चांद्रयान २ दणदणीत यशस्वी! वाचा मोहिमेच्या यशाची इत्यंभूत माहिती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चंद्रयान २ चे विक्रम लॅन्डर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर होते तेव्हा सॉफ्ट लँडिंगच्या प्रयत्नात अखेरच्या क्षणी यानाचा संपर्क तुटला. असे होणे म्हणजे खरं तर दुर्दैव होते.
करोडो भारतीयांना ह्या घटनेचे दुःख झाले. इस्रोतील संशोधकांच्या चेहेऱ्यावरील दुःख व नाराजी स्पष्ट दिसून येत होती. इस्रो प्रमुखांना तर इतके दुःख झाले की ते त्यांच्या भावना रोखू शकले नाहीत.
त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांचे अश्रू बघून प्रत्येक सच्च्या भारतीयाचे मन गलबलून आले नसेल तरच नवल! कारण कुठल्याही अवकाश मोहिमेसाठी अनेक लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते.
रात्रीचा दिवस करून काम केलेले असते. अशा वेळी जर शेवटच्या क्षणी काही गडबड झाली आणि मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली नाही तर निराश वाटणे, दुःख होणे अगदी साहजिक आहे.
तसेच चंद्रयान २ च्या बाबतीत सुद्धा झाले. शेवटच्या क्षणी यानाशी आपला संपर्क तुटला आणि विक्रम लॅन्डरचे काय झाले, व आता पुढे काय हे प्रश्न पुढ्यात उभे राहिले.
अनेक विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्या विकृत मनोवृत्तीला जागत इस्रोची खिल्ली देखील उडवली. पण त्यांनाही आपल्या लोकांनी वेळीच ठेचून गप्प केले. कारण जरी विक्रम लॅन्डरशी आपला संपर्क तुटला असला, तरीही ऑर्बिटरचे काम अगदी व्यवस्थितपणे सुरु आहे.
त्यामुळे ही मोहीम अयशस्वी झाली असे अजिबात म्हणता येणार नाही. जरी गोष्टी संशोधकांनी ठरवल्या तश्या झाल्या नसल्या तरीही चंद्रयान २ ह्या मोहिमेचा आपल्याला फायदाच होणार आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ऑर्बिटरचे काम अगदी छान सुरु असल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागाची विविध छायाचित्रे काढून इस्रोला पाठवू शकते. संशोधकांच्या मते ह्या मोहिमेत फक्त ५ टक्के अपयश आले आहे.
चांद्रयान २ हे तीन भागांत विभागले होते. पहिला भाग ऑर्बिटर (२३७९ किलो ,आठ पेलोड्स), दुसरा भाग विक्रम(१४७१ किलो, चार पेलोड्स) आणि तिसरा भाग प्रज्ञान (२७ किलो, चार पेलोड्स).
विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर ह्यांचा भाग सोडल्यास ऑर्बिटर चंद्राला यशस्वीपणे प्रदक्षिणा घालत आहे. तसेच हेच ऑर्बिटर विक्रम लॅन्डरचे काय झाले ह्याबद्दलही आपल्याला माहिती देऊ शकते.
ऑर्बिटरने विक्रम लॅन्डरचे फोटो पाठवले की इस्रोचे संशोधक विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हरची नेमकी काय परिस्थिती आहे हे शोधून काढू शकतात.
२२ जुलै रोजी चांद्रयान २ चे Geosynchronous Satellite Launch Vehicle-Mark III (GSLV Mk III) ह्या हेवी लिफ्ट रॉकेटद्वारे यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले होते आणि २ सप्टेंबर रोजी अवकाशात ऑर्बिटरपासून विक्रम वेगळे झाले होते.
चंद्राच्या पृष्ठभागापासून अगदी जवळ असताना विक्रम लॅन्डरचा संपर्क तुटला म्हणजे कदाचित सॉफ्ट लँडिंग दरम्यान काहीतरी अडथळा निर्माण झालेला असू शकतो आणि विक्रम लॅन्डर व प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरलेही असू शकेल.
