जगभरात रस्त्यावरील खड्ड्यांवर केले गेलेले ‘हे’ उपाय आपल्या राजकारण्यांना कुणी कळवेल काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दर वर्षी पावसाळा आला की रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. दर वर्षी नवा रस्ता तयार केला तरी बऱ्याच ठिकाणी पावसाळा झाल्यावर रस्त्यांची चाळण झालेली दिसून येते. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडावा इतकी भयानक अवस्था होते.
असे रस्ते असले की हाडे खिळखिळी झालीच म्हणून समजा!
अश्या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे गाडी चालवणाऱ्या माणसाच्या “ड्रायव्हिंग स्किल्सची” आणि त्याच्या मागे बसणाऱ्या प्रवाश्याच्या संयमाची कसोटी लागते.
अश्या रस्त्यांवर नियमित प्रवास केला तर पाठीचे, मानेचे दुखणे मागे लागणार हे सांगायला कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. प्रवासात सतत धक्के आणि झटके बसल्यावर हाडांना त्रास होणारच!
बाहेरच्या देशात जाऊन आलेला माणूस तिथल्या शिस्तीचे, स्वच्छतेचे कौतुक करतोच पण त्याला पदोपती तिथल्या गुळगुळीत रस्त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे असे रस्ते बनवायला काय हरकत आहे?
इतका टोल घेतात, टॅक्स घेतात मग साधे रस्ते सुद्धा नीट का बनवत नाहीत, दर वर्षी रस्ते दुरुस्ती होऊन सुद्धा रस्त्यांची चाळण का होते? दर वर्षी खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन माणसे जायबंदी होतात, जखमी होतात, कित्येकांचे तर अकाली जीव देखील जातात.
आपल्या देशात सगळ्यात स्वस्त काय असेल तर तो म्हणजे माणसाचा जीव! नुसते कायदे कडक करून, भरमसाठ दंड वसूल करून रस्तावाहतूक सुधारणार आहे का? आम्ही नियम पाळूच पण तुम्ही अपघात होणार नाही असा गुळगुळीत पक्का रस्ता आम्हाला देणार का?
असे प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला पडतात ज्याला रोज खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. ज्या प्रकारचे रस्ते बाहेरच्या देशांत आहेत, त्या प्रकारचे रस्ते आपल्या देशात का बनू शकत नाहीत? ते लोक जे तंत्रज्ञान वापरतात ते आपल्याकडे का येत नाही?
तिकडे सुद्धा खराब हवामान, पाऊस सगळे असते. पण त्यांचे रस्ते मात्र व्यवस्थित असतात. मग आपल्याकडे असे पक्के टिकाऊ रस्ते का तयार होऊ शकत नाहीत? आपल्या राजकारण्यांपर्यंत हे कुणी पोहोचवू शकेल का?
सध्या तर अमेरिकेत सुद्धा इन्फास्ट्रक्चरचा प्रश्न उभा राहिला आहे. पण तिथे कदाचित लोकांना आणि राजकारण्यांना सुद्धा प्रश्नावर उत्तर शोधण्याची इच्छा आहे. म्हणूनच तिथले शास्त्रज्ञ असे मटेरियल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत की जे स्वतःच स्वतःचे दुरुस्त होऊ शकेल.
इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी ऍस्फाल्ट आणि काँक्रीट ह्या दोन मटेरियल्सची सर्वात जास्त गरज पडते. आणि शास्त्रज्ञ ह्याच दोन मटेरियल्सवर विविध प्रयोग करून एक नवे मटेरियल बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.
रस्त्यांचा पृष्ठभाग तयार करण्यासाठी बहुतांश वेळा ऍस्फाल्ट वापरले जाते कारण ते वापरून रस्ता बांधणे सोपे असते. ऍस्फाल्ट गरम करा ,एकत्र करा आणि ते रस्त्यावर व्यवस्थित पसरा! एकदा ते गार झाले की एक कठीण- टणक पृष्ठभाग तयार होतो.
हा रस्ता सच्छिद्र असतो. कारण ह्या छिद्रांतून आवाज शोषून घेतला जातो आणि ध्वनि प्रदूषण कमी होते. हे ऍस्फाल्टचे फायदे झाले. पण दुसरी बाजू बघितल्यास असे लक्षात येते की ऍस्फाल्ट हे टिकाऊ नाही. त्यामुळे लगेच रस्त्यांना तडे जातात आणि खड्डे तयार होतात.
