आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: गुरुदत्त सोन्सुरकर
===
माणूस उत्तम आहे असं म्हणणं, बऱ्याच जणांना आवडणार नाही कारण माणूस अत्यंत खडूस आहे. म्हणूनच मला भयंकर आवडतो. प्यायला बसला की दिलदार. पण याला किक बसली की मग सगळ्यांनी निघायचं.
‘चलो निकलो’ म्हणून वस्कन मित्रांवर गुरकावणार. आणि मित्र म्हणजे आपले बंडू, पिंट्या नाही बरं का? एक आपला जम्पिंग जॅक जीतेंद्र आणि दुसरा हृतिक रोशनचा बाबा… मुकाट निघून जातात.
चिंटू तोंडाने फाटका असला तरी मनाने नाही हे त्याच्या जवळच्या सर्व लोकांना माहीत आहे. उगीच नाही नीतू सारखी सरदारनी त्याच्याबरोबर इतकी वर्षे टिकली.
“चिंटू बाहेर कितीही लफडी करू दे, पोटात दोन पेग गेले की गडी सगळं मला घरी येऊन सांगायचा” इति नीतू. ही सवय मी उचलली आहे असं माझी बाईल दोन दिवस अबोला संपला की सांगते.
कपूर लोकांचं मदिरा प्रेम जग जाहीर आहे.
माझ्या मित्राचा पुतण्या एका पंचतारांकित पार्टीत सर्व्ह करत होता. समोर लॉर्ड फाँटलर रॉय ऋषी कपूर. आमचं पोरगं त्याला इमानदारीत विचारतं झालं, “सर वूड यू लाईक सम ज्यूस ऑर मोकटेल?” सगळ्या जुहूला ऐकू जाईल इतक्या जोरात ऋषी गडगडला,
“ओ बच्चे, कपूर खानदान में किसीने ज्यूस पिया हो ये सुना हैं तुमने?”
आता हा मनुष्य ट्विटर वर असताना काय करेल? रणबीर पर्यंत पोहोचावं म्हणून त्याला गूळ लावणाऱ्या फटाकड्यांना तो वात न काढता, वाट न पाहता फोडून काढतो.
खुद्द तो आणि नीतू एका कार्यक्रमाला पोहोचले आणि नेमका तेव्हा रणबीर आला तेव्हा फोटोग्राफर्स नी धांदल केली, तेव्हा हा ओरडला,
“आरामात फोटो काढा. मला पण हवेत हे फोटोज. आजकाल साहाबजादे आम्हाला तरी कुठं भेटतात?”
रणबीर तेव्हा कॅट बरोबर लिव्ह इन मध्ये होता.
पण निव्वळ फटकळ, खडूस या पलीकडे हा माणूस एक उत्तम अभिनेता आहे, ज्याला दुर्दैवानं त्याच्या तेजीच्या काळात म्हणावे तेवढे आव्हानात्मक रोल्स नाही मिळाले आणि खैर जे मिळाले ते याने चाबूक वाजवले.
मग डफलीवाले असो की कर्ज मधला पुनर्जन्माच्या घेऱ्यात अडकलेला माँटी. कर्ज मध्ये तो हतबल होऊन प्राणला म्हणतो ‘ये अनहोनी मेरे साथ बिती हैं ये पहाड मेरे सरपे टूटा हैं’ तेव्हा प्रेक्षकांना तो बऱ्याच अंशी हा अतर्क्य आणि विचित्र प्लॉट आपल्या अभिनयाने गळी उतरवत असतो.
काका शशी प्रमाणे त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलं आहे, अमिताभ बरोबर काम केलं आहे पण तिथेही याने बच्चनच्या तोडीस तोड काम केलं आहे.
कपूर खानदानात कुणीच वाईट अभिनय करू शकत नाही…येस चिम्पू म्हणजे राजीव कपूर सुद्धा.
पण ऋषीला गाणी मस्त मिळाली त्यामानाने. काही काळ त्याला बेबी फेस, लेडी फेस म्हणून हिणवण्यात आलं. खन्नाची सद्दी बच्चनच्या angry young man ने संपवली होती. म्हणून बच्चनच्या सिनेमात कपूर घराण्यातले गोरे गोमटे, गोंडस पुरुष मुरांबा म्हणून तोंडी लावायला असायचे.
