' “हत्ती” या महाकाय प्राण्याबद्दल या ११ अज्ञात गोष्टी वाचाच – InMarathi

“हत्ती” या महाकाय प्राण्याबद्दल या ११ अज्ञात गोष्टी वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जंगलातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांमध्ये हत्ती हा आपल्या अवाढव्य आकार आणि शरीर रचनेमुळे उठून दिसतो. शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण नाते आहे.

माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे, वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे.

मिथ्यक, जातककथा, पंचतंत्र इत्यादींच्या माध्यमातून हत्ती हा पुरातन काळापासून नागरी जीवनाचा घटक असल्याचे लक्षात येते.

भासाने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तामध्ये राजा उदयनकडे हत्तीला वीणावादन करून आकृष्ट करण्याची विद्या अवगत होती, असा उल्लेख आहे.

‘मातंगलीला’, ‘हस्तायुर्वेद’ अशा ग्रंथांमधून हत्तीच्या प्रशिक्षणाविषयी त्याच्या आरोग्याविषयी तसेच व्यवस्थापनाविषयी सखोल विचार केलेला आहे.

असे सांगितले जाते की, पूर्वीच्या राजेरजवाड्यांचे वैभव त्यांच्याकडे असलेल्या गजदळावरून तोलले जात असे. अशीही एक मान्यता आहे की सैन्यात हत्तीचा वापर भारतामध्ये सर्वप्रथम केला गेला.

 

elephant inmarathi
mallstuffs.com

 

भारतीय संस्कृतीत गजलक्ष्मी, गणपती, ऐरावत अशा अनेक दैवी स्वरूपात हत्तीची आराधना केली जाते. भारतीय लोकसाहित्यात ही हत्ती वेगवेगळ्या रूपात डोकावत राहतो.

भारतामध्ये हत्ती हे समृद्धी, सृजनशीलता, बुद्धी, शौर्य, औदार्य, मांगल्य व राजयोगाचे प्रतीक मानले जाते.

जंगलातले वाघ, सिंह, बिबटे, हत्ती, हरिण, काळवीट, कोल्हे, लांडगे अशा अनेक प्राण्यांबद्दल आपण नेहमी ऐकतो, वाचतो. तरीही त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. म्हणून ‘पशु-जीवन’ या शैलजा ग्रब यांच्या पुस्तकातील हत्तीविषयीची ही वेगळी माहिती.

आपल्या जंगलातून दिसणारा एक वैशिष्टयपूर्ण प्राणी म्हणजे हत्ती. भारतात उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात.

काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्तींची सहज ओळख होते.

 

elephant inmarathi
zsl.org

 

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामं करवून घेता येतात.

याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावं लागतं. जंगलात लाकडं कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडं कापून लाकडाचे ओंडके बनवतात. शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत वाहून नेतात.

वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किना-यावरून दुस-या किना-यावर किंवा खाली वाहत जातात.

प्रशिक्षित हत्ती गाडय़ा ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा केला जात असे. हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत. तसंच अंबारीतून मिरवणुका काढत असत.

हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामं करवून घेतली जातात. ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामं करतात.

हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेट्या, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटनं इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.

 

elephant teeth inmarathi
reuters.com

 

हत्ती हा मुळातच कळपप्रिय प्राणी असल्यामुळे हत्ती जंगलात कळपानं राहतात. एकेका कळपात सात-आठपासून ते २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्यानं दोन-तीन माद्या आणि पिल्लं असतात. नर कळपात नसतात.

कळपात जसे मध्यम वयाचे बछडे असतात, तसे अगदी लहान पिल्लेदेखील असतात. कळपाचं नेतृत्व म्हाता-या अनुभवी मादीकडे असतं. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो.

केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघंही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असं म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो.

हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात.

माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.

हत्तीण २२ महिन्यांपर्यंत गर्भवती राहते. एका वेळेस तिला एकच पिल्लू होतं. क्वचित दोनदेखील होतात. नुकत्याच जन्मलेल्या पिलाचं वजन ९० किलोग्रॅमच्या आसपास व उंची सुमारे एक मीटर असते. पिलू जन्मल्याबरोबर लगेचच चालू लागते आणि कळपात सामील होते.

 

elephant inmarathi
factanimal.com

 

हत्ती मुख्यत: गवत, झाडपाला, पानं, फळं, फुलं खातात. ऊस हे हत्तीचं आवडीचं खाद्य. त्याचबरोबर नारळ, केळीदेखील त्याला आवडतात. हत्ती सर्व खाद्यपदार्थ सोंडेनं उचलून तोंडात धरतो. या लांब सोंडेचा त्याला हातासारखा उपयोग होतो.

हत्तींना पाण्यात डुंबायला फार आवडतं. पाण्यात असतानादेखील ते सोंडेत पाणी घेऊन फवा-यासारखे डोक्यावर सोडतात.

हत्तीची छोटी पिलं कित्येकदा सोंडेत पाणी घेऊन एकमेकांवर फवारण्याचा खेळ खेळतात. सोंड हे हत्तीचं नाक आहे. ते सोंडेनं श्वासोच्छवास करतात. हत्तीची सोंड आणि कान फारच मोठे असतात.

त्यामुळे हत्तीला त्याच्या शत्रूच्या अंगाचा वास लांबूनच येतो. तसंच शत्रूच्या हालचालीमुळे झालेला आवाजही दुरूनच ऐकू येतो. त्यामुळे शत्रू दूर असला तरी त्याची चाहूल हत्तीला लागते. हत्ती ७०-८० वर्ष जगतो.

तो आपल्या कळपातील सर्व सदस्यांच्या संपर्कात राहतो. जमिनीवरील अनेक सस्तन प्राण्यांमधे आपल्या अवाढव्य आकार, सोंड, सुळे, कान इत्यादी गोष्टींमुळे तो वेगळा ठरतो.

