आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण कुठलाही पॅक्ड खाद्यपदार्थ विकत घेताना त्यावरची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि सहसा एक्स्पायरी डेट बघूनच पदार्थ विकत घेतो. ज्यांना कॅलरीजची काळजी असते ते लोक त्या खाद्यपदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत हे सुद्धा बघतात.
ज्यांना एखाद्या खाद्यपदार्थाची ऍलर्जी आहे उदाहरणार्थ एखाद्याला शेंगदाण्याची ऍलर्जी असते, एखाद्याला बदामाची ऍलर्जी असू शकते, एखाद्या व्यक्तीला दुग्धजन्य पदार्थाची ऍलर्जी असू शकते.
तर अश्या व्यक्ती त्या खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील कन्टेन्टस वाचून मग तो पदार्थ विकत घेतात. पण ह्याशिवाय सुद्धा त्या पाकिटांवर अनेक अगम्य आकडे लिहिलेले असतात.
काही कोड्स, काही अक्षरे, काही आकडे असतात ज्यांचा अर्थ आपल्याला गुगल केल्याशिवाय कळत नाही. हे आकडे कशासाठी दिलेले असतात? त्यावरून आपल्याला कुठली माहिती मिळते हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सुपरमार्केट्समध्ये आकर्षकरित्या मांडून ठेवलेले खाऊचे पदार्थ ,बिस्किटे, वेफर्स वगैरे ह्यांचे पॅकिंगचं इतके आकर्षक केलेले असते की माणूस त्यावरील फोटो बघून ते विकत घेण्यास आणि चाखून बघण्यास आकृष्ट होतो.
त्यावर त्यातील कार्ब्स आणि फॅट कन्टेन्ट, त्यात असलेले प्रिझर्व्हेटिव्ह्ज, साखरेचे प्रमाण, ऍलर्जन ह्याबाबतीत अतिशय बारीक टाईपात लिहिलेले असते की ते वाचणे म्हणजे आपल्यासाठी डोकेदुखी असते.
त्यामुळे आपण ते बऱ्याच वेळेला न वाचतात हे सगळे अनारोग्यकारक पदार्थ खातो. ब्रिटिश फूड जर्नलच्या मते एखादा पॅक्ड पदार्थ विकत घेताना जर त्यावरील माहिती वाचायला घेतली तर कठीण शब्दावली, लहान फॉन्ट आणि न्यूट्रीशनल लेबलबद्दल न कळणे किंवा माहिती नसणे हे सगळे प्रश्न ग्राहकांपुढे उभे राहतात.
जेव्हा आपण कुठल्याही खाद्यपदार्थाचे वेष्टन वाचायला घेतो तेव्हा आपल्याला तिथे त्यातील जिन्नस, कॅलरीज, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, प्रोटिन्स, शुगर ही नावे दिसतात. ह्या सगळ्यांचा अर्थ काय हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व्हिंग साईज किती आहे ते सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे.
फॅट्सबद्दल माहिती दिलेली असते त्यात सॅच्युरेटेड, ट्रान्स -फॅट, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ह्या सर्वांबद्दल तिथे माहिती दिलेली असते.
तुम्ही एखादा पदार्थ विकत घेताना त्यात जर ट्रान्स फॅट आणि सॅच्यूरेटेड फॅट्स असतील तर ते पदार्थ खाणे टाळलेलेच बरे!
कारण हे फॅट्स शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच त्या पदार्थात जर साखरेचे प्रमाण सुद्धा जास्त असणे म्हणजे तो पदार्थ खाऊन आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
जर एखाद्या पदार्थात शुगर लेव्हल वीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर तो पदार्थ आपल्यापासून लांब ठेवणेच इष्ट आहे.
ज्या लोकांना हृदयरोग आहे किंवा ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे, ज्यांना स्थूलतेचा त्रास आहे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी कुठलाही पदार्थ विकत घेताना त्यात सोडियमचे प्रमाण किती आहे हे तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज घातलेले असतात किंवा जे खाद्यपदार्थ फ्रोजन असतात त्यात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हृदयरोगी, स्थूल व्यक्ती, आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे पदार्थ खाऊच नयेत. जास्त प्रमाणात सोडियम त्यांच्यासाठी विषाप्रमाणे आहे.
तसेच लहान मुलांना पदार्थ देताना त्यात कुठले प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरले आहेत, त्यात घातलेले इसेन्स, फ्लेवर्स आणि रंग लहान मुलांना चालण्यासारखे आहेत का हे तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रिझर्व्हेटिव्हज म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट सारखी काही रसायने लहान मुलांच्या वाढीसाठी व तब्येतीसाठी घातक असतात.
ती जरी परमिसिबल लिमिटमध्ये घातली असली तरी विष ते विषच असते. त्यामुळे आपण आपल्या लहान मुलांना कुठले विष तर खायला घालत नाही ना, ह्याची खातरजमा करूनच तो पदार्थ विकत घ्यावा.
हल्ली डाएट बार्स, हाय प्रोटीन पदार्थांचे पेव फुटले आहेत. डाएट करणारी माणसे, प्रोटीन सप्लिमेंटच्या शोधात असणारी माणसे हाय प्रोटीन असे टॅग वाचून एखादा पदार्थ विकत घेत असतील तर त्यांनी त्यावर लिहिलेले प्रोटीनचे प्रमाण वाचूनच तो पदार्थ विकत घ्यावा.
