विराट ध्रुवताऱ्याचा अस्त…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खमक्या आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री आणि त्याचं मेंगळट प्रशासन हाच माझा अनुभव सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र मंत्रालयाबद्दल आहे. मी पासपोर्ट काढायला दिला होता. नेमकी मी राहण्याची जागा त्याच वर्षी बदलली होती.
त्यामुळे दोन दोन पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड करावी लागते काई काय अशी वेळ आली. सुदैवाने ओळख प्रक्रिया एकाच पोलीस स्टेशनमध्ये झाली. पण पासपोर्ट आधीच्या घराकडच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिकडेच अडकून पडला.
तब्बल साडे तीन महिने यात निघून गेले. एक दिवस परराष्ट्र मंत्र्यांच्या तक्रार निवारण कक्षाला खरमरीत ईमेल पाठवला. “तुमच्यामुळे माझी एक फिनलँडची वारी हुकली आहे, अत्यंत मानाचं स्थान मला मिळणार होतं पण तुमच्या मंत्रालयात ते राहून गेलं.
पोलीस व्हेरिफिकेशन झालं पण पुढे काय झालं ते कळलंच नाही. कृपया माझ्या पासपोर्टचं काय झालं ते सांगू शकाल का?” या मेल नंतर चौथ्या दिवशी सकाळी माझा पासपोर्ट घरी आला होता. मंत्र्यांचा ठसा असतो तो हाच.
ध्रुवतारा हा सदैव चमकतो म्हणूनच मोठा नसतो. तर तो इतर ताऱ्यांपासून बराच दूर एकटाच तरीही आपलं ठसठशीत अस्तित्व दाखवून देत असतो.
२०१४ नंतरच्या सुषमा स्वराजांबद्दल हेच सांगता येईल. २०१४ आधीच्या सुषमा स्वराजांशी तुलना होईल कदाचित शुक्राची. सदैव प्रकाशमान. पण २०१४ पासून एक अंतर त्यांच्या वाट्याला आलं आणि तीच त्यांची सर्वात मोठी संधी ठरली.
अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांना उत्तम स्थान होतं. वयाच्या ४७ व्या वर्षी त्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात होत्या. तत्पूर्वी काही काळ दिल्लीचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं.
पण त्यांच्या त्या करारी व्यक्तिमत्वाची मोहिनी एवढी होती की ‘रांझणा’ सिनेमात दिल्लीची मुख्यमंत्री दाखवताना बोलणं आणि आवाजाचा पोत यात हे पात्र सुषमा स्वराज यांच्यावर बेतलेलं सरळ कळत होतं. तोपर्यंत सुमारे १४ वर्षे मुख्यमंत्री असणाऱ्या शीला दीक्षितांचा मागमूसही त्यात नव्हता.
त्याकाळच्या मंत्रालयात असताना सुषमा स्वराजांनी जो दबदबा निर्माण केला तो खूपच मोठा आणि महत्वाचा होता. वाजपेयी उतार वयाचे झाल्यावर अडवाणींच्या खालोखाल भाजपाला जर कोणी दिल्लीत चेहरा मिळवून देण्याचं काम केलं असेल तर सुषमा स्वराज यांनी.
विशेषतः प्रमोद महाजन यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांनी ही जबाबदारी उत्तम पेलली.
२००४ साली निवडणूक अनपेक्षितरित्या हरल्यावर केलेला थयथयाट आणि सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यास डोक्याचे केस पूर्ण कापायची धमकी हे प्रकरण सोडलं तर काहीतरी मूर्खपणाचं असं त्यांच्याकडून कधीच घडलं नाही. २००९ साली त्यांना लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळालं.
नुसता कॅबिनेट रँक, इतकंच विरोधी पक्षनेत्याचं महत्व नसतं. भाजपाची मशागत मोठ्या प्रमाणात सुरु झाली ती तेंव्हा. पक्षाला आपल्यापरीने गर्तेतून काढायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.
त्या काळात तत्कालीन मनमोहन सरकारचे घोटाळेच अधिक ऐकू यायला लागले. सरकारने जी ऐतिहासिक निर्नायकी व्यवस्था राबवली त्या काळात भाजपचे प्रवक्ते विविध टीव्ही चॅनेल्सवरून मुद्देसूदरीत्या विरोधी पक्षाची बाजू मांडत होते.
