ग्लोबल वॉर्मिंगवर असाही उपाय – विशालकाय बर्फ तयार करणारी विशाल पाणबुडी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
ढासळते पर्यावरण आणि वाढते प्रदूषण यांचे गंभीर परिणाम दिवसेंदिवस वाढत आहेत. संपूर्ण जगाला ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जाणवत आहेत. अनेक देशांत याचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. नैसर्गिक ऋतू चक्र विस्कळीत होत आहे.
कुठे मुसळधार पावसामुळे आलेला महापूर तर कुठे पाऊसच नसल्याचे कोरडा दुष्काळ. कित्येक वर्षे हे चित्र आपण पाहत आहोत. प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे जैवसृष्टी आणि नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत झाली आहे.
वाढत्या तापमानामुळे पृथ्वीच्या धृवावरील बर्फ वितळत आहे. ज्यामुळे जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवायची तर हे वाढते तापमान रोखणे गरजेचे आहे. गेल्या तीन दशकात अर्कीटिकवरील जुन्या बर्फाचे प्रमाण ९५% नी कमी झाले आहे.
यावर संशोधकांनी एक नाविन्यपूर्ण कल्पना शोधून काढली आहे. वितळणाऱ्या बर्फाचे पुन्हा बर्फात रुपांतर करणारी एका विशालकाय पाणबुडीचा शोध या संशोधकांनी लावला आहे.
इंडोनेशियाच्या एका डिझाईनर बॅचमधील- फारीस राजक कोताहातुहाहा, डेनि लेस्माना बुडी, फिरा अलीफा, या चार डिझाईनर्सनी वितळत्या बर्फाला पुन्हा बर्फात रुपांतरीत करणाऱ्या या पाणबुडीची संकल्पना मांडली.
यामुळे तापमानातील वाढ रोखली जाईल आणि त्यात समतोल निर्माण होईल. तसेच यामुळे ध्रुवीय पर्यावरणातील समतोल साधणे देखील शक्य होईल असे या डिझाईनर्सचे मत आहे.
ध्रुवीय पर्यावरणातील बदलाचा परिणाम संपूर्ण जगाला जाणवू लागतो. तसेच वाढत्या तापमानामुळे या भागातील जीवसृष्टी देखील धोक्यात आली आहे. या प्रदेशातील अन्न साखळी धोक्यात आली आहे. सील, मासे, पोलार बिअर, लांडगे, कोल्हे, यांची संख्या कमी-कमी होत चालली आहे.
ज्याप्रमाणे पुन्हा वनीकरण केल्याने ज्याप्रमाणे तेथील जैव-अधिवास पुन्हा सुरक्षित होत आहे, त्याप्रमाणेच या भागात देखील कमी होत जाणार्या बर्फाचे प्रमाण पुन्हा वाढवल्यास इथली जीवसृष्टी पुन्हा वाचवली जाऊ शकते.
सियामी अर्कीटेक्ट असोसिएशनने भरवलेल्या डिझाईन स्पर्धेमध्ये पहिल्यांदा हे डिझाईन सादर करण्यात आले. या प्रदर्शनात या डिझाईनला दुसरे पारितोषिक मिळाले.
या पाणबुडीला एक षटकोनी आकाराची टाकी बसवण्यात आली आहे ज्यामध्ये वितळलेला बर्फ साठला जातो.
या पाणबुडीमध्ये अशा प्रकारची यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे जी पाण्यातून क्षार वेगळे करते. त्यानंतर क्षार विरहित पाण्याचे पुन्हा बर्फात रुपांतर केले जाते. हा बर्फ तयार झाल्यानंतर ही पाणबुडी पुन्हा वर येते आणि तयार झालेला बर्फ षटकोनी आकाराच्या त्या टाकीतून बाहेर पृष्ठभागावर सोडून दिला जातो.
एका वेळेस ही टाकी २,०२७ क्युबिक मीटर इतका बर्फ यात रीफ्रीज होऊ शकतो. पुन्हा ही पाणबुडी खाली जाते आणि पुन्हा वितळलेले बर्फाचे पाणी षटकोनी आकाराच्या टाकीमध्ये साठवले जाते.
आता जर मोठ्या प्रमाणावर अशा पाणबुडी जर बर्फाळ प्रदेशात काम करत राहिल्या तर तो एक कुल प्रोजेक्ट होईल नाही का?
ज्यामुळे सर्व जगावरील भावी संकट टळू शकतं. परंतु, काही संशोधकांना मात्र ही संकल्पना फारशी चांगली वाटत नाही.
कारण पाणबुडीच्या संचलनासाठी जीवाश्म इंधनाचा वापर केला जाईल आणि अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर झाला तर, काही गोष्टी आहेत त्यापेक्षा आणखी धोकादायक होतील.
पुन्हा अशा पाणबुड्यांमधून कार्बनचे उत्सर्जन वाढणारच त्यामुळे मूळ समस्या नाहीशी होत नाही. यासाठी शुद्ध इंधनाचा पर्याय उपलब्ध असेल तरच हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो.
कोलोराडो विद्यापीठाचे संचालक मार्क सेर्रेझ यांच्या मते, जर हिमनग पुरेसे मोठे असतील की त्याच्यामुळे खरच समुद्राची पातळी वाढू शकेल ज्याच्या परिणाम सौर किरणांवर होऊन तापमान वाढीवर होईल तरच हा प्रयोग यशस्वी होईल.
मुळात अशी पाणबुडी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी आहे. अशाने तापमानवाढीवर फारसा फरक पडणार नाही.
तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत त्यांच्या वाढत्या प्रमाणावर किंवा ते कोणत्या परिस्थितीत आणि कशा पद्धतीने वापरले जावेत यासाठी आवश्यक ते नियम बनवणे गरजेचे आहे. वाढते कार्बन उत्सर्जन रोखणे गरजेचे आहे.
त्यासाठी वाढत्या औद्योगिकीकरण आणि वाढते ग्रीनहाउसच्या प्रोजेक्ट वर काही अंकुश घालणे आवश्यक आहे. ग्रीन हाउस च्या कार्बन उत्सर्जनाबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. हे उत्सर्जन आटोक्यात आल्यास पर्यावरणातील समतोल राखला जाईल आणि नैसर्गिक चक्र सुरळीतपणे सुरु राहील.
तसेही हिमनग वितळून जर ते बर्फाखालीच राहिले तर त्याचा फारसा धोका नाही. वितळत्या हिमनगाचा खरा परिणाम तेंव्हा जाणवेल जेंव्हा हे हिमनग समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतील.
अर्थातच या पाणबुडीमुळे जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर पूर्ण तोडगा निघू शकत नसला तरी, ध्रुवीय प्रदेशातील वन्य जीवांना त्यांचा हक्काचा सुरक्षित आणि अधिक चांगला अधिवास मिळण्यास मदत होईल. त्यामुळे तेथील ढासळती अन्नसाखळी पूर्ववत होईल.
कमी होत जाणार्या ध्रुवीय प्राण्यांचे जतन करणे सोपे जाईल. असा विधायक दृष्टीकोन ठेवून या चार संशोधकांनी या पाणबुडीचे डिझाईन केले होते. जागतिक तापमान हा अशा एकाच घटकाने नियंत्रित होणारा प्रश्न नाही. यासाठी वैश्विक स्तरावर व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.