आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन, भारतातील स्वर्ग असं म्हटलं जातं. भारतीय उपखंडात उत्तरेला काश्मीर आहे. काश्मीर प्रश्न हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काश्मीरमध्ये मुस्लीम वस्ती जास्त आढळते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही काश्मीरमध्ये बरेच प्रश्न उद्भवत होते यावर उपाय म्हणून इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली एक अनोखा निर्णय घेण्यात आला.
सरकारने ३७० कलम अंशतः रद्द करून काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले.
त्यानंतर काश्मीरमधील बातम्यांचं अक्षरश: पीक येतंय. खूप बातम्या येत आहेत, काही सत्य काही असत्य.
असेच काही फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे की, केंद्र सरकारने काश्मीरमधील सर्व मशिदी ताब्यात घेतल्या आहेत आणि तिथे शस्त्रास्त्रांचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे.
‘द क्विन्ट‘ वेब पोर्टलने अशा अफवांची सत्यासत्यता पडताळून खरं काय आहे हे मांडलं आहे.
पण अशा घटना जेव्हा आपल्याकडे येतात, तेव्हा आपण घाबरून जातो, तसंच काहीसं या मशिदींच्या बाबतीतील बातम्यांत असावं असं वाटत आहे. पाहुया एकेक फोटो आणि त्याची सत्यता…
फोटो १
या फोटोत काही मुस्लीम लोक आणि पोलीस दिसत आहेत. त्यावरून हा फोटो काश्मीरमधला आहे असे बोलले जात होते.
जेव्हा त्याची सत्यता पडताळून बघण्यासाठी गुगलवर या फोटोचा शोध घेतला गेला तेव्हा आश्चर्यकारक असं वेगळेच सत्य समोर आलं.
ऐकायचं आहे काय आहे ते सत्य? तर मंडळी, हा फोटो ११ जुलैचा आहे. नवभारत टाइम्समधील हा लेख आणि फोटो आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात पोलिसांनी एका घरावर आणि एका मुस्लिमांची शाळेवर छापा टाकून शस्त्रास्त्रे जप्त केली.
यामध्ये सहा माणसांना अटक केली होती. तर मंडळी, आहे हे असं आहे. ही बातमी ११ जुलैची आहे, पण ती प्रतिमा इथे वापरून लोकांची दिशाभूल केली जात आहे.
फोटो – २
जम्मू काश्मीरमध्ये अशांतता असं हेडिंग देऊन हा फोटो सगळीकडे पसरवला जात आहे. यामध्ये मुस्लीम लोक पोलिसांच्या गराड्यात दिसत आहेत.
त्यावरून असं वाटतंय की, खरंच आता सगळीकडे अशांतता आहे आणि पोलीस त्यांना दम देत आहेत किंवा समज देत आहेत.
म्हणून या फोटोची सत्यता पडताळून पाहिली तर हा फोटो २ जुलै रोजी ‘द स्टेटस्मॅन’ने एक लेख प्रकाशित केला होता त्याबरोबरचा आहे.
ही घटना उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील असून पोलिसांनी म्यानमारच्या चार नागरिकांना शामलीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याबद्दल अटक केली होती.
हाच फोटो शामली पोलिसांनी त्यांच्या ट्वीटरवर २ जुलै रोजी शेअर केल्याचे आढळले आहे. चौघांना अटक केले आहे आणि बाकीचे मदरशाचे म्हणजेच मुस्लीम शाळेचे प्रतिनिधी आहेत. त्यातील चारच जणांवर गुन्हा दाखल आहे.
फोटो – ४
या तिसर्या फोटोत सोफ्यावर बंदुका ठेवलेल्या दिसत आहेत. असं पसरवलं जात आहे की, ही शस्त्रं काश्मीरमधील आहेत. पण सत्यता पाहिली तर ती अशी आहे की, हा फोटो टंबलरवर अपलोड करण्यात आला आहे आणि हा आत्ताचा नसून ३ मार्चचा फोटो आहे.
खरंच कुठच्याही इमेजेस कुठेही चिकटवून वाटेल त्या बातम्या पसरवल्या जात आहेत तेव्हा सावधान.
फोटो – ४
या फोटोत तलवारी, शस्त्रास्त्रं दिसत आहेत. याचा शोध घेण्यासाठी ट्वीट केलं असता त्यामध्ये अशी माहिती मिळाली की, हे चित्र पटियालातील आहे.
तिथे किर्पण कारखाना आहे त्याचं ‘इंडिया टुडे’ ने घेतलेला हा फोटो आहे. पटियालातील किर्पण कारखान्याचा शोध घेतला गेला आणि ‘खालसा किर्पण फॅक्टरी’ नावाची फॅक्टरी मिळाली.
त्या फॅक्टरीच्या मालकाशी म्हणजेच बच्चन सिंग यांच्याशी संपर्क केला असता असे कळले की, तो फोटो त्यांच्याच फॅक्टरीतील आहे.
त्यांनी सांगितले त्यातील तलवारी म्हणजे खंजीर आहेत जे शीख लोकं त्यांच्याजवळ बाळगतात. त्यांनी हेही सांगितले की हा फोटो त्यांच्या गोदामातून घेतला गेलेला आहे आणि हा सर्व माल पंजाबला पुरवला जातो. आहे ना कमाल?
फोटो – ५
या पाचव्या फोटोत खूप सार्या तलवारी दिसत आहेत आणि पोलीसही दिसत आहेत. हा फोटो याआधीही व्हायरल झाला होता तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की, गुजरातच्या मशिदीत या तलवारी सापडल्या आहेत.
पण खरी गोष्ट अशी आहे की, राजकोट क्राईम ब्रँच आणि कुवादावा रोड पोलीस यांनी राजकोट-अहमदाबाद महामार्गावर बेकायदा शस्त्रांच्या रॅकेटचा शोध लावला होता.
तेव्हा पाच जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा हा फोटो घेण्यात आला होता.
तेव्हा गुजरातमध्ये ही हेडलाईन न्यूज होती की, ‘पाच जणांना अटक केली, प्राणघातक शस्त्र जप्त केले’ मंडळी, सध्या सोशल मिडियामुळे सर्वच गोष्टी एका सेकंदाच्या आत सगळ्या जगभर पसरल्या जात आहेत, काही सत्य काही असत्य.
व्हाटस्अॅप, फेसबुक, ट्वीटर याद्वारे किंवा सोशल मिडियाद्वारे खूप गोष्टी आपल्याला एका सेकंदात कळतात, पण कधीकधी त्यावर विश्वास ठेवावा की न ठेवावा? असे वाटून जाते.
बर्याच वेळा फिल्म अभिनेत्याचं लग्न किंवा अगदी मृत्यूची बातमी सुद्धा व्हायरल होऊन जाते आणि मग आपण त्याची शहानिशा करता ते असत्य आहे हे समजते.
तसंच काहीसं या ‘जम्मू-काश्मीरमधील मशिदीत शस्त्र सापडली’ म्हणून दिलेल्या फोटोंच्या बाबतीत झालं आहे. अगदी ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ हे वर्णन इथं तंतोतंत लागू पडतं.
काश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, म्हणून कदाचित अति उत्साहाने असे प्रकार केले जात असावेत असा अंदाज.
पण अशा गोष्टी करणार्यांनी आपण लोकांना फसवत आहोत आणि चुकीचं वर्तन करत आहोत तसंच हे केल्याने समाजात अनुचित प्रकार घडू शकतील याचीही जाणीव त्यांनी ठेवायला हवी. बाकी सत्य ते सत्यच असतं. कधी ना कधीतरी ते जगासमोर येतंच.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.