Site icon InMarathi

पृथ्वीवरील सर्वात मोठं जंगल शब्दशः ‘पेटून’ उठलंय…जग खरोखर संकटात सापडलंय!

amazon inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

अमेझॉन रेनफॉरेस्ट हे जगातील सर्वांत मोठं जंगल आहे. म्हणजे आपण म्हणतो सिंंह जंगलचा राजा आहे तर अमेझॉन रेनफॉरेस्ट हे सगळ्या जंगलांचा राजा आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. कारण ते प्रचंड मोठे आहे. हे जंगल ब्राझीलच्या सीमेवर आहे.

या जंगलाचा ६०% भाग ब्राझीलमध्ये आहे. पेरू मध्ये १३%, कोलंबिया मध्ये १०% आणि अगदी थोडा भाग व्हेनेजुएला, ईक्वाडोर, बोलिविया, गुयाना, सूरीनाम आणि फ्रेंच गुयाना मध्ये हे जंगल पसरलेलं आहे, पण जास्तीत जास्त भाग ब्राझीलमध्ये आहे.

हे जंगल जरी आपल्यापासून कोसो दूर असलं तरी हे जंगल आपल्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे कारण इथे ऑक्सिजन तयार होतो.

आपण सर्वजण जो ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनचे सरासरी २८% प्रमाण या अमेझॉन वर्षावनात तयार होतो. म्हणजे काही प्रमाणात का होईना पण आपण इथल्या ऑक्सिजनचा वापर करतो.

 

blog.ucsusa.org

या अमेझॉन जंगलात जगातील सर्व प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेत. या भागात सुमारे २५ दशलक्ष कीटक प्रजाती, ३० हजार झाडे आणि सुमारे २००० पक्षी, २२०० मासे, ४२७ सस्तन प्राणी, ४२८ उभयचर, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती या भागात राहतात.

याचे कारण आहे अमेझॉन नदी. ही नदी सगळ्यात मोठी नदी नाही तरीही ती खूपशा देशांना पाणी पुरवठ्याचे कार्य करते.

तर इतक्या मोठ्या अमेझॉन जंगलाला आग लागलीय. ती कशामुळे लागली असेल बरं? त्यामुळे सगळ्यांनाच फटका बसणार आहे. पाहुया या आगीमागचं कारण.

जंगलात वणव्यामुळे आग लागते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्याची फारशी चिंता करण्याचे कारण नसते, कारण ती नैसर्गिक गोष्ट असते. पण अमेझॉनमध्ये लागलेली आग ही खरंच चिंताजनक आहे.

कारण ही आग विध्वंसक तर आहेच आणि त्याची फ्रीक्वेन्सी पण जास्त आहे. ब्राझीलच्या अवकाश एजन्सीच्या मते, यावर्षी फक्त या भागात ७२,००० हून अधिक वेळा आग लागली आहे.

 

news18.com

मागच्या वर्षीपेक्षा यावेळी ८०% वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात ९५०० हून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. या आगीचे लोळ इतके प्रचंड आहेत की अंतराळातूनही धूर दिसू शकतो आणि तज्ज्ञ म्हणतात की, या आगीमुळे संपूर्ण जगातील हवामानावर परिणाम होऊ शकतो. ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणतो त्याच्यावर याचा परिणाम नक्कीच होईल.

ही आग फार मोठ्या प्रमाणावर आहे. तीन आठवडे तीव्र आगीने देशाला होरपळून टाकल्याने अमेझॉनसने आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली. हवामानशास्त्रज्ञ एरिक होलथॉस यांनी ट्वीटरवर सांगितले की,

“अमेझॉनच्या रेनफॉरेस्टमध्ये सध्या जळत असलेल्या आगीचा धूर ब्राझीलच्या अर्ध्या भागावर व्यापला आहे. आम्ही हवामान आपत्कालीन परिस्थितीत आहोत.’’

ही आग कशामुळे लागली असेल?

छोटी-मोठी आग लागणं समजू शकतं, पण ही जी आग लागली आहे त्यामुळे त्या भागात दिवसासुद्धा काळोख निर्माण झाला, जोरदार वार्‍यामुळे जंगलातील अग्नीचा धूर अमेनानस आणि रोंडोनिया या राज्यांमधून साओ पाऊलपर्यंत १७०० मैल पेक्षा जास्त वेगाने वाहिला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक देशात अंधारमय वातावरण झाले.