संसदेबाहेर हे प्रवक्ते तर संसदेत स्वराजबाई हे आदर्श विरोधी पक्षाचं उदाहरण तयार झालं होतं. घोटाळ्यांना अनुसरून त्यांनी तिरमिरीत एकंच प्रश्न तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना विचारला.
“तू इधर उधर की न बात कर ये बता कि क़ाफ़िला क्यूँ लुटा मुझे रहज़नों से गिला नहीं तिरी रहबरी का सवाल है.” हा हल्ला अक्षरशः गाजला. सरकारला सळो की पळो करण्यात त्यांचा मोठा हात होता.
नरेंद्र मोदींनी जेंव्हा भाजपाच्या राजकारणाचा पोत सत्ताकारणात बदलला तेंव्हा सुषमा स्वराजांच्या कारकिर्दीची खरी देस रागापासून अचानक शिवरंजनी सुरु झाली असं अनेकांना वाटलं. आणि त्यात सर्वथा अयोग्य असं काहीच नव्हतं.
देशाच्या तत्कालीन राजकारणात नरेंद्र मोदी नावाची ओसाडवाटेची मगर ही अजस्त्र डायनासोर होऊ लागली तेंव्हा वाजपेयी अडवाणी यांच्या काळातल्या कर्तृत्ववान नेत्यांना दिवस खराब येतात की काय अशी शंका वाटू लागली.
सुषमा स्वराज यांना परराष्ट्र खातं मिळालं आणि ती अजूनच दृढ झाली. पण सुषमा स्वराज यांना मनापासून सलाम ठोकायचा काळ सुरु झाला तो तेंव्हापासून.
परराष्ट्र मंत्रालय हा सुषमा स्वराज यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड. त्यांच्या आधी असणाऱ्या सलमान खुर्शीद एस. एम. कृष्णा किंवा नटवर सिंह यांच्या कोणत्याही धोरणापेक्षा किंवा कार्यक्षमतेपेक्षा त्यांच्या वागण्यामुळेच त्यांना लक्षात ठेवता आलं.
२००५ साली “सोव्हिएत महासंघ फुटणं ही जगातली एक अतिशय दुर्दैवी घटना होती” असं विधान करणारे नटवरसिंह असोत, किंवा कोणाशी आणि त्यातही महिलेशी किती वेळ हात मिळवायचा याचं भान नसलेले एस. एम. कृष्णा असोत.
किंवा वेळप्रसंगी धर्माला चिकटून राहू शकणारे सलमान खुर्शीद असोत, यांच्यापेक्षा सुषमा स्वराज यांचं वेगळेपण निव्वळ त्यांच्या त्या खात्यातल्या कामगिरीमुळे अधिक उजळून दिसलं.
परराष्ट्र खातं ही ज्यांना राजकारण समजत नाही, अश्या अनेकांच्या दृष्टीने मंत्रिमंडळातली तडीपारी असते. यात मोठी भर मोदी विरोधकांची पडली.
भारतातल्या कोणत्याही कामकाजात हस्तक्षेप करायचा अधिकार तुम्हाला नसतो म्हणजे राजकारणात असून तुम्ही बाहेर फेकलेले असता असं अनेकांचं मत असतं.
महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांना याच दृष्टिकोनातून परराष्ट्र खातं इंदिरा गांधींनी दिलं असं मानणारे अनेक आहेत. २०१४ साली अडवाणी, वाजपेयी, महाजन, मुरली मनोहर जोशी यांच्या राजकारणाचा बाज असणाऱ्या स्वराज यांना परराष्ट्र खातं देऊन नरेंद्र मोदींनी खड्यासारखं बाजूला सारलं अशीच भावना पसरवली गेली.
पण पुढे काहीतरी वेगळंच घडलं. निव्वळ पाकिस्तानात जाण्यासाठी उर्दू शिकणं किंवा कन्नड शिकून सोनिया गांधींसमोर बेल्लारीला टेचात उभं राहणं, याचसाठी सुषमा स्वराज राजकारणात आल्या नव्हत्या.
नरेंद्र मोदी हे अत्यंत मस्तवाल असणारे बिनडोक नेते असून त्यांचं शिक्षणही पूर्ण झालेलं नसल्याने त्यांना सत्तेवर आल्यावर कामकाजातली काय अक्कल असणार आहे? किंवा परराष्ट्र धोरण वगैरे गोष्टी कशाशी खातात हे मोदींना ठाऊक तरी आहे का?