ऋषीने मारामारी करणं म्हणजे प्रेक्षकांना गोळा यायचा. चांगल्या घरातल्या पोराला कशापायी त्रास देता, त्या परीस त्याच्या मामा संग लढा असं लोकांना वाटणं साहजिक आहे. इथं मामा म्हणजे दैत्यासुर प्रेमनाथ.
पण या रोमँटिक इमेज ने ऋषीला लंबी रेस दौडवत ठेवलं हे खरं. त्यात त्याचा तो व्हेर्साची चे स्वेटर्स घालत केलेला विचित्र विक्रम- नव्या नायिकांना लाँच करणे. ही त्याच्या सुद्धा रोमँटिक हिरो म्हणून चलनी राहण्याची एक क्लुप्ती होती. अँड मुझे खुशी हैं के इट वर्कड हिज वे.
त्याच्या सिनेमाबद्दल काय बोलावं. बरेच हिट्स आहेत. बरेच एकसुरी रोल्स आहेत पण याला बघायला कधीही कंटाळा येत नाही. याच्या काकालोकांसारखा हा पण टवटवीत असतो पडद्यावर.
ऋषी आणि आरडी ची गाणी लावा पार्टीमध्ये नाय रंग भरला तर सांगा. आमची मुलं हृतिकच्या इट्स मॅजिक वर नाचायची तसे आम्ही ऊ दिल लेना खेल हैं दिलदार का म्हणत गुडघे फोडून घ्यायचो.
ऋषीची हिरो म्हणून कारकीर्द उताराला लागली आणि नासिर हुसेन साहेब दुःखाने उद्गारले, “शेवटचा रोमँटिक नायक उतरला. आता मी सिनेमे कसे बनवू?”
पण ऋषीने त्या नंतरही बोल राधा बोल आणि दिवाना हे सुपरहिट दिलेच. मला त्याचा बोल राधा मधला डबल रोल मधला क्रिमिनल त्याने ज्या सटल पद्धतीत केलाय फार आवडतो. द्विधाता नावाच्या प्राचीन मालिकेत विक्रम गोखले सरांनी असा स्टायलिश डबल रोल केला होता.
सनी बाबाने मध्यंतरात येऊनही खाऊन टाकलेल्या दामिनी मध्ये, कुटुंब आणि सत्याची कास धरणारी पत्नी यात कुचंबणा झालेला शेखर गुप्ता कोण विसरेल?
खेल खेल में मध्ये प्रचंड तणावात असलेले नीतू आणि ऋषी जेव्हा इफ्तेकार ला कबुली देतात, व इफ्तेकार त्यांना दिलासा देतो तेव्हा ऋषीच्या डोळ्यात पाणी तरळत.
तो ज्या पद्धतीने “आय ट्रस्ट यू सर, आय ट्रस्ट यू” म्हणतो, यकीन मानीये तिकडे प्रेक्षकांनी ही सुस्कारा सोडला असतो. हा माणूस प्रतिभावक्रियांचा बाप आहे. Reactions.
अग्नीपथच्या रिमेक मध्ये त्याचंच पात्र मूळ कथेत नसताना जोडण्यात आलं आणि रौफ लाला तुफान हिट झाला. अंगाने गब्दूल, गोरा गोमटा असलेला फक्त सुरमा घातलेल्या डोळ्यांनी जी हिंसा करतो… डुग्गुचा विजय चौहानच काय संजूचा कांचा चिना, पानी कम वाटतो तेव्हा…
होप ८६ या इंडस्ट्रीच्या ब्रेबोर्न स्टेडियमवरील कार्यक्रमात अमिताभ आणि जॉनी लिव्हर पाठोपाठ हिट आयटम होता चिंटूचे डान्स, त्याच्या सुपरहिट गाण्यांवर. समोर बसलेल्या राज आणि कृष्णा कपूरच्या डोळ्यांत पाणी आलं होतं म्हणतात.
दुर्दव की त्याला अमेरिकेला कर्करोगाच्या उपचारासाठी पाठवलं आणि इकडे कृष्णा कपूर यांचं देहावसान झालं. आता तो बरा होतोय म्हणतात. बरा होऊ दे. आमचे खूप लोकांचे आशीर्वाद, शुभेच्छा आहेत.
स्पष्टवक्तेपणा वस्तुनिष्ठ असावा, व्यक्तिनिष्ठ नव्हे हे मी नक्कीच चिंटू उर्फ ऋषीराज कपूर याच्या कडून शिकलोय.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.