आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपण सर्वजण आपल्या देशावर प्रेम करतोच! आपण इथवर गेलेल्या प्रगतीचा देखील सर्व भारतीयांना अभिमानच आहे. परंतु, एक देश आणि एक समाज या नात्याने अजून बऱ्याच गोष्टी अशा आहेत जिथे आपण बदल करणे आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास स्त्रियांची सुरक्षितता!
आजही आपण पेपरमधून हुंडाबळी, बलात्कार किंवा स्त्रीभ्रूण हत्येच्या बातम्या जेंव्हा वाचतो तेंव्हा निश्चितच भारत हा स्त्रियांच्या दृष्टीने असुरक्षित देश आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
सेक्शन ३७५ या आपल्या आगामी चित्रपटात बलात्कार पिडीतेला वाचवण्यासाठी तिच्या वकिलाची भूमिका करणाऱ्या रिचा चढ्ढा या अभिनेत्रीने नुकतेच असे विधान केले आहे की,
“भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश आहे हे लपवून ठेवण्यात कसलीही देशभक्ती नाहीये.
“भारत हा स्त्रियांसाठी असुरक्षित देश आहे हे लपवून ठेवण्यात कसली आलीय देशभक्ती…स्त्रियांवरील अत्याचाराच्या बाबतीत भारताचा क्रमांक खूप वरचा लागतो…. अगदी भारतात स्त्री गर्भ देखील आईच्या पोटात सुरक्षित नाहीत.
स्त्री भ्रूणहत्या, लिंग विच्छेदन, हुंड्यासाठी छळ, अॅसिड हल्ला, अशा कितीतरी घटना घडत असतात…. या सर्व घटना म्हणजे स्त्रियांविरोधातले हिंसक गुन्हे आहेत.
“मग, कुठल्या आधारावर आपण हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित आहे असे म्हणू शकतो? जे लोकं म्हणताहेत की भारत हा स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित देश आहे, ते पुरुष आहेत.”
परंतु, स्त्रियांच्या दृष्टीने हा देश कसा सुरक्षित होईल हे पाहणे महत्वाचे आहे. आपण महिलांना सामाजिक, कौटुंबिक सुरक्षा कशी देणार आहोत?
ही परिस्थिती आपण कशी सुधारणार आहोत? यावर विचार होणे अत्यावश्यक आहे.”
रिचा चढ्ढाच्या मते, ही दुहेरी प्रक्रिया आहे.
एकीकडे कायदे अधिकाधिक कडक करणे आवश्यक असले तरी, समाजाची मानसिकता बदलणे देखील तितकेच आवश्यक आहे. बलात्कार आणि लैंगिक हिंसेकडे एक लांच्छन म्हणून पाहणे थांबले पाहिजे.
“बदलाची प्रक्रिया दोन्ही बाजूनी अपेक्षित आहे, (सरकार आणि समाज), बलात्कारी पुरुष देखील याच समाजातून तयार होतात,”
असेही ती म्हणाली.
बलात्कार किंवा लैंगिक हिंसेच्या घटना घडतात तेंव्हा राजकीय वलय किंवा सत्ता असणाऱ्या व्यक्तींचा एक उलटाच प्रश्न असतो तो म्हणजे, एकटी कशाला बाहेर पडली? यावेळी कशाला बाहेर पडली? तिथे जायचीच काय गरज होती? हे आणि असे उपस्थित केले जाणारे प्रश्न देखील लज्जास्पद आहेत.
जागतिक चळवळीतून प्रेरणा घेऊन उभ्या राहिलेल्या #Me Too या चळवळीने गेल्याच वर्षी भारतात चित्रपट क्षेत्रापासून राजकारणापर्यंत सगळ्यांना हादरवून सोडले होते.
अगदी नाना पाटेकर, सुभाष घई, आलोकनाथ, साजिद खान, जतीन दास, विकास बहल ते राजकुमार हिराणीपर्यंत चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांची नावे यात गोवली गेली.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने पहिल्यांदा नाना पाटेकर विरोधात केस नोंद केल्यानंतर तिच्या पाउलांवर पाउल टाकत अनेक जणींनी आपली आपबितीही सांगितली. पण, पुरेशा पुराव्या अभावी यात कुणालाच गुन्हा सिद्ध करता आला नाही.
