Site icon InMarathi

पाकिस्तानचे ६९ रणगाडे उध्वस्त करणाऱ्या भारतीय सैन्यातील महायोद्ध्याची कथा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१९६५ साली पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात भारताने अभूतपूर्व विजय मिळवला. त्या युद्धाची विजय गाथा गात असताना, लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोरे यांची आठवण काढणे तर क्रमप्राप्त आहे. लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोरे यांनी या युद्धात आपले असीम शौर्य दाखवून भारताला विजयाच्या समीप नेऊन ठेवले.

स्वतःच्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तानी सैन्याशी त्यांनी दिलेली लढत अगदी अतुलनीय आहे. त्यांनी दाखवलेले असीम शौर्याची ही कहानी वाचल्यानंतर लेफ्टनंट कर्नल तारपोरे यांच्या बद्दलचा आदर कित्येक पतीने वाढेल, यात शंका नाहीच.

 

 

१९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या ऐतिहासिक आठवणीना उजाळा देताना आपण पहिली आठवण काढली पाहिजे ती लेफ्टनंट कर्नल तारापोरे यांची. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि दृढ निश्चयामुळे पाकिस्तानी सैन्याला फालोरा आणि चाविंडा मधून माघार घ्यावी लागली होती.

आपल्या सैन्याचा झेंडा अजिबात खाली झुकू देणार नाही या दृढ निश्चयानेच तारापोरे यांनी प्रचंड अटीतटीच्या युद्धात देखील आपला आणि आपल्या सैन्याचा विश्वास आणि धैर्य गमावू दिले नाही. प्रसंगी त्यांनी आपला जीव गमावला पण, शत्रूची कंकणभर देखील सरशी होऊ दिली नाही.

 

 

भारतातील एका खेड्यात जन्मलेल्या आदी यांना तारापोरे हे आडनाव इनाम म्हणून मिळालेल्या एका गावावरून पडले. आदी यांच्या पूर्वजांना युद्धात चांगली कामगिरी केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांकडून इनाम म्हणून शंभर गावे देण्यात आली होती. त्याच शंभर गावांपैकी तारापूर हे देखील एक गाव होतं ज्यावरून त्यांना तारापोरे हे आडनाव मिळालं.

अर्देशर यांचे आजोबा हैदराबाद येथे स्थलांतरित झाले व तेथे त्यांनी निझामाच्या सैन्यात नोकरी पत्करली.

मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर तारापूर हैद्राबाद स्टेट आर्मीमध्ये दाखल झाले. एक दिवस सरावा दरम्यान पुढच्या एका सैनिकाच्या हातून चुकून ग्रेनाईड निसटला आणि तो जवळच पडला. ते पाहून अर्देशेर यांनी पटकन तो ग्रेनाईड उचलला आणि दूर फेकून दिला.

यात त्यांना थोडी दुखापत देखील झाली पण, त्यांचा धाडस पाहून याचवेळी त्यांनी आर्मीच्या मेजर जनरल एल-इदृस यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला.

नंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले. भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याचं पाहिलं काम होतं सेंच्युरीयन टँकबद्दलची सगळी माहिती जाणून घेणं. या टँकबद्दलची अधिक माहिती आणि युद्धात होणारा त्यांचा परिणाम जाणून घेण्यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन विशेष प्रशिक्षण देखील घेतले.

या माहितीचा पुढे जाऊन प्रत्यक्ष युद्ध भूमीवर आपल्याला किती फायदा होणार आहे, याची तेंव्हा त्यांना कल्पना देखील नव्हती. १ जानेवारी १९५८ रोजी अर्देशीर तारापोरे यांना मेजर पदावर बढती देण्यात आली. भारत-पाक युद्धाला तोंड फुटल्यानंतर १९६५ त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली.

 

 

१९६५ च्या सुरुवातीच्या काळातच पाकिस्तानी सैन्याने काश्मीर प्रांतातून घुसखोरी करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा पार करून ऑपरेशन गीब्राल्टर पार पडल्यानंतर दोन्ही देशातील परिस्थिती चिघळण्यास सुरुवात झाली. पाकिस्तानी सैन्याच्या सततच्या घुसखोरीच्या कारवाईला वैतागून भारतीय सैन्याने ६ सप्टेंबर रोजी रॅडक्लिफ रेषा पार करून त्यांचा सूड उगवला.

