' पोर्तुगिजांचे भारतीय जनतेवरील धार्मिक अत्याचार; काळाकुट्ट,अमानुष इतिहास! – InMarathi

पोर्तुगिजांचे भारतीय जनतेवरील धार्मिक अत्याचार; काळाकुट्ट,अमानुष इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल आपण इतिहासाच्या पाठयपुस्तकांमधून वाचलंय. पण, पोर्तुगीजांनी गोव्यातल्या हिंदूंवर केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला फार माहित नाही.

जवळजवळ ३०० वर्ष (सोळाव्या शतकाच्या मध्यापासून) पोर्तुगीज “चौकशी” अधिकार्याने हिंदू आणि मुस्लिम धर्मियांवर जे जुलूम केले ते थोडक्यात या लेखात मांडण्यात आलेले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पोर्तुगीजांनी गोव्यात स्थापना केलेलं चौकशी कार्यालय हे फक्त गोव्याचंच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातल्या त्यांच्या साम्राज्याचं काम करत असे.

 

Goa Inquisition inmarathi

 

त्याची स्थापना १५६० साली करण्यात आली. कॅथलिक पंथ वाढावा ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यालयाने मात्र भारतीय हिंदू आणि कॅथलिक यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे, त्यांच्या जमिनी हडप करणे, संपत्ती कार्यालयाच्या नावावर करणे अशी कामे केली.

समकालीन व आजच्या घडीच्या सर्व इतिहासकारांनी ह्या पोर्तुगीज कार्यालयाला “सर्वात क्रूर” म्हणून संबोधले आहे.

ह्या चौकशी कार्यालयाची स्थापना एक न्यायालय म्हणून करण्यात आली होती. पोर्तुगालहून पाठवलेला एक जज आणि त्याचे दोन गुंड असे ते कोर्ट होते.

जज फक्त लिस्बनचे (पोर्तुगालची राजधानी) ऐकत असे आणि त्याला वाटेल तसा न्यायनिवाडा करत असे. चौकशी नियम हे २३० पानांचे होते. जेथे ह्या “न्यायालयीन” सुनावण्या चालत त्या महालाला “बिग हाऊस” असे म्हणत.

ह्या सगळ्या सुनावण्या बंद खोलीत चालत. असे असले तरी आतल्या आरोपींच्या आर्त हाका, किंचाळ्या, आरोळ्या, विव्हळणे बाहेर रस्त्यावर ऐकू येत असे.

 

Goa Inquisition inmarathi

 

रात्रीच्या भयाण शांततेत हे आवाज ऐकणे असह्य होत असे. आरोपींना त्यांच्या नातेवाइकांसमोर टॉर्चर केले जात असे. आरोपींच्या पापण्या, हातपाय अत्यंत “काळजीपूर्वक” कापण्यात येत असत. फक्त धड आणि डोकं शिल्लक राहिलं तरी माणूस जिवंत राहत असे.

डियागो दे बोर्डा (एक प्रिस्ट) त्याचा सल्लागार व्हीकर जनरल, मिगुएल व्हाज ह्यांनी हिंदूंना टॉर्चर करण्यासाठी ४१ मुद्द्यांचा एक आराखडा तयार केला होता. ह्याच प्लॅनच्या अंतर्गत व्हाइसरॉय अंटानो दे नोरोन्हा ह्याने १५६६ साली एक आदेश काढला होता –

“मी असा आदेश देतो कि कुठल्याही भागात जो माझ्या मालकाच्या हक्काचा आहे तेथे हिंदू मंदिर बांधण्यात येऊ नये. आधीच बांधलेल्या मंदिरांची माझ्या परवानगीशिवाय डागडुजी करू नये.”

“ह्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास अशी मंदिरे तोडण्यात येतील आणि त्यातील सर्व वस्तू ह्या पवित्र कार्यासाठी वापरण्यात येतील (चर्चच्या कामांसाठी).”

१५६७ मध्ये बार्डेझ ह्या गोव्यातल्या भागात जवळजवळ ३०० मंदिरे तोडण्यात आली.

४ डिसेंबर १५६७ पासून हिंदू विवाह, यज्ञोपवित परिधान करणे आणि अंतिमसंस्कार यांविषयी जाचक कायदे कारणात आले. १५ वर्षांवरील सर्वांना ख्रिस्ती शिकवण ऐकण्यासंबंधी सक्ती करण्यात आली. तसे न केल्यास त्यांना शिक्षा करण्यात येत असे.

१५८३ साली असोलना व कंकोलिम येथील मंदिरे सैनिकी कारवाईने तोडण्यात आली. १८१२मध्ये जेव्हा कार्यालय बंद करण्यात आले त्यावेळी ह्या कृत्त्यांचे रेकॉर्डस् नष्ट करण्यात आले.

