आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: अखिलेश विवेक नेरलेकर
===
अशा खूप कमी वेबसिरीज आहेत ज्यांची उत्सुकता आपल्याला जराही वेळ ब्रेक घेऊ देत नाही आणि त्या सिरीज पूर्ण केल्याशिवाय जीवाला शांतता लाभत नाही अशा काही सीरिज पैकी या दोन सिरीज नेटफ्लिक्स वरची The Spy आणि ऍमेझॉन प्राईम वरची The Family man.
म्हणजे सेक्रेड गेम्स, हाऊस ऑफ कार्ड्स, ब्रेकिंग बॅड किंवा सुट्स या मी अगदी एका बैठकीत २ ते ३ दिवसात पाहून संपवल्या होत्या.
तशाच या दोन सिरीज आहेत…!
अगदी अधाश्यासारख्या दोन्ही सिरीज दोन दिवसात पाहून घेतल्या आणि तेंव्हा कुठे जरा डोकं शांत झालं…
खरंतर या दोन सिरीज बद्दल बोलायचं झालं तर खूप मोठा लेख होईल.
पण तरीही शक्य तितकं थोडक्यात लिहून आटोपतो!
१) The Spy
हि नेटफ्लिक्स च्या लिमिटेड सिरीजपैकी एक. रिलीज होऊन २ आठवडे झाले आणि खूप लोक म्हणत होते की ही सिरीज बघाच.
पहिला एपिसोड चालू केला आणि सांगतोय काय दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत सिरीज पूर्ण झाली.
मुळात हि सिरीज ६ एपिसोड्स ची असल्याने आणि प्रत्येक एपिसोड ५० मिनिटांच्या वर असल्याने त्यातली उत्सुकता कमी झाली नाही.
हि कथा आहे इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेच्या एका मिशन किंवा ऑपरेशनची. इस्राईल आणि सीरिया यांच्यातल्या एका वेगळ्याच युद्धाची.
हे युद्ध काय शस्त्र किंवा रणगाडे घेऊन झालं नाही तर ते युद्ध म्हणजे एका गुप्तहेराच, त्याच्या पत्नीचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या सहकऱ्यांचं. एली हा इस्राईल चा नागरिक असून मोसाद तर्फे सीरिया येथे एका ऑपरेशन साठी हेरगिरी करण्याची कामगिरी त्यावर सोपवली जाते.
त्यासाठी लागणारं प्रशिक्षण देऊन त्याला त्या कामगिरीच्या लायक तयार केलं जातं…आणि मग चालू होतो एली उर्फ कामील या स्पाय चा जीवघेणा प्रवास.
मग तिथून एली हे ऑपरेशन पूर्ण करतो का नाही, ते ऑपरेशन नक्की काय आहे, तो पून्हा आपल्या मातृभूमीत येऊ शकतो का नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात.
हि सिरीज रियल लाईफ इन्सिडंट्स वर आधारित असल्याने ती जास्त आपल्याला भावते. फक्त ६ एपिसोड्स असून देखील त्यातल्या कॅरॅक्टर ची डेव्हलपमेंट इतकी सुरेख केलीये कि आपण त्यातल्या प्रत्येक पात्रांशी अगदी मनापासून जोडले जातो.
शिवाय ६० च्या दशकातलं इस्राईल, सीरिया हे ज्या पद्धतीने उभं केलंय ते पाहून याच्या सेट डिझायनिंग वर किती मेहेनत घेऊन काम केलंय ते दिसतं.
गुप्तहेर म्हणजे काय, त्यांची निवड कशी होते, त्यांच काम काय, ते नक्की आपल्या देशातल्या लोकांशी संपर्क कसा साधतात, त्यांचं उर्वरित आयुष्य कसं जातं अशा असंख्य शंकांचं निरसन हि सीरिज करते…
“गुप्तहेर म्हणजे बॉन्ड” हे जर समीकरण लोकांना खरं वाटत असेल तर तो समज फार चुकीचा आहे.
बॉन्ड हे एका नॉव्हेल वरून सिनेमासाठी तयार केलेलं झाकपाक कॅरॅक्टर आहे.
खरा गुप्तहेर हा बॉण्ड सारखा अजिबात नाही हे ही सिरीज आपल्याला ठासून सांगते. यातल्या प्रत्येक कलाकाराचं काम हे लाजवाब झालंय. शिवाय सिरीज च्या टायटल मध्ये फिरणार दिसणार फुलपाखरू याची खूप सुंदर लिंक आपल्याला दिली आहे.
हे गुप्तहेर त्यांच्या विश्वात एवढे गुरफटून जातात कि त्यांचं खरं आयुष्य काय आहे ते खरे कोण आहेत याचा सुद्धा त्यांना विसर पडून ते गुप्तहेराच्या आयुष्याला आपलं मानून जगू शकतात हि देखील शक्यता या सिरीज मध्ये खूप इफेक्टिव्हली दाखवली आहे.
शिवाय गुप्तहेरांच हे जग हा कारभार काहीही झालं तरी निरंतर चालत राहणार याची देखील आपल्याला जाणीव होते. एकंदरच एक परिपूर्ण स्पाय थ्रिलर असलेली ही लिमिटेड सिरीज नेटफ्लिक्स ला जरूर बघाच.
अजून जास्त डिटेल मध्ये लिहिलं असतं, पण फॅमिलीमॅन विषयी सुद्धा लिहायचंय, म्हणून थांबतो!
