“विखे पाटील”: सत्ता वर्तुळातील एक वजनदार नाव – भारतातील नव्हे – थेट स्वीडनच्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पंजोबा महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे प्रणेते, आजोबा आठ वेळा खासदारपदी निवडून आलेले, काका सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत आणि वडील महाराष्ट्रातील ख्यातनाम शिक्षणसम्राट.
असा समृद्ध वारसा घेऊन आलेली नीला विखे-पाटील हे सुद्धा सत्ता करणातील एक वजनदार नाव आहे – पण भारतातील नव्हे तर थेट स्वीडनच्या….
होय, महाराष्ट्राच्या विखे-पाटील घराण्याचा महाराष्ट्रातील राजकारणातील दबदबा तर आपण जाणतोच. विखे-पाटील घराण्याच्या तब्बल दोन पिढ्या राजकारणात तर, तीन पिढ्या शिक्षण आणि नागरीसेवेत कार्यरत आहेत.
पण, याच विखे-पाटलांचा हा वारसा आता, सात समुद्रापार पोहोचला आहे. नीला विखे पाटील एक दिवस स्वीडनची पंतप्रधान देखील बनू शकते.
सध्या स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफव्हेन्स यांची सल्लागार पदी तिची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील त्या पंतप्रधानांच्या सल्लागार होत्या. नीला ग्रीन पार्टीच्या कृतीशील सदस्य असून, इलेक्शन कमिटी ऑफ द स्टॉकहोम ग्रीन पार्टीच्या देखील सदस्य आहेत.

सोशिअल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते स्टीफन लॉफव्हेन्स यांची अलीकडेच स्वीडनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांच्या पक्षाने ग्रीन पार्टीशी युतीकरून सत्ता स्थापन केली आहे.
अशोक विखे-पाटील आणि इव्हा-लिल यांची नीला विखे-पाटील हे एकमेव आपत्य. नीलाची बालपणीची काही वर्षे ही अहमदनगर मधील लोणी येथे गेली.
नंतर आई-वडिलांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर ती आई सोबत स्टॉकहोमला निघून गेली. ३३ वर्षीय नीला, त्या देशातील ग्रीन पार्टीसोबत काम करू लागली आणि सध्या ती पंतप्रधान कार्यालयात सल्लगार म्हणून नेमली गेली आहे.
स्वीडनसाठी भारत ही एक चांगली बाजारपेठ आहे. १६० पेक्षा जास्त स्वीडन कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती विखे-पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोल विखे-पाटील यांनी दिली. ते महाराष्ट्रभर १०२ शिक्षण संस्था चालवतात.
“राजकारण आणि अर्थव्यवस्था, करप्रणाली, संविधानिक मुद्दे, संसदीय धोरण आणि उद्योगविश्व यांच्यात समन्वय साधणे हेच माझे काम आहे,” असे ती सांगते.
हे सगळं करताना तिला विविध विभागातील लोकांशी, तसेच स्वीडनच्या संसदेत कार्यरत असणारे विविध पक्ष आणि सरकार स्थापन करण्यसाठी एकत्र आलेल्या दोन सत्ताधारी घटक पक्षातील लोकांशी सतत मोबाईल आणि इ-मेलद्वारे संपर्क साधावा लागतो.
भारतीय वंशाची असल्याने, माझ्या कामात मी काही अंशी वास्तवता आणू शकते असे नीलाचे मत आहे:

स्वीडनशी तुलना करता भारत हा पूर्णतः वेगळा देश आहे. तिथले हवामान, हवा, प्राणी, वनस्पती, अन्न सगळं काही अगदी वेगळं आहे. भारत म्हणजे जणू काही एक स्वतंत्र ग्रहच आहे.”
“भारत हा असा देश आहे जिथे कल्पकता आणि बुद्धिमत्ता यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. ज्यामुळे दैनंदिन आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्येवर मात करणे सहज शक्य आहे. जगभरातील उत्तम प्रोग्रामर हे भारतातीलच असतात हे देखील प्रसिद्ध आहे.”
”तर स्वीडन हे अत्यंत विस्तृत आणि शांत ठिकाण आहे. जिथे लोक एकमेकांपासून वेगळी आहेत. त्यांना सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आणि प्राप्तीकराच्या निधीतून निर्माण झालेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा घेता येतो.
यामुळे येथील लोक आरामात आपलं आयुष्य व्यतीत करू शकतात. लोकांना विकासाच्या अनेकानेक संधी मिळतात आणि समाजासाठी योगदान देणे लोकांना आवडते आणि याला ते अग्रक्रमाने प्राधान्य देखील देतात.
त्यांना नेमून दिलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काही तरी योगदान देणं आवडतं. ” नीलाला भारत आणि स्वीडन दोन्ही देशांबद्दल आदर आहे.
“भारतात देखील सर्वाना संधीची समानता मिळाली पाहिजे आणि स्वीडनमधील लोकांना आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांनी देखील आपल्या शेजारच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. एकमेकांकडून आपण या दोन गोष्टी तरी किमान शिकायला हव्यात.” असे नीला म्हणते.
नीलाला लहान वयातच भारत सोडून शिक्षिका आणि चित्रकार असलेल्या आपल्या आईसोबत स्वीडनला परतावं लागलं. तरीही तिने भारताशी जोडलेली आपली नाळ तुटू दिली नाही.

