Site icon InMarathi

या ९ गोष्टी पाळा आणि तुमचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पवित्र, मंगलमय करा…!

ganpati 2021 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

संपूर्ण भारतात अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाणारा एक सण म्हणजे गणेशोत्सव! देव गणपती हा विद्येचा आणि बुद्धीचा देवता म्हणून ओळखला जातो.

अगदी कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला भारतात गणेशाचीच पूजा केली जाते. गणेश चतुर्थीला लोकं वेगवेगळ्या आकारांचे, रंगाचे, सुशोभित गणपतीच्या मुर्त्या सुंदरशी आरास करून आपल्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी एखादा मंडप घालून तिथे स्थानापन्न करतात.

गणेशोत्सवाच्या या चार-पाच दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात. शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीने “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,” असा जयघोष करत गणपतीचे विसर्जन केले जाते.

जे गणपती घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी बसवले जातात ते मातीचेच असतील असे नाही. हल्ली गणपतींच्या मुर्त्या बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीसचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो.

 

YouTube

 

हे प्लास्टर ऑफ पॅरीस पाण्यात लवकर विरघळत नाही, तसेच गणपती सोबत निर्माल्य आणि इतरही काही वस्तू पाण्यात सोडून दिल्या जातात ज्या पाण्यात विरघळणाऱ्या नसतात किंवा विरघळल्याच तर त्यातील हनिकारक केमिकलच्या प्रभावाने परिसरात रोगराई पसरण्याची किंवा आरोग्यावर काही घातक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी तर अक्षम्यच आहे!

खरे तर सण साजरे करणे म्हणजे आनंदाची लयलूट! त्यातून पुन्हा त्रासदायक गोष्टी उद्भवणार असतील तर, आपण कुठे तर चुकतोय हे लक्षात घ्यायला हवंय.

म्हणून गणेश चतुर्थीचा हा सण सर्वांसाठीच आनंदाचा, मांगल्याचा आणि महत्वाचा म्हणजे आरोग्यदायी असावा असे वाटत असेल तर, पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा साजरा करता येईल यावर आपल्याला थोडा भर देणे गरजेचे आहे.

 

Anant National University

 

गणेशाच्या मूर्तीची सजावट करणे, घराची सजवट करणे, रांगोळी घालणे, फटके फोडणे, मोठमोठाले मंडप उभारणे, हे सगळे काही किती हौसेनी करतो आपण! पण, हेच करत असताना प्रत्येक गोष्ट नक्की पर्यावरण पूरक आहे का? याचा जरा विचार करावा लागेल.

मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात, अगदी छोट्या प्रामाणात असली तरी हानी ही हानीच असते, याचा थोडा विचार करूया.

१. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निवडा :

घरी असो किंवा सार्वजनिक मंडळात असो तुम्ही जी मूर्ती बसवणार असाल ती केमिकल, प्लास्टर ऑफ पॅरीस, चीनी माती किंवा थर्मोकोलची नसली पाहिजे याची खबरदारी घ्या.

 

in.pinterest.com

 

नैसर्गिक पद्धतीने बनवलेली आणि जे सहज नष्ट होईल अशा साहित्यापासून बनवलेली मूर्तीच बसावा. त्यामुळे विसर्जनानंतर पाणी दुषित होणार नाही.

२. गणेश मूर्तींची संख्या आणि आकार देखील मर्यादित ठेवा

एका गावामध्ये किंवा एका कॉलनीमध्ये किती गणपती बसवावे यावर काही मर्यादा घालणे आवश्यक आहे.

 

Banega Swachh India – NDTV.com

 

तसेच या गणपतींचा आकार देखील अगदी मर्यादित असावा. कारण जितका मोठा गणपती तितकेच प्रदूषित घटक पाण्यात मिसळणार. तसेच, यांना विरघळण्यासाठी देखील फार अवधी लागणार.

जितका मोठा गणपती तितकीच पर्यावरणाला मोठी हानी हे सूत्र लक्षात ठेवा.

म्हणून गणपतींची संख्या आणि आकार दोन्ही मर्यादित असावे. सार्वजनिक गणपती शक्यतो ५ फुट किंवा १.५ मीटर इतक्याच उंचीचे असावेत.आता कोरोनामुळे अधिकच निर्बंध आले आहेत.  एकाच भागात मोठेमोठे मंडप उभे केल्याने वाहतुकीचाही प्रश्न निर्माण होतो.

३. विजेची बचत करा

मंडप किंवा घरातील आरास करताना वापरलेले लाईट्स फक्त पूजेच्या आणि आरतीच्या वेळीच लावा. गरज असेल तेंव्हाच लावा.

 

 

सार्वजनिक ठिकाणी तर संपूर्ण गल्लीला लाईटींग केले जाते आणि ही लाईट रात्ररात्र भर सुरु राहते. हे जितके टाळता येईल तितके बरे…! शक्यतो गर्दी टाळा, काही ठिकाणी मंडपात दर्शन घेण्यासाठी बंदी घातली आहे.

