पर्यावरण चळवळीचा प्रवास आक्रस्ताळेपणाकडे नको!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: शैलेंद्र कवाडे
===
आपल्याकडे आणि आपल्याला, पर्यावरणाचे रक्षण करायचे असते पण आपल्या सोयीने…!
पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरण टिकविणे हे पाण्याला एका जागी उभे करण्यासारखे आहे. आजवरच्या पृथ्वीच्या इतिहासात पर्यावरण कधीही स्थिर राहिलेले नाही, पर्यावरण ही मानवी संस्कृतीसारखीच एक “चल ” आणि बदलणारी व्यवस्था आहे, तिचा एकमेकांशी ताळमेळ आहेही आणि नाहीही.
ह्या विश्वात घडणाऱ्या नैसर्गिक घटना एकाशी दुसरी आणि दुसरीशी तिसरी अशा बांधलेल्या असतात. ह्यातील बहुसंख्य घटना ह्या अपघाती आणि आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या असतात.
पर्यावरणातील जे बदल आपल्या हस्तक्षेपामुळे होतं आहेत, त्याचा अंतिम परिणाम वाईट होईल किंवा चांगला हे आज आपल्याला माहीत नाही, तसेच जे बदल आपल्या हस्तक्षेपाशिवाय होतं आहेत त्यांचाही बरावाईट परिणाम आज आपल्याला माहीत नाही.
पर्यावरण रक्षण म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळताना एका जागी उभे राहण्यासारखे आहे. आपण काहीही केले नाही तरी पर्यावरण बदलणारच आहे, तो खेळ सुरूच आहे.
जेंव्हा माणूस ह्या विश्वातील एक अतिसामान्य प्राणी होता, तेंव्हाही भोवतालचे पर्यावरण बदलत होतेच. किंबहूना असे कित्येक बदल घडले म्हणूनच माणूस नावाचा प्राणी ह्या पृथ्वीवर अवतरला, टिकला आणि वाढला.
जगभर हजारो प्रजाती मानवी हस्तक्षेपाशिवाय वाढल्या आणि नष्टही झाल्या. कोणत्याही प्राण्याने इतर प्रजातींच्या किंवा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काहीही केले नाही.
ते काहीही न करणारे प्राणीही कालांतराने नष्ट झाले. असेच काहीही न करणारे कासव दोन अडीच कोटी वर्षांपासून ह्या पृथ्वीवर टिकून आहे.
पर्यावरण रक्षण वगैरे काहीही माहीत नसलेली झुरळे तीन कोटी वर्षांपासून पृथ्वीवर टिकून आहेत. माणूस नावाचा प्राणी त्यामानाने फारच नवखा आहे.
जसे एखादे शेवाळ किंवा बॅक्टरीया आपल्याला हवी तशी आपली परिसंस्था बदलतो तसेच माणसानेही आपली परिसंस्था आपल्याला हवी तशी बदलली आहे. त्यांना ते माहीत नसते आणि आपल्याला ते माहीत आहे हाच एकमेव फरक आहे.
एका अर्थाने मानवाची बुद्धिमत्ता आणि भविष्याचा वेध घेण्याची त्याची उत्सुकता, त्या उत्सुकतेपोटी जन्मणारी साधार-निराधार भीती हीच पर्यावरण रक्षणाची प्रेरणा आहे.
खरे तर, पर्यावरण रक्षण चळवळ ही मानवी अस्तित्व टिकवण्याचा एक प्रयत्न आहे. हा प्रयत्न योग्य दिशेने आहे किंवा नाही हे आज सांगता येणार नाही.
पृथ्वीवरील गोडे पाणी आणि हवा ह्या दोन गोष्टी आहे त्या स्थितीत ठेवण्याचा आपला अट्टाहास हा आपल्या अस्तित्वाच्या गरजांशी जोडलेला आहे.
बदलत्या पर्यावरणाची “समस्या” ही वाढलेले सरासरी आयुर्मान आणि त्यामुळे वाढलेल्या सरासरी लोकसंख्येने जन्मलेली स्थिती आहे.
ह्या लोकसंख्येला आवश्यक असलेले अन्न, मृत्यू टळावा म्हणून लागणारी औषधे, ते अन्न व औषध सगळ्यांना मिळावे म्हणून आवश्यक असलेला व्यापार, बुद्धिमत्तेचे बाय प्रॉडक्ट्स असलेले रिवाज, कल्पना व मनोरंजन ह्या सगळ्या गोष्टींतून आपण आपले पर्यावरण बदलवत असतो. अनेकांच्या मते बिघडवत असतो.
थोडक्यात आपल्या अस्तित्वाच्या गरजांशी किंवा भीतीशी जोडलेला आपला पर्यावरण रक्षणाचा निर्धार अनेकदा आपल्या जगण्याच्या सुलभतेशी समोरासमोर भिडतो. आपण शोधलेली सुलभता ही देखील एका अर्थाने आपल्या पर्यावरणाचा भाग आहे.
आज घडणारा संघर्ष हा सुलभतेचा मोह आणि अस्तित्वाची भीती ह्यांच्यातील संघर्ष आहे.
ज्या मानवी समुदायाने, राष्ट्राने ही सुलभता पुरेशी चाखली नाही त्यांना अस्तित्वाची भीती अनाठायी वाटते, ज्यांनी हे उपभोगून झाले आहे त्यांना त्या सुखापेक्षा अस्तित्व जास्त महत्वाचे वाटते.
त्यामुळेच पर्यावरणाची चळवळ ही अनेकदा “आहे रे” वर्गाची चळवळ भासते. वंचितांना सुखाचा मोह असतो, प्रस्थापितांना अस्तित्वाचा…!
म्हणूनच सारासार विचार करू शकणारा, संतुलन साधू शकणारा मध्यमवर्ग इथे निर्माण होणे फार आवश्यक आहे.
अन्यथा हा प्रश्न आक्रस्ताळेपणाकडे प्रवास करेल.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.