आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सध्या चालू असलेल्या ऍशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दणदणीत शतक ठोकलं आहे. त्याच्या या खेळीमुळे या सिरीजमध्ये इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मालिकेत बेन स्टोक्सने केलेल्या शतकी खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.
या आधीही यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या खेळीने इंग्लंडला इतिहासात पहिल्यांदा विश्वचषक जिंकता आला. त्याची ही कामगिरी पाहता सध्या तो प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आहे.
बेनच्या या यशानंतर आयसीसीने त्याचा ‘सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू’ म्हणून गौरव केला आणि वादाला तोंड फुटले. सचिनच्या चाहत्यांना काही हे आवडले नाही.
सचिनला डावलून बेन स्टोक्सला सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू म्हणून गौरवण्याच्या आयसीसीच्या उतावळेपणावर सचिनच्या चाहत्यांनी ताशेरे ओढले आहेत.
ट्विटरवरील अनेक प्रतिक्रिया पाहता सचिनच्या चाहत्यांचा आयसीसीवरचा रोष दिसून येतो.
बेन स्टोक्सची स्तुती करणारं आयसीसीचं हे ट्विट पहा…
२८ ऑगस्ट म्हणजे कालच्या या ट्विटवर एका चाहत्याने बेन आणि सचिन यांच्या आकडेवारीची तुलना करत सचिन त्याच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले आहे.
या ट्विटमध्ये आयसीसीला रिप्लाय करताना सचिनचा चाहता म्हणतो,
“सचिनचे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे १५,९२१ आणि १८,४२६ रन्स आहेत. त्याच्या तुलनेत बेन स्टोक्सचे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ३४७६ आणि २६२८ रन्स आहेत. या दोघांची तुलना कशी होऊ शकते? बाकी शतकांच्या संख्येबद्दल तर न बोललेलेच बरे.”
तौकीर अहमद नावाचा एक चाहता म्हणतो,
“सचिन केव्हाही बेन स्टोक्स पेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. ९०च्या दशकाच्या शेवटी शेवटी संपूर्ण भारतीय संघाची मदार सचिनने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. फक्त त्यावेळी त्याचं कौतुक करायला ट्विटर अस्तित्वात नव्हतं.”
सचिनच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाशी आपण सर्व परिचित आहोत. अनेक सामने अनेक वेळा सचिनच्या फलंदाजीमुळे भारत जिंकू शकला. सातत्य हा त्याचा गुण आज क्वचित एखाद्या फलंदाजात आढळतो.
एका चाहत्याने तर एक फोटो शेअर करत आयसीसीची खिल्ली उडवली आहे.
एका व्यक्तीने बेन स्टोक्सची खेळी चांगली झाली असली तरी इंग्लंडच्या विजयात दर्जाहीन अम्पायरिंगचा वाटा जास्त असल्याचे म्हटले आहे. बेन स्टोक्सला बेस्ट प्लेअर अनाकलनीय असल्याचे तो म्हणतो.
एक चाहता म्हणतो,
फक्त तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही बेन स्टोक्सला सचिनपेक्षा उत्तम खेळाडू म्हणून मान्य करू या भ्रमात राहू नका. सचिन हाच क्रिकेटमधी सर्वोत्कृष्ठ खेळाडू आहे आणि बाकी सर्वांची नावं त्यानंतर येतात.
चाहत्यांच्या या प्रतीक्रिया पाहता बेन्स स्टोक्सची तुलना सचिन तेंडुलकरची करणं त्यांना रुचलेलं नाही. आयसीसी यावरून कालपासून ट्रॉल होते आहे. एखाद्या खेळाडूला फार विचार न करता ‘ऑल टाइम ग्रेट’ ठरवण्याची घाई आयसीसीने केली यात काही शंका नाही.
बेन स्टोक्स हा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात होऊन फार वर्षे झालेली नाहीत.
त्याचे रन्स, विकेट्स यांची आकडेवारी सचिनच्या आसपासही जात नाही. खेळातील सातत्य हा सचिनच्या ठायी असलेला अनन्यसाधारण गुण बेन स्टोककडे नाही, त्यामुळे येत्या काळात आयसीसीने केलेल्या या कौतुकाला बेन किती न्याय देतो हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.