असे घडले असेल ह्याची खात्री देता येत नसली तरीही असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी लॅन्डरचे क्रॅश लँडिंग झाले असले पण सुदैवाने ते सुस्थितीत असले आणि इस्रोचा विक्रम बरोबर संपर्क पुनःप्रस्थापित झाला तर सगळेच काम परत सुरळीत सुरु होईल.
आणि जरी विक्रम लँडिंग दरम्यान खराब झाले असले तरी, ऑर्बिटरच्या मदतीने आपण चंद्राचा अभ्यास नक्कीच करू शकतो. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे हे काही साधे काम नाही.
हे अत्यंत कठीण आव्हान होते. ह्या आधी विविध देशांना ह्याबाबतीत अपयश आले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग कसे करायचे, उतरताना व्हिलॉसिटी कन्ट्रोल कशी करायची आणि क्रॅश लँडिंग पासून कसे वाचायचे ह्या प्रश्नाने भल्या भल्यांची झोप उडवली आहे.
आजवर चंद्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. पण त्यापैकी तब्बल ३० उपग्रह चंद्रापर्यंत पोहोचूच शकले नाहीत किंवा पोहोचले तरी ते सुस्थितीत तिथे उतरू शकले नाहीत.
चंद्राच्या पृष्ठभागावर आजही त्या उपग्रहांचे अवशेष पडून आहेत.
काही काळापूर्वी इस्राईलने पाठवलेला Baresheet हा उपग्रह सुद्धा चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेपर्यंत अगदी व्यवस्थित होता.
त्याचेही शेवटच्या क्षणी काय बिघडले हे कळले नाही आणि त्यांचाही उपग्रहाशी संपर्क अखेरच्या क्षणी तुटला.
म्हणजेच हे काम काही सोपे नव्हते. त्यामुळे ह्या अत्यंत आव्हानात्मक मोहिमेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले म्हणून इस्रोच्या संशोधकांचे आपण कौतुकच केले पाहिजे.
जरी ह्यावेळी आपल्यापुढे सॉफ्ट लँडिंग करण्यात समस्या उत्पन्न झाल्या असल्या तरी ह्या समस्यांचा अत्यंत खोलात शिरून अभ्यास करून आपले संशोधक नक्कीच त्यावर उत्तर शोधून काढू शकतील.
विज्ञानात प्रयोग करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कुठलाच प्रयोग पहिल्याच फटक्यात यशस्वी होत नसतो. त्यासाठी आधी भरपूर प्रयत्न करावे लागतात.
विज्ञानाच्या इतिहासात डोकावून बघितल्यास आपल्याला हेच लक्षात येईल की कुठल्याही यशस्वी शोधामागे त्या आधी केलेल्या प्रयोगांची व त्यात आलेल्या अपयशाची मालिका असते.
अपयशातूनच माणूस शिकतो आणि आधी झालेल्या चुका टाळून यशाकडे वाटचाल करतो. आपल्या ह्या मोहिमेत जरी आपल्याला १०० टक्के यश मिळाले नसले तरी जगातील अवकाश संशोधन संस्थांपैकी इस्रोचा ट्रॅक रेकॉर्ड सर्वोत्तम आहे.
इतर देशांच्या अवकाश संशोधन संस्थांपेक्षा आपल्या इस्रोच्या यशस्वी मोहिमांचे प्रमाण जास्त आहे.
इस्रोच्या आजवरच्या अवकाश मोहिमांमध्ये चंद्रयान २ ही सर्वात कठीण मोहीम होती. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची इस्रोची योजना होती, कारण त्यांना लॅन्डर मधील इतर उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरवायची होती.