४. नैसर्गिक रंग आणि रांगोळी

रांगोळी काढताना नैसर्गिक रंगोलिया आणि रंगांचा वापर करा. उदाहरणार्थ हळद, हीना, मेहंदी, तांदळाचे पीठ, गुलाल. असे रंग पर्यावरणाला किंवा मानवी आरोग्यासाठी देखील हानिकारक नसतात.

 

Loksatta

 

५. पर्यावरणपूरक आरास

आरासाविना गणपती ही तर कल्पनाही करवत नाही. पण, हल्ली गणपतीच्या आरासासाठी म्हणून प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, चायनाच्या लायटिंग माळा, प्लास्टिकची फुले, गौरीचे मुखवटे, त्यांची आरास, अशा अनेक वस्तू आपण वापरत असतो,

पण या वस्तू खराब झाल्यानंतर जेव्हा आपण कचर्यात फेकून देऊ तेव्हा त्यातून आपण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत हे लक्षात घ्या. म्हणून गणपतीच्या किंवा गौरीच्या आरासासाठी वापरले जाणारे साहित्य हे नैसर्गिक स्वरूपाचे असेल हे याकडे लक्ष द्या.

 

 

विविध रंगांची फुले, पाने, पडदे, यापासून देखील आरास करता येऊ शकते, ज्यामुळे पर्यावरणाला हानी देखील पोहोचणार नाही.

६. प्लास्टिक बंदी

सार्वजनिक ठिकाणच्या गणपतीच्या दर्शनाला जाताना, प्रसाद, लाडू, फुले, अगरबत्ती अशा कितीतरी गोष्टी प्लास्टिकच्या पिशवीतून नेल्या जातात आणि एकदा हे सगळ देवाचरणी अर्पण केलं की या पिशव्या हव्या तिथे टाकून दिल्या जातात.

आपल्या या कृतीतून आपण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत याची सुतरामही कल्पना कुणाला नसते ना त्याबद्दल कसली खंत. अगदी घराघरातील निर्माल्य देखील प्लास्टिक पिशवीतून नदीत तसेच सोडून दिले जाते.

त्यामुळे या गणेश चतुर्थीला प्लास्टिक वापरावर आपण स्वयंस्फूर्तीने पूर्णतः बंदी घातली पाहिजे. यासाठी इतरांनाही उद्युक्त करा आणि स्वतःही अंमलात आणा.

 

 

७. ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

काही ठिकाणी जमावबंदी आहेच तर काही ठिकाणी विसर्जनाला ठरविक लोकांनाच परवानगी आहे त्यामुळे इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने मोठमोठ्या आवाजात गाणी लावणे टाळा. त्याऐवजी तबला, मृदंग अशी मृदू आवाजातील वाद्ये वाजवू शकता.

लाउडस्पीकर्स मुले आजूबाजूच्या परिसरातील दवाखाने, शाळा, यांना त्रास होऊ शकतो. माईक आणि स्पीकरचा वापर शक्यतो संध्याकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंतच करा.

 

 

फटाके फोडणे टाळा. यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सणाच्या दिवसात फटके फोडलेच पाहिजेत असे कुठेही लिहून ठेवलेले नाही. फटाक्यातून निघणारा धूर पर्यावरणाला आणि आरोग्यालाही घातक असतो.

८. कृत्रिम विसर्जन टाकी

गणपतीच्या मुर्त्या नदी, तलावात विसर्जित करून संपूर्ण जलस्त्रोत दुषित करण्याऐवजी विसर्जनासाठी तात्पुरते हौद बनवा किंवा घरगुती गणपती बादलीत देखील बुडवले तरी चालतात.

शक्यतो धातूच्या किंवा दगडापासून बनवलेल्या मुर्त्या असतील तर, त्या अशा पद्धतीने बादलीत बुडवून, स्वच्छ पुसून पुन्हा पुढच्या वर्षीसाठी वापरता येऊ शकतात.

प्रतीकात्मक विसर्जन देखील करू शकता. गणपतीऐवजी सुपारी जरी पाण्यात बुडवली तरी विसर्जनाचा विधी पूर्ण होतो. त्यासाठी नद्या आणि तलाव प्रदूषित करण्याची गरज नाही.

 

९. कंपोस्ट खड्डा

गणेश विसर्जनानंतर निर्माल्य देखील नदीत न सोडता एक खड्डा खणून त्यामध्ये हे निर्माल्य पुरू शकता. यामध्ये फुले, दुर्वा असे नैसर्गिक घटक असल्याने त्याचे चांगले खात बनू शकते.

त्यामुळे विसर्जनाला येणाऱ्या लोकांकडून असे निर्माल्य घेऊन त्याचे चांगले कंपोस्ट बनवू शकता. सुकलेल्या फुलांचा पुन्हा रंग वगैरे बनवण्यासाठी पुनर्वापर देखील करू शकता.

सण आणि उत्सवाचा आनंद लुटत असताना पर्यावरण आणि निसर्गाची हानी होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेणे गरजेचे आहे, तरच या सणातील पावित्र्य आणि मांगल्य टिकून राहील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version