आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
तेव्हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी ( म्हणजे वेगळ्याप्रकारे सांगायचे तर टी.व्ही.आणि सोशल मिडीयावर) आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसून/ डाचून रहात होती. ती म्हणजे नोटाबंदी!
काय अभूतपूर्व परिस्थिती! दिवाळी नंतर शिमगा लगेचच यावा आणि सर्वत्र धुळवड साजरी व्हावी असे चित्र. महामहीम पंतप्रधान मोदीशेठ ह्यांचे परम भक्त आणि परम शत्रू, सगळेच डोके गमावलेल्या मुरार बाजी प्रमाणे थैमान घालताना दिसत होते.
बरे दोघांना ही सर्वसामान्य जनतेच्या हालाची, तिच्या देशभक्तीची, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची काळजी, आमचे तर अतिसामान्य मन, आणि त्याहूनही अतिसामान्य मती गुंगच झाली.
आता आम्ही अतिसामान्य बुद्धीमत्तेचे, त्यामुळे आमचा मित्र परिवारही अतिसामान्य बुद्धीमत्तेचा! दर शनिवारी आम्ही असेच भेटतो जेवणानंतर, गप्पा मारायला ( फक्त गप्पाच मारायला बरं, इतर काही धंदे करायला आम्ही उच्च (सामान्य) वर्गीय थोडेच आहोत.)
ह्या आमच्या ग्रुप मध्ये एक सचिन कडू म्हणून शालेय मित्र आहे. आता हा सुद्धा सामान्य माणूस, लोकांच्या घराची इलेक्ट्रिक वायरिंगची कामं करतो. तो सांगत होता, हे मोदी शेठनी नोटाबंदी केली आणि त्याच्या अनेक ग्राहकांनी जुनी थकलेली बिल अगदी घरी आणून दिली.
हा त्यांच्याकडे खेटे मार मारून थकला होता. आता हा काय आणि ह्याचे ग्राहक काय दोघेही सर्व सामान्य नागरिक. पण काळ कठीण आला आणि माणसांमधले प्रामाणिकपणाचे स्वच्छ निर्मळ पाणी उफाळून आले.
ह्या गरीब बिचाऱ्या इलेक्ट्रिकची कामे करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या माणसाचे कसे व्हायचे ह्या विवंचनेतून त्याच्या जुन्या ग्राहकांनी स्वतःच्या पोटाला आणि कशाकशाला चिमटा घेऊन ह्याची थकलेली बिलं दिली आणि हा तरला की राव!
कोण म्हणतो जगात माणुसकी नाही? नाहीतर एरवी का त्यांच्याकडे पैसे अगदी पडून होते त्याला द्यायला, असतात का सामान्य माणसाकडे असे पैसे पडून. सामान्य माणूस काय जाणून बुजून बिल थकवतो का? काल तोंड फाटे पर्यंत स्तुती करीत होता मोदीशेटची!
असा राग आला मला, शेवटी अति सामान्य तो अतिसामान्यच राहायचा हा. अरे भाऊ स्वतःच्या अनुभवावरून जग ठरवणारा मागास आणि असंवेदनशील असतो, कधी न दिसणाऱ्या, न अनुभवायला मिळणाऱ्या दु:खाचे जो कढ आणतो आणि त्याचे टाहो फोडतो तो खरा पुरोगामी!
आमच्या ह्या ग्रुप मध्ये एक असामान्य असामी ( बुद्धिमत्तेने सुद्धा) आहे बरं का! म्हणजे वाड वडिलांनी भरपूर जमीन जुमला गोळा करून ठेवली आहे. काही म्हणजे काही करायची गरज नाही (आणि नाहीच करत काहीही काम धंदा, मग काय कुणाची भीती आहे का?)
पण कामधंदा करीत नसला तरी समाज कार्य भरपूर करतो बरं! ४-५ भिश्या चालवतो. त्या पण २०-२०, ३०-३० हजारांच्या! गरीब गुरीब लोकांना, ज्यांच्याकडे गॅस जोडणी घ्यायला पैसे/ कागदपत्रे नसतात, त्यांना स्वतःच्या खिशाला खार लावून ग्यास च्या टाक्या पुरवतो.
ह्याचं अख्ख घराणंच समाजसेवी बरं का! त्याचा एक भाऊ गरिबांना परवडेल अशी घर बांधतो. उगाच शासकीय परवानग्या बिरवानाग्या असल्या फंदात पाडून सामान्य जनतेच्या डोक्याला ताप देत नाही. लोकांना राहायला घर पाहिजे स्वस्तात, ती पुरवणे ही समाजसेवा!
काय समजले! आणि निर्मल मनाने समाजसेवा करायला काय नियम/ कायदा आड येत नाही. आमच्या कॉलनितल्या कित्येक बायका पण अशाच सहृदय समाजसेवी! घराघरात भिशी चालवायची, एकमेकींना मदत करायची. बिच्चाऱ्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगार!
सुशिक्षित बेरोजगार नागरिकांचा प्रश्न किती गंभीर आहे! सरकार तिथे काही करायचे सोडून ही कसली नोटाबंदी करत आहे काही कळत नाही.