त्यामुळे एकूणच पीडितांचा आकडा सांगणे कठीण होऊन बसले आहे.

 

GOA inquisition inmarathi

हे ही वाचा – ७२ तासात तब्बल चार हजार लोकांचा बळी घेणारी भारताच्या इतिहासातील अज्ञात दंगल

उपलब्ध असलेल्या नोंदींवरून एच. पी. सोलोमन आणि आय.एस.डी. ससून यांनी १५६१-१७७४ दरम्यान १६,२०२ लोकांवर खटले चालले असं सांगितलंय.

ह्या १६२०२ पैकी ५७ जणांना सरळ मृत्युदंड ठोठावण्यात आला होता, ६४ लोकांना जाळण्यात आले होते. इतरांना काहीशा सौम्य शिक्षा करण्यात आल्या होत्या पण नक्की काय ह्याचा पत्ता कुणालाच नाही.

युरोपात गोव्यातल्या ह्या चौकशी कार्यालयाचे कारनामे कुप्रसिद्ध होऊ लागले. फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेअर म्हणतो –

“पोर्तुगीझ monks (भाषांतर आपल्याला समजावे म्हणून “संन्यासी” असे करू शकतो) यांनी भारतीय लोक सैतानाला पूजतात असा चुकीचा समज पसरवला आहे. मुळात हेच monk लोक सैतानाचे नोकर आहेत.”

डॉ. टी. आर. डिसुझा (एक ख्रिस्ती इतिहासकार) यांच्या मते –

“१५४० नंतर गोव्यातील सर्वच मंदिरे आणि त्यातील मुर्त्या नष्ट करण्यात आल्या होत्या आणि त्या मंदिरांच्या जागी चर्च, चॅपेल उभारण्यात आले होते. हिंदू पंडितांना गोव्यातून बाहेर काढण्यात आले.

हिंदू अनाथांना सांभाळण्याची जबाबदारी पोर्तुगीज सरकारने उचलली. हिंदूंना नोकऱ्या देण्याचे नाकारण्यात आले. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेण्यात येत असे.

आणि हिंदू असलेल्यांना बळजबरी ख्रिस्ती ‘सत्संग’ ऐकवण्यात येत असे.”

 

Goa Inquisition inmarathi

 

सामूहिक बॅप्टिसम (ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा विधी) हे जेझुइट आणि फ्रांसिसी यांनी सुरु केले. हे जेझुइट लोक काही निग्रो लोकांसोबत हिंदू वस्तीत जात असत. त्यांना गाईचे मास बळजबरी खाऊ घालत असत.

असे लोक नंतर हिंदूंसाठी “अस्पृश्य” होऊन जात असत. मग त्यांच्यापुढे ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय उरत नसे.

हिंदूंच्या पुढील धार्मिक कार्यांवर बंदी घालण्यात आली

लग्नकार्य : –

भारतीय – हिंदू संगीतात वापरण्यात येणारी वाद्ये वाजवू नयेत. लग्नातील देवाणघेवाण करतांना वधू – वर यांचे नातेवाईक हजर राहू नयेत. लग्नात विड्याचे पान सार्वजनिकरित्या व वैयक्तिकरित्या वाटण्यात येऊ नये.

फुले; तळलेल्या पुऱ्या, विड्याचे पान, सुपारी इत्यादी वस्तू वधू – वर यांच्या घरी पाठवू नये, कुलदेवतेचा गोत्रासंबंधीचा विधी करू नये. लग्नाच्या आदल्या दिवशी कुठल्याही प्रकारचे जेवण बनवू नये. मंडप टाकण्यात येऊ नयेत. वधूचे कुठल्याही प्रकारे स्वागत करण्यात येऊ नये. वधू आणि वर यांनी मंडपात बसू आलेल्यांचे आशीर्वाद घेऊ नयेत.

उपास, व्रतवैकल्ये आणि इतर विधी :-

गरिबांना सार्वजनिकरित्या भोजन देऊ नये आणि पितरांसाठी तर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी उपवास करू नये. उपवास ख्रिस्ती नियमांनुसार करता येऊ शकतो, मृत्यूनंतर बाराव्या दिवशी कुठलेही विधी करू नये तसेच पौर्णिमा – अमावस्या यादिवशी सुद्धा कुठलेही विधी करू नयेत. चंद्रग्रहणाच्या दिवशी कुठलाही उपास करू नये.

रुढींसंबंधी : –

हिंदू पुरुषांनी धोतर आणि स्त्रियांनी चोळी परिधान करू नये, तुळशीचे रोप घरात, अंगणात, बागेत लावू नये.

