्य कर्तृत्व नव्हे.

त्याकरीता आवश्यक असलेली पॉवर ऑफ अॅटर्नी, सेनेतील अन्य सर्वांना डावलून, उद्धव ठाकरेंनी राऊतांना दिली यातच सर्व काही आलं.

पक्षाचं, कार्यकर्त्यांचं, आणि समर्थकांचं मनोबल वाढवणारे असे एक-दोन संजय राऊत प्रत्येक पक्षात असायला हवेत.

मर्यादित काळासाठी का होईना, ते उपयुक्त असतात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?