ह्यामुळे प्रवास कष्टदायक होतो आणि रस्ता खराब असल्यास अर्थातच लोक खड्डे चुकवण्याचा प्रयत्नांत हळू हळू गाडी चालवतात आणि ट्रॅफिक जॅम सुद्धा होतो.
खड्डे चुकवण्याचा नादात कधीतरी बॅलन्स जाऊन जीवघेणे अपघात सुद्धा होतात. रस्ते अपघातांसाठी नियम न पाळणे, अति वेग ह्याबरोबरच खराब रस्ते सुद्धा कारणीभूत आहेत.
नेदरलँड्सच्या डेल्ट युनिव्हर्सिटीत मटेरियल सायंटिस्ट असणाऱ्या एरीक श्लॅन्गन ह्यांच्या मते सेल्फ हीलिंग ऍस्फाल्ट हा ह्या खड्ड्यांच्या समस्येवरील एक उपाय असू शकतो. त्यांनी बनवलेल्या ऍस्फाल्टमध्ये त्यांनी लहान स्टील फायबर्स एकत्र केले आहेत.
त्यामुळे त्यांचे ऍस्फाल्ट कंडक्टिव्ह झाले आहे. जर ह्या ऍस्फाल्टवर मोठ्या इंडक्शन मशीनद्वारे उष्णता सोडली तर ऍस्फाल्ट आणि स्टील फायबर्स मध्ये उष्णता निर्माण होईल आणि लहान लहान भेगा आपोआपच बुजतील.
इंडक्शन मशीन हे एखाद्या मोठ्या चुंबकाप्रमाणे काम करेल. खरं तर हे सूर्याच्या उष्णतेमुळे सुद्धा होऊ शकेल पण बऱ्याच ठिकाणी वातावरणात इतकी उष्णता नसते.
अर्थात ही पद्धत सेल्फ हीलिंग नाही. पण आता जी पद्धत वापरली जाते त्यापेक्षा ही पद्धत कमी वेळखाऊ आणि सोपी आहे. आणि दुरुस्तीसाठी दिवसदिवस रस्ते बंद करून ठेवण्याची गरज पडणार नाही.
सेल्फ हीलिंग ऍस्फाल्टची नेदरलँड्सच्या वेगवेगळ्या १२ रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली. ह्यातील एक रस्ता २०१० पासून लोकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे आणि हे रस्ते अजूनही सुस्थितीत आहेत.
एरीक श्लॅन्गन ह्यांच्या मते साध्या ऍस्फाल्टचे रस्ते सुद्धा सात ते दहा वर्षापर्यंत चांगले टिकतात. त्यामुळे ह्या रस्त्यांची खरी परीक्षा आता येणाऱ्या काळात होईल. येत्या काही वर्षांत साध्या ऍस्फाल्टच्या रस्त्यांत आणि ह्या नव्या प्रकारच्या रस्त्यांत नेमका काय फरक आहे हे पुढे येईल.
एरीक श्लॅन्गन ह्यांनी असेही सांगितले की ह्या नव्या ऍस्फाल्टपासून जर रस्ते तयार केले तर त्याचा खर्च साध्या ऍस्फाल्टच्या रस्त्यांच्या खर्चाच्या २५ टक्के कमी असेल. ह्या रस्त्यांचे आयुष्य साध्या रस्त्यांपेक्षा दुप्पट असेल.
जर ह्याच मटेरियलपासून नेदरलँड्समधील सगळे रस्ते तयार केले तर त्यामुळे नेदरलँड्सचे रस्तादुरुस्ती आणि रस्ता बनवण्यासाठी जे वर्षाचे बजेट आहे त्यातील चक्क नव्वद मिलियन युरो वाचतील. नेदरलँड्सने हा प्रयोग केला आहे ह्याशिवाय चीनमध्येही असे सेल्फ हीलिंग रस्ते बांधण्यात आले आहेत.
एरीक श्लॅन्गन ह्या स्पेशल ऍस्फाल्टबरोबरच आणखी काही पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यांच्या मते ऍस्फाल्टच्या आत जर स्टील फायबर्स असतील तर त्याचा अर्थ असा की तुम्ही त्यात इन्फॉर्मेशन पाठवू शकतात.
