इम्रान खान आणि पाक आर्मी संबंधांची, एका पाक मंत्र्यानेच “पोलखोल” केलीये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री शेख रशीद अहमद म्हणाले की, काश्मीर मुद्द्यावरून पंतप्रधान इम्रान खान यांनी अणु हल्ल्याची धमकी दिली आहे कारण, यासाठीच पाक लष्कराने त्यांना पंतप्रधान पदावर बसवले आहे.
खरे तर भारत हे कधीपासून सांगत आहे. जगानेदेखील हे केंव्हाच मान्य केले आहे. पण, पाकिस्तान सरकारला मात्र आत्तापर्यंत हे मान्य करताना लाज वाटत होती की, त्यांचे सरकार लष्कराच्या हाताचे बाहुले आहे.
त्यांच्या देशात पाकिस्तानी लष्कर हा पाकिस्तान सरकारचा बॉस आहे.
आता इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शेख रशीद अहमद यांनी याबाबत उघडपणे कबुली दिलेली आहे की, त्यांना पाकिस्तान लष्करानेच भारताविरोधात युद्धाची भाषा बोलण्यासाठी उभे करण्यात आले आहे.
नानकाना साहिब या शिखांच्या पवित्र धर्मस्थळी बोलताना, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद म्हणाले,
“मी इथे युद्धाची भाषा करत आहे कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्थानला उध्वस्त करण्याच्या हेतूनेच सत्तेवर आलेले आहेत. युद्धाच्या तयारीविषयी बोलण्यासाठीच मला पाकिस्तान लष्कराने सत्तेत ठेवले आहे. अगदी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने मी हे बोलत आहे. पाकिस्तानकडे सध्या स्मार्ट बॉम्ब उपलब्ध आहेत.”
इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री रशीद म्हणाले की पाकिस्तानकडे १२५ ग्रॅम आणि २५० ग्रॅम वजनाचे छोटे छोटे बॉम्ब तयार आहेत, जे भारतावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येतील.
गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तान लष्कराकडून भारताला धमकावणारी अशा पद्धतीची भाषा वापरली जात आहे.
ज्या ज्या देशांनी पाकिस्तानला भारताशी शांतता पूर्ण संबंध ठेवण्याविषयी सूचना दिल्या त्या सर्व देशांना पाकिस्तानी लष्कराच्या अवकृपा दृष्टीला सामोरे जावे लागले आहे.
देशातील राजकीय सत्तेची लालसा सोडण्यास हे लष्कर अजिबात तयार नाही ज्यांनी देशात किमान चार वेळा तरी थेट लष्करी शासन राबवलेले आहे. पाकिस्तान लष्कराने तीन वेळा पाकिस्तानमध्ये थेट सत्ता गाजवली आहे, १९५८-१९७१, १९७७-१९८८ आणि १९९९-२००८ अशा तीन टप्प्यांमध्ये त्यांनी थेट सत्ता हाती घेतलेली आहे.
याशिवाय १९५३ आणि १९५६ पर्यंतच्या काळातील सरकारवर देखील लष्कराचे नियंत्रण होते. म्हणजे एकूण ७२ वर्षांपैकी तब्बल ३८ वर्षे तिथे लष्करी सत्ता होती.
त्यामुळेच पाकिस्तानचे काश्मिर आणि भारताविषयीचे धोरण हे त्याच्या लष्कराच्या मर्जीवरच अवलंबून असते.
इम्रान खानच्या रूपाने देखील लष्कराला त्यांच्या इच्छेनुसार वागणारा सहकारी भेटला आहे. जसे त्याच्या काही पूर्वसुरींनी केले त्याचप्रमाणे तो देखील लष्कराच्या हातचे बाहुले बनला आहे.
पाकिस्तान लष्कर, पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्री सातत्याने भडकावू विधाने करत असून त्यांच्या वक्तव्यातून युद्धाबाबतची स्पष्ट दर्पोक्ती दिसत आहे.
त्याच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार म्हणाले,
“या सगळ्या वक्तव्यावरून पाकिस्तानची नेमकी खेळी काय आहे ते सगळ्या जगाला पाहता येईल.”
