' वयाच्या १६व्या वर्षी ऐकू येणं बंद झालं, तापाने फणफणत परीक्षा दिली… पण शेवटी ती आयएएस झालीच! – InMarathi

वयाच्या १६व्या वर्षी ऐकू येणं बंद झालं, तापाने फणफणत परीक्षा दिली… पण शेवटी ती आयएएस झालीच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===  

आयएएसची परीक्षा भारतातल्या सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. आयएएस होण्याचं स्वप्नं अनेक तरुण बघतात. लोक वर्षानुवर्षे आयएएससाठी दिवसरात्र एक करून अभ्यास करतात तरीही पहिल्या प्रयत्नात यश मिळतंच असं नाही.

दोन तीन अटेम्प्ट केल्यानंतर, प्रचंड मेहनत घेतल्यानंतर लोकांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण होते. त्यासाठी जीव तोडून मेहनत घेतात. पण आयएएस होणे इतके सोपे नाही.

त्यासाठी मेहनत आणि कष्ट तर लागतातच शिवाय अंगात चिकाटी लागते आणि सगळ्यात महत्वाची असते ती तुमची जिद्द. ह्या जिद्दीमुळेच अशक्य गोष्टी शक्य करून दाखवता येतात.

पण दिल्लीच्या सौम्या शर्मा हिने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी पहिल्या अटेम्प्टमध्येच आयएएस परीक्षेत नववा क्रमांक मिळवण्याची कामगिरी करून दाखवली.

परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तिच्याकडे फक्त चार महिन्यांचा कालावधी होता. फक्त चार महिन्यात तिने प्रचंड अभ्यास करून अशक्य ते शक्य करून दाखवले.

IAS office InMarathi

 

खरं तर सौम्याला श्रवणयंत्र लावल्याशिवाय ऐकायला येत नाही. तरीही तिने तिच्या अभ्यासात कुठेही कमतरता ठेवली नाही आणि जिद्दीने हे यश मिळवून दाखवले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी एका गंभीर आजारामुळे तिच्या दोन्ही कानांची श्रवणशक्तीच गेली.

ऐकू न येणे ही अतिशय गंभीर समस्या आयुष्यात उद्भवून सुद्धा सौम्याने हार मानली नाही. खरं तर कर्णबधिर असल्याने ती आरक्षणाचा लाभ घेऊ शकत होती पण तिला तिच्या गुणवत्तेच्या जोरावरच हे यश मिळवायचे होते.

सौम्या लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने अभ्यासात पहिला दुसरा क्रमांक कधीच सोडला नाही. शाळेत तर बहुतांश वेळेला तिचा पहिलाच क्रमांक असायचा.

सौम्याने आयएएससाठी प्रयत्न करायचे ठरवले तेव्हा तिने कुठलीही शिकवणी किंवा कोचिंगची मदत घेतली नाही. सगळं अभ्यास तिचा तिनेच केला. इतका अभ्यास करून देखील ऐनवेळी परीक्षा सुरु असताना ती आजारी पडली.

तिला व्हायरल फिवरचा त्रास झाला आणि त्यात तापाने फणफणलेली असताना तिने सगळी परीक्षा दिली.

 

CSE-009-saumya-law Inmarathi

सौम्याची तब्येत तेव्हा इतकी बिघडली होती की तिच्या घरच्यांना अशी चिंता वाटत होती की सकाळी उठू तरी शकेल की नाही आणि परीक्षेला बसू शकेल की नाही? पण तिची इच्छाशक्ती इतकी जास्त होती की तिने अंगात भरपूर ताप असताना देखील परीक्षा दिली.

दोन पेपरच्या दरम्यान असलेल्या जेवणाच्या सुट्टीत तिच्या गाडीत तिला सलाईन लावावे लागले. हे करताना तिला प्रचंड त्रास झाला. आजारपण आणि त्यात अशक्तपणा त्यामुळे परीक्षेच्या वेळेला ती बेशुद्ध पडता पडता वाचली होती.

