आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
एकंदरीत माहोल पाहिल्यानंतर सगळे लोक आनंदी आहेत..३७० कलम रद्द करण्यात आलं आहे. मिठाई वाटून, ढोल ताशे वाजवून आनंद साजरा केला गेला.
काही ठिकाणी तर आनंदाने खुद्द मंत्री महोदयांनी सुध्दा ढोलाच्या तालावर पावलं थिरकवलेली दृश्यं पाहिली. पण तरिही इतिहासात काय काय चुका झाल्या आपल्याकडून ते पाहूया..
चीनसोबत युध्द झालं. मुळात झालं म्हणण्यापेक्षा स्वसंरक्षणार्थ लढावं लागलं. चीनच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी ते लढावं लागलं.
भारतानं आजवर झालेल्या युध्दात कधीच स्वतः कुरापत काढली नाही. तर कुरापती निपटण्यासाठी युध्द केलं आहे. मात्र या प्रसंगात आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत.
दिल्लीमधील साऊथ ब्लाॅकमध्ये अद्यापही ऐतिहासिक दस्तावेज वर्गीकरण न करता पडून आहे. तो पुरातत्त्व विभागाच्या हवाली करणं आवश्यक आहे.
दुसरं, व्ही के कृष्ण मेनन यांची कागदपत्रे नेहरु मेमोरियल संग्रहालय आणि वाचनालय येथे अजूनही गुंडाळून ठेवली आहेत. जी जिज्ञासू व अभ्यासकांना आजही मिळत नाहीत.
व्हीके कृष्ण मेनन यांनी आपल्या सैन्याच्या सक्षम अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या आडून फार हीनतेची वागणूक दिली होती. या गोष्टी लपवून का ठेवल्या आहेत?
वास्तविक विजयापेक्षा पराभवातून माणूस जास्त शिकतो. चुकांचा वापर करुन पुढं कसं बरोबर वागायचं हे समजतं. ले.ज. थोरात यांनी नेफा येथील आपल्या सैन्याधिकाऱ्यांना चीनच्या कुरापतीसंबंधी माहिती देणारं एक पत्र लिहून पाठवलं होतं.
त्या पत्र्याचा गोषवारा असा- मागे पाकिस्तान कडून आलेली धमकी ही दुर्लक्ष करण्याजोगी होती. पण चीन अतिरेकी कारवाया करत आहे आणि मॅकमोहन रेषा मान्य करायलाही तयार नाही. चीन आपल्या लडाख, उत्तर प्रदेश आणि नेफा इथं हल्ला चढवू शकतो.
त्या अधिकाऱ्याने ते पत्र मंत्र्यांना पाठवलं. त्यावेळी मेनन हे सुरक्षा मंत्रालयाचे प्रमुख मंत्री होते. या सूचना वजा इशाऱ्याकडं त्यांनी केवळ दुर्लक्षच केलं नाही तर मेनन यांनी त्या पत्राची संभावना केली.
त्यांच्या मते लेफ्टनंट जनरल थोरात हे विनाकारण घाबरवून सोडणारे आणि युद्धपिपासू आहेत. लेफ्टनंट जनरल थोरात, के एस थिमैय्या हे मेनन यांच्या नावडत्या लोकांत गेले.
मेजर व्ही के सिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात स्पष्ट लिहीलं आहे,
“लेफ्टनंट जनरल थोरात यांनी चीनचा हल्ला झाला तर खबरदारी म्हणून शक्य ती हत्यारे, साधनसामुग्री, सैन्यदल एकत्र करायला सुरुवात केली. पण मेनन यांची ढकलगाडी वृत्ती.. बघुया..करुया हे धोरण हे योग्य नव्हतं.
थोरात यांनी तक्तासुध्दा तयार केला ज्यात संरक्षण खातं चीनने हल्ला चढवला तर दिवसेंदिवस कसं कमी पडू शकतं हे दाखवलं होतं. त्यांनी हवाई दलाच्या वापराची स्पष्ट सूचना केली होती.