२) The Family Man
जेंव्हा या सिरीज चा ट्रेलर पाहिला आणि वाजपेयी आहे म्हंटल्यावर ती रिलीज झाल्या झाल्या बघायला सुरुवात केली आणि काल संपवली. मुळात मला स्पाय थ्रिलर फिल्म किंवा सिरीज पाहायला प्रचंड आवडतं त्यामुळे अशा कुठल्याही सिरीज मी सोडत नाही.
हि सिरीज राज & डी.के यांनी बनवली आहे. ज्यांनी गो गोवा गॉन सारखा पहिला भारतीय झॉम्बी सिनेमा केला त्यांच्याकडून निश्चितच अपेक्षा जास्त होत्या आणि त्यांनी कुठेही निराश केलेलं नाही हे पाहून तर आणखीनच आनंद झाला.
हि स्टोरी आहे श्रीकांत तिवारी या फॅमिलीमॅन ची जो इतर लोकांसाठी एका सरकारी कचेरीत काम करतोय पण त्याच खर काम हे देशाच्या सुरक्षेसाठी झटण्याचं आहे.
जे काम नाम शबाना मध्ये वाजपेयी यांनी केले हे सुद्धा अगदी तसंच आहे फक्त जरा मोठ्या लेव्हल वर..पण बाकी सिरीज आणि त्यातली कथा हि फार नवीन आहे.
खरतर या सिरीज बद्धल काहीही बोललो तरी ते स्पॉयलर देण्यासारखं ठरेल. एकाच सिरीज मध्ये देशप्रेम, दहशतवाद, काश्मीर मुद्दा, हेरगिरी, जातीयवाद, नॅशनल ऍन्टी नॅशनल, बीफ बॅन, फॅमिली, सरकारी सुरक्षा यंत्रणा आणि त्यांची कार्यप्रणाली अशा कित्येक मुद्यांना हात घालून त्यावर अगदी सुटसुटीतपणे भाष्य केलेलं आहे.
या सिरीज ची खासियत म्हणजे यातल्या ऍक्शन सिक्वेन्स च शूटिंग. बहुतेक ऍक्शन सिक्वेन्स हे वन टेक मध्ये घेतले आहेत आणि ते इतके पद्धतशीरपणे रचले आहेत की चूक काढायला अजिबात वाव नाही.
पर्सनली मला वन टेक शॉट्स खूप आवडतात बघणाऱ्याला सुद्धा जास्त त्रास होत नाही, आणि कलाकारांची तसेच टेक्निशयन ची मेहनत त्यात दिसून येते.
शिवाय यात दिल्या गेलेल्या शिव्या आणि प्रणय दृश्ये (समलैंगिक दृश्य सुद्धा) त्यातल्या कथेला अनुसरून असून ती कथा पूढे नेण्यासाठीच वापरली आहेत हे स्पष्ट होते. कुठेही ते सीन्स उगाच घुसवले आहेत असं वाटत नाही!
नीरज माधव याने उभा केलेला व्हिलन लक्षात राहतो, एका वेगळ्या पद्धतीने त्याने यावर काम केल्याच दिसून येत..शिवाय प्रियामणी, शरद केळकर, शरीब हाश्मी, दलीप ताहील, गुल पनाग यांनी सुद्धा त्यांचं बेस्ट आणि अफलातून काम केलंय.
या सिरीज मध्ये इतकी पात्र असून सुद्धा सगळ्या पात्रांना योग्य तो न्याय आणि ट्रीटमेंट दिली आहे..कोणतंही पात्र आपल्याला अपूर्ण वाटणार नाही.
लास्ट बट नॉट लिस्ट. दि ग्रेट ग्रेट मनोज वाजपेयी, म्हणजे हा रोल त्यांच्या साठीच लिहिला गेला असावा असं वाटत. यात त्याच्याजागी अगदी नवाझ किंवा इरफान किंवा अजून कुणीही मोठा ऍक्टर असता ना तरी ती मजा नसती आली जी मनोज वाजपेयी मुळे आली!
यार हा माणूस नक्की काय खाऊन काम करतो हे रहस्यच आहे. इतका उत्स्फूर्त अभिनय. काही काही ठिकाणी तर हे प्रकर्षानं जाणवत कि हि स्क्रिप्ट फक्त मनोज वाजपेयी यांच्या Improvisation मुळे हिट झाली असेल.
यातला श्रीकांत तिवारी हा सुद्धा वासेपुर मधल्या सरदार खान सारखाच आहे. पण हा जरा जास्त शिकलेला उच्चभ्रू लोकांमध्ये राहणारा आणि सर्वात महत्वाच म्हणजे आपल्या देशासाठी जीव ओवाळून टाकणारा सरदार खान आहे.
जो terrorist ना कधी गोळ्या मारून तर कधी “तलवार के बदले तलवार उठाओगे तो अंत में तो सिर्फ तलवार ही बचेगी” असे डायलॉग मारून अद्दल घडवत असतो!
ओव्हरऑल एक परिपूर्ण ऍक्शन स्पाय क्राईम थ्रिलर सिरीजचा आनंद घ्यायचा असेल तर ऍमेझॉन वर हि सिरीज नक्कीच बघा आणि मनोज वाजपेयी यांचे फॅन असाल तर अजिबात मिस करू नका!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.