आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अमेरिकेत होते. पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचे भाषण ऐकण्यासाठी ह्युस्टनमध्ये तब्बल पन्नास हजार भारतीय – अमेरिकन लोक पोहोचले होते. त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय अविस्मरणीय ठरला.
कारण होते टेक्सस ह्या राज्यात होणारा “हाउडी मोदी” हा कार्यक्रम! पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच्या दौऱ्यातील “हाऊडी मोदी” हा कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत होणारे भाषण हे मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
रविवारी टेक्सस राज्यातील ह्युस्टन ह्या शहरात “हाऊडी मोदी” ह्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५० हजार भारतीयांना संबोधित केले व भारतात सगळं काही ठीक असल्याचे सांगितले.
ज्या शहरात हा कार्यक्रम झाला ते शहर टेक्सस ह्या अमेरिकेच्या राज्यातील एक मोठे शहर आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांपैकी एक राज्य असलेल्या टेक्ससला “काउबॉईज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड” असेही म्हटले जाते. काऊबॉय कल्चर, कंट्री म्युझिक आणि रोडिओ ह्या टेक्सस राज्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत.
आता काऊबॉय म्हटले की फुल लॉन्ग स्लीव्ज कॉटन बीब शर्ट, त्यांची विशिष्ट काऊबॉय पॅन्ट किंवा जीन्स, जॅकेट, काऊबॉय बूट्स आणि काऊबॉय हॅट घातलेला पुरुष डोळ्यांपुढे येतो.
बऱ्याच हॉलिवूड चित्रपटांतून काऊबॉइजची अशीच प्रतिमा आपल्यापुढे उभी केली आहे.
हे काऊबॉईज किंवा टेक्ससचे स्थानिक लोक एकमेकांना भेटल्यावर “हॅलो, हाऊ आर यु” च्या ऐवजी “हाउडी” असे म्हणतात.
“हाउडी” म्हणजे एक अनौपचारिक अभिवादन (इन्फॉर्मल ग्रीटिंग) आहे. हा “हाऊ डू यु” चा झालेला शॉर्टफॉर्म किंवा अपभ्रंश आहे असे आपण म्हणू शकतो. सोळाव्या शतकात पहिल्यांदा दक्षिण इंग्लंड बोलीत ह्या शब्दाचा वापर झाला असे सांगण्यात येते.
त्या काळातील साहित्यात सुद्धा ह्या प्रकारच्या अभिवादनाचा उल्लेख आढळतो. स्कॉटिश लोक अँग्लो लोकांशी बोलताना किंवा त्यांना ग्रीट (अभिवादन) करताना हाऊ डू असे म्हणत असत. ह्याच प्रकारचे ग्रीटिंग आजही अमेरिकेच्या नैऋत्य भागातील राज्यांत “हाउडी” ह्या शब्दांत ऐकायला मिळते.
थोडक्यात टेक्सस,नेव्हाडा, ओरेगॉन किंवा मेक्सिको किंवा अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्यांत एकमेकांना हाय- हॅलो ऐवजी हाउडी म्हणजेच ‘हाऊ डू यु डू” असे म्हणण्यात येते.
टेक्सस आणि काऊबॉईज हे पक्के समीकरण आहे.हे काऊबॉईज बोलताना “हाउडी पार्टनर” म्हणजेच “हाय देअर फ्रेंड” असे म्हणतात. ह्या ठिकाणची बोलीभाषा इतर अमेरिकन इंग्लिशपेक्षा थोडी वेगळी आहे. इथले लोक “ऑल ऑफ यु” ला “या ऑल” असे म्हणतात.
म्हणजेच यु चा उच्चार “या” असा करण्यात येतो. इथल्या लोकांच्या बोलण्यात येणारा आणखी एक शब्द म्हणजे “गिडी अप” म्हणजेच “लेट्स गो” असा होतो. हा वाक्प्रचार बऱ्याचदा घोडेस्वारी करताना हे काउबॉईज वापरतात.
त्यांचे पशुधन हाकताना त्यांच्या तोंडून “हेड एम अप , मूव्ह एम आउट” असे म्हटलेले ऐकायला येते. ह्यांची भाषा ऐकल्यास आपल्या शब्दसंग्रहात बरीच भर पडते. कारण ह्यांची बोलण्याची पद्धतच वेगळी आहे.
तर जगात प्रसिद्ध असलेले हे काउबॉइज म्हणजे खरं तर पशुपालन करणारी माणसे आहेत. उत्तर अमेरिकेत पारंपारिकपणे घोड्यावर बसून गुरेढोरे हाकणारे काउबॉईज बर्याचदा पाळीव प्राण्यांशी संबंधित इतर व्यवसाय सुद्धा करतात.
ऐतिहासिक अमेरिकन काउबॉय हे १९व्या शतकात उत्तर मेक्सिकोच्या व्हॅकेरो परंपरांतून प्रसिद्ध झाले. उत्तर मेक्सिकोच्या व्हॅकेरो परंपरांमध्ये काऊबॉईज विषयी विविध आख्यायिका सांगितल्या जातात.