ह्या लेखात आपण त्याची ही आगळीवेगळी वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आपल्या या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे हत्ती इतर प्राण्यांमध्ये वेगळा ठरतो. हत्तीसंदर्भात अशा काही अज्ञात गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेणार आहोत.

१) भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठे मोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालाही सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखणा’ म्हणतात.

आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तींमध्ये नर व मादी दोघांनाही सुळे असतात. भारतीय हत्तींची पाठ फुगीर तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते.

 

elephant inmarathi
factanimal.com

 

२) इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते, त्यामुळे त्यांना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करून घेता येतात.

३) हत्तीचा बुध्यांक( EQ ) तेव्हढाच उच्च असतो जितका की चिम्पांझीचा असतो.

४) हत्ती त्याच्या कळपातील प्रत्येक सदस्याला ओळखू शकतो, एव्हढेच नाही तर आकार आणि गंधानुसार कमीतकमी ३० सदस्य तो लक्षात ठेवू शकतो.

५) हत्तीची स्मृती त्याच्या कळपापुरती किंवा त्याच्या अधिवासापुरती मर्यादित राहत नसून तो अशा व्यक्ती देखील स्मरणात ठेवतात ज्यांच्या सोबत त्यांचे भावनिक बंध तयार होतात. लहानपणी संपर्कात आलेल्या व्यक्ती देखील तो अनेक वर्षानंतर देखील ओळखू शकतो.

६) हत्तींनी दिलेले ध्वनिसंकेत हे वाऱ्यासोबत सर्व दिशांना जातात. निरीक्षणात असेही आढळले आहे की हत्तीची स्वतःची एक भाषा व व्याकरण असते. केवळ ध्वनीच्या माध्यमातून हत्ती आपल्या कळपाशी किंवा इतर प्राण्यांशी संपर्क साधू शकतो.

तो आपल्या दृष्टी, गंध, स्पर्श व ध्वनीज्ञानाचा उपयोग इतर हत्तींशी व प्राण्यांशी संपर्क साधण्यासाठी करतो. त्याला स्पंदनलहरी देखील चटकन जाणवतात, ज्यांचा उपयोग तो आपल्या संवाद व हालचालींसाठी करतो.

हत्तीची खासियत म्हणजे खर्ज स्वरातील व दिर्घ पल्ल्यावर साधलेला संवाद होय.

 

elephant inmarathi
africafreak.com

 

७) मानवामधे आढळणारा post traumatic stress disorder ( मानसिक ताण-तणाव ) हत्तींमध्येपण आढळतो. एखादा आघात किंवा दुःखद घटनेच्या आठवणींनी हत्ती देखील व्यथीत होतात. ते या घटनांमुळे येणाऱ्या तणावाला बळी पडू शकतात.

८) हत्तीची संवेदनशीलता त्याला अनेक प्रकारच्या संकटांवर उपाय शोधण्यास उपयोगी पडते.

९) हत्तीला अंकगणिताची देखील चांगली समज असते. तो वस्तूची संगती सुद्धा लक्षात ठेवू शकतो.

१०) हत्ती १२ प्रकारचे ध्वनी किंवा स्वर ओळखू शकतो. इतकेच नाही तर ऐकलेल्या निरनिराळ्या सुरावटी देखील तो वाद्यांच्या सहाय्याने पुन्हा निर्माण करू शकतो.

११) हत्ती हा मानवेतर सस्तन प्राण्यांमधील एकमेव सस्तन प्राणी आहे जो कळपातील मृत सदस्यांचे दफन करतो. एव्हढेच नाही तर तो वारंवार त्या दफनस्थळाला भेट देतो.

हत्तीविषयी बऱ्याच आख्यायिका व दंतकथा आहेत. भारतीय संस्कृतीत हत्तीला महत्त्व दिले जाते.

वैदिक काळापासून धार्मिक ग्रंथ व पुराणकथा यांत हत्तीचा उल्लेख आहे. हिंदू व बौद्ध धर्मांत हत्ती पवित्र मानतात. हिंदू धर्मातील प्रमुख देवता ‘गणपती ‘चे शीर्ष हत्तीच्या रूपातील आहे.

ऋग्वेदा मध्ये हत्तीसाठी हस्तिन् (हात असलेला) असा शब्द वापरला आहे. 

हत्तींच्या अनेक जाती मानल्या जात असत. सर्वोत्तम हत्तीला कुमेरिया म्हणतात. मृग ही दुसरी जाती असून या दोन्हीमधील एका जातीचे नाव द्वासाला आहे. आसाममधील आहोत जातीच्या लोकांनी हत्तीपुथी या ग्रंथात मनुष्य व हत्ती यांच्या स्वभावांत तुलना करून जाती पाडल्या आहेत.

 

elephant inmarathi
elephantcountry.org

 

हत्तीच्या गंडस्थळात मोती असून ते ज्याला मिळतात तो अत्यंत भाग्यवान असतो, अशी दंतकथा आहे.

जिभेवरील डाग, सोळापेक्षा कमी नखे, जमिनीवर लोळणारी वा अगदी आखूड शेपटी वा सोंड ही हत्तीची अशुभ लक्षणे मानली गेली आहेत.

तर घड्या पडणारी व सहज हातात येणारी त्वचा, भव्य गंडस्थळ, डोक्यावरील केस ही त्याची शुभ लक्षणे मानतात. हत्तीची अशी लक्षणे पाहून हत्तीची विक्री होत असे.

हत्तीच्या या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेच त्याला प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान दिले गेले असून ओव्या, श्लोक, सुभाषिते तसेच हादगा, गणेशोत्सव आदी पारंपारीक सण उत्सवांतून तो जनमानसात रुजला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?