पुढं १९६१ मध्ये थिमैय्या निवृत्त झाल्यानंतर युद्ध नीतीचा गाढा अनुभव, हुशारी, निडर वृत्ती आणि सीमारेषेवर असणाऱ्या एकंदर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते धैर्य या सर्व गुणांमुळे लेफ्टनंट जनरल थोरात हेच सैन्यदल प्रमुख म्हणून निवडले जातील असंच वाटत होतं.
पण तंत्रज्ञान कौशल्य असलेले मेजर थापा यांची तिथं नियुक्ती झाली. त्यांना लढाईचा अनुभव कमी होता पण ते मंत्र्यांचे निकटवर्तीय होते.
तोपर्यंत लेफ्टनंट जनरल थोरात निवृत्तीला आले होते. २४ जून १९६१ रोजी सकाळी आठ वाजता लेफ्टनंट जनरल थोरात यांना एक पत्र आलं.
त्यांनी रानीखेत इथं भाषण करताना राजकिय नेत्यांच्या हस्तक्षेपांमुळं आपलं काम न सोडता आपल्या उच्च अधिकाऱ्यांशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला त्यांनी सैनिकांना दिला होता. सुरक्षा मंत्र्यांबद्दल तुम्ही अनुद्गार काढले.
थिमैय्या यांच्या निरोप समारंभाला केलेला खर्च सादर करा. जनरल लाटांनी घाईघाईने त्यांना लिहीलं होतं, ही फार मोठी आणि गंभीर बाब आहे. याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल. मग थोरातनी सारं काही व्यवस्थित सांगितलं.
“रानीखेत इथं सैनिक राजकिय नेत्यांच्या हस्तक्षेपांबद्दल तक्रार करत होते तेंव्हा त्यांना सांगितलं होतं तुम्ही तुमचं काम इमानदारीने करा.. यात काय चूक आहे? सुरक्षा मंत्र्यांबद्दल अनुद्गार काढले. थेट मी काहीच बोललो नाही.
आमचं दोघांचंही मत एकमेकांबद्दल चांगलं नाही तर मी थेट काही बोलणं योग्य नाही. आणि राहीला प्रश्न निरोप समारंभाला खर्च करण्याचा तर परेडचे फक्त साडे चारशे रुपये खर्च. बाकी खाणं पिणं पाहुणे यावर एक रुपया खर्च केला नाही.
पुढं लेफ्टनंट जनरल थोरात यांनी सांगितल्याप्रमाणे चीनने भारतावर हल्ला चढवला. २० आॅक्टोबर १९६२ रोजी हे युध्द सुरु झालं. आणि भारताचा भूभाग चीनने बळकावला.
नेहरुंना प्रकर्षानं थोरांतांचा सल्ला आठवला. पण त्याला फार उशीर झाला होता. चीनची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बिघडली. पण त्यानं चीनला विशेष फरक पडला नाही. भारताचा पराभव झाला.
ही पराभवाची नामुष्की केवळ आणि केवळ मेनन यांच्या दिरंगाईमुळे आणि लेफ्टनंट जनरल थोरात यांच्यासारख्या धोरणी चतुर आणि मुरब्बी सेनानीचा सल्ला दुर्लक्षित करुन आपल्या मर्जीतील कमी अनुभवी लोक उच्च पदावर नियुक्त केल्यामुळंच ओढवली होती.
आपल्या वैयक्तिक हितसंबंधापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित या गोष्टींचा अधिकाधिक विचार करावा अन्यथा जो अनर्थ होतो तो याहून वेगळा नसतो.
आता फक्त ती ऐतिहासिक कागदपत्रे लोकांसाठी खुली केली तर उद्धट मंत्र्यांनी केलेल्या चुका जनतेला समजतील आणि किमान कसं वागावं इतकं जरी समजलं तरी पुरे आहे..या सरकारकडून आपण इतकी अपेक्षा ठेवूया…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.