Site icon InMarathi

निवृत्तीनंतर, त्यांनी तब्बल १ कोटी रुपये भारतीय सैन्याला डोनेट केले आहेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

दानाला आपल्या संस्कृतीत पूर्वापार फार महत्त्व आहे. दान करणं ही गोष्टी सोपी नसते त्यासाठी मनाचं मोठेपण खूप जास्त असावं लागतं. कारण जरी आपल्याकडं असलं तरी ते देण्याची दानत असावी लागते.

दान म्हणजे निरपेक्ष मनाने केलेली कृती असते.

असंच दान एका आयआयएफच्या व्यक्तीनं केलंय त्यामुळे त्यांच्याबद्दल खूपच आदर वाटत आहे. पाहुया कोणाला आणि कुणी हे दान केलंय.

सी. बी. आर. प्रसाद यांना भारतीय वायुसेनेतून निवृत्त होऊन ४० वर्षे झाली. त्यानंतर ते स्वत:चा व्यवसाय करत होते. आता त्यांनी संरक्षण दलाला १.८ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

hindustantimes.com

सोमवारी दि. १९/८/२०१९ रोजी त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. राजनाथ सिंग यांनी त्यांचे खूपच कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘एक छोटासा सैनिक आपली सर्व बचत संरक्षणासाठी परत करत आहे.’’

आपण पूर्वी करत असलेल्या आपल्या कामावरची निष्ठा किंवा त्या खात्यावर असणारं प्रेमच यातून दिसून येतं. एक सैनिक निवृत्त होऊ शकतो, सैन्यातून बाहेर पडू शकतो, पण त्याच्यातला सैनिक कधीच बाहेर पडू शकत नाही याचंच हे जिवंत उदाहरण आहे.

त्यांनी आपल्या ७४ वर्षीय आयुष्यातली सगळी बचत संरक्षण मंत्रालयाला दान दिली आहे. खरंच किती महान कार्य आहे ना हे?

मनुष्य पै पै वाचवून आपल्या पुढच्या पिढीसाठी साठवत असतो. खूप असलं तरी दे दुसर्‍याला देण्यात त्याला फारसं स्वारस्य नसतं.  या पार्श्‍वभूमीवर अशी माणसं पाहिली की ती माणसं नसून देवच आहेत यावर विश्‍वास बसतो.

ते सांगतात की, त्यांनी ९ वर्षे इंडियन एअर फोर्स म्हजणचे (आयएएफ) मध्ये नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय रेल्वे मधून चांगल्या पदाच्या नोकरीची ऑफर आली म्हणून त्यांनी एअर फोर्स सोडले. परंतु दुर्दैवाने त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली नाही.

उपजीविकेसाठी त्यांनी काहीतरी बिझनेस चालू करण्याचा विचार केला. त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि नशिबाने तो बिझनेस खूप छान चालला.

३० वर्षे कठोर परिश्रम केले. समाजाला मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी एक स्पोर्टस् युनिव्हर्सिटीही स्थापन केली.

th.thgim.com

७४ वर्षांचे तरुणच म्हणावे लागेल त्यांना! तर हे ७४ वर्षांचे युवक म्हणतात की,

“मी आता कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण केल्या आहेत. तेव्हा मला वाटले की, जे आयएएफ कडून मला मिळाले ते मी परत करावे.” असे म्हणून त्यांनी संरक्षण दलाला १.८ कोटी रुपये देण्याचे ठरविले.

याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला नाही का? किंवा त्यांचे काय मत होते असा प्रश्‍न नक्कीच आपल्याला पडेल. कारण इतकी मोठी रक्कम आहे. त्यांना तसा प्रश्‍न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की,

‘‘कुटुंबीयांची याबद्दल काहीच हरकत नाही. मी माझ्या मुलीला माझ्या मालमत्तेपैकी 2 टक्के आणि पत्नीला एक टक्का हिस्सा दिला आहे आणि राहिलेली ९७% रक्कम मी समाजासाठी परत देत आहे.”

