' १०० किलोंच्या ‘चॉकलेट’ गणपतीबाप्पांचे विसर्जन, मनाला हेलावून टाकणाऱ्या पद्धतीने… – InMarathi

१०० किलोंच्या ‘चॉकलेट’ गणपतीबाप्पांचे विसर्जन, मनाला हेलावून टाकणाऱ्या पद्धतीने…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

सध्या गणेशोत्सावाच्या आनंदात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सगळे तल्लीन झाले असतील. गणेशोत्सव हा तर महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक! सर्वत्र जल्लोषाच्या वातावरणात आणि धुमधडाक्यात हा सण साजरा केला जातो.

गणेशोत्सव साजरा करताना तो पर्यावरण पूरक कसा होईल यावर देखील काही लोक आवर्जून भर देत आहेत आणि आपापल्या पद्धतीने त्यावर काही अफलातून मार्ग देखील शोधत आहेत.

आत्ता आपण माहिती घेणार आहोत अशाच एका पर्यावरण पूरक आणि स्वतः सोबतच इतरांनाही आपल्या आनंदाचा भाग बनवून घेणाऱ्या ‘चॉकलेट’ गणपतीबद्दल!

सण साजरा करण्यामागचा खरा उद्देश असतो, समाजातील सर्व घटकांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणे आणि आपणही इतरांच्या आनंदात सहभागी होणे. आपण आनंदात, उत्साहात जल्लोषात सण साजरा करत असताना ज्यांना असा आनंद साजरा करणे परवडत नाही त्यांचीही आठवण ठेवणे गरजेचे आहे, तरच त्या सणाला मांगल्याचा अर्थ प्राप्त होईल.

 

ganapati inmarathi
stackpathcdn.com

लुधियानातील एका बेकरी मालकाने सणाचा नेमका हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, इतरांनाही आनंद मिळेल असे काही करून दाखवण्याचे ठरवले.

लुधियानातील या बेलफ्रांस नावाच्या बेकरीने २०१६ मध्ये ४० किलोचा बेल्गिअन चॉकलेट वापरून गणपतीची मूर्ती तयार केली. त्याचा उद्देश हाच होता की, ज्यांना अगदी पुरेसे अन्न देखील मिळत नाही त्या गरीब मुलांना किमान एक दिवस चॉकलेट मिल्क देता येईल.

एकीकडे मी, माझे, हा संकुचित, आत्मकेंद्री विचार वाढत असताना हरजिंदर कौर यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह तर आहेच पण, अभिमानास्पद देखील आहे.

आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण या सामाजाला जे काही देणं लागतो त्याची अशा पद्धतीने परतफेड करणे देखील शक्य आहे. हरजिंदर यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेचे स्वागत झाले पाहिजे. अशाच पद्धतीने आपणही काही नवे प्रयोग करू शकतो का याबाबत विचार केला पाहिजे.

तसेच यातून पर्यावरणाला देखील कोणतीही हानी पोहोचणार नाही, असा विचार करून या लुधियानातील एका बेकारी मालकाने बेल्गीअन चॉकलेट पासून गणेशाची मूर्ती बनवण्याचे ठरवले.

 

chocolate ganapati inmarathi
.indianexpress.com

२०१६ पासून ते आजतागायत ते याच पद्धतीची मूर्ती बनवत आहेत. यावर्षी तर त्यांनी तब्बल १०० किलोची मूर्ती बनवली आहे. त्यांच्या या मूर्तीचे फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर देखील शेअर केले आहेत.

चॉकलेटचा हा पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे!

१०० किलो बेल्गिअन चॉकलेट पासून हा गणपती बनवण्यासाठी त्यांना १० दिवस २० शेफ काम करत होते. गेल्या वर्षी देखील बेल्गिअन चॉकलेट पासून बनवलेला ६५ किलोचा गणपती त्यांनी बनवलेला.