त्यासाठी त्यांना पृष्ठभागापासून ३० किमी अंतरावरच गती कमी करणे आवश्यक होते. त्यानंतर ७ किमी अंतरावर त्यांच्यापुढे “फाईन ब्रेकिंग” चे आव्हान होते.
हे करून मायक्रोग्रॅव्हीटीचा उपयोग करून लॅन्डर पृष्ठभागावर हळू हळू उतरवणे हेच कितीतरी कठीण होते.
हे करणे कठीण आहे कारण तुम्ही बुस्टर्स पृष्ठभागावाच्या जास्त जवळ नेऊ शकत नाही. जर रॉकेट बुस्टर्स पृष्ठभागाच्या जवळ आले तर सोलर पॅनेल्सवर धूळ बसून ते खराब होऊ शकतात किंवा स्फोट होऊन तुमचे यान कोसळू शकते.
म्हणूनच हे सॉफ्ट लँडिंग अत्यंत अवघड आहे. सिवन ह्यांनी तर ह्या सॉफ्ट लँडिंगला “फिफ्टीन मिनिट विंडो ऑफ टेरर” असेच नाव दिले होते.
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्हीही अत्यंत महत्वाचे होते ह्यावर कुठलेही दुमत नाहीच. पण हे चांद्रयान २ चे एकमेव उद्दिष्ट्य नव्हते.
प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लॅन्डर हे चंद्राच्या पृष्ठभागावर केवळ १४ दिवस (चंद्रावरील १ दिवस) काम करणार होते तर ऑर्बिटर मात्र पुढची काही वर्षे चंद्राला प्रदक्षिणा घालून त्याची माहिती आपल्याला देणार आहे.
ऑर्बिटरवर जो कॅमेरा बसवण्यात आला आहे तो चंद्राच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेला आजवरचा सर्वात हाय रिझोल्युशनचा कॅमेरा आहे. ह्या कॅमेऱ्याचे ड्युएल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक ऍपर्चर रडार पाण्याचा शोध घेईल.
हा कॅमेरा म्हणजे एक चमत्कार आहे कारण त्याचे वजन केवळ १६ किलो आहे. ह्या कॅमेऱ्याद्वारे आपल्याला खूप महत्वाची माहिती मिळू शकेल.
त्या माहितीचा उपयोग निश्चितच पुढच्या मोहिमेसाठी केला जाईल. त्यामुळे हा प्रयोग संपूर्णपणे अयशस्वी झालेला नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे.
राहिला पैश्यांचा प्रश्न तर संपूर्ण चंद्रयान २ मिशन हे ९७८ कोटी रुपयांत पूर्ण झाले. त्यापैकी जवळजवळ ६०३ कोटी रुपये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरसाठी लागले.
त्यात पैश्यात नॅव्हिगेशन सपोर्ट आणि ग्राउंड सपोर्ट नेटवर्क सुद्धा तयार केले गेले. आणि उरलेले ३७५ कोटी रुपये GSLV Mk III रॉकेट तयार करण्यासाठी लागले.
ह्या रक्कमेची तुम्ही नासाच्या मोहिमांबरोबर तुलना केलीत तर तुमच्या लक्षात येईल की नासाने आपल्यापेक्षा जवळजवळ वीस पट जास्त खर्च केला आहे.
नासाला सुद्धा अपोलो ११ च्या आधी १० अपोलो चंद्रावर पाठवावे लागले होते. तेव्हा कुठे त्यांचा करावा प्रयोग संपूर्ण यशस्वी झाला होता. आपला प्रयोग ९९ टक्के यशस्वी झाला होता.
शेवटच्या क्षणी काहीतरी गडबड झाली आणि संपर्क तुटला.
आपले संशोधक नेमकी कुठे चूक झाली हे नक्कीच शोधून काढतील आणि पुढची मोहीम यशस्वी करून दाखवतील हा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. त्यामुळे प्रत्येक सच्चा भारतीय आज इस्रोच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि प्रत्येकाच्या मनात इस्रोविषयी आदर व कौतुकच आहे…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.