 

archinect.imgix.net

तर इतके मोठे नुकसान कशामुळे झाले असेल बरे? याचं प्राथमिक कारण असं असू शकतं अशी चर्चा होत आहे.

ब्राझीलचे आत्ताचे प्रेसिडंट आहेत बोलसोनारो. ते आताच सत्तेमध्ये आले आहेत. त्यांनी जेव्हापासून हे पद सांभाळायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्यापुढे मोठं आव्हानं होत, ते म्हणजे ब्राझीलची कमी झालेली इकॉनॉमिक ग्रोथ वाढवणं. हे त्यांच्यासमोरचं मोठं चॅलेंज होतं.

ब्राझीलला परत एक ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर हाउसच्या रूपात कसं पुढे आणता येईल? हा विचार सतत त्यांच्या समोर होता. त्यामुळे बोलसोनारो यांनी हा विचार केला की, ब्राझीलजवळ सर्वांत मोठी संपत्ती कोणती आहे तर अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्ट.

त्याचा उपयोग का करून घेऊ नये? त्यांनी जंगलासंबंधीचे सगळे कायदे कमी केले. ब्राझीलमधील नागरिकांना जंगलतोडीची किंवा जंगलातील संपत्तीचा वापर करण्याची परवानगी दिली. त्यासाठी बोलसोनारोने जे जंगलासंंबधीचे नियम होते ते शिथिल केले. जर कोणी याला विरोध केला तर त्यांनी त्यांच्यावर उलटा आरोप केला, की ते ब्राझीलची प्रगती होण्यात अडथळा आणत आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च यांनी सुद्धा प्रेसिडेंट बोलसोनारोला धोक्याची सूचना दिली की, ज्या पद्धतीने या वर्षी अमेझॉनला आग लागत आहे ती जर आग अशीच वाढत राहिली तर एक दिवस असा येईल की ही आग कंट्रोल करणं अवघड होऊन जाईल.

पण जेव्हा हा रिपोर्ट समोर आला तेव्हा बोलसोनारोने त्या रिपोर्ट देणार्‍या अधिकार्‍यालाच नोकरीवरून काढून टाकलं. या सगळ्या प्रकारामुळे तेथील लोकांनी, कंपन्यांनी, शेतकर्‍यांनी सर्रास जंगलतोड सुरू केली. त्यासाठी आगही लावली.

तिथल्या उष्णतेमुळे ती आग वाढतच गेली. या सगळ्यामुळे अमेझॉन फॉरेस्टचा बराचसा भाग जळला आहे किंवा तिथे अजूनही आग सुरूच आहे.

 

blastingcdn.com

सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की, ही आग एका ठिकाणी नाही, तर बर्‍याच ठिकाणी आहे. अशा प्रकारची आग याच वर्षी नाही दरवर्षीे लागते, पण ती छोट्या प्रमाणात असते, पण यावर्षी ती खूप मोठ्या प्रमाणात पसरली जात आहे.

अमेझॉन रेनफॉरेस्ट हे फक्त ब्राझीलसाठी महत्त्वाचे नसून संपूर्ण जगासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. कारण त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग वर होणार आहे.

अमेझॉनला लागलेली आग ही संपूर्ण जगासाठी चिंताजनक गोष्ट आहे. यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांना एकत्र येण्याची आणि रेनफॉरेस्टची काळजी घेण्याविषयी सूचना करणं आवश्यक आहे.

कारण त्याचा ऑक्सिजन नॉर्थ अमेरिका पासून चायना, रशिया, श्रीलंकेपर्यंत सर्वच जण वापरत आहेत.

जर आगीत असंच ते जंगल जळून गेलं तर त्याचा फटका जगभरात सर्वांनाच बसणार आहे. जगातील सर्वांत मोठे उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट म्हणून हे अमेझॉन जंगल आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे.

 

rd.com

त्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. ऑक्सिजन निर्मितीत अमेझॉन रेनफॉरेस्टचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्या जंगलाच्या नुकसानीची झळ नक्कीच सर्व देशांना बसू शकते. त्यामुळं संपूर्ण जग काळजीत पडलंय की ही आग कशी आटोक्यात आणायची?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version