Site icon InMarathi

पाकिस्तानात सुरु आहे स्वातंत्र्याचा लढा, आणि “ते” मागत आहेत भारताची मदत, वाचा…

Balochistan Freedom struggle InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या इंटरनेटवर द फॅमिली मॅन आणि बार्ड ऑफ ब्लड ह्या दोन वेब सिरीज बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. ह्या दोन्ही वेब सिरीजमध्ये बलुचिस्तानचा विषय आला आहे.

आपले भारतीय गुप्तहेर बलुचिस्तानमध्ये काम करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या संकटांना तोंड द्यावे लागते ते ह्या वेब सिरीजमध्ये दाखवले आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नैऋत्य दिशेला असणारा एक निसर्गसंपदेने मढलेला भूप्रदेश आहे.

 

Latestly

पाकिस्तानशी जबरदस्तीने जोडला गेलेल्या ह्या प्रदेशातील लोक गेली अनेक वर्षे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यासाठी ते लढा देत आहेत. त्यांना त्यांचे वेगळे राज्य हवे आहे.

बलुच नेत्यांनी त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांनी भारताची सुद्धा मदत मागितली आहे.

पाकिस्तानने अनेकवेळा बलुचीस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे. ह्या प्रदेशातील लोकांना पाकिस्तानने कायम सापत्नभावाने वागविले आहे.

म्हणूनच पाकिस्तानपेक्षा वेगळ्या संस्कृतीचे पालन करणाऱ्या आणि त्यांची वेगळी स्वतंत्र भाषा असणाऱ्या बलुच लोकांना पाकिस्तानपासून वेगळे व्हायचे आहे.

 

baluchsarmachar.wordpress.com

पाकिस्तानी सैन्याने वेळोवेळी बंड करून उठणाऱ्या बलुच नेत्यांची हत्या करून त्यांचा आवाज दडपण्याचा तसेच त्यांना भारतापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानच्या नैऋत्य दिशेला वसलेल्या बलुचिस्तानने पाकिस्तानचा जवळजवळ अर्धा भूभाग व्यापला आहे. पण बलुचिस्तानची लोकसंख्या पाकिस्तानच्या संपूर्ण लोकसंख्येच्या केवळ ३.६ टक्के आहे. म्हणजेच ह्या प्रदेशाची लोकसंख्या त्याच्या क्षेत्रफळाच्या मानाने अत्यंत कमी आहे.

पण ह्या जागेत असे काय आहे की पाकिस्तान बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्यास तयार नाही?

बलुचिस्तान हा प्रदेश नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण आहे. नैसर्गिक गॅस, सोने, तांबे, आणि नैसर्गिक तेल ह्या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, खरं तर इथल्या गॅसच्या साठ्यावरच पाकिस्तान अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानला ह्या प्रदेशावरील हक्क सोडणे महागात पडणार आहे.

खरं तर पूर्वी बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग कधीच नव्हता.

en.wikipedia.org

ब्रिटिशांच्या शासनकाळात काही संस्थाने अशीही होती ज्यांच्यावर ब्रिटिशांचे थेट राज्य नव्हते. अश्या संस्थानांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. त्यांना भारतात विलीन व्हायचे की पाकिस्तानात किंवा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार होता.

त्यातील एक संस्थान बलुचिस्तान (कलात, मकरान, खारान आणि लास बेला ) हे सुद्धा होते.

११ ऑगस्ट १९४७ रोजी मुस्लिम लीग आणि कलात ह्यांच्यात एक करार झाला. ह्या करारात असे लिहिले होते की कलात हे भारतीय राज्य नाही आणि ते एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि मुस्लिम लीग कलातच्या स्वातंत्र्याचा आदर करते. कराराप्रमाणे कलातला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळणे अपेक्षित होते.

पण जिन्ना ह्यांचा विचार बदलला आणि १ एप्रिल १९४८ रोजी पाकिस्तानी सैन्याने कलातवर आक्रमण करून कलातच्या खानाला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.

त्यानंतर २७ मार्च १९४८ रोजी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण बलोचिस्तानच ताब्यात घेतले. आणि तिथेच हा वाद सुरु झाला.

पाकिस्तानने जबरदस्तीने बलुचिस्तान ताब्यात घेतल्यामुळे बलोच लोकांनी त्याला विरोध करणे सुरु केले. बलोच जनतेचे बंड मोडून काढण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने इथल्या जनतेवर अमानुष अत्याचार करणे सुरु केले.