 

inqusition-victims GOA inmarathi


१५६७च्या कायदयानुसार अनाथांचे अपहरण केले जाई आणि त्यांचे धर्मांतर केले जाई.

२२ सप्टेंबर १५७० रोजी पुढील आदेश काढण्यात आला – धर्मांतर केलेल्या हिंदूंना जमिनीसंबंधीचा कर १५ वर्षांसाठी माफ करण्यात येईल, हिंदू नावे आणि आडनावे कुणीही ठेऊ नये.

चर्चच्या फादरनी हिंदूंना त्यांचे धर्मशास्त्र वाचण्यास सक्त मनाई केली असे ससेटी म्हणतो,  ज्याचे भारतात १५७८ – १५८८ दरम्यान वास्तव्य होते.

१६८४साली कोकणी भाषेवर बंदी आणण्याचा आदेश काढण्यात आला. पोर्तुगीज हि भाषा सक्तीची करण्यात आली. इतर धर्मियांचे सर्व चिन्हे नष्ट करण्यात आली आणि सर्व पुस्तके हि पोर्तुगीज भाषेत छापण्याची सक्ती करण्यात आली.

गोव्याची चौकशी समिती हि पवित्र मानण्यात येत असे. ह्या समितीतल्या अधिकाऱ्यांना विरोध करणाऱ्या स्त्रियांवर पाशवी लैंगिक अत्त्याचार करण्यात येत असत आणि नंतर त्यांना जिवंत जाळण्यात येत असे.

एक फ्रेंच प्रवासी ज्याचे नाव दिलोन असे होते, तो ह्या सर्व अत्याचाराचा प्रत्यक्षदर्शी होता. त्याने १६८७ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात ह्या ख्रिस्ती प्रिस्ट लोकांचे अत्त्याचार नमूद करून ठेवले आहेत.

त्याला ज्यावेळी तुरुंगात डांबण्यात आले त्यावेळी त्याने इतर कैद्यांच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या. त्या कैद्यांना धारदार वस्तूंनी टॉर्चर करण्यात येत असे.

 

Goa Inquisition inmarathi

 

हे असले अत्त्याचार २०० वर्ष सुरु होते. किती हजार लोकांना ह्या अमानुष अत्त्याचाराला तोंड द्यावे लागले असेल हे देवालाच ठाऊक.

१८१२ साली ब्रिटिशांनी गोव्याचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. पोर्तुगीझांची ताकद कमी होत होती. गोव्यातील ग्रँड इन्क्वीसिटरचा महाल नंतर नष्ट करण्यात आला कारण त्यांच्या महान “संत” फ्रान्सिस एक्सझेवियर याने केलेल्या राक्षसी कृत्त्यांचा तो एक पुरावा होता.

डॉ. त्रस्ता ब्रेगान्का कुन्हा म्हणतात –

“इतिहास कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी सत्य लपून राहत नाही. गोव्यातील धर्मांतर हे धार्मिक शिकवणुकीतून न होता हे अमानुष पद्धतीने केले गेले होते. ह्यामुळे इथल्या लोकांचे चारित्र्य आणि त्यांची ओळखच संपून गेली. जर पुरावाच हवा असेल तर कायद्याची पुस्तके, त्यावेळचे आदेश, अहवाल आणि ख्रिस्ती पंथातील कागदपत्रे तपासून बघा.”

सुप्रसिद्ध इतिहासकार निनाद बेडेकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक प्रसंग सांगितलाय.

१६६७ साली जेझुइटांनी एक फतवा काढला. त्यात फक्त कॅथलिक लोक गोव्यात राहतील इतर धर्मीय राहू शकणार नाहीत असे होते.

 

shivaji maharaj inmarathi

 

तेव्हा महाराजांचा मुक्काम गोव्यानजीकच होता. त्यांनी काही कॅथलिक लोकांना अटक केली. त्यात ते पाद्रीदेखील होते ज्यांनी हा फतवा काढला होता. महाराजांनी त्यांच्यासमोर हिंदू होण्याचा प्रस्ताव ठेवला.

त्यांनी तो नाकारल्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. व्हाईसरॉयने घाबरून हा फतवा मागे घेतला. नंतर महाराजांनी त्या भागात १५० लक्ष होनांची लूट केली. आज गोव्यातील ह्या सर्व अत्याचारांबद्दल वाचत असतांना महाराजांनी केलेल्या ह्या कार्याचे समर्थनच करावेसे वाटते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – कॅथलिक चर्चचं लपवलेलं “कर्तृत्व” : विद्वान स्त्रिया, पुजाऱ्यांना जिवंत जाळण्याचा इतिहास

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?