असे प्रश्न विचारणारे आणि पत्रकारितेच्या मुखवट्याखाली निव्वळ दलाली करणारे सुमार भाट आज नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर पानंच्या पानं (अर्थातच वायफळ) लिहीत बसलेत.
परराष्ट्र धोरण चांगलं की वाईट हा एकवेळ वादाचा मुद्दा असेल पण तो दखलपात्र आहे की नाही यावर चर्चाही करायची गरज उरलेली नाही, एवढा नरेंद्र मोदी यांनी यात रस घेतला. या संपूर्ण कामगिरीचा एकखांबी तंबू तेंव्हा अर्थातच सुषमा स्वराज होत्या.
परराष्ट्र धोरणात रस म्हणून जेथे जेथे पंतप्रधान मोदींनी आपले दौरे केले तेथे तेथे सुषमा स्वराज आधी जाऊन आपला माहौल करायच्या. एकत्रित दौरे त्यांनी केलेले फार दिसून येत नाहीत. कारण दोन आठवडे आधी स्वराज यांची तेथील मंत्र्यांशी भेट झालेली असे.
नरेंद्र मोदींच्या विरोधापायी अडवाणी आणि स्वराज यांच्याबद्दल नाटकी गळे काढणारे बहुतेक विरोधक दोन आरोप करत. एक, स्वतः मोदीच सगळं करतात आणि दुसरा, मोदींना काहीच कळत नाही आणि सगळं स्वराज यांचंच यश.
पैकी पहिल्या आरोपात आपण मोदींचं यश अधोरेखित केलं हेच अनेकांच्या गावी नसे. अजून एक लाडका आरोप असा की मोदींच्या काळात मंत्री फार पुढेच नाही आले. आणि हेच पत्रकार लेखांवर लेख आर्थिक सामाजिक आणि परराष्ट्र धोरणाबद्दल लिहीत.
सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अर्थातच मनोहर पर्रीकर या मंडळींनी आपापल्या खात्याला मोठा चेहरा दिला. ही मंडळी लोकप्रिय झाली हे कोणीच नाकारत नाही. (यात अजून एक नाव, सुरेश प्रभू).
सुषमा स्वराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात संबंध कसे होते याचा एक मोठा किस्सा स्वतः मोदी यांनी ऐकवला आहे. अभिनेता अक्षय कुमारने मोदींना एक प्रश्न विचारला. “पंतप्रधान झाल्यावर युनोमध्ये तुमचं पाहिलं भाषण झालं तेंव्हा तुम्ही नर्व्हस होतात का?
मोदी म्हणाले, मी नर्व्हस नव्हतो, मी तर ओव्हर कॉन्फिडन्ट होतो. जाऊन भाषणच तर करायचंय, त्यात काय मोठं? मी एरवीही भाषण करतोच. मला अधिकाऱ्यांनीही ब्रिफींग करून ठेवलेलं होतंच.
सुषमा स्वराज बरोबर होत्या, त्यांनी विचारलं भाषणाची कॉपी कुठे आहे? मी म्हणालो त्याची काय गरज? त्या म्हणाल्या असं कसं चालेल, भाषण लिखित हवं आणि त्यातूनच बोलावं लागतं.
त्यांना अनुभव होता, मीही मग समजावून द्यायला लागलो, बराच वेळ आमची वादावादी सुरु होती, त्या अनुभवी होत्या, आपल्या म्हणण्यावर त्या ठामच राहिल्या. बराच वेळ चर्चा झाल्यावर शेवटी मग मसुदा तयार झाला, मग भाषण झालं.
मोदी हा प्रसंग स्वतःला कमीपणा येईल म्हणून लपवू शकले असते. पण त्यांनी त्यातून सुषमा स्वराज यांचं मोठेपण अधोरेखित केलं. आपण एका राज्याच्या राजकारणातून आलो असल्याने दिल्ली आपल्याला नवी आहे.
अश्या वेळी स्वराज यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला सांभाळून घेतलं हे सांगायला त्यांना कमीपणा कधीच वाटत नव्हता.
पुलवामाचा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केलेला होता, हे आपण जगाला अजूनही सांगू शकलो नाही. पण ते सांगत न बसता जगाच्या समोर आपण बालाकोट हवाई हल्ले केले. यानंतर जगातून आणि खास करून इस्लामिक देशांतून कुठलीही अस्वस्थता व्यक्त झाली नाही.