 

pakistan_Map InMarathi

बलोच जनतेची भाषा, संस्कृती, परंपरा ह्या आधुनिक पाकिस्तानपेक्षा अगदीच भिन्न आहेत.

हाच प्रश्न पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशमध्येही निर्माण झाला आणि अखेर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशची निर्मिती झाली.

बलोच जनतेने सुद्धा बंगालच्या लोकांकडून प्रेरणा घेऊन १९७० साली स्वातंत्र्यासाठी उठाव करण्यास सुरुवात केली. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने जोर धरला. ह्या मोहिमेत अनेक लोक सामील होऊ लागले.

पण मुळात त्यांची लोकसंख्याच कमी असल्याने हा उठाव करणाऱ्यांची संख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून फारच कमी होती. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने त्यांच्या सैन्याची मदत घेऊन हे बंड चिरडून टाकले.

त्यानंतरच्या दोन तीन दशकांत स्वतंत्र बलुचिस्तान मोहिम पाकिस्तानी सरकार आणि सैन्याद्वारे वेळोवेळी चिरडले गेले. पण नव्या पिढीच्या बलोच लोकांना त्यांच्यावर होत असणाऱ्या अन्यायाची, अत्याचाराची कल्पना आल्यावर त्यांनी परत स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी लावून धरली.

आता त्यांचा लढा हा वांशिक राष्ट्रीयत्वासाठी नसून त्यांच्या प्रदेशात असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी होता. कारण पाकिस्तान ह्या भूप्रदेशातून प्रमाणाच्या बाहेर नैसर्गिक साधनसंपत्ती घेत आहे.

ह्यावर बलोच नेत्यांनी अशी भूमिका घेतली आहे की ह्या सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर खरं तर बलुचिस्तानचा हक्क आहे. बलुचिस्तानमधून हे सगळे ओरबाडले जात आहे आणि त्याचा काही फायदा देखील इथल्या लोकांना मिळू दिला जात नाही. त्यांनी परत स्वतंत्र बलुचिस्तानसाठी मोहीम सुरु केली. ती सुद्धा दडपण्याचे अनेक प्रयत्न पाकिस्तानने केले.

आता भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची निवड झाल्यापासून ही मोहीम आणखी तीव्र झाली आहे.

युरोपातून सुद्धा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा मिळतो आहे. अगदी इस्लामाबादमधील काही लोक सुद्धा ह्या मोहिमेला पाठिंबा देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बलोच लोकांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यांच्या २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी तसा उल्लेख केला होता.

 

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर बलोच नेते आणखी तीव्रतेने त्यांच्या मागण्या उचलून धरू लागले आणि त्यांच्या मोहिमेला आणखी बळकटी मिळाली. ह्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानच्या ह्या स्वातंत्र्यदिनाला युरोप तसेच अमेरिकेने सुद्धा बलोच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली.

पण असे असले तरी बलोच जनतेचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांच्यावर होणार अन्याय, अत्याचार अजूनही थांबलेला नाही. मानवी अधिकारांचे उल्लंघन होणे अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानी सरकार अजूनही क्रूरपणे दडपशाही करतेच आहे.

इकडे चीनने बलोच अतिरेक्यांशी हातमिळवणी केली आहे.

कारण त्यांना त्यांची ६० बिलियन डॉलर्सची चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉर मोहीम कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करायची आहे.

पण बलोच मोहिमेसाठी झटणाऱ्या काहींना मात्र चीन्यांचे वन बेल्ट वन रोड मान्य नाही. त्यांनी त्यांच्या काही साईट्सवर हल्ला करून तिथली नासधूस केली आहे.

त्यामुळे पाकिस्तानी आणखी चिडले आणि स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेला चिरडून टाकण्याचा आणखी तीव्रतेने प्रयत्न केला.कारण वन बेल्ट वन रोड हा प्रोजेक्ट पाकिस्तानच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे.

 

Top China Travel

पाकिस्तानच्या दडपशाहीच्या धोरणामुळे बलोच नेते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे प्रश्न मांडून जगाचे लक्ष वेधून घेत आहेत आणि पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जागतिक स्तरावरून पाठिंबा मागत आहेत.

पण पाकिस्तान मात्र ह्या सगळ्या आरोपांचे खंडन करतो. त्यांच्या मते बलुचिस्तान त्यांचेच आहे आणि त्यांना स्वातंत्र्य वगैरे देणे म्हणजे त्यांच्या देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका आहे. भारत मात्र बलोच जनतेच्या पाठीशी उभा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version