अमिताभजी, तुमची पुरुष-सत्ताक विचारसरणी सोडून द्या : KBC च्या प्रेक्षकांचा सल्ला…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगात सगळीकडेच जेंडर स्टीरियोटिपिकल विनोद सांगितले जातात. बायका हा तर विनोदाचाच विषय आहे असा समज बहुतांश पुरुषांचा असतो आणि ते कायम “सेक्सिस्ट जोक्स” करीत असतात.
बायकांचे ड्रायव्हिंग, संशयी बायका, मूर्ख बायका असे बायकांचे चित्र ह्या असल्या जोक्समधून उभे केले जाते. गंमत म्हणजे बायका सुद्धा हे जोक्स एकमेकींना फॉरवर्ड करतात. त्यात त्यांना काही गैर देखील वाटत नाही. कजाग बायको किंवा पैश्याची भुकेली बायको /गर्लफ्रेंड ह्यावर तर कायमच विनोद केले जातात.
बहुतांश पुरुषांना हे जोक करण्याची इतकी सवय असते की ते कुठेही असले तरी त्यांच्या तोंडून असले सेक्सिस्ट जोक्स बाहेर पडतातच. अगदी अमिताभ बच्चन हे सुद्धा स्वतःला असे स्टीरियोटिपिकल आणि मायसोजेनिस्टिक विनोद नॅशनल टीव्हीवर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम परत सुरु झालाय. हा कौन बनेगा करोडपतीचा अकरावा सिझन आहे. लोकांना हा कार्यक्रम अजूनही आवडतो. परंतु काही दिवसांपूर्वी जो भाग प्रसारित झाला तो बघून अनेकांना अमिताभ बच्चन ह्यांचे बोलणे आवडले नाही.
अकराव्या सिझन च्या ह्या भागात अमिताभ बच्चन ह्यांनी बायकांबाबत एक सेक्सिस्ट जोक केला.
हा भाग बघितल्यानंतर लोकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अमिताभ बच्चन खरं तर ह्या कार्यक्रमात अगदी संतुलित आणि स्त्रियांशी विनयशील वागताना दिसतात. त्यांच्या “पिंक” वगैरे सारख्या चित्रपटांतून सुद्धा काही चांगले संदेश दिले गेले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन ह्यांच्याकडून असे सेक्सिस्ट जोक्स लोकांना अपेक्षित नव्हते.
कौन बनेगा करोडपतीच्या ह्या अमिताभ बच्चन ह्यांनी अप्रत्यक्षपणे असे वक्तव्य केले आहे की बायका ह्या पैश्यांच्या मागे म्हणजे थोडक्यात गोल्ड डिगर्स असतात. त्यावर ट्विटरवर राहुल कपूर नावाच्या एका व्यक्तीने असे ट्विट केले आहे की ,
” सेक्सिस्ट बच्चन सर मेकिंग जोक्स व गर्ल्स बीइंग गोल्ड डिगर्स. नो सर प्लिज डोन्ट डू धिस..”
ज्यांना ह्या ट्विटचा संदर्भ कळला नसेल त्यांच्यासाठी एका ट्विटर युझरने ह्या घटनेबद्दल तपशीलवार लिहिले आहे. त्याने असे नमूद केले आहे की ,बच्चन ह्यांनी सेक्सिस्ट आणि मायसोजेनिस्टिक विनोद केला आहे.
ह्या व्यक्तीने असे ट्विट केले आहे की , “ज्यांनी आजचा भाग बघितला नाही त्यांच्यासाठी! आजच्या भागात एक स्पर्धक होता ज्याला कधीच एकही मैत्रीण मिळाली नाही. त्याने त्याचे सामान्य ज्ञान वापरून एक कोटीपर्यंत बाजी मारली.
ह्यावर प्रतिक्रिया देताना बिग बी म्हणाले की “आता मुली तुमच्याकडे आकृष्ट होतील. आणि म्हणतील ,’करोडपतीजी , मैं आपकी करोडपत्नी बनना चाहती हूँ .’
म्हणजे बिग बी ह्यांनी अप्रत्यक्षपणे असेच म्हटले की मुली फक्त पैश्यांच्या मागे असतात. थोडक्यात त्या गोल्ड डिगर्स असतात. ह्याकडे दुर्लक्ष करणे अवघड आहे कारण अमिताभ बच्चन ह्यांनी आज पहिल्यांदाच असा विनोद केला अशातला भाग नव्हे. ते जवळजवळ प्रत्येक भागात अश्या प्रकारचे “बायको” ह्या विषयावरील मायसोजेनेस्टीक विनोद सांगत असतात.
