' वाहन क्षेत्रात मंदीच्या बातम्या वाचल्या? आता वाचा- ‘टाटा-इसरो’च्या प्रदूषणमुक्त हायड्रोजन बसबद्दल! – InMarathi

वाहन क्षेत्रात मंदीच्या बातम्या वाचल्या? आता वाचा- ‘टाटा-इसरो’च्या प्रदूषणमुक्त हायड्रोजन बसबद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मिठापासून मोटार पर्यंत सर्व प्रकारचे उत्पादन देणारी कंपनी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या टाटाने आता आणली आहे हायड्रोजन बस!

या बसचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे हवाप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण अशा दोन्ही प्रदूषणाला आळा बसू शकतो.

टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल या दोन कंपन्यांनी मिळून ही बस प्रत्यक्षात आणण्याची धडपड सुरु केली आहे. परंतु, या बसच्या काही चाचण्या झाल्यानंतरच ही बस सगळीकडे वापरात आणली जाईल.

ही बस जेंव्हा प्रत्यक्ष भारतीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग बनेल तेंव्हा अक्षरश: देशात एक वेगळी क्रांती घडलेली असेल.

नवी हायड्रोजन फ्युएल सेल असणारी ही टाटा स्टार बस धूर किंवा आवाज न करता चालू शकते. इतर वाहनांप्रमाणे यातून धूर किंवा कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जित न होता पाणी आणि उष्णता उत्सर्जित केली जाईल.

 

tata moters inmarathi
tatamotors.com

 

या बसमुळे हवेचे प्रदूषण किंवा ध्वनिप्रदूषण देखील आटोक्यात येणार आहे, कारण ही बस चालवताना आवाज देखील होत नाही.

टाटा स्टार बस फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल पॉवर वापरण्यात आली आहे, जी ११४ एचपी आणि इलेक्ट्रिक प्रोपल्जन मोटार जी २५० एचपी बनवते. या बसमध्ये एकावेळी ३० प्रवासी बसू शकतील इतकी याची क्षमता आहे.

साधारण बसेस मधील पारंपारिक कम्बशन इंजिन्स रासायनिक उर्जेचे शक्तीमध्ये रूपांतरण करण्यासाठी २०% उपयुक्त ठरतात तिथे स्टार बस फ्युएल सेल अशा पद्धतीचे ४०-६०% रूपांतरण करू शकतात.

म्हणजे साधारण इंजिनच्या तिप्पट याची कार्यक्षमता आहे. त्यामुळे स्टार बस फ्युएल सेलमध्ये इंधनाची ५०% बचत होते.

स्टार बस फ्युएल सेल मधून कोणत्याही प्रकारचे उत्सर्जन होणार नाही त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी या बस अगदी उत्तम पर्याय ठरू शकतात.

 

buses inmarathi
chargeupindia.com

 

टाटाने या बस डिझाईन करण्यामध्ये इसरोची देखील भागीदारी आहे.

या प्रोजेक्टसाठी विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पुनर्वापर उर्जा मंत्रालयाकडून अंशतः अनुदान मिळाले.

हायड्रोजन फ्युएल सेल टेकसाठी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे इंडियन ऑईलच्या आर अँड डी या देशातील पहिल्या हायड्रोजन डीस्पेन्सिंग फॅसिलिटी येथे या बसचे इंधन पुनर्भरण होऊ शकते.

या बसची कार्यक्षमता आणि मजबुती दोन्ही समजून घेण्यासाठी, या दोन्ही कंपन्या टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल हायड्रोजन फ्युएल सेल बसची चाचणी करत आहेत.

या नव्या संशोधनाच्या माध्यमातून वाहतुकीसाठी स्वच्छ आणि नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

या प्रोजेक्टच्या माध्यमातून भारत सरकारच्या मेक इन इंडिया या नव्या धोरणाची चुणूक जाणवते.

देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी टाटा मोटर्स सारखी कंपनी स्वच्छ आणि धूरविरहित बस आणण्याचा प्रयत्न करत आहे. वोल्वो आणि मर्सिडीज सारख्या आरामदायी बस पाहिल्यानंतर टाटा मोटर्सने स्वच्छ पर्यावरणाचा ध्यास घेत अशा प्रकारची बस बनवण्याचे ठरवले.

