मुलीच्या बड्डे पार्टीच्या खरेदीसाठी गेलेल्या दांपत्याचा मुलाचा जीव वाचवताना मृत्यू
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नियती कधीकधी असं काहीतरी घडवून आणते की दगडालाही पाझर फुटावा…! असंच काहीतरी घडलंय…अंधाधुंद गोळीबारामध्ये एका जोडप्याचा मृत्यू झालाय. तो ही आपल्या लाडक्या लेकीचा जीव वाचवताना…आणि कधी? तर तिच्या “बर्थ डे पार्टी साठी शॉपिंग करताना”…!
२४ वर्षीय जॉर्डन आणि २३ वर्षीय आंद्रे दोघेही आपल्या लेकीच्या बड्डेपार्टीच्या खरेदीसाठी एल पासो येथील एका शॉपिंग मॉल मध्ये गेले असताना झालेल्या गोळीबारात सोबत घेतलेल्या आपला तान्हुल्याचा जीव वाचवताना दोघांवर देखील काळाने झडप घातली.
मोठ्या मुलीला चीअरलीडिंग प्रॅक्टिससाठी तिच्या क्लासवर सोडून ते दोघी छोट्या मुलासह वॉलमार्ट मधील पार्किंग लॉट मध्ये आले जिथे त्यांच्याप्रमाणेच शेकडो ग्राहक जमलेले होते.
जॉर्डन आणि आंद्रे आपल्या दोन महिन्याच्या मुलाला घेऊन शॉपिंग मॉल मध्ये गेले खरे पण, नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच डाव आखला होता, हे त्या निष्पाप जीवांना तरी कुठे माहित होतं.
तो दिवस त्यांच्यासाठी खूपच आनंदाचा दिवस होता. मोठ्या मुलीच्या ६व्या वाढदिवसाची पार्टी घरी आयोजित केली होती. त्यामुळे एकूणच सगळा दिवस व्यस्ततेत गेला होता. मुलीला तिच्या क्लासवर सोडून हे दोघे छोट्या लेकरासह बड्डेपार्टीसाठी लागणारे साहित्य खरेदी करायला आले होते.
आपल्या बड्डेसाठी आपले मम्मी-पप्पा खूप काही मजेशीर आणतील याची उत्सुकता लागून राहिलेल्या त्यांच्या लेकीलाही वाटलं नव्हतंच की खरेदीला गेलेले मम्मी-पप्पा पुन्हा कधीही तिचा बड्डे सेलिब्रेट करू शकणार नाहीत.

खरेदी उरकून पटकन घरी जायचं होतं कारण तासाभरात सगळे मित्र आणि नातेवाईक घरी येतील. त्यांचा पाहुणचार करायला हवा. किती स्वप्न आणि किती नियोजन!
पण, नियती जे नियोजन करते त्यापुढे मात्र कुणाचेही काही चालत नाही.
“या नव्या जोडप्याच्या घरी होणारा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आम्ही नातेवाईक पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या घरी जाणार होतो,” आंद्रेचा भाऊ टिटो सांगत होता.
ते मॉलमध्ये पोचले नाहीत तोच गोळीबार सुरु झाला. आम्ही जॉर्डन आणि आंद्रेला फोन लावत होतो पण ते फोन रिसीव्ह करत नव्हते.
“शेवटी एका तासानंतर मला फोन आला आणि मी अक्षरशः हादरून गेलो.” टिटो सांगत होता.
काही अधिकाऱ्यांचे फोन होते ज्यांनी मला थेट हॉस्पीटलमध्ये बोलावले होते. २४ वर्षीय जॉर्डन आणि २३ वर्षीय आंद्रे हे देखील त्या वीसजणांमध्ये सामील होते जे वॉलमार्टच्या एल पासो शॉपिंग मॉल मध्ये माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारात मारले गेले.
त्यांच्या छोट्या तान्हुल्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःचा जीव गमावला आणि त्याला कायमचं पोरकं करून गेले. शनिवारीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