खरं तर हे अत्यंत विडंबनात्मक आहे कारण बच्चनसाहेब कायम स्त्रीसक्षमीकरणाला पाठिंबा देत असतात. त्यांचा चित्रपट “पिंक” , त्यांचे ब्लॉग आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून ते कायम स्त्रीसक्षमीकरणाविषयी बोलताना दिसतात.
” ही व्यक्ती असे म्हणते की ,“प्रिय बच्चन साहेब, आपण २०१९ सालात आहोत. तुमच्या केबीसीमध्ये असे लिंगभेदाचा उदोउदो करणारे, उद्धट आणि स्त्रियांना कमी लेखणारे विनोद होता कामा नयेत.”
ही व्यक्ती पुढे असेही म्हणते की “लाखो लोकांप्रमाणे मी देखील तुमच्या चित्रपटांचा चाहता आहे आणि कायम असेन. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की मला अश्या प्रकारचे साहित्य आणि मजकूर पटेलच. जे मला पटणार नाही त्याबद्दल मी बोलून दाखवेनच.
जरी अश्या प्रकारच्या टिप्पण्या जगातील सर्वात प्रसिद्ध लोकांपैकी एक असलेल्या व्यक्तीकडून आल्या, तरी त्या जर पटण्यासारख्या नसतील तर मी त्याचा निषेध नक्कीच करेन.”
सोशल मीडियावर अनेकांनी ह्याच प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लोकांच्या मते असे काही पहिल्यादांच घडलेले नाही. ह्या आधी सुद्धा अनेकांनी बच्चन साहेबांच्या अश्या प्रकारच्या टिप्पण्या ह्या कार्यक्रमात ऐकल्या आहेत.
एका व्यक्तीने असेही सांगितले की केबीसीच्या एका भागात बच्चन साहेबांनी बायका कश्या किड्यांना (कोळी, झुरळे) घाबरतात, ह्यावर सुद्धा विनोद केला होता.
ते म्हणाले होते की “बायका कोळ्यांना बघून घाबरतात. ” आणि पुढे ते हसले होते. हा ट्विटर युझर ह्यावर म्हणतो की ,”बच्चन साहेबांचे हे casual sexism आहे जे ते प्राईम टाइमवर सुरु असलेल्या कार्यक्रमात करतात. “
ट्विटरवरील आणखी एक व्यक्ती असे म्हणते की ,”केबीसी टिपिकल पितृसत्ताक आहे. बच्चन साहेबांचे स्वतःला श्रेष्ठ समजून केले जाणारे जोक्स, सेक्सिस्ट कमेंट्स, आणि व्हॉट्सऍप फॉरवर्ड टाईप जोक्स ह्यामुळे लिंगभेदाला चालना मिळते आणि जेंडर स्टीरियोटिपिकल विचार वाढीला लागतात.”
एका व्यक्तीने असे म्हटले आहे की ,”अमिताभ बच्चन नॅशनल टीव्हीवर प्राईम टाइमवर सुरु असलेल्या कार्यक्रमात असल्या प्रकारच्या लिंगभेदात्मक टिप्पण्या करतात आणि त्यावर कोणीही काहीही बोलत नाही. आक्षेप घेत नाही. हे तर आणखी वाईट आहे की कुणाला त्यात काही गैर देखील वाटत नाही.”
२०१४ साली सुद्धा अमिताभ बच्चन ह्यांनी अशीच एक टिप्पणी केली होती. एका महिला स्पर्धकाला ते म्हणाले होते की, “तुमच्या हातात लाटणे असते तर डिफेन्स मिनिस्ट्री सुद्धा तुमच्या हातात आहे.” ते एकदा असेही म्हणाले होते ,”बायकांना तर पोळ्या करण्याविषयी सगळे माहिती असलेच पाहिजे.”
अमिताभ बच्चन ह्यांच्या सारख्या व्यक्तीकडून जर अश्या प्रकारच्या टिप्पण्या आणि विनोद वारंवार केले जात असतील तर हे गंभीर आणि आक्षेपार्ह आहे.
बायकांवरील विनोद हा विषय इतका सामान्य झाला आहे की खुद्द बायकांनाच त्याविषयी काही वाटेनासे झाले आहे. एखादीने त्यावर आक्षेप व्यक्त केला तरी तिला नावे ठेवली जातात किंवा तिच्या विनोदबुद्धीची खिल्ली उडवली जाते.
बायकांनाच जोवर हे चालतेय तोवर हे सुरूच राहणार! मग सामान्य माणसापासून ते अमिताभ बच्चन ह्यांच्यापर्यंत सगळेच बायकांवर लिंगभेदात्मक विनोद करत राहणार आणि जग त्यावर पोट धरून हसणार!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.