तीने आपल्या वडिलांशी आणि त्यांच्या कुटुंबीयाशी असलेले नाते राखून ठेवले. सात वर्षाची असताना तीने स्वीडन मध्ये शालेय जीवनाला आरंभ केला तत्पूर्वी ती भारतातच अहमदनगर मधील, इंग्लिश माध्यमाच्या प्री-स्कूलमध्ये शिकत होती.
ऑर्गनायझेशनल थिअरी मध्ये पदवी घेतल्यानंतर आणि फायनान्स आणि अकाऊंटींग मध्ये गेटेनबर्ग विद्यापीठातून मास्टरी मिळवल्यानंतर नीला राजकारणात सक्रीय झाली.
तिने युनिव्हर्सिटी ऑफ कंप्ल्यूटेन्स, माद्रिद मधून एमबीए देखील केले आहे. सोळाव्या वर्षी तीन पर्यावरणाच्या प्रश्नावर काम करण्याऱ्या ग्रीन पार्टीमध्ये दाखल झाली.
आज हा पक्ष स्टीफन लॉफवेन यांच्या सोबत आघाडी करून सत्तेत आला आहे. स्वीडनमधील तरुणांना या पक्षाचे खूप आकर्षण आहे, विशेषतः विद्यार्थ्यांना.
पक्षाच्या वतीने तीला स्टॉकहोम मधून पुढील संसद सदस्य होण्याची संधी मिळू शकते. ग्रीन पार्टी व्यतिरिक्त, ती ग्रीन पार्टी गटेनबर्ग, ग्रीन स्टुडंट ऑफ स्वीडन या संस्थासोबत देखील काम करते. स्टॉकहोमच्या महानगरपालिकेची देखील ती सदस्य आहे.
तिच्या आजोबांचा तिच्यावर खूपच प्रभाव आहे. आजोबांसोबतच आपलं नातं अतिशय सुंदर होतं असं नीला सांगते.
“राजकरणाच्या निमित्ताने त्यांची नेहमी युरोपवारी होत असे तेंव्हा ते आम्हाला नियमितपणे भेटण्यासाठी येत असत. ते अत्यंत बुद्धिमान आणि प्रेमळ स्वभावाचे होते. मी ग्रीन पार्टीमध्ये सामील झाल्याचे काळातच त्यांना खूप आनंद झाला आणि त्यावेळी ते मला भेटण्यासाठी आले.
त्यांच्यासोबत मी गावात फेरफटका मारण्यासाठी गेलेतेंव्हा आमच्या भरपूर गप्पा झाल्या…. झाडे, पीकं, शेती आणि दोन्ही देशातील साम्यता याबद्दल त्यांच्याशी पुष्कळ गप्पा झाल्या.

त्यांच्या विचारानाच्या दृष्टीकोन पाहून मी भारावून गेले, त्यामुळे माझ्या आदर्शवादी विचारसरणी घेऊन मी पुढचा प्रवास करू शकले. त्यांनी माझं खच्चीकरण न करता माझ्या विचारांच्या मार्गांनी जाण्यास प्रेरणा दिली.”
त्यांचं हे अत्यंत काळजीपूर्वक मिळणारं मार्गदर्शन माझ्यासाठी फार चांगला अनुभव होता. माझ्या आजीचं देखील माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझे वडील देखील मला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी खूप धडपड करत हे मी पाहिलेलं आहे.”
पर्यावरणीय समस्या टाळण्यासाठी आणि हवामानावरील विपरीत परिणाम थोपवण्यासाठी भारत विकासासोबतच चांगल्या पर्यावरणीय कल्पना राबवेल, अशी मला अशा आहे. जगभरातील ही एक अत्यंत क्लिष्ट समस्या आहे ज्यावर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे, असेही नीला म्हणाली.
भारतीय हिंदू पुराण आणि भारतीय पदार्थांची तिला विशेष आवड आहे. आजीच्या हाताच्या जेवणाची चव तिला खूप आवडते. वरण-भात, पिठलं-भाकरी शेपूची भाजी हे काही तिचे आवडते पदार्थ आहेत.
सध्या ती भारतापासून दूर असली तरी, ते वर्षातून एकदा तरी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात येते. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे तिचे आदर्श आहेत. भारतातील स्थानिक गटांशी आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने तिने इथे काम केले आहे.
भारतीय इतिहासाची तिला प्रचंड आवड आहे. भारतीय इतिहासा संदर्भातील पुस्तके वाचण्याची तिला प्रचंड आवड आहे. तिला योगा आणि ध्यानधारणा यांची देखील आवड आहे. “माझं भारतावर खूप प्रेम आहे. भारताशी माझी जिव्हाळ्याची नाळ जोडली आहे.” अशा भावना देखील तिने व्यक्त केल्या.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.