 

tata moters inmarathi
stackpathdns.com

 

हायड्रोजन फ्युएल सेल टेकवर चालणाऱ्या बसेस अनेक देशांमध्ये प्रत्यक्षात वापरात आल्या आहेत. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेत अशा प्रकारच्या १०० बसेसचा समावेश आहे.

फ्युएल सेल बॅटरीप्रमाणेच काम करत असली तरी, तिला चार्जिंग करण्याची गरज नाही. या सेलला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतर यातून पाणी आणि उष्णतेचे उत्सर्जन होते.

टाटा मोटर्सने आपल्या पुण्यातील सेंटर मधून या वर्षाच्या जानेवारीमध्ये पहिल्यांदा हायड्रोजन फ्युएल बसचे उद्घाटन केले.

कंपनीने स्टारबस इलेक्ट्रिक 9m, स्टारबस इलेक्ट्रिक 12m, स्टारबस हायब्रीड 12m या रेंजच्या बसेस सुरुवातीलाच आणल्या होत्या. ज्या पर्यायी इंधनापासून चालवल्या जातील आणि त्यानुसारच डिझाईन करण्यात आल्या आहेत.

कमीतकमी उत्सर्जन करणाऱ्या या बसेसच्या माध्यमातून टाटा मोटर्सने हरित तंत्रज्ञान आणि वाहतूक समस्येवर पर्याय म्हणून या बसेसची निर्मिती केली आहे. भारतातील स्मार्ट सिटीज मध्ये अंतर्गत वाहतुकीसाठी या बस अगदी उत्तम पर्याय ठरतील असे कंपनीचे मत आहे.

 

greenary inmarathi
ytimg.com

 

गेल्याच वर्षी कंपनीने मुंबई मेट्रोपॉलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटीशी करार करून हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेहिकल टेक्नॉलॉजीची ऑर्डर मिळवली असून यामध्ये २५ स्टारबस डीझेल हायब्रीड इलेक्ट्रिक बस पुरवण्याचा करार केला आहे.

कंपनीने मुंबई, अहमदाबाद आणि सुरत सारख्या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर सीएनजी बसेसची देखील चाचणी केलेली आहे. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळी नवी दिल्लीमध्ये या बसेसचा वापर करण्यात आला होता.

“गाड्यांमधून जास्त प्रमाणावर कार्बनडाय ऑक्साईड निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे मोटार उत्पादन बनवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.

या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करून आम्हाला बाजारपेठेत देखील महत्वाचे स्थान मिळवायचे आहे.” अशी माहिती टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेहिकल-चे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर रवींद्र पिशारोडी यांनी दिली.

त्यांनी सांगितले की,

“भविष्यातील गरजा ओळखून त्यानुसार आम्ही सार्वजनिक वाहतुकीला नवीन पर्याय देऊ इच्छित आहोत, ज्यामुळे सार्वजनीक वाहतूक क्षेत्रात आम्हाला एक ठोस भूमिका बजावता येईल. याद्वारे नफ्यासोबतच शाश्वत विकासातही आमचा हातभार असेल आणि या दोन्हीत योग्य समतोल साधला जाईल अशी आम्हाला आशा आहे.”

 

public transport inmarathi
hindustantimes.com

 

टाटा मोटर्सच्या या नवीन बसेस मुळे पेट्रोल आणि डीझेल सारख्या महागड्या इंधनाला एक पर्याय देखील उपलब्ध होईल. शिवाय कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाल्यास प्रदूषणाला आळा बसेल.

भारतातील अनेक मेट्रो सिटीमध्ये प्रदुषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. या ठिकाणी गाड्यांमधून निघणारा धूर हाच प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा महत्वाचा घटक असल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे अशा ठिकाणी कमी उत्सर्जन करणारी वाहने वापरणे ही काळाची गरज आहे. अशा स्थितीत टाटा मोटर्स, इंडियन ऑईल आणि इसरोच्या या नाविन्य पूर्ण कल्पनेचे दिलसे स्वागत झाले पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?