आपली पत्नी आणि छोट्या मुलाला गोळी लागू नये म्हणून आंद्रेने पूरपूर प्रयत्न केले. त्यांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नातच तो मारला गेला. जॉर्डनची बहिण लेटा जाम्रोवस्की म्हणाली, बाळाच्या जखमांवरून दिसते की, जोर्डनने आपल्या बाळाला शेवट पर्यंत इजा होऊ दिली नाही.
त्याला इजा होऊ नये यासाठी दोघांनीही त्याच्याभोवती संरक्षणात्मककडे केले होते. अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत तिने आपल्या बाळाला सोडलं नाही.
आपल्या बाळाचा जीव वाचवतावाचवता ती गेली, खरे तर तिने तिचे आयुष्य पुरेपूर जगून घेतले असे म्हणायाला हवे. खाली पडताना देखील ती त्याच्या अंगावर पडून राहिली यामुळे मुलाची बोटे फॅक्चर झाली असली तरी, त्याचा जीव मात्र वाचला. तिची बहिण सांगत होती.
जॉर्डनची काकी सांगत होती, “बाळाला तिच्या शरीराखालून ओढून काढण्यात आले. त्याच्या आईचं रक्त त्याच्याही शरीरावर पसरलेलं होतं. बाळाची काही बोटे मात्र फॅक्चर झाली असल्याचं तिने सांगितलं.
“पालक शॉपिंगसाठी जातात आणि तिथेच त्यांना जीवघेण्या गोळीबाराला सामोरे जावे लागते हे किती दुर्दैवी आहे?” टेरी, जॉर्डनची काकू उद्वेगाने विचारत होती.
“त्याचं आयुष्य अजून कितीतरी मोठ होतं. कितीतरी गोष्टींची त्यांना अपेक्षा होती. अगदी आपल्या मुलीच्या बड्डेपार्टीची देखील.”
ज्या दिवशी हा गोळीबार झाला आणि त्यांचा जीव त्यांना गमवावा लागला त्याच्या एक दिवस आधीच जॉर्डन आणि आंद्रे यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. स्वतःचा नवीन बिझनेस सुरु करण्याची त्याची इच्छा होती.
आपल्या कुटुंबासाठी त्याने स्वतः घर देखील बांधले होते. त्यांची मोठी मुलगी ही त्यांच्या लग्नापूर्वीच्या संबधातून जन्मली होती. टिटो सांगत होता.
खूप स्वप्ने होती त्याची त्याच्या कुटुंबांबद्दल. सर्व काही पाण्यात गेले. जाताजाता आपली मुलगी आणि मुलग्याला मात्र ते अनाथ करून गेले.
आत्ता सर्व जबाबदारी त्याच्या भावाला टिटोलाच घ्यावी लागणार होती. जॉर्डनदेखील खुप चांगली मुलगी होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एक प्रेमळ आई आणि दक्ष गृहिणी होती. ती त्याच्यासाठी सर्व काही होती.
तो जॉर्डनला भेटला तेंव्हा त्याला सुखी आणि सुरळीत आयुष्य जगण्याचं एक कारण भेटलं असं तो म्हणत होता. पटरी वरून घसरलेल्या आयुष्याच्या गाडीला त्याने जॉर्डनच्या मदतीनं पुन्हा रुळावर आणलं होतं.

अमेरिकेत एकाच आठवड्यात माथेफिरून गोळीबार करून निष्पाप जीवांची हत्या केल्याची ही दुसरी घटना होती. आणखी एका माथेफिरूने ओहियो येथे गोळीबार करून नऊ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला ज्यामध्ये त्याच्या बहिणीचा देखील समावेश होता.
दोषी गनमॅन पॅट्रिक कृसिअस या २१ वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कदाचित त्याला फाशीची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते.
टेक्सासच्या पश्चिम जिल्ह्याचे अटर्नी जनरल जॉन एफ. बाश यांच्या मते, ही घटना म्हणजे अंतर्गत दहशतवादाचेच उदाहरण आहे. कृसिअसने इंटरनेटवर पोस्ट केलेल्या जाहीरनाम्यामध्ये लॅटिनो घुसाखोरांबाद्दल चीड व्यक्त केली होती.
“हा अँग्लो मनुष्य फक्त लॅटिनो लोकांना मारण्याच्या हेतूने इथे आला होता.” एल पासोचे शेरीफ रिचर्ड आपले मत व्यक्त करताना म्हणाले, “लोकांच्या वर्णावरून केवळ त्यांचा द्वेष करणारी मंडळी या देशात आहेत याबद्दल मला प्रचंड खेद वाटत आहे.

आपल्या प्रत्येकाला असा खेद वाटायला हवा. आपण अजूनही अशा लोकांमध्ये राहतोय जे फक्त एकमेकांच्या रंगावरून एकमेकांचा जीव घ्यायाला उठतात, हे वास्तव प्रचंड संतापजनक आहे.
जॉर्डन आणि आंद्रेचे कुटुंबीय मात्र प्रचंड शोकमग्न झालेत. जॉर्डनची मोठी मुलगी जेंव्हा तिच्या मम्मी-पप्पाबद्दल विचारते तेंव्हा तिला काय उत्तर देणार हा प्रश्न त्यांना सतावतोय.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.