जगभरात पेट्रोलचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरवलेल्या सौदी वरील ड्रोन हल्ल्याबद्दल जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगातील सर्वात श्रीमंत तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या अरामको ह्या सौदी अरेबियन तेल कंपनीच्या दोन फॅसिलिटी सेंटर्सना शनिवारी सकाळी आग लागल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. अबकॅक आणि खुराईस ह्या ठिकाणच्या फॅसिलिटी सेंटर्समध्ये ही आग लागली होती.
ही आग ड्रोन हल्ल्यामुळे लागल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. शनिवारी पहाटे चार वाजता ह्या कंपनीत गोळीबार झाल्याचे सुद्धा समजले आहे. ह्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी अगदी चोख प्रत्युत्तर दिले.
दहा स्वयंचलित ,हवाई, कॉम्बॅट ड्रोन्सने सौदी अरेबियाच्या अबकॅक प्लांट आणि खुराईस ऑइल फिल्डवर शनिवारी पहाटे ३. ३१ आणि ३.४२ वाजता हल्ला केला. दोन्ही ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे समजते.
मागच्या महिन्यात सुद्धा अरामको ह्या कंपनीच्या नॅचरल गॅस फॅसिलिटीवर सुद्धा हल्ला झाला होता येमेनच्या हूथी ह्या विद्रोही दहशतवादी संघटनेने ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये क्रॉस-बॉर्डर क्षेपणास्त्रांचा वापर करून सौदी अरेबियाच्या एअर बेसवर सुद्धा हल्ला झाला होता. हा हल्ला सुद्धा हूथी ह्या संघटनेनेच घडवून आणला होता. आत्ताचा हल्ला सुद्धा त्यांनीच घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या काही वर्षांत सौदीच्या हवाई हल्ल्यात अनेक येमेनी नागरिक मारले गेले आहेत आणि हूथीने सुद्धा सौदीवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत तसेच लाल समुद्रातील व्हेसल्सना सुद्धा लक्ष्य केले होते.
शनिवारचा हा हल्ला मात्र सौदीच्या ऑइल इन्फास्ट्रक्चरवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे. ह्या आधी पहिल्या आखाती युद्धात सद्दाम हुसैनच्या अखत्यारीत असलेल्या इराणने १९९० साली सौदीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून आखाती प्रदेशात तणावाचे वातावरण पसरले आहे. आखाती देशच जगाला तेल पुरवठा करण्यात अग्रेसर असल्याने तिथे तणावसदृश परिस्थिती उद्भवली की त्याचा थेट परिणाम इंधनाच्या पुरवठ्यावर होतो आणि जगात सगळीकडे इंधनाच्या किमतीचा भडका उडतो.
शनिवारी झालेल्या ह्या हल्ल्यामुळे सुद्धा जगातील इंधनाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. ह्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर ह्या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
इराणने मात्र अमेरिकेच्या ह्या आरोपाचे खंडन केले आहे व आपला ह्या हल्ल्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.
ह्या ड्रोन हल्ल्यामुळे अरामको कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. रोजच्या क्रूड उत्पादनापैकी क्रूड तेलाचे ५.७ दशलक्ष बॅरेल्स नष्ट झाले आहेत आणि कंपनीचे नुकसान झाल्याने ५० टक्के तेल उत्पादन सध्या जवळजवळ बंद झाले आहे.
अरामाको कंपनीचे खुराईस आणि अबकॅक ऑइल फिल्ड हे जगातील सर्वात मोठ्या इंधन प्रक्रिया केंद्रांपैकी दोन केंद्रे आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्याने जगातील रोजच्या एकूण तेल उत्पादनात पाच टक्के घट झाली आहे. ह्यामुळे क्रूड तेलाच्या किमतीवर परिणाम नसता झाला तरच नवल!
