आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आंततराष्ट्रीय राजकारणाचा सामान्य माणसावर प्रत्यक्षपणे परिणाम होत नाही असं आपलं ठाम मत असतं.
दोन देशांमधील संबंध, वाद हे विषय केवळ चर्चेपुरते मर्यादित रहात असले तरी आपल्या दररोजच्या आयुष्यात त्यात फार काही बदल होत नाही.
मात्र एका अंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसाद केवळ आजचं नव्हे तर यापुढील कित्येक भारतीयांवर होतील यात शंका नाही.
पब्जीवर बंदी घालण्यात आल्यानंतर त्याबाबतच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी त्याबाबतचे दुरगामी परिणाम लक्षात घेतल्यानंतर भारताच्या भविष्यासाठी ही घटना किती महत्वाची आहे याचीही प्रचिती येईल.
आधी टिकटॉक आणि आता पब्जी… नेटेक-यांना एकामागोमाग एक जबरदस्त धक्के बसले आहेत या बॅनमुळे!!
अगदी विद्यार्थी वर्गापासून ते नोकरदारांपर्यंत अनेक मंडळी या अँप्सचा वापर करत असत. पण अशा अँप्सच्या वापराचा मानसिकतेवर कसा परिणाम होतो याचा विचार होणे सुद्धा आवश्यक आहे.
पूर्वी घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली, तर ही गोष्ट लक्षात येते. विडिओ गेम्सच्या आहारी गेल्यामुळे चुकीची पावलं उचलली जाण्याच्या घटना नवीन नाहीत. आपल्या आवडीचं ऍप बॅन होणं, त्यामुळे झालेलं दुःख ही गोष्ट साहजिक आहे. पण, तुम्हाला वाईट वाटलं असलं तरी या अँप्समुळे झालेलं गंभीर परिणाम एकदा जाणून घ्या.
पबजी बॅन झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी यामुळे घडू शकतात, हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल.
एकटेपणा, घरातील आणि शाळा-कॉलेजातील ताणतणाव यातून थोडा विरंगुळा म्हणून मुले व्हिडीओ गेमचा मार्ग स्वीकारतात. ‘बाहेर उनाडक्या करण्यापेक्षा घरी बसतोय ना, मग असुदे!’ असा विचार करून आपणही मुलांना यापासून रोखणे टाळतो.
पण, व्हिडीओ गेम्स खेळण्याची मुलांची ही सवय, पुढे जाऊन तुमच्यासाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना? हे वेळीच ओळखा.
व्हिडीओ गेम्सचे अनेक प्रकार असतात. गेम्स खेळण्याच्या सवयीचे रुपांतर, हळूहळू व्यसनात होऊ शकते.
इतर व्यसनांप्रमाणेच या व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्तीदेखील, वास्तव जगाचे भान हरपून बसते. सतत गेम खेळण्याचे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात.
अलीकडेच पब्जी हा व्हिडीओ गेम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्थातच त्याच्याशी निगडीत नकारात्मक घटनांमुळेच!
पब्जी खेळण्यास वडिलांचा विरोध होता, म्हणून कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाने वडिलांचीच हत्या केली.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका मुलाने, १९ वर्षीय भावाची हत्या केली.
पबजी खेळण्यासाठी, भावाने मोबाईल दिला नाही, हे या हत्येचे कारण होते.
व्हिडीओ गेमच्या आहारी जाऊन, अशाप्रकारचे भयानक कृत्य करणारी, हिंसा करण्यास प्रवृत्त होणारी तरुण मुले नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण, त्यांची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपाय किंवा प्रतिबंध केला असता, तर पुढील अनर्थ निश्चितच टळला असता.
व्हिडीओ गेम्सचे कोणकोणते विपरीत परिणाम होऊ शकतात, आणि त्यापासून स्वतःला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला कसे परावृत्त करता येईल, हे समजून घेण्यासाठी संपूर्ण लेख जरूर वाचा.
व्हिडीओ गेम्सचे, शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम जाणवतात. व्यक्तीची बौद्धिक क्षमता, नजर आणि स्मृतीवरदेखील व्हिडीओ गेम्सचे विपरीत परिणाम होतात.
अतिप्रमाणात व्हिडीओ गेम्स खेळल्याने मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील पेशींना इजा पोहोचू शकते. यामुळे निद्रानाशासारखी गंभीर समस्या उद्भवू शकते.
मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागाला इजा पोहोचलयास अल्झायमर्स किंवा तीव्र डिप्रेशन असे मानसिक आजार होण्याची दाट शक्यता असते.
मुलांच्या वर्तणुकीवरदेखील व्हिडीओ गेम्सचे दुष्परिणाम दिसून येतात. सातत्याने आक्रमक गेम खेळणाऱ्या मुलांचे वागणे देखील आक्रमक होत जाते. त्यांच्या मनात, इतरांबद्दल असणारी सहानुभूतीची भावना कमी होते.
असे गेम्स खेळल्याने मुलांमधील संवेदना पूर्णतः नाहीशा होतात. त्यामुळे ही मुले अनेकदा स्वतःला किंवा इतरांना इजा पोचवण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत.