त्यामुळे पुढे मागे तुम्ही रस्त्यांवर चालावता चालवताच तुमची इलेक्ट्रिक कार चार्ज करू शकता.अर्थात ह्या सगळ्याला अजून बराच काळ लागेल पण ते ह्याची चाचणी ट्रॅफिक सिग्नल्सवर घेणार आहेत. तिथे सिग्नलवर थांबल्यानंतर कार थोडी चार्ज होऊ शकेल अशी यंत्रणा तिथे येत्या काही काळात तयार होऊ शकेल.
फक्त रस्तेच नाही तर पूल सुद्धा लवकर खराब होतात. हे पूल काँक्रीटचे असतात. काँक्रीट हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या मटेरियल्सपैकी एक आहे आणि ते पर्यावरणासाठी घातक आहे.
जगभरात जे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते त्यापैकी १० टक्के उत्सर्जन काँक्रीटमुळे होते. त्यामुळे काँक्रीट इंडस्ट्रीतील लोक आता पर्यावरणपूरक आणि टिकाऊ काँक्रीट बनवायचा प्रयत्न करीत आहेत.
काँक्रीट हे स्वस्त आहे पण त्याला लवकर भेगा पडतात त्यामुळे आपण त्यात स्टीलचे बार टाकतो. पण जेव्हा काँक्रीटला भेगा पडतात ,त्यात पाणी मुरते आणि आतील स्टील गंजते. त्यामुळे अख्खा पूल किंवा इमारत खराब होते. जुने पूल पडण्याचे हे देखील एक कारण आहे.
आपल्याला जर सेल्फ हीलिंग काँक्रीट तयार करायचे असेल तर आपल्याला असे काहीतरी बनवावे लागेल ज्यामुळे भेगा भरता येतील जेणे करून पाणी आणि क्षार आत जाऊन स्ट्रक्चर खराब होणार नाही.
एरीक श्लॅन्गन असेही सांगतात की सध्या तरी एकच आशादायक उपाय डोळ्यापुढे आहे तो म्हणजे काँक्रीटमध्ये एक खास प्रकारचा बॅक्टेरिया एकत्र करणे. हा बॅक्टेरिया ह्या मिश्रणात राहतील आणि ते कॅल्शियम कार्बोनेट तयार करतील.
ज्यामुळे भेगा पडल्या तरी त्या आपोआप भरल्या जातील. बॅक्टेरिया हे २०० वर्षांपर्यंत राहू शकतात. त्यामुळे श्लॅन्गन ह्यांनी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे की ज्याने हे बॅक्टेरिया काँक्रीटमध्ये मिसळले जाऊ शकतील.
त्यामुळे त्या काँक्रीटच्या स्ट्रक्चरचे आयुष्य कितीतरी जास्त पटींनी वाढेल. तसेच हे बॅक्टेरिया माणसांच्या आरोग्यासाठी अजिबात घातक नाहीत.पण युरोप आणि अमेरिकेत काँक्रीटसाथीचे नियम खूप कडक आहेत त्यामुळे तिथे काँक्रीटची चाचणी होऊ शकत नाही.
जिथे हे नियम फारसे कडक नाहीत त्या देशांत म्हणजे जपान, चीन आणि कोरिया ह्या देशांनी ह्या मटेरियलमध्ये रस घेतला आहे. अमेरिकेत काही शहरांत नागरिकांनी एक ऍप डाऊनलोड करून घेतले आहे.
त्या ऍप द्वारे ते खड्ड्यांची माहिती देऊ शकतात ह्युस्टन ह्या शहरात तर नागरिक पॉटहोल ट्रॅकर ऍप चेक करू शकतात आणि वेबसाईट वर लॉग इन करून ग्राफिक्स आणि चार्ट बघून रस्ता दुरुस्तीबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात.
मिसुरी, कान्सास सिटीमध्ये एका पायलट प्रोजेक्टमध्ये अल्गोरिदम वापरून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे की रस्त्यात नेमके कुठे खड्डे पडू शकतात.
गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सुद्धा असे ऍप्स तयार करत आहेत जे लोक त्यांच्या कारमध्ये वापरू शकतील आणि त्यावरून खड्ड्यांबद्दल माहिती घेऊ शकतील तसेच खराब रस्त्यांबद्दल इतरांनाही माहिती देऊ शकतील.
तर बाहेरच्या देशांत खराब रस्त्यांसाठी अश्या उपाययोजना केल्या जात आहेत. हे आपल्या बाबतीत कधी घडेल? चांगले रस्ते हा जनतेचा अधिकार आहे हे आपल्या राजकारण्यांना हे कोण सांगेल?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.