आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतात आणि एकूणच जगामध्ये सध्या मंदीसदृश्य स्थिती उद्भवली आहे. गेल्या काही दिवसापासून आपण यासंदर्भात बातम्या किंवा लेख वाचत असाल. देशातील वाहन उद्योग, घरबांधणी क्षेत्र तसेच वस्त्रोद्योग देखील मंदीच्या छायेत आहेत.
काही महिन्यात देशातील हजारोंच्या संख्येत वाहन विक्री शोरूम बंद पडले आहेत. तसेच लाखों लोकांना रोजगार देखील गमवावा लागला आहे.
याबाबतीत आणखी गंभीर वाटावी अशी स्थिती व चर्चा तेव्हा आरंभ झाली जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा भाग बनलेल्या पारलेजी या बिस्कीट कंपनीने येणाऱ्या काळात १० हजार कामगारांना कमी करण्याची शक्यता व्यक्त केली.
आता यावर विविध अर्थविषयक जाणकार चिंता व्यक्त करत आहेत.
देशातील विविध अर्थ जाणकारांपासून ते देशाचे माजी पंतप्रधान व प्रख्यात अर्थशास्त्री मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वानी या मंदी बद्दल भीती व्यक्त केली आहे.
तर मग या अश्या आपल्या पुढ्यात आलेल्या मंदीला आपण कसे सामोरे जाऊ शकतो यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. याच्या मदतीने तुम्हाला मंदीचा सामना करताना उपयोग होईल. तर चला बघूया काय आहेत या उपाययोजना…
१. आपत्कालीन निधी तयार ठेवा
जर आतापर्यंत तुम्ही असा आपत्कालीन निधी बाजूला ठेवत नसाल तर आताच ते चालू करा.
हा निधी तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये ठेवू शकता. मंदीच्या परिणामांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हा मार्ग नक्कीच उपयोगी पडेल.
काही महिन्यांसाठी आपला अतिरिक्त खर्च कमी करून तुम्ही हि रक्कम सुरक्षित करू शकता, जी तुम्हाला अडचणीच्या वेळी म्हणजे गुंतवणूक करताना किंवा नोकरी गेल्यानंतर कामी येईल.
२. आपल्या गुंतवणुकीत विविधता आणा
मंदीच्या काळात भांडवली बाजारातील किमती नाट्यमयरित्या कमी होतात, ज्याचा सरळ परिणाम म्हणजे गुंतवणूकदारांचे नुकसान होय.
या स्थितीला काही कंपन्या पुरून देखील उरतात. पण दुर्दवाने काही कंपन्यांना नुकसान सहन करावाच लागतो.
हो धोका टाळण्यासाठीच एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता आणा.
वैयक्तिक स्टॉक, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंड इ. मध्ये गुंतवणूक योग्य पर्याय आहेत.
३. उत्पनाचा अतिरिक्त स्रोत शोधा
मंदीसारख्या काळात एक धोका कायम असतो, तो म्हणजे आपली सध्याची नोकरी जाण्याचा. त्यामुळे आहे ती नोकरी टिकवणं हे तुमचं प्राथमिक उद्दिष्ट असलं पाहिजे.
पण हे करत असतानाच नोकरी जाण्याची शक्यता गृहीत धरून मार्केट मधील नवीन संधींचा शोध घेतला पाहिजे.
जेणेकरून ऐनवेळी नोकरी गमावण्याची वेळ आल्यानंतर शोधाशोध करावी लागणार नाही.
त्याचबरोबर आपली आर्थिक सुरक्षितता वाढवण्यासाठी उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग शोधा. उदाहरणार्थ ऑनलाईन बिजनेस वगैरे…
जरी तुम्ही महिन्याला ५०० किंवा १००० रुपयाचे देखील अतिरिक्त उत्पन्न मिळवले तरी भविष्यात याचा तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे..
अगदी त्याचप्रमाणे जेव्हा दुदैवाने तुमची नोकरी काही तेव्हा हेच पैसे तुम्हाला त्या संकटाचा सामना करण्यासाठी बळ देतील.
४. अतिरिक्त खर्चावर नियंत्रण आणा
जेव्हा आपले उत्पन्न कमी होते तेव्हा सगळ्यात मोठी अडचण म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवणे.
अशा स्थितीत मंदीला तोंड देण्याचा अंतिम मार्ग म्हणजे आपल्या उत्पन्नापैकी निश्चित खर्चावर नियंत्रण आणणे.
म्हणजे एखाद्या गोष्टींवरचा तुमचा मासिक खर्च १५०० रुपये असेल तर तुम्ही तो १००० करू शकता. टप्प्या टप्प्याने बचत, काटकसर रुजवू शकता.
यामध्ये वारंवार होणारी कपडे खरेदी, हॉटेलिंग इ. अनावश्यक खर्च टाळून या पैशांची केलेली बचत तुम्हाला भविष्यात कामी येईल.
५. कुटुंबियांसोबत चर्चा करा
परीवारातील सर्व व्यक्ती एकत्र बसून कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती व समस्या यावर चर्चा करा. कुटुंबातील प्रत्येकाचं याबाबत मत, दृष्टिकोन समजून घ्या.
त्याचबरोबर यावर काय काय उपाय करता येतील याची चाचपणी करा.
अशी बिकट आर्थिक स्वरूपातील परिस्थिती मुलांना आयुष्यात एक चांगला धडा देऊ शकते या दृष्टीतून या संकटाकडे संधी म्हणून बघा. अशा बिकट स्थिती मध्ये सर्वजण मिळून कसा सामना करायचा आणि संकटावर मात करायची याची शिकवण त्यांना यातून मिळेल.
६. आयुष्याची मजा घ्या
जेव्हा पैश्याची चणचण भासते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे मंदीमुळे येणाऱ्या मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी तुमच्या मनावर भीतीचा ताबा मिळवू देऊ नका.
आयुष्यात चढ-उतार येतच असतात तेव्हा जास्त ताण घेऊ नका.
कारण मानसिक तणावाचा परिणाम शरीरासोबतच नातेसंबंधावर पण होतो. मंदी आज आहे उद्या नसेल – पण –
अश्या काही दिवसांच्या/महिन्यांच्या समस्येचा, जास्तीचा तणाव घेऊन त्याचा कायमस्वरूपी परिणाम नातेसंबंधावर होणार नाही याची काळजी घ्या.
यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही एखादा छोटा प्रवास करू शकता.
निसर्गाच्या जवळ जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एकांत मिळेल. जिथे या धावपळीच्या जीवनातून काही काळ सुटका मिळेल.
संकटाचा जास्त विचार करण्यापेक्षा सध्य स्थितीत जे सध्या तुमच्याकडे आहे त्यासाठी देवाचे आभार माना. आणि जीवन आनंदाने व्यतीत करा.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.