दिवसातून केवळ एक तास, किंवा त्यापेक्षा कमी वेळ व्हिडीओ गेम्स खेळल्यास त्याचे फार दुष्परिणाम जाणवत नाहीत. पण, जर तुमचे मुल एका तासापेक्षा अधिक काळ, व्हिडीओ गेम खेळण्यात घालवत असेल, तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे.
सलग दोन-तीन तास व्हिडीओ गेम खेळत राहिल्याने आरोग्याच्या इतर समस्या तर निर्माण होतातच, पण याचा सर्वात जास्त परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो.
दोन-तीन तास व्हिडीओ गेम खेळत राहिल्याने, डोळे दुखणे, एकाच ठिकाणी नजर स्थिर न राहणे आणि तीव्र डोकेदुखी असा त्रास उद्भवू शकतो.
व्हायोलंट व्हिडीओ गेम खेळत राहणाऱ्या मुलांमध्ये तणावाचे प्रमाण वाढते, असे अभ्यासांती सिध्द झाले आहे. कोणत्याही तणावपूर्व स्थितीत “लढा किंवा पळा” अशी साधारण प्रतिक्रिया असते.
परंतु, काही गेम्समध्ये, ना लढता येतं ना पळता येतं; अशावेळी तणाव वाढतो, याचा परिणाम आरोग्यावर आणि मानसिकतेवर देखील होतो.
सातत्याने अशा तणावपूर्ण मानसिकतेत राहिल्याने वर्तणुकीत देखील बदल होतो. व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलांमध्ये आक्रमकता वाढते. अशी मुले सतत भीती किंवा काळजीच्या सावटाखाली वावरत असतात.
व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलांना रात्रीची शांत झोप मिळणे देखील कठीण होऊन जाते. या गेम्सचा परिणाम त्यांच्या झोपेच्या सवयींवर सुद्धा होतो. रात्री झोपण्यापूर्वी जर मुलांनी गेम खेळला तर, त्यांना गाढ झोप लागत नाही.
यातूनच पुढे निद्रानाशासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
दारू किंवा अमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणेच, हे व्हिडीओ गेम्सचे व्यसन, त्या व्यक्तीप्रमाणेच तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींसाठी देखील घातक ठरू शकते.
या लोकांना सतत आभासी जगात वावरण्याची सवय लागते. अशी मंडळी, वास्तव जीवनापासून दूर राहण्याचा किंवा वास्तवातील प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतात.
व्हिडीओ गेम्सचे व्यसन लागले असेल तर सतत थकवा जाणवणे, स्वतःच्या आरोग्याची, वैयक्तिक स्वच्छतेची पर्वा नसणे, सतत उद्भवणारी डोकेदुखी, सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे, हे परिणाम दिसून येतात.
ही काही सामान्यतः आढळून येणारी लक्षणे आहेत. अर्थात वेगळ्यावेगळ्या गेमर्समध्ये वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. शारीरिकच नाही, तर मानसिक लक्षणांकडे सुद्धा लक्ष ठेवणे आवश्यक ठरते.
गेम खेळायला न मिळाल्याने राग येतो किंवा नैराश्य येते. मन सतत व्हिडीओ गेमवर केंद्रित झाल्यामुळे, अभ्यास किंवा इतर काम करण्यात एकाग्रता राहत नाही.
खेळण्यासाठी भरपूर वेळ मिळावा, याकरिता काही ना काही कारण सांगून घराबाहेर जायचे टाळणे, अशी लक्षणे या मुलांमध्ये दिसून येतात.
यामुळे त्या व्यक्तीचा इतर नातेवाईकांशी असणारा संपर्क तुटतो किंवा नात्यामध्ये कटुता निर्माण होते. याचा परिणाम म्हणून, ती व्यक्ती पुन्हा व्हिडीओ गेमकडे ओढली जाते. इतर व्यसनांप्रमाणेच या व्यसनाचेही दुष्टचक्र निर्माण होते.
तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये, अशाप्रकारची लक्षणे आढळत असतील तर, यावर वेळीच उपाय करून त्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढणे आवश्यक आहे.
इतर व्यसनांवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र, या व्यसनावर कोणताही औषधोपचार उपलब्ध नाही.
यावरील उपाय म्हणून, कॉग्निटीव्ह बिहेविअरल थेरपी उपयोगी पडते. या उपचार पद्धतीनुसार, व्यक्तीला पहिल्यांदा, ‘तो एक प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जात आहे’ याची जाणीव करून दिली जाते.
यातून बाहेर पडणे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.
आभासी जगापासून आपले लक्ष विचलित करून, वास्तव जगात ते कसे रमेल यासाठी या व्यक्तीला स्वतःच प्रयत्न करावे लागतात. अशी व्यक्ती, मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य किंवा समुपदेशकांची मदत घेऊ शकते.
सुरुवातीला हे थोडे अशक्य वाटले तरी, हळूहळू टप्प्याटप्प्याने खेळासाठी दिला जाणारा कमी करणे शक्य होऊ लागते. त्याऐवजी स्वतःला दुसऱ्या एखाद्या कामात गुंतवून ठेवता येऊ शकते.
व्हिडीओ गेमकडे वळणारी आपल्या मुलाची पावले, नेमक्या कुठल्या दिशेला जात आहेत हे वेळीच ओळखा. पुढील संभाव्य धोक्यापासून स्वतःला आणि आपल्या मुलाला देखील वाचवण्याची हीच योग्य वेळ आहे…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.