काऊबॉईजप्रमाणेच जे रँग्लर असत ते विशेषत: गुरेढोरे पाळण्यासाठी व हाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची काळजी घेत असत.गुरे चारण्याच्या कामाव्यतिरिक्त काही काउबॉइज रोडिओ ह्या खेळात सुद्धा भाग घेत असत. रोडिओ हा एक खेळ आहे ज्यात काउबॉईजचा वेग आणि कौशल्याची कसोटी लागते.
अमेरिकन काउबॉय संस्कृतीची मूळे ही स्पेन आणि अमेरिकेत पूर्वी स्थायिक झालेल्या युरोपियन लोकांच्या संस्कृतीमध्ये सापडतात. शतकानुशतके विविध प्रकारचे भूप्रदेश, विविध प्रकारचे हवामान, आणि विविध संस्कृतीतील पशुपालनाच्या विविध पद्धती ह्यांतील फरकांमुळे जगात पशुपालन करणाऱ्यांची संस्कृती, वेशभूषा तसेच उपकरणे आणि पशुपालनाची पद्धत ह्यांत वैविध्य आढळते.
काऊबॉय हा इंग्रजी शब्द “गुरे (गायी) राखणारा मुलगा” ह्यावरून आला असल्याचे म्हटले जाते. असेही म्हणतात की व्हॅकेरो ह्या शब्दाचे थेट भाषांतर म्हणून “काऊबॉय” हा शब्द रूढ झाला. व्हॅकेरो हा एक स्पॅनिश शब्द आहे.
एखादी व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन गुरे राखत असेल तिला व्हॅकेरो असे म्हणत असत. स्पॅनिश मध्ये गायीला व्हॅका असे म्हणतात. हा शब्द मूळ लॅटिन शब्द “व्हाक्का” पासून तयार झाला आहे.
काउबॉईजची संस्कृती आणि परंपरा मुख्यत्वेकरून स्पेनमधून अमेरिकेत आली. स्पेनच्या इबेरियन पेनिन्सुला आणि अमेरिकेच्या ह्या भागात कोरडे वातावरण असल्याने गवत कमी आहे. त्यामुळे गुरांना चारायला न्यायचे असेल तर बरीच पायपीट करावी लागत असे.
इतके अंतर पायी चालणे कठीण किंवा जवळजवळ अशक्य असल्याने हे लोक घोड्यावर बसून गुरे राखीत आणि चारत असत. तिथूनच ही व्हॅकेरो संस्कृती रुजली आणि ती सोळाव्या शतकात स्पॅनिश वसाहतवाद्यांनी अमेरिकेत आणली.
त्यांनी त्यांची गुरे, घोडे सुद्धा आजच्या मेक्सिको आणि फ्लोरिडा मध्ये आणले. त्यांनी मेक्सिको मध्ये नवे स्पेनच वसवले. फक्त मेक्सिकोचे हवामान आणि संस्कृतीतील विविधता त्यांनी सामावून घेतली आणि नंतर मेक्सिकन संस्कृती तयार झाली. हीच संस्कृती पुढे नैऋत्य अमेरिकन राज्यांत सुद्धा पसरली आणि तिथे रुजली.
इंग्लिश वसाहतवादी अमेरिकेत आले. आणि हळूहळू पश्चिम-दक्षिण भागात पोहोचले. तिथे आधीच स्पॅनिश संस्कृती आणि स्थानिक संस्कृती ह्यांचा मेळ झालेली एक संस्कृती तयार झालेली होती. त्यात इंग्लिश लोक सुद्धा तिथे स्थायिक झाल्यावर त्यांचीही संस्कृती त्यात मिसळली गेली.
स्पॅनिश व्हॅकेरोंनी त्यांच्या सवयी, जीवनशैली ह्या सगळ्यांत बदल केले आणि काही इंग्लिश परंपरा आपल्याशा केल्या. त्यातून अमेरिकन काऊबॉय संस्कृतीचा जन्म झाला.
ह्यात स्थानिक अमेरिकन, स्पॅनिश, आफ्रिकन अमेरिकन, अमेरिकन -इंडियन, मेक्सिकन, युरोपियन अशी विविध वंशांची माणसे आहेत.
काळाच्या ओघात त्यांची एक वेगळीच खास संस्कृती निर्माण झाली. आज ही संस्कृती जगभरात ओळखली जाते. चित्रपट, कथा, कादंबऱ्या, वेस्टर्न संगीत, कंट्री म्युझिक मधून ह्या संस्कृतीचे दर्शन आपल्याला घडते.
आधुनिक काळात काउबॉईजने आधुनिक जगाशी जुळवून घेत त्यांच्या अनेक गोष्टींत आवश्यक ते बदल केले. त्यांच्या पद्धती, उपकरणे, तंत्रज्ञान आधुनिक झाले. पण तरीही त्यांनी त्यांच्या अनेक खास विशिष्ट परंपरा अजूनही जतन करून ठेवल्या आहेत.
ह्युस्टन येथे झालेल्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमामुळे हाउडी म्हणणाऱ्या ह्या टेक्ससच्या काउबॉईजची परत सगळीकडे चर्चा झाली आणि त्यांच्या संस्कृतीची भारतीयांनाही ओळख झाली…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.