त्यानंतर अनेकदा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा सहकाऱ्यांकडून कसा गैरफायदा घेताला जातो, याच्या अनेक हकीकती समोर आल्या.
#Me Too या चळवळीने अनेकींना आपल्या वरील अन्यायाला वाचा फोडली असली तरी, यातून अनेकांना क्लीन चीट मिळाली.
तर अनेक जण अजूनही कोर्टकचेर्यांच्या वाऱ्या करत आहेत. देशातील स्त्रियांमध्ये किती असुरक्षितता आहे हे या एका चळवळीवरून पुरेसे स्पष्ट होते. परंतु, ही चळवळ एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित होती.
स्त्रियांची छळवणूक करणारा आणखी एक प्रकार म्हणजे त्यांचा रंग, जाडी, वजन, फिगर, यावरून त्यांना टोमणे मारणे. ज्याला उच्चभ्रू वर्तुळात ‘बॉडी शेमिंग’ असे म्हंटले जाते.
प्रसार माध्यमे असोत की समाज माध्यमे आदर्श सौंदर्याच्या विशिष्ट कल्पना ठरवल्या गेल्या आहेत.
अशा सौंदर्यवतींना मॅगझीन, टी.व्ही. चॅनेल किंवा अगदी फेसबुक, इंस्टाग्राम, अशा माध्यमातून फार फार डोक्यावर घेतले जाते. अशा सौंदर्याच्या आदर्श असणाऱ्या मोडेल्स आणि अभिनेत्रीना पाहून सामान्य स्त्रियांना आपल्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ लागतो. त्या जशा दिसतात त्याबद्दल त्यांना स्वतःलाच घृणा वाटू लागते.
अगदी भारतातील ९०% स्त्रियांना अशाप्रकारे स्वतःच्याच शरीराची घृणा वाटत असल्याचे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच अशी कबुली दिली की, तिच्या रंगामुळे तिला अनेक हॉलीवूड आणि बॉलीवूडच्या चित्रपटांत नकार मिळालेला आहे.
म्हणजे तुम्ही कोणीही असा, बॉडी शेमिंग हा असा प्रकार आहे जो तुमचा सर्वत्र पिच्छा पुरवत असतो.
परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा आणि विद्या बालन या अभिनेत्रींना देखील त्यांच्या फिगरमुळे या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे.
“किती जाडी आहेस?”, ” तू थोड वजन वाढवायला हवं?”, “तुझे आई-वडील काही खायला प्यायला घालत नाहीत का तुला?”
हे आणि अशा प्रकारचे टोमणे जेव्हा आपण आजूबाजूच्या लोकांकडून, शेजाऱ्यापाजाऱ्याकडून, नातेवाईक किंवा अगदी घरातीलच व्यक्तीकडून ऐकवण्यात येते तेव्हा त्या व्यक्तीचे किती मानसिक खच्चीकरण होते, याची कल्पनाच केलेली बरी.
अशा प्रकारची वक्तव्ये त्या व्यक्तीमध्ये असहाय्यता आणि मानहानीची भावना निर्माण करतात. आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी याप्रकारच्या अनुभवाला सामोरे गेलेलो आहोत.
आपल्याकडे स्त्रियांना विशेषत: या प्रकारची छळवणूक जास्त सहन करावी लागते. कुणी लग्न करणार नाही किंवा जास्त हुंडा द्यावा लागेल, असे सतत ऐकून घ्यावे लागते.
Stop Body Shaming ही चळवळ देखील समाजमाध्यमात चालवण्यात आली. पण, ही एक विकृती आहे, हे कोणालाही सहज मान्य होत नाही.
भारतीय स्त्रियांना अशा प्रकारे घरापासून ते बाहेरच्या जगात देखील सतत असुरक्षिततेच्या वातावरणात वावरावे लागते. आपल्याकडे पिडीतेलाच हजार प्रश्न विचारले जातात, तिचे मानसिक, नैतिक खच्चीकरण केले जाते.
स्त्रियांना कौटुंबिक आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यापासून भारत अजून तरी कोसो दूर आहे. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि समाजमनात थोडा जरी बदल झाला तरी, किमान आपली वाटचाल या दिशेने सुरु होईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.