पण आजारपणामुळे मागे राहणे किंवा थांबणे तिला पसंत नव्हते. सौम्या म्हणते की मी ,”एका तापामुळे मी माझ्या सगळ्या मेहनतीवर नक्कीच पाणी फिरू देणार नव्हते.

मी ह्या परीक्षेसाठी जो अभ्यास केला होता तो वाया जाऊ देण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मी देवाचे आभार मानते की इतके अडथळे येऊन सुद्धा मी परीक्षा देऊ शकले आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवू शकले.”

युपीएससीची परीक्षा देण्याआधी सौम्याने दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. कायद्याचा अभ्यास करतानाच स्पर्धा परीक्षा देऊन नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

 

IAS Lady Inmarathi

 

सौम्या म्हणते की ,”जेव्हा तुम्ही कायद्याचे शिक्षण घेता तेव्हा आपोआपच तुम्हाला सामाजिक समस्यांमध्ये रस निर्माण होतो. तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करता, मानवाधिकार आणि इतर अनेक गोष्टींबद्दल वाचता.

ह्यामुळे तुम्हाला समाजासाठी काहीतरी काम करण्याची प्रेरणा मिळते. मी ह्या परीक्षेबद्दल फेब्रुवारी २०१७ पासूनच गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली होती.

तेव्हा पूर्वपरीक्षेला फक्त चार महिने उरले होते.” पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी तिने कायदा हा विषय निवडला आणि त्याचा अभ्यास केला.

सौम्या म्हणते की ,”रक्त ,घाम आणि अश्रू. माझा प्रवास हा असा आहे. रात्र रात्रभर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अभ्यास करता करता अक्षरश: घाम गाळला. परीक्षेच्या दिवशी जेव्हा आयव्ही लावावे लागले तेव्हा हात हलला आणि रक्त सुद्धा सांडले.

अश्रू! सहसा मी कधी रडत नाही पण जेव्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून मी वेगवेगळी पुस्तके वाचली, लोकांनी कितीही कठीण परिस्थिती ओढवली असताना सुद्धा हार न मानता यश मिळवले हे वाचले तेव्हा माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू सुद्धा वाहिले.

पण आता मागे वळून बघताना असे वाटते की हे सगळे चांगल्यासाठीच घडले. जेव्हा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळते, तेव्हा जो आनंद मिळतो तो अगदी अनमोल आणि अवर्णनीय असतो. यश सुद्धा पटकन पचवता येत नाही. ते पचवायला आणि स्वीकारायला सुद्धा वेळ लागतो.

सुरुवातीला आपल्याला यश मिळाले आहे ह्यावर पटकन विश्वासच बसत नाही, मग कुठेतरी एक पोकळी जाणवते. तुमचे मन सत्य स्वीकारायला वेळ घेतं. पण जेव्हा एन्डॉर्फिनची लेव्हल कमी होते आणि आपण सत्य स्वीकारू लागतो.

 

IAS Sushma Inmarathi

मग येते कृतज्ञतेची भावना! मी अत्यंत आभारी आहे कारण मला हा दिवस बघायला मिळाला. आता माझी खरी सुरुवात झाली आहे. आता माझा देशसेवेचा प्रवास सुरु झाला आहे.”

सौम्याचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. तिच्या परीक्षेच्या वेळेला ते दोघेही सेंटरवर तिच्या बरोबर थांबले होते कारण तिच्या अंगात १०२ -१०३ डिग्री ताप होता. त्यांनी परीक्षेच्या दरम्यान तिला ड्रिप सुद्धा लावले. सौम्याच्या जिद्दीपुढे सर्व संकटांनी नमते घेतले.

यूपीएससी उत्तीर्ण करण्याच्या तिच्या जिद्दीपुढे तिने सर्व संकटांवर मात केली. आज सौम्या दिल्लीत असिस्टंट कमिशनर ह्या पदावर कार्यरत आहे. सध्या तिचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरु आहे.

आयुष्यात असे काही घडल्यावर सगळे संपले असे मानून हार मानणाऱ्यांनी सौम्याचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे. तिचा नेव्हर से डाय ऍटिट्यूड तिला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल ह्यात शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?