पण बघा ह्या नोटाबंदी मुळे ह्या सगळ्या लोकांना रोख रक्कम मिळणे किती दुरापास्त झाले आहे. कशा चालणार भिश्या? कशी उभी राहणार स्वस्तातली घरं? कशी निघणार घरगुती पाळणाघर, ब्युटी पार्लरं आणि शिकवण्या? कशी चालणार अर्थव्यवस्था? मंदी येणार मंदी (आर्थिक मंदी म्हणतोय, मंदाकिनी चा shortform नाही.)
ह्या निमित्ताने मागे एकदा एका बऱ्यापैकी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याशी झालेला संवाद आठवला तो इथे लिहीला आहे. अगदीच अप्रस्तुत ठरणार नाही. परवानगी घेतली नाही म्हणून नाव घेत नाही, नाहीतर खाली लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे, आईशप्पथ!
तर हे बऱ्यापैकी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. चॅनेल वरील चर्चेत बऱ्याचदा असतात. काही कारणाने त्यांच्याशी ओळख निघाली, भेट झाली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना दुष्काळ आणि शेतकऱ्यांची अवस्था यावर बोलण्याचा विषय आला.
त्यांनी सांगितलं, “तुम्हा शहरातल्या लोकांना फारसं माहित नसतं. टी.व्ही. वर जे दाखवतात तेवढंच तुम्हाला दिसत असतं. मी हल्लीच एका वृत्त वाहिनी बरोबर मराठवाड्यातल्या एका दुष्काळी गावात ष्टोरी कवर करायला गेलो होतो.
तिथे शेतकऱ्यांची हलाखी, शासनाची उदासीनता वगैरे सगळ साद्यंत दाखवून झाले. दारिद्र्याने, नापिकीने, वसुली अधिकाऱ्यांनी पिडलेल्या, अभागी शेतकऱ्यांच्या मुलाखती वगैरे झाल्या. मग मी त्या युनिट मधल्या पोरांना म्हटले चला गावात जाऊ.”
“गावात एक मंगल कार्यालय होते. तिथल्या माणसाने मला ओळखून नमस्कार केला. मी म्हटले, “कसा काय धंदा? दुष्काळामुळे अगदी बंद पडला असेल ना?” तो म्हटला, “छे! जोरात चालू आहे.
आजकाल धुमधडाक्यात लोक लग्नच काय बारसं, वाढदिवस, सत्यनारायण सगळ करतात.” माझ्याबरोबरची पोरं चमकली, मी म्हटलं, “आणि पाणी कुठनं आणता?
तो म्हणाला टँकर बोलावतो, पैसे दिले की मिळतो आणि लोक पैसे देतात.” मी विस्मयाने म्हणालो, “म्हणजे लोकांकडे सणवार, लग्न धुमधडाक्यात करायला पैसे आहेत बँकेची कर्जफेड करायला नाहीत.
“तो म्हणालो, “तसं नाही साहेब, लोक कर्ज काढूनच हे करतात आणि कर्ज फेडत नाहीत ऐपत असो वा नसो. वसुली करायला लोक आले तर तुम्ही आहातच की!” म्हटलं बर, “गावात दारूच दुकान नसेल? लोकांकडे काम नाही, पैसा नाही, अन्न नाही दारू कुठून पिणार?” तो म्हटला.
“ते का? ३ बार आणि एक देशी दारूची भट्टी आहे आणि जोरात चालते” आणि म्हणलं, “मोबाईल? तो आहे का?” तो म्हटला, “आहे की, प्रत्येकाकडे मोबाईल, डीश टी.व्ही. सगळं आहे.”
मग म्हटलं, “घरात संडास आहे का?” तर तो मात्र नाही बहुसंख्य लोक शौचाला उघड्यावरच जातात आणि जाताना स्मार्टफोन घेऊन जातात, गाणी लावून बसतात. म्हणजे मागाहून जागा शोधात येणाऱ्या माणसाला कळतं की इथे कुणीतरी आधीच बसलाय जागा अडवून.
गावात शाळा एकच ती पण नीट भरत नाही. इमारत गळकी, पडकी पण ती मात्र सरकारी अनास्था! घरात पुस्तक सोडा, वर्तमानपत्रसुद्धा येत नाही पूर्वी कागदात बांधून जिन्नस येत तेवढे तरी कागदाचे कपटे येत, आता पातळ कॅरीब्यागा येतात. दुष्काळ फक्त पावसाचा, सरकारच्या आस्थेचा नाही तर लोकांच्या विवेकाचा फार मोठा आहे.
मी म्हटलं, “मला हे सगळ सांगताना तुम्हाला भीती नाही वाटत मी हे कुणाला तरी सांगेल. तो म्हटला वेडा आहेस. त्या चॅनेलच्या पोरांना मी जे सांगितलं तेच तुला पण सांगतो.
मिडिया मधल्या लोकांना हे सगळ माहिती आहे. हे सत्य दाखवून काही होणार नाही तो चॅनेल वाला असहिष्णू, भांडवलदारांचा कुत्रा वगैरे होईल आणि तुला कोणी विचारणार नाही. हे असच चालणार….”
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.