हे असतं परराष्ट्र धोरणाचं यश. त्यातही इस्लामिक देशांमध्ये जाऊन स्वराज यांच्या होणाऱ्या परिषदा हा स्वतंत्र लेखाचा मुद्दा होता. त्या पार्श्वभूमीवर त्या अधिकच उजळून निघतात.
त्यांच्या कारकिर्दीत नुसत्याच लूक ईस्ट पॉलिसीमध्ये ऍक्ट ईस्ट, म्हणजेच दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्याची सुरुवात आणली गेली. शेजाऱ्यांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला गेला. भारताने जगाला काय दिलं असा प्रश्न निराशावादी विचारतात.
सकारात्मकतावादी म्हणतात की ग्राहकाने बाजारपेठेला काय दिलं असा प्रश्नच मूर्खपणाचा. भारतीय पंतप्रधान जेंव्हा सौदीमध्ये गेले तेंव्हा त्यांना प्रवासासाठी इस्रायली विमान मिळालं होतं. इस्रायल आणि सौदीतले संबंध माहित असणाऱ्यांना याचं महत्व कळेल.
अनेकदा आखाती देशांमध्ये आपापसात भांडणं सुरु झाली की भारतीय लोकांच्या सुटकेचा प्रश्न निर्माण होई. तेंव्हा भारतीय लोकांच्या सुटकेसाठी काही काळ हल्ले थांबवण्याचं आश्वासनही हल्लेखोर देशांतर्फे दिलं जाई. जगभरात भारताच्या असलेल्या ऐपतीचा तो भाग होता.
अनेक भारतीयांची संकटातून सुटका त्यांनी करवली. निव्वळ ट्विटरवरच्या तक्रारींवर कारवाई केली जाई. प्रशासनाचा स्वान्तसुखाय आणि आंतरावरोध (इनर्शिया) असलेला स्वभाव लक्षात घेता हा भीम पराक्रम आहे हे लक्षात घ्यावं लागेल.
आपल्या सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता गगनचुंबी होती. पण म्हणून त्या त्याच्या आहारी गेल्या नाहीत. काहीवेळा त्यांच्या लोकप्रियतेचा पलटवार झाला पण त्या विचलित झाल्या नाहीत. एका आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलीला एका अधिकाऱ्याने पासपोर्ट नाकारला.
त्या मुलीने स्वराज यांच्याकडे तक्रार केली. स्वराज यांनी सर्व कागदपत्रे असूनही त्या पासपोर्ट दिला नाही म्हणून त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली. सोशल मीडियावर अक्षरशः रान पेटलं.
मुसलमान मुलाशी लग्न केलं म्हणून त्या मुलीला चिखलफेक सहन करावी लागली आणि स्वराज यांना मुस्लिम लांगूलचालनाचा आरोप सहन करावा लागला.
आपल्या निर्णयावर स्वराज ठाम राहिल्या आणि त्या अधिकाऱ्याची चुकाही सिद्ध झाली. असाच आरोप त्यांना ललित मोदीला मदत केली म्हणून सहन करावा लागला. त्यावेळी त्यांचं राहुल गांधींना उद्देशून ‘क्विड प्रो क्यो’ स्पष्ट करणारं भाषण निव्वळ सुरेख होतं.
त्या प्रकरणाची चर्चा पुढे थांबली. अनेकदा त्यांचे इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर फोटो येत. त्यात त्या एकट्या महिला असत. ही बाब कौतुकास्पदच.
त्यांच्या किडन्या खराब झाल्याने बदलाव्या लागल्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्याने त्या राजकीय जीवनातून लवकरच निवृत्त झाल्या. उभा पक्ष स्थापनेपासून ज्या मुद्द्यांवर ठाम होता त्यापैकी एक म्हणजे कलम ३७० मुद्दा संपलेला पाहताना त्यांनी डोळे मिटले. हा मृत्यू अकाली आहे, पण त्याला समाधानाची किनार आहे.
परराष्ट्र सेवेत उभी व्यावसायिक हयात काढलेले असूनही एस. जयशंकर यांच्यासारखे महानुभाव स्वतःला पोरकं समजतील की काय, असं सुषमा स्वराज यांच्या जाण्यामुळे वाटतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विराटपण ते हेच. म्हणून हा विराट ध्रुवताऱ्याचा अस्त ठरतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.