Site icon InMarathi

 ८ ते ६५ वर्ष वयोगटातील १६ लोकांनी तब्बल १०,००० किलो कचरा साफ केलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

पावसाळा सुरू होतो तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो. उन्हाच्या तडाख्यातून पावसाचा थंड शिडकावा मनाला गारवा देऊन जातो. मग वेध लागतात ते पावसाळी ट्रीपचे.

जरा जोरात पाऊस सुरू झाला की खूपशा ठिकाणी धबधबे सुरू होतात. नदी, धरणं तुडुंब भरतात. ट्रीपचे प्लान सुरू होतात. मुंबई-पुणा या ठिकाणी तर या ट्रीपचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणात होत असतं.

आठवडाभर कामाने कंटाळलेली माणसं जीव रमवायला, मजा करायला शनिवार-रविवार फिरण्याची ठिकाणं शोधत असतात त्यामुळे आठवडाभराचा शीण निघून जातो. त्यात पावसाळी ट्रीपची मजा काही औरच असते.

मनसोक्त धबधब्याखाली भिजणं, गरमगरम भजी, चहा. खूपच धमाल येते, पण हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट मात्र विसरून जातो, किंवा मुद्दाम दुर्लक्षित करतो ती गोष्ट म्हणजे आपण ज्या पर्यटन स्थळी जातो त्या ठिकाणची स्वच्छता.

मुंबईच्या आसपास खूपच नैसर्गिक धबधबे आहेत. या हंगामात सह्याद्रीचे सौंदर्य अनेक पटीने वाढलेले असते. त्याच्यामधून वाहणारे पाणी आणि त्याच्याभोवती असणारे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतात.

 

TravelTriangle

ते तिथला आनंद लुटतात, फ्रेश होतात आणि परत आपल्या कामाला लागतात. या सगळ्यामध्ये ते एक गोष्ट अगदी जाणूनबुजून किंवा जाणता-अजाणता करतात ते म्हणजे तेथील सौंदर्याचा र्‍हास.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कोणी गेल्याने र्‍हास कसा होऊ शकेल? तर गेल्याने र्‍हास होत नाही, उलट निसर्ग तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा न करता तुम्हाला भरभरून देत असतो, पण आपण लोक तिकडे जाऊन कचरा टाकून येतो.

त्या कचर्‍यामुळे तिथल्या सौंदर्याचा नाश होतो. पटतंय ना तुम्हाला? पण एका पथकाने मात्र अलीकडेच खूप चांगली कामगिरी केली आहे. यात ८ ते ६५ वयोगटातील मुलं, माणसं समाविष्ट आहेत.

तुम्हाला आश्‍चर्य वाटेल या पथकाने १ नाही, दोन नाही तर तब्बल १०,००० किलो कचरा मुंबई व त्याच्या आसपास असणार्‍या धबधब्यांवर गोळा केला. फिरायला आलेल्या लोकांनी करून ठेवलेला हा कचरा या पथकाने साफ केला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या पथकाने आगळावेगळा संकल्प केला आणि मुंबईजवळील १३ धबधब्यांची साफसफाई या पथकाने केली. या पथकाचं नेतृत्व केलं आहे धर्मेश बरई या गृहस्थांनी.

 

Indiatimes.com

धबधब्यावर झालेल्या या कचर्‍यामुळे, घाणीमुळे ते अस्वस्थ होते, मग त्यांनी ते साफ करण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला आणि एक टीम तयार केली. ज्यात त्यांनी स्वत:पण भाग घेतला.

या त्यांच्या टीममध्ये वयाच्या ८ व्या वर्षापासून ते ६५ वर्षांपर्यंतचे अशा सर्व वयोगटातील टीम मेंबर आहेत. सगळे मिळून ते एकूण ३० जण आहेत आणि ते सगळे मुंबईचे रहिवासी आहेत.

या टीमचं नाव त्यांनी ठेवलं आहे. ‘एनव्हायर्नमेंट लाइफ’ या टीमनं मुंबईच्या जवळपासचे १३ धबधबे साफ केले आहेत. एकूण १०,००० किलोचा कचरा त्यांनी जमा केला आहे आणि त्या धबधब्यांना, निसर्गाला आपलं सौंदर्य परत मिळवून दिलं आहे.

ही टीम २०१६ सालापासून कार्यरत आहे. त्यांचं ब्रीदवाक्य आहे, ‘माय वेस्ट, माय रिस्पॉन्सिबिलीटी’ म्हणजेच माझ्याकडे जे काही टाकाऊ आहे, ते कसं डिस्पोज करावं ही माझी जबाबदारी आहे.

धर्मेश बरई यांनी या बाबतीत टाइम्स ऑफ इंडिया यांच्या बोलताना सांगितलं की, ‘‘यामध्ये मिळालेल्या कचर्‍यात ८० टक्के कचरा रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आणि खाण्याचे पॅकेटस् आहेत. मुंबईच्या लोकांना माझं हेच सांगणं आहे की, त्यांनी कृपया कचरा पसरवू नये.