रशीद यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान मोदी म्हणाले की,
भारत आणि पाकिस्तान हे १९४७ पूर्वी एकच देश होते. त्यामुळे आपल्यातील वादावर आपण चर्चेने आणि सामंजस्याने तोडगा काढू शकतो.
गेल्या महिन्यात भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचे विशेष हक्क तहकूब करून या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. या निर्णयाने पाकिस्तानच्या हक्कांवर भारताने अतिक्रमण केल्याच्या निषेधासाठी पाकिस्तान सरकारने याबबत आपला निषेध व्यक्त करण्यासाठी एक रॅली आयोजित केली होती.
या रॅली दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते. त्याचवेळी अचानक त्यांना विजेचा सौम्य झटका देखील बसला.
त्यामुळे काही काळ त्यांचे भाषण थांबवण्यात आले. काश्मीर मधील फुटीरतावाद्यांना सहानुभूती म्हणून पाकिस्तानने शुक्रवारी काश्मीर तास देखील पाळला.
यावेळी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रशीद यांचे भाषण ऐकू येतेय ज्यामध्ये ते म्हणतात,
“हम तुम्हारी, मोदी नियतोंसे वाकीफ हैं”
याच वेळी त्यांना करंट लागल्याने त्यांचे भाषण थांबवण्यात आले.
पुन्हा काही वेळाने त्यांचे भाषण सुरु झाल्यावर ते म्हणतात, “करंट लग गया. खैर, कोई बात नाही. मेरा खयाल है, करंट आ गया. ये मोदी इस जलसे को नाकाम नाही कर सकता.”
५ ऑगस्ट रोजी मोदी सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा अध्यक्षीय हुकुम काढला, ज्यानुसार जम्मू आणि काश्मीर राज्याला भारतीय संविधानानुसार काही विशेष अधिकार देण्यात आले होते ते रद्द करण्यात आले.
याचवेळी राज्याची पुनर्रचना करण्याचा कायदा देखील मोदी सरकारने संमत करून घेतला. या कायद्यानुसार जम्मू आणि काश्मीरचे दोन भाग करण्यात आले.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याबद्दल पाकिस्तानला हरकत नोंदवली आहे आणि तेंव्हापासून ते भारताविरोधात आक्रमकरित्या निषेध व्यक्त करणारी विधाने करत आहेत.
अंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या दर्पोक्तीची थोडीफार दखल घेण्यात आली आहे.
खरे तर, १९४७ नंतर हल्ला करून जम्मू आणि काश्मीरचा जो भूभाग पाकिस्तानने जिंकून घेतला होता त्याचे विशेषाधिकार, १९७० मध्ये पाकिस्तानने अशाच पद्धतीने रद्द केले होते, याची आठवण करणे देखील यावेळी अवश्यक आहे.
काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाविरोधात त्यांना आंतरराष्ट्रीय पाठींबा मिळत नसल्याने हताश होऊन पाकिस्तान अशा पद्धतीची युद्धाची चेतावणी देणारी भाषा वापरत आहे. गेली कित्येक वर्षे त्यांनी अशाच पद्धतीचे धोरण अवलंबलेले आहे.
अगदी पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूयॉर्क टाईम्स मध्ये याबाबत एक अग्रलेख देखील लिहिला आहे. ज्यामध्ये ते लिहितात,
“काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान “लष्करी संघर्ष” देखील होऊ शकतो, ज्याचे परिणाम संपूर्ण जगला भोगावे लागू शकतात.”
इम्रान खान यांचा हा अग्रलेख जेंव्हा प्रसिद्ध झाला तेंव्हा, अनेकांनी असाच विचार केला की, त्यांनी या अग्रलेखातून जे काही सांगितले आहे, ते त्यांचे मत नसून त्यांच्या तोंडून वदवून घेणारा त्यांचा धनी दुसरा कोणीतरी आहे.
परंतु, आत्ता रशीद यांच्या या वक्तव्या वरून इम्रान खान यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे, हे अगदी नि:संशय सिद्ध झाले आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.