ANI

म्हणजे स्वत:साठी त्यांनी काहीच अपेक्षा ठेवली नाहीये. कष्ट करून कमावलेला पैसा सत्कार्यासाठी जावा हा एकच उद्देश त्यांच्या मनात असावा असं दिसत आहे. त्यांच्या या दातृत्वाला खरंच सलाम.

संरक्षण मंत्रालयाला आपली बचत देण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली हा प्रश्‍न नक्कीच सगळ्यांना पडला होता. त्यावरचं उत्तर देताना प्रसाद म्हणाले, जेव्हा ते २० वर्षांचे होते आणि हवाई दलात काम करत होते, तेव्हा तेथील अधिकार्‍यांनी कोइंबतूर येथील एक सद्गृहस्थ जी. डी. नायडू यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

तेव्हा ते जे काही बोलले ते प्रसाद यांच्या मनावर चांगलंच ठसलं होतं, ते म्हणाले होते,

“भारत हा महान देश आहे कारण आपले ऋषी सांगतात, जे आपण मिळवले आहे ते आपल्या ‘कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण झाल्यावर समाजाला परत द्याव्या. तुम्ही स्वत:साठी काही ठेवू नये कारण जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमच्यासोबत काहीच नसतं. तुमच्या कुटुंबाला जी रोजच्या जीवनासाठी लागणारी गरज असेल तेवढे द्या, पण बाकीचा भाग समाजासाठी निश्‍चित द्या.”

हे त्यांचे विचार त्यांच्या मनावर इतके ठसले की, त्यांनी त्या मताप्रमाणे विचार करून कृती केली. आपण ऐकतो खूप, पण त्याप्रमाणे कृती करण्यासाठी लागणारे धैर्य आपल्याकडे असावे लागते.

 

livemint.com

भारत ही संतांची भूमी आहे, आणि संतांनी नेहमी हेच सांगितलं आहे की, ‘मोहापासून दूर राहा, गरज आहे तेवढंच ठेवा, बाकीचे दान करा.’ तोच विचार प्रसाद यांनी उचलून धरला. पूर्वापार आपण खूप राजांच्या गोष्टी पण ऐकत असतो.

जसे कि, दधिची ऋषी यांनी वृत्तासुराला मारण्यासाठी आपल्या अस्थींचे दान इंद्राला दिले. दशरथराजाचे आजोबा राजा रघु यांनी सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली. सत्यवादी हरिश्‍चंद्राने तर स्वप्नात आपण राज्य दान केले असं पाहिले आणि ते सत्य करण्यासाठी आपले संपूर्ण राज्य विश्‍वामित्रांना दान केले. शिबी राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मांस काढून दिले.

अशा खूप कथा आपल्या संस्कृतीत सांगितल्या जातात. त्याप्रमाणे वर्तन करण्याचं काम प्रसाद यांनी केलं आहे.

प्रसाद यांनी पूर्वी फार हाल-अपेष्टात दिवस काढले आहेत. त्यांचे पूर्वीचे दिवस आठवताना ते म्हणतात की,

“मी माझ्या खिशात ५ रुपये घेऊन घर सोडले आणि माझ्या मेहनतीच्या प्रयत्नातून आता ५०० एकर जमीन मिळवली आहे.”

toiimg.com

खरंच यातून दिसून येतं जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर माणूस नक्कीच यश मिळवतो. फक्त जिद्द आणि मनापासून इच्छा हवी.
त्यांनी एकेकाळी ऑलिंपिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, पण त्यांना तसे करता आले नाही.

कदाचित परिस्थितीमुळे असेल त्यांची ती अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी क्रीडा विद्यापीठ स्थापन केले आहे. जेणे करून तिथे शिकलेली मुलं शिकू शकतील आणि पदकं मिळवतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल.

वीस वर्षे ते मुलांना प्रशिक्षण देत आहे. ५० एकर जागेत त्यांचं क्रीडा विद्यापीठ आहे. अजून एक क्रीडा विद्यापीठ तयार करण्याची त्यांची इच्छा आहे.

तर अशा या दानशूर माणसाला मनापासून मानवंदना!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version