Site icon InMarathi

१८५७च्या तब्बल १० वर्ष आधी इंग्रजांना आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकाची थक्क करणारी कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मसाल्यांच्या व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनी हळूहळू सबंध भारताचा ताबा स्वतःकडे घेऊन भारतावर पारतंत्र्य लादले. त्यांच्या अन्यायकारक वागणुकीमुळे जवळजवळ प्रत्येकाच्याच मनात संताप खदखदत होता.

पण एकजूट नसल्यामुळे इंग्रज बंडखोरीची भाषा करणाऱ्याला चिरडून टाकत असत. हळूहळू भारतीयांच्या मनात इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची भावना निर्माण झाली.

पहिला सशस्त्र क्रांतिकारी उठाव १८५७ साली झाला. त्या वेळेला इंग्रजांची भारतावर मजबूत पकड होती आणि ह्या उठावात सुद्धा देशात एकजूट नसल्यामुळे हा पहिला उठाव अयशस्वी झाला. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा इंग्रजांविरुद्ध केलेला पहिला उठाव मानला जातो.

quoracdn.net

पण खरं तर १८५७ सालच्या दहा वर्षे आधी एका शूर क्रांतिकारकाने इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला होता. त्या वीराचे नाव होते ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी!

आंध्र प्रदेशाच्या मातीने अनेक शूरवीरांना जन्म दिला आहे. त्यापैकीच एक होते ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी. नावाप्रमाणेच नरसिंह असलेल्या ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी ह्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कडवा लढा दिला होता.

ब्रिटिश भारतात आले तेव्हा सुरुवातीच्या काळात ब्रिटिश वसाहतवाद्यांनी साम्राज्यविस्तार करताना अनेक भारतीय राजांवर दडपशाहीचे धोरण अवलंबले होते.

इंग्रजांनी अनेक स्थानिक राज्यकर्त्यांच्या हातून सत्ता काबीज केली आणि राज्यातील जनतेकडून जबरदस्तीने करवसुली करणे सुरु केले. लोकांवर अन्याय होऊ लागला.

अनेकांच्या मनात संताप खदखदत होता पण क्रूर इंग्रजांविरुद्ध बंड करण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. पण काही शूरवीरांनी मात्र प्राणांची देखील पर्वा केली नाही आणि इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यापैकीच एक होते ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी!

आंध्रप्रदेशातील रायलसीमा प्रदेशातील नरसिंह रेड्डी ह्यांचा जन्म इसवी सन १८०० च्या सुमारास झाला. कुंडी नदीच्या किनारी ,सध्याच्या कुर्नुल जिल्ह्यातील जमीनदारांच्या घराण्यात नरसिंह रेड्डी ह्यांचा जन्म झाला होता.

 

Quora

नरसिंह रेड्डी ह्यांना दोन मोठे भाऊ होते. त्यांचे वडील हे कुर्नुल जिल्ह्यातील ऊईयलावाडाच्या पॉलिगर कुटुंबाचे नातेवाईक होते. त्यांच्या आईचे नाव सिद्धम्मा होते. नरसिंह रेड्डी भारतातील सर्वात पहिल्या क्रांतिकारकांपैकी एक होते.

रेड्डी ह्यांच्या अखत्यारीत ६६ गावे होती आणि त्यांच्या सैन्यात २००० सैनिक होते. सर्वसामान्य भोळ्याभाबड्या गरीब जनतेवर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला अन्याय आणि अत्याचार त्यांना सहन झाला नाही.

त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढा देण्याचा खूप प्रयत्न केला. पण कंपनीची ताकद जास्त होती आणि रेड्डी ह्यांच्या अखत्यारीत असलेली गावे ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. निझामाने हा प्रदेश सहज ब्रिटिशांच्या ताब्यात देऊन टाकला.

जेव्हा ब्रिटिशांनी लोकांच्या जमिनी हस्तगत करणे सुरु केले, अन्यायकारक कर वसूल करणे सुरु केले, गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार करणे सुरु केले तेव्हा पहिली ठिणगी पडली. नरसिंह रेड्डी ह्या गरीब जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर उभे राहिले.

पण रेड्डी ह्यांनी थेट इंग्रजांना कर देण्यास ठाम नकार दिला. १० जून १८४६ रोजी त्यांनी कोईलकुंतला येथील खजिना लुटला आणि ते कंभमच्या दिशेने निघाले. कंभम हे आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात आहे. वाटेत रुद्रवरम येथे त्यांनी एका वन अधिकाऱ्याला ठार केले.

ब्रिटिशांच्या राज्यात त्यांच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर प्रकार होता. त्यामुळे तेव्हा त्या भागात कलेक्टर असलेल्या थॉमस मॉंरोने रेड्डी ह्यांच्या अटकेचे आदेश दिले.

ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्यावर पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवले. आणि जो कुणी त्यांचे शीर आणून देईल, त्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली.