ज्याप्रमाणे ते भरलेली पाण्याची बाटली घेऊन येतात, त्याचप्रमाणे रिकामी बाटली पण परत बरोबर घेऊन जावी आणि कोणत्या तरी कचराकुंडीत टाकावी. धबधब्याजवळ सोडून जाऊ नये.’’ पण लोकं काहीच ऐकत नाहीत.

खरंतर रिकाम्या खाऊच्या पिशव्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, फळांची सालं जे काही टाकाऊ आहे ते एका पिशवीत भरून ती पिशवी आपल्या गाडीत ठेवावी आणि नंतर जवळच असणार्‍या कचरा कुंडीत टाकावी. हे जर प्रत्येकाने केलं तर किती सुसह्य होईल ना?

ठिकठिकाणी कचरा-कुंडी असली तरी लोकं उभे आहोत तिथेच कचरा टाकून मोकळी होतात, स्वच्छतेचा नियम प्रत्येकाने स्वत:ला लावून घेतला तरच त्याचा फायदा होईल.

सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे रस्त्यावर थुंकणे. लोकं काही न बघता पचकन थुंकतात आणि सर्व रस्ता, किंवा अशी प्रेक्षणीय स्थळे खराब करून टाकतात. अशा लोकांसाठी कडक कायदा करणे आवश्यक आहे.

 

Indiatimes.com

आपण परदेशात फिरायला जातो किंवा तिथल्या गोष्टींचं वर्णन करताना म्हणतो, ‘आपल्याकडे हे होणं शक्य नाही.’ अरे पण का? जर प्रत्येकाने स्वयंशिस्त लावून घेतली तर काहीच अवघड नाही.

‘एनव्हायर्नमेंट लाइफ’ च्या एका सदस्याने सांगितलं की, त्यांना एक धबधबा साफ करायला ३ ते ४ तास लागतात. जेव्हा ते पूर्ण कचरा साफ करतात तेव्हाच त्यांना शांती मिळते.

पर्यटक अशा स्थळी जाऊन स्वत:ला शांती मिळवतात, किंवा मजा करून येतात, पण तिथे येणार्‍या दुसर्‍या लोकांसाठी घाण, अस्वच्छता ठेवून येतात. जेव्हा ते परत त्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांना सुद्धा त्या घाणीचा सामना करावा लागेल याचा विचारही ते करत नाहीत.

अगदी सगळेच लोक असे असतात असं नाही काही लोक जागरूक पण असतात, पण दुर्दैवाने त्यांची संख्या फारच कमी आहे. २०% लोक जागरूक असतील तर ८०% लोक जबाबदारी न पाळणारे असतात, त्यामुळे सर्वांचेच नुकसान होते.

जेव्हा साफसफाई होते, तेव्हा तेथील निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसते. असं वाटत असेल की, आता तो धबधबा मोकळा श्‍वास घेत आहे. निसर्गाचे रक्षण करणे हे आपल्या हातात आहे, पण आपण मात्र नेहमी दुसर्‍याला दोष देत राहतो.

‘एनव्हायर्नमेंट लाइफ’ या पथकाने टप्पलवाडी, जुम्मापट्टी, खोपोली, पांडवकाडा, चिंचोटी, आंनदवाडी, कोंडेश्‍वर, भिवपुरी, पलसादारी, आंबेवाडी, खारघर, प्रबलमाची आणि वडाप येथील धबधबे साफ केले आहेत.

आता त्यांनी साफ केलेले धबधबे तरी लोकांनी साफ-सुधरे ठेवावेत अशी अपेक्षा आहे. आपण जातो ते ठिकाण आपलं घर समजून जर लोकांनी वावर केला तर स्वच्छता पाळली जाईल.

निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण ते सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे, तिथं गर्दी करून, घाण टाकून आपण त्या निसर्ग सौंदर्याचा र्‍हास करत आहात हे लक्षात घेतलं पाहिजे.

 

Twitter

तर मंडळी, धर्मेश बराई आणि त्यांची टीम यांनी खूपच मोठं आणि महत्त्वाचं काम केलं आहे. त्यांच्या या कामाला हातभार लावण्यासाठी आपण फक्त आपल्या स्वत:मुळे होणार्‍या कचर्‍याची जबाबदारी घेतली तर त्यांच्या कामात खूप मोठा हातभार लावल्यासारखं होईल.

तेव्हा फक्त धबधब्यावरच नव्हे तर कुठेही सार्वजनिक ठिकाणी आपण प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे की, कचरा, टाकाऊ वस्तू डस्टबिनमध्येच टाकल्या पाहिजेत.

तेव्हा कुठे या आणि अशा कार्य करणार्‍या टीमला तुमची खारीची मदत होईल. या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्या टीमचं मन:पूर्वक अभिनंदन !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version