हा हल्ला झाल्यानंतर तेलाच्या उत्पादनात घट झाली आणि लगेच ब्रेंट क्रूडची किंमत ६६ . २८ प्रति बॅरेल इतकी वाढली. म्हणजेच जवळजवळ दहा टक्क्यांनी किमतीत वाढ झाली.
ह्या हल्ल्याचा परिणाम फक्त तेलाच्या उत्पादनावर आणि किमतीवरच नव्हे तर जगातील आर्थिक मार्केटवर सुद्धा झाला आहे. सोने, येन आणि कोषागारावर सुद्धा ह्या हल्ल्यामुळे परिणाम झालेला दिसला.
कमोडिटीशी निगडित चलन म्हणेजच नॉर्वेजियन क्रोन आणि कॅनडियन डॉलर ह्यांच्या किमतीत वाढ झाली. तसेच एशियन ट्रेडिंगमध्ये यूएस गॅसोलीन फ्युचरच्या किमतीत १३ टक्के वाढ झाली आणि वेस्ट टेक्ससची किंमत ५९.७५ डॉलर्स इतकी वाढली.
ही वाढ जवळजवळ ८.९ टक्के इतकी आहे. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी अमेरिकेतील राखीव इंधन खुले करण्याची घोषणा केली तेव्हा ह्या किमतीत थोडी घट झाली.
डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी त्यांच्या ट्विट मधून असेही सुचवले की ह्या हल्ल्याचे उत्तर द्यायला अमेरिकेचे सैन्य तयार आहे आणि त्यांची युद्धासाठी सुद्धा जय्यत तयारी आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमधून इराणला लक्ष्य केले आहे.
त्यामुळे साहजिकच इराणचे लोक संतापले आहेत. इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मौसवी ह्यांनी त्यावर असे उत्तर दिले आहे की ,”असे आंधळे आरोप निष्फळ आहेत. त्यांनी केलेली टिप्पणी सुद्धा अगदी अर्थहीन आणि न समजण्यासारखी आहे.
हे आरोप केवळ इराणची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि आमच्या इस्लामिक रिपब्लिकवर पुढे केल्या जाऊ शकणाऱ्या कारवाईकडे लक्ष वेधण्यासाठी इशारा म्हणून केले आहेत. ”
इराण व अमेरिकेमधून सध्या विस्तव जात नाही असे चित्र दिसते आहे. हे दोघे एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी इराणशी २०१५च्या आण्विक करारातून माघार घेतली होती.
आता पुढे काय ह्या प्रश्नाचे उत्तर देताना सौदी अरेबियाचे राजपुत्र अब्दुलअझीझ बिन सलमान म्हणाले की तेलाच्या उत्पादनात जी घट निर्माण झाली त्याची भरपाई सौदी अरेबिया त्यांच्याकडील असलेल्या मोठ्या साठ्यातून करण्याचा प्रयत्न करेल.
हा तेलसाठा १९८८ ते २००९ ह्या काळात तयार करण्यात आला होता आणि आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठीच त्याची निर्मिती करण्यात आली होती. सौदी अरेबियात असे पाच मोठे भूमिगत साठे तयार करण्यात आले आहेत.
जगात सगळीकडेच ह्या हल्ल्यामुळे तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. भारत हा सौदी अरेबियाकडून सर्वाधिक तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
भारताला क्रूड तेल आणि नैसर्गिक गॅस निर्यात करणारा सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. ह्या परिस्थितीत जर आखाती देशांत तणावसदृश परिस्थिती उद्भवली तर आपल्याला काळजी करण्यासारखेच कारण आहे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होणार आहे.
तेलाच्या किमती वाढल्या तर आपली अर्थव्यवस्था ढासळू शकते. त्यामुळे स्टॉक्स आणि रुपयाची सुद्धा घसरण होऊ शकते. तेलाची किंमत एक डॉलरने जरी वाढली ती आपल्यासाठी वर्षाला १०७०० कोटी रुपयांनी महाग होऊ शकते. त्यामुळे ह्यावर आपल्याला लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.