आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारताचा सर्वात मोठा प्रकल्प चांद्रयान-२ सर्वाधिक शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क-३ च्या सहाय्याने आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून २२ जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते.
कमी खर्चात आणि संपूर्ण भारतीय बनावट असणारी ही मोहीम म्हणजे भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील एक नवे स्वप्न आहे.
या मनुष्यविरहित यानाच्या सहाय्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचण्याचा प्रयत्न करणारा भारत पहिला देश आहे.
भारताच्या या प्रयत्नातील चंद्रयान-२ हा पहिलाच महत्वाकांक्षी प्रकल्प होता. इतका मोठा प्रकल्प आखण्यासाठी त्यामागे अनेक हात अविरतपणे आणि अचल निष्ठेने कार्यरत असतात.
कोणताही मोठा प्रकल्प साकारणे आणि तो यशस्वी करून दाखवणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही त्यासाठी समर्पणाची भावना ठेवून काम करणारी सहकार्यांची एक टीम असावी लागते.
जाणून घेऊया इस्रोच्या अशाच टीमची माहिती ज्यांनी चांद्रयान-२ मोहीम यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाट उचलला. या टीम मधल्या प्रत्येकाने काही महत्वाची जबाबदारी पेलली ज्यामुळे आज देशाला इस्रोचा अभिमान वाटतो आहे.
चांद्रयान-२ मोहीमेचा संपूर्ण उद्देश अजून सफल झाला नसला किंवा ही मोहीम १००% यशस्वी ठरली नसली तरी, या शास्त्रज्ञांनी हार मानलेली नाही. अजूनही ते ही मोहीम कशी यशस्वी होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत.
चंद्रावरील खनिज संपत्तीचा शोध घेणे, मानवीवस्तीच्या शक्यतेचा आढावा घेणे आणि भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही रॉकेट आणि क्रायोजेनिक इंजिनच्या क्षमतेची चाचणी घेणे असे प्रमुख उद्देश या प्रकल्पामागे आहेत.
या प्रकल्पातील रोव्हर एक पूर्ण चांद्र-दिवासाच्या कालावधीसाठी चंद्राच्या पृष्ठभागाची पाहणी करेल आणि त्याची माहिती इस्रोला पाठवेल.
७ सप्टेंबरच्या भल्या पहाटे संपूर्ण भारत आपला श्वास रोखून चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची आतुरतेने वाट पहात होता.
परंतु, लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त २.१ किमी अंतरावर असताना इस्रोचा त्याच्याशी असणारा संपर्क तुटला.
विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क साधण्यात यश मिळेल. सध्या चांद्रयान-२चे ऑर्बीटर चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेचा ५% भाग अयशस्वी झाला असला तरी, यावेळी संपूर्ण देश इस्रोसोबत उभा राहिला.
संपूर्ण देशाने इस्रोवरील विश्वास दाखवून दिला आणि ही मोहीम यशस्वी करून दाखवल्याबद्दल जल्लोषही केला.
अर्थातच हे मिशन यशस्वी होण्यात इस्रोतील शास्त्रज्ञांच्या आणि इंजिनियर्सच्या सातत्यपूर्ण आणि अविश्रांत परीशामाचा वाटा मोठा आहे.
या सर्वांनी मिळून कित्येक वर्षे सातत्याने या मोहिमेचा पाठलाग करत आहेत म्हणूनच आपण, चांद्रयान-२ मोहिमेचा असा कौतुक सोहळा साजरा करू शकलो.
देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात चार चांद लावणाऱ्या इस्रोच्या टीममधील ज्यांनी चांद्रयान-२ च्या यशात सिंहाचा वाटा उचललाय जाणून घेऊया अशा ऑल राउंडर खेळाडूं विषयी!
मैयलस्वामी अन्नादुराई
अन्नादुराई, यांना “मून मॅन” या टोपण नावाने देखील ओळखले जाते. यापूर्वी त्यांना देशाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
१९८२ मध्ये ते इस्रोमध्ये दाखला झाले. चांद्रयान-१ च्या मोहिमेचे देखील त्यांनी प्रोग्रॅम डायरेक्टरहोते.
इस्रोच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक उपग्रहांच्या प्रक्षेपण मोहिमेत देखील त्यांनी मिशन डायरेक्टर होते. तामिळनाडू राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे ते अध्यक्ष देखील आहेत. चांद्रयान-२ मोहिमेत अन्नादुराई यांनी देखील आपले अनमोल योगदान दिले आहे.
रितू करीधाल
रितू करीधाल, यांना देशाची रॉकेट वूमन म्हणून देखील संबोधले जाते. चांद्रयान-२ मोहिमेत त्यांनी मिशन डायरेक्टरची भूमिका सांभाळली. नोव्हेंबर १९९७ मध्ये त्यांनी यंग इंजिनियर म्हणून त्या इस्रोमध्ये दाखल झाल्या.
करीधाल यांना २००७ सालचा इस्रो यंग सायंटिस्ट अवार्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे. मार्स ऑर्बीटर मिशनच्या त्या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर देखील आहेत.
चांद्रयान-२ मोहिमेत या देशाच्या रॉकेट वूमनने देखील आपले योगदान दिले आहे. रितू किरीधल यांनी बेंगळूरूच्या आयआयएससी या संस्थेतून एरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.
मुथ्थया वनिता
मुथ्थया वनिता या इस्रोमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला इंजिनियर आहेत. इस्रोसोबतच्या ३२ वर्षांच्य प्रवासात वनिता यांच्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याच्या अद्भुत कौशल्याबाबत त्यांचे खूप कौतुक होते.
म्हणूनच एम. अन्नादुराई यांनी त्यांच्यावर चांद्रयान-२ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवली.
अस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना २००६ साली बेस्ट वूमन सायंटीस्ट या अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
चांद्रयान-२ चे पृथ्वीवरून यशस्वी प्रक्षेपण होण्यापासून ते हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पोचेपर्यंत या मोहिमेची सर्व जबाबदारी वनिता यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
चंद्रकांत कुमार
चंद्रकांत कुमार यांच्यावर चांद्रयान-२ च्या आरइफ सिस्टीमच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्टर जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
चंद्रकांत २००१ मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले होते. सध्या ते यु. आर. राव स्पेस सेंटरच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक विभागाचे प्रमुख आहेत.
चंद्रकांत यांनी चांद्रयान-१ च्या मोहिमेत देखील अँटिना सिस्टिमचे, प्रोजेक्ट डायरेक्टर होते.
अमिताभ सिंग
अमिताभ सिंग हे चांद्रयान-२चे डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. चांद्रयान-२ चे लँडर आणि रोव्हरशी संबधित ऑप्टिकल पेलोड डाटा प्रोसेसिंग आणि ऑन बोर्ड अल्गोरिदम यांची माहिती घेण्याचे काम अमिताभ यांच्यावर सोपवण्यात आले आहे.
ते रिमोट सेन्सिंग, सॅटेलाईट फोटोग्रॅमेट्री या क्षेत्रातील संशोधक आहेत. २००२ मध्ये अमिताभ इस्रो मध्ये दाखल झाले.
भारताला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात एका नवीन उंचीवर घेऊन जाणाऱ्या या सर्व संशोधकांचे खरे तर मनापासून आभार मानायला हवेत.
उपग्रह प्रक्षेपण, मंगळयान मोहीम अशा पूर्वीच्या अंतराळ संशोधन मोहिमेतही या सर्वांनी आपापल्या परीने भरीव योगदान दिले आहे.
यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच चांद्रयान-२ सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प आज यशस्वी होऊ शकला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.