 

Wirally.com

रेड्डी ह्यांनी २३ जुलै १८४६ रोजी त्यांच्या सैन्यासह गिड्डालुरू येथे असलेल्या इंग्रजांच्या छावणीवर हल्ला केला. रेड्डी ह्यांच्याकडे पाच हजाराचे सैन्य होते आणि ब्रिटिशांची तुकडी लहान होती.

त्या घनघोर लढाईत २०० क्रांतिकारक ठार झाले आणि इतर काहींना ब्रिटिशांनी अटक केली. रेड्डी काही इंग्रजांच्या हाती लागत नसल्याने शेवटी इंग्रजांनी रेड्डी ह्यांच्या कुटुंबाला फसवून आपल्या ताब्यात घेतले. त्यांना कडप्पा येथे अटक केली.

जेव्हा रेड्डी ह्यांच्यापर्यंत त्याच्या कुटुंबाच्या अटकेची बातमी पोहोचली तेव्हा ते त्यांच्या कुटुंबाला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी नल्लमाला जंगलात गेले. कुणीतरी गद्दारी करून ब्रिटिशांकडे आधीच रेड्डी ह्यांची बातमी पोहोचवली होती.

ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून रेड्डी नल्लमाला जंगलातून परत कोईलकुंतला प्रदेशात गेले आणि जगन्नाथ कोंडा येथे ते भूमिगत होऊन राहिले.

बराच काळ कोणाच्याही हाती न लागलेले रेड्डी अखेर ६ ऑक्टोबर १८४६ रोजी ब्रिटिशांच्या तावडीत सापडले. तेव्हाही कुणीतरी फितुरी करून रेड्डींच्या लपण्याचे ठिकाण ब्रिटिश सैन्यापर्यंत पोहोचवले होते.

 

cinemapolitics.com

ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी रेड्डींच्या हातात, पायात मोठ्या जड शृंखला घातल्या आणि रक्ताने माखलेल्या कपड्यांत त्यांना कोईलकुंतलाच्या रस्त्यांवरून फिरवले.

ही भारतीयांना दिलेली एक प्रकारची धमकीच होती की जर तुम्ही आमच्या विरोधात उभे राहिलात तर तुमचीही अशीच अवस्था होईल. रेड्डी ह्यांच्यासह त्याच्या ११२ अनुयायांना सुद्धा अशीच अटक करण्यात आली आणि त्यांना पाच ते चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. त्यापैकी बऱ्याच लोकांना अंदमान येथे शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले.

कडप्पाच्या स्पेशल कमिशनरपुढे ही केस लढण्यात आली आणि रेड्डी ह्यांच्यावर बंडखोरी, खून, लूटमारीचे आरोप करण्यात आले. त्यांच्यावरील सगळे आरोप सिद्ध झाले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२२ फेब्रुवारी १८४७ रोजी जवळपासच्या नदीकिनारी त्यांना सर्वांसमक्ष फाशी देण्यात आले. त्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात दहशत कायम राहावी म्हणून रेड्डी ह्यांचे शीर तब्बल तीस वर्षांसाठी म्हणजेच १८४७ ते १८७७ सालापर्यंत किल्ल्याच्या दारावर लोकांना दिसेल असे लावून ठेवले गेले.

लोकांनी कायम दहशतीखाली राहावे आणि परत बंडखोरीचा प्रयत्न करू नये अशी चाल इंग्रजांनी खेळली. ही भारतीय इतिहासातील एक दुर्दैवी घटना आहे.

 

Mirchi9.com

ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी ह्या शूर देशभक्ताला इंग्रजांनी लुटारू, खुनी म्हणून बदनाम केले आणि शेवटी अत्यंत क्रूरपणे त्यांचा जीव घेतला. त्यांना ठार मारल्यावर सुद्धा ब्रिटिश तिथे थांबले नाहीत तर त्यांच्या मृतदेहाची तब्बल ३० वर्षे विटंबना केली.

ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी ह्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या दहा वर्षे आधीच अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला होता. त्यांच्या लढ्याची स्मृती आजही आंध्रप्रदेशातील कोठाकोटा येथील किल्ल्यांच्या अवशेषांच्या रूपाने जिवंत आहे.

आंध्रप्रदेश सरकार रेड्डी ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा पुतळा उभारण्याच्या विचारात आहे तसेच त्यांची कथा एका धड्याच्या रूपाने मुलांना पाठ्यपुस्तकात अभ्यासाला असणार आहे.

रेड्डी ह्यांच्या स्वातंत्र्यउठावाची कथा चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी ह्याची प्रमुख भूमिका असेल आणि सुरेंद्र रेड्डी ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळतील.

ह्या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण सर्वांना विस्मरणात गेलेल्या ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी ह्या भारतमातेच्या शूर सुपुत्राविषयी माहिती होईल. ऊईयलावाडा नरसिंह रेड्डी ह्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version