एखाद्या पदार्थावर जर हाय प्रोटीन असे लिहिलेले असेल तर त्यात पर सर्व्हिंग किमान दहा ते वीस टक्के प्रोटीन असायला हवे. एफएसएसएआयच्या नियमानुसार खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर आरडीए म्हणजेच रेकमेन्डेड डायटरी अलाउन्समध्ये त्या पदार्थाच्या पर सर्व्हिंगने किती टक्क्यांनी भर पडते हे लिहिणे अनिवार्य आहे.
फॅटचे प्रकार माहिती असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण कुठले फॅट्स खायचे आणि कुठे टाळायचे हे माहिती असले तरच आपण त्यानुसार कुठले खाद्यपदार्थ खायचे हे ठरवू शकतो. आपल्या शरीरासाठी ट्रान्स फॅट्स अजिबात चांगले नाहीत.
कुठलाही पॅक्ड खाद्यपदार्थ विकत घेताना हे बघून घ्या की त्यात ट्रान्स फॅटचे प्रमाण शून्य असले पाहिजे कारण ह्याच ट्रान्स फॅट्समुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे तुम्हाला दिवसातून किती सॅच्युरेटेड फॅट्स खाण्याची परवानगी आहे हे तुमच्या रोजच्या कॅलरी सेवनावर अवलंबून असते.
तुमच्या रोजच्या कॅलरीज सेवनाच्या सात टक्के सॅच्युरेटेड फॅट्स शरीरात गेलेत तर ते अपायकारक ठरत नाहीत.
उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर दिवसातून अठराशे किलोकॅलरी इतके सेवन करत असेल तर त्या व्यक्तीचे एकूण सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन १४ ग्रॅम्सपेक्षा जास्त असू नये. त्यामुळे पदार्थ खाण्याआधी त्यातील सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण तपासून घेणे आवश्यक आहे.
आता पर सर्व्हिंग म्हणजे काय तर प्रत्येक वेळेला तुम्ही तो पदार्थ खाल्लात तर त्यात किती कार्ब्स, प्रोटिन्स, फॅट्स असतील! ह्यावरून तुम्ही हिशोब करू शकता की प्रत्येक वेळेला तुम्ही तो पदार्थ खाताना तुमच्या शरीरात किती कॅलरीज आणि इतर पोषणमूल्ये जाणार आहेत.
अनेकदा पर सर्व्हिंग कॅलरीज सुद्धा वेष्टनावर लिहिलेल्यापेक्षा कमी-जास्त असू शकतात.
एफडीएच्या नियमानुसार प्रत्येक खाद्यपदार्थावर त्यात असणारे एकूण फॅट, सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, कोलेस्ट्रॉल, सोडियम, एकूण कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर, साखर, प्रोटीन, व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण किती आहे हे लिहिणे अनिवार्य असते. त्यावरून तुम्ही तो पदार्थ खायचा की नाही हे ठरवू शकता.
तसेच तो पदार्थ बनवताना त्यासाठी कुठले जिन्नस वापरलेत हे सुद्धा त्यावर लिहिणे गरजेचे असते. जो पदार्थ सगळ्यात जास्त वापरला जातो त्या जिन्नसाचे नाव सर्वात आधी असते आणि सगळ्यात कमी वापरलेल्या जिन्नसाचे नाव सर्वात शेवटी दिलेले असते.
हे तपासलेत तर तुम्हाला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी असेल किंवा एखादे जिन्नस वर्ज्य असेल तर तुम्ही तो पदार्थ खाणे टाळू शकाल. एखाद्या पदार्थावर सोडियम फ्री असे लिहिलेले असेल तर त्या पदार्थात सोडियम नाही असे नसून त्यात सोडियम जास्तीत जास्त पाच मिलिग्रॅम असते. ह्याचप्रमाणे एखादा पदार्थ पूर्ण कोलेस्ट्रॉल फ्री नसतो. त्यावर
कोलेस्ट्रॉल फ्री असे लिहिलेले असते म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉल दोन मिलिग्रॅमपेक्षा कमी असते.
त्यात सॅच्युरेटेड फॅट्स व ट्रान्स फॅट्सचे प्रमाण देखील कमी असते. एखादा पदार्थ लो फॅट आहे म्हणजे त्यात तीन ग्रॅम्स पेक्षा कमी फॅट्स असतात.
तर पुढच्या वेळेला कुठलाही पॅक्ड खाद्यपदार्थ विकत घेताना शक्यतोवर त्यावरील लिहिलेली माहिती वाचूनच मग तो पदार्थ विकत घ्या किंवा त्याचे सेवन करा म्हणजे तुम्हाला आपण नेमके काय खात आहोत आणि त्याने आपल्या शरीराला कितपत फायदा-नुकसान होणार आहे हे कायम लक्षात राहील आणि आपण आपोआप पौष्टिक पदार्थांकडे वळू.
—
- अॅल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये खाण्याच्या वस्तू पॅक करायच्या आधी, हे वाचा
- सावध व्हा! रोजच्या खाण्यातले “हे” पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी करतात!
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.