पुना हॉर्सचा भाग म्हणून अर्देशेर तारापोर देखील आपल्या शस्त्रसज्ज तुकडीसह या युद्धात सहभागी झाले. हे युद्ध त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरले.

१३ सप्टेंबर रोजी, फुल्लोरा हून चाविंडा येथे पाठीमागून हल्ला करण्याचे नियोजन सुरु असतानाच, शत्रू पक्षाकडून त्यांच्या तुकडीवर तोफखान्याचा मारा सुरु झाला. अशा परीस्थित तसूभरही न ढळता, त्यांनी या तोफांच्या माऱ्याला उत्तर देणे सुरूच ठेवले.

त्यांच्या या अखंडपणे आणि अविरत सुरु असणाऱ्या माऱ्यात पाकिस्तानचे ९ रणगाडे उडवले. तारापोरे यांच्या रणगाड्यावर ही हल्ला करण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला पण, ते मागे हटले नाहीत. अशा अत्यंत प्रतीकूल आणि कठीण प्रसंगीही त्यांनी आपल्या सैन्याला प्रतिकार करण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा दिली.

आपल्यातील चिवटपणाच्या जोरावर त्यांनी भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने अत्यंत त्वेषाने शत्रू पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

या हल्ल्यात एका पाठोपाठ एक असे शत्रूचे तब्बल ६० रणगाडे एकाच वेळी नष्ट करण्यात आले.

या हल्ल्यात तारापोरे हे गंभीररित्या जखमी झालेले असताना देखील ते युद्धभूमीवरून मागे हटले नाहीत. आपल्या सैन्याच्या तुकडीने धैर्य आणि विश्वास गमावू नये म्हणून ते शेवट पर्यंत झुंजत राहिले. शेवटी शत्रूच्या रणगाड्यातील एक गोळा तारापोरे यांच्या रणगाड्यावर येऊन पडला.

या हल्ल्यात त्यांच्या रणगाड्याने पेट घेतला आणि क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी तारापोरे यांना कसे गिळंकृत केले कळले देखील नाही.

भारतीय सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या प्राणाची आहुती दिली होती. मात्र अजूनही वाझिरली, जासोरान नि बुतूरडोग्रंडी हे भाग पाकिस्तानच्या कब्जात होते.

परंतु, पाकिस्तानचे ८०% रणगाडे नष्ट करण्यात आले होते. पुढे लढाई सुरु ठेवण्याची त्यांची तयारी नव्हती. यानंतर या युद्धात पाकिस्तानचा पाडाव झाला.

 

ScoopWhoop

ऐनवेळी तारापोरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता. शत्रूला धूळ चारली नसती तर, भारताच्या दृष्टीने हा विजय इतक्यात दृष्टीस पडला नसता. परंतु, अर्देशेर तारापोरे यांच्या सारखे निडर आणि धाडसी अधिकारी असल्यामुळेच भारत या युद्धात विजयी ठरला.

लेफ्टनंट कर्नल अर्देशेर तारापोरे यांना मृत्यू पश्चात भारत सरकारच्या वतीने त्यांना परम वीर चक्र या भारताच्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

प्रत्येक भारतीयांच्या मनात तारापोरे यांची निडर वृत्ती आणि परम देशभक्ती यांची जाज्वल्य प्रेरणा तेवत राहील. देशासाठी प्रसंगी मरणाला ही कवटाळणारे वीर पुत्र या देशात होऊन गेले, जे देशाच्या अखंडतेसाठी प्रसंगी प्राणदेखील तळहातावर घेऊन लढले.

या महान नरवीराचं नाव कायमच भारतीयांच्या मनावर कोरलं जाईल.

अशा शूर आणि महान देशप्रेमिंचे आदर्श पुढील पिढीसाठी देखील प्रेरणादायी ठरेल आणि येणाऱ्या पिढीलाही जाज्वल्य देशभक्ती म्हणजे काय याचे एक निखालस उदाहरण त्यांच्या चरित्रातून पाहायला मिळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version