हरजिंदर यांना इकोफ्रेंडली गणेशा एवढाच संदेश या कृतीतून द्यायचा नाही तर, समाजातील एकमेकांच्या मनातील भावना देखील साफ असाव्यात आणि समाज एक दिलाने गुण्यागोविंदाने नांदावा यासाठी त्यांनी हा गणपती बनवण्याची ऑर्डर एका मुस्लीम शेफकडे दिली होती. म्हणजे हा बेल्गिअन चॉकलेट पासून इकोफ्रेंडली गणेशा तयार करणारा कलाकार मुस्लीम आहे.

एका शीख व्यक्तीच्या प्रेरणेने एका मुस्लीम कलाकाराने हिंदू देवतेची मूर्ती बनवणे हे एका निरोगी आणि सौहार्दपूर्ण समाजाचे द्योतक आहे. इतरांनाही या उदाहरणातून खूप प्रेरणा घेता येईल.

 

hindu muslim inmarathi
telanganatoday.com

इतर गणपती हे प्लास्टर ऑफ पॅरीससारख्या अविघटनशील पदार्थापासून बनवले जातात. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेला गणपती पाण्यात विसर्जित केल्या नंतर लवकर विरघळत नाही. त्याला विरघळण्यासाठी बराच अवधी लागतो.

तसेच यामध्ये बरीच रसायने आणि कृत्रिम रंग वापरले जातात ज्यामुळे ज्या नदीत किंवा तलावात हे गणपती विसर्जित केले जातील तिथले पाणी प्रदूषित होऊन जाते.

प्लास्टर ऑफ पॅरिस नदीच्या तळाशी तसेच साचून राहते, ज्यामुळे गाळाची समस्या उद्भवते. तसेच जलसाठे दुषित झाल्याने जलजीवन देखील धोक्यात येते. प्रदूषित पाणी अनेक प्रकारच्या रोगराईला आमंत्रण ठरू शकते. म्हणजे सणाचा मुळ उद्देश आणि त्यातील पावित्र्यच यामुळे संपून जाते.

चॉकलेट पासून बनवलेल्या या गणपतीचे विसर्जन देखील फारच अनोख्या मनाला हेलावणाऱ्या पद्धतीने केले जाते.

हा गणपती पाण्यात विसर्जित न करता दुधात विसर्जित केला जातो आणि यापासून बनवले गेलेले चॉकलेट मिल्क गरीब मुलांमध्ये वाटून दिले जाते. म्हणजे यामुळे पर्यावरणाला तर हानी पोहोचत नाहीच किंवा एवढे खाद्यपदार्थ वाया देखील जात नाही तर ते सत्कारणी लावले जाते.

 

chocolate ganapati inmarathi
ytimg.com

खरे तर सगळेच सण अशा अभिनव पद्धतीने साजरे होणे गरजेचे आहे. ज्यामुळे इतरांना देखील आपल्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळते. आपणही इतरांच्या आनंदात सहभागी होतो. एकमेकांना दिला जाणारा हा आनंदाचा ठेवा इतर कोणत्याही महागड्या भेटवस्तूंपेक्षा मोठा आहे.

गणेश चतुर्थी हा सण देव गणेशाचा जन्मोत्सव म्हणून सजरा केला जातो. पार्वती आणि शंकराचे लाडके बाळ अशीही त्याची ओळख आहे. गणेश देवता हा विद्येचा आणि बुद्धीचा देवता मानला जाते. या देवतेला बुद्धी, उत्कर्ष आणि भरभराटी यांचे प्रतिक मानले जाते.

हरजिंदर यांच्या या प्रयत्नाचे कौतुक झाले पाहिजे. त्यांची ही कल्पना अगदी हटके आणि तरीही इतरांच्या मानसिक स्वास्थ्याचा तसेच पर्यावरणाचाही विचार करायला लावणारी आहे.

 

chocolate ganapati inmarathi
etimg.com

जल्लोषाच्या नावाखाली आपल्याच नादात मश्गुल असणाऱ्या आजच्या तरुणाईसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

उत्सव कोणताही असो तो किती धुमधडाक्यात, किती जल्लोषात साजरा केला याला महत्व नाही. हा उत्सव साजरा करताना आपण इतरांना आनंद दिला का? याचे भान ठेऊन आपल्यालाही इतरांच्या सुखदुखात समरस